अवनी सरदेसाई
भाषा माणसांना जोडते, एकत्र आणते, असं म्हणतात. ते खरंही आहे. पॉला माक्ग्लिन सध्या हाच अनुभव प्रत्यक्ष जगते आहे. मराठी भाषेचा तिच्याशी असणारा अनुबंध उलगडताना पॉलाची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घ्यायला हवी. पॉला मूळची कॅनडाची. व्हॅन्कूव्हरची. कॅनडामध्येच ती फिल्म मेकिंग शिकली. त्याचाच एक भाग म्हणून तिला भारतीय चित्रपटांवर आधारित शोधनिबंध लिहिण्याची संधी मिळाली.
पॉला सांगते, ‘‘पूर्वी भारतीय चित्रपट म्हणजे ‘बॉलिवूड’ अशीच माझी समजूत होती, पण भारतात आल्यावर मी चित्रपट रसास्वादाची कार्यशाळा केली आणि माझे डोळे उघडले. २०१६ च्या सुमारास मला ‘पिंडदान’ या मराठी चित्रपटात भूमिका करण्याची संधी मिळाली. पण जी भूमिका होती, ती अस्खलित मराठी बोलणारी व्यक्तिरेखा होती. त्यामुळे मराठी भाषा शिकणं अपरिहार्य होतं. ती माझी मराठी भाषा शिकण्याची प्रत्यक्ष सुरुवात.’’ त्याआधी पॉला एका चित्रपटाच्या संहितेवर काम करत होती आणि त्याचं चित्रीकरण पुण्यात होतं. पुण्यात जाण्यासाठी तिने टॅक्सी शेअर केली तेव्हा तिचे सहप्रवासी होते सारंग साठय़े आणि
अनुशा नंदकुमार. ती सांगते, ‘‘या प्रवासात गप्पांच्या ओघात आमच्या तिघांच्याही लक्षात आलं, की आपल्या आवडी सारख्याच आहेत, जुळणाऱ्या आहेत. आपण एकत्र काम करू शकतो. त्यानंतर आम्ही ‘गुलबदन टॉकीज’ या नावानं कामाला सुरुवात केली. आम्हाला चित्रपट करायचा होता, पण ते शक्य होईना, तेव्हा आम्ही जाहिरातपट केले. सुदैवानं ते गाजले आणि वर्षभर तशी अनेक कामं आम्ही केली. दरम्यान, मुंबईत डिजिटल व्यासपीठावरील संधींची चर्चा करणाऱ्या एका परिसंवादानं मला प्रभावित केलं. डिजिटल प्लॅटफॉर्मवर तेव्हा मराठीत काय काय उपलब्ध आहे, याचा शोध सुरू झाला. फारसं काही सापडलं नाही. विचार आला, की मराठी बोलणारे, वाचणारे, ऐकणारे, पाहणारे सुमारे १० कोटी प्रेक्षक असताना, खास मराठी असा कंटेंट तेव्हाच्या डिजिटल व्यासपीठांवर नव्हता. जो होता तो अगदी चिमुकला होता.
आमच्या नंतरच्या डिजिटल उपक्रमाची म्हणजे ‘भाडिपा’ची बीजं त्यामध्ये होती.’’ पॉला सांगते. आपण इथेच, भारतात तेही पुण्यात राहून काम करायचं, हा पॉलाचा निर्णय एव्हाना पक्का झाला होता. इथे राहायचं, इथल्या सहकाऱ्यांबरोबर काम करायचं तर इथली भाषाही यायला हवी, हा विचार होताच. पण तात्कालिक निमित्त चित्रपटातल्या भूमिकेचं. सारंग मराठीच आणि अनुशासुद्धा उत्तम मराठी बोलते. पॉला सांगते, ‘‘चित्रपटाची संहिता देवनागरी लिपीत होती. मग व्याकरणाची पुस्तकं आणली आणि ‘अ, आ, इ, ई’ पासून सुरुवात केली. लिपी निराळी असली, की ‘हाऊ टू राइट’पासून सुरुवात करावी लागते. सुरुवातीला मी रोमन लिपीचा आधार घेतला, पण लवकरच ते उपयोगाचं नाही, हे लक्षात आलं. मग सलग तीन महिने नेटानं मराठीचा अभ्यास केला. त्याच वेळी मराठी संहितेचाही सराव सुरू होता. अशी मी जय्यत तयारी केली आणि आयत्या वेळी माझे संवाद बदलले! पण निभावून नेलं. नवीन भाषा शिकताना माणसापुढे जी आव्हानं येतात, ते सगळं या प्रक्रियेत होतं!
लिपी शिकली तरी प्रत्यक्ष भाषेतला वापर, ही वेगळीच गोष्ट असते, उदाहरणादाखल पॉला सांगते,‘‘ पडणे म्हणजे ‘टू फॉल’ एवढं एकच क्रियापद पण कितीतरी अर्थानी मराठी भाषेत वापरलं जातं. रस्त्यात माणूस पडतो, उमेदवार निवडणुकीत पडतो, चित्रपट पडतो आणि माणूस प्रेमात पण पडतो! अर्थात हे भाषेचं वैशिष्टय़ असतं आणि भाषेच्या समृद्धीचं, सौंदर्याचं लक्षणही. पण या प्रक्रियेनं मला प्रवास खडतर असल्याची जाणीव दिली, जी आजही कायम आहे. भाषा सतत ऐकणं, वाचणं, बोलणं, ती भाषा बोलणाऱ्यांच्या सहवासात राहणं आणि त्या भाषेतला कंटेंट पाहणं (निर्माणही करणं) यातून शब्दसंग्रह वाढतोय माझा. मराठी भाषेत मी आता लिहू, वाचू, बोलू शकते. आमच्या टीममध्ये ‘हिला मराठी येत नाही’ असं समजून मंडळी माझ्यासमोर बिनधास्त काहीही बोलत. पण एकदा मी त्यांना ‘मला मराठी समजतं’ चा शॉक दिला, तेव्हापासून ते जपून असतात! ‘भाडिपा’ लोकप्रिय झाली, त्याला मराठी भाषेचा पाया होता. त्यामुळं मराठी भाषा पद्धतशीर शिकण्याची माझी प्रक्रिया सुरूच आहे आणि राहील.’’
मुळात भाषा स्थिर नसतेच, ती प्रवाही असते. इतर भाषांचे प्रभाव, शब्द, अर्थ काळाच्या ओघात स्वीकारत भाषेचा प्रवाह वाहात असतो. मराठी भाषेनंदेखील कित्येक नवे शब्द सामावून घेतले आहेत. शिवाय युवा पिढी भोवतालच्या वातावरणातून, प्रवासांतून, अन्यभाषिक मित्रमैत्रिणींकडून, व्यावसायिक कारणांतून नवे शब्द मूळ भाषेत मिसळत असते. पॉला म्हणते, ‘‘मला अशी सरमिसळ आवडते. भाषेची मिश्रणं बहुतेक वेळा त्या त्या काळातली तरुणाई करते. असं मिक्सिंग मला भावतं. भाषेचा असा प्रवास मला व्यापक अर्थानं ‘कल्चर ट्रॅव्हल’ वाटतो. मराठी भाषा शिकताना बोलीभाषांची गोडी वेगळी असल्याचं जाणवलं. हे वैविध्य आपण पुरेसं वापरत नाही असं वाटतं. मला तर बोलीभाषा ‘साजऱ्या’ कराव्यात असं वाटतं. तसा प्रयत्न आम्ही ‘भाडिपा’मधून करणार आहोतच. प्रमाण भाषा महत्त्वाची आहेच, पण माझ्यासाठी मराठी भाषेचं ‘संवादी आणि प्रवाही’ रूप अधिक जवळचं आहे. भाषेनं मनामनांत संवादाचे, सौहार्दाचे सेतू उभारावेत. भाषेनं एकमेकांची मनं जोडावीत. ‘भाडिपा’चे आगामी प्रकल्प भाषेला केंद्रस्थानी ठेवूनच पुढे जातील. भविष्यात अस्सल मराठी कंटेंट डिबगच्या तंत्रानं अन्य ठिकाणी नेण्याचाही प्रयत्न आहे. समकालीन संगीतात काही प्रकल्प करायचे आहेत. वेब सिरीजवरही काम सुरू आहे. संहिता तयार होत आहेत. सारं काही भाषेच्या माध्यमातून, भाषेनं जोडू पाहणारं.. म्हणूनच महत्त्वाचं आणि आत्मीय वाटतं मला.’’ पूर्णत: अनोळखी असलेली एखादी भाषा शिकल्यावर जेव्हा त्यातल्या शब्दांचे, वाक्प्रचारांचे सूक्ष्म अर्थ कळायला लागतात, तेव्हा मनातल्या मनात खुदकन फुटणारं हसू ‘भाडिपा’वर पॉलानं सादर केलेल्या ‘मिस मॅनर्सचे संस्कार वर्ग’मध्ये तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकतं. मराठी भाषा अतिशय अर्थवाही असूनही गहनगम्य नाही, याची प्रचीतीच पॉलाची ही वाटचाल देते. मराठीजनांचा आपल्या भाषेबद्दलचा अभिमान द्विगुणित व्हावा आणि भाषासमृद्धीसाठी प्रत्येकाचा हातभार लागावा, यासाठी ही प्रेरणाही पुरेशी आहे!