मला आधुनिक काळातल्या सगळय़ा आधुनिक ययातिंना विचारायचं आहे, ‘स्वप्न पूर्ण होणं’ असं खरंच काही असतं का? तुमच्या मुलांनी नक्की किती जाहिराती केल्या, किती पैसे कमावले, किती सिनेमे केले की तुमचं स्वप्न पूर्ण झालं असं समजायचं? या सगळय़ाला अंत आहे? एक स्वप्न पूर्ण होणं पुरेसं आहे? मग पुढच्या स्वप्नाचं काय? ‘शेवटचं’ स्वप्न असं काही आहे का ज्यानंतर सगळं संपेल? स्वप्नांच्या या मिथ्या रस्त्यावर नेमकं कुठं थांबायचं हे कोण ठरवणार? मला वाटतं समजूत ठरवणार. आपणच आपली घातलेली समजूत!
ययाति आणि देवयानीचं लग्न झाल्यावर देवयानीची सखी आणि दासी शर्मिष्ठा हिच्या प्रेमात ययाति पडला. देवयानीपासून त्याचं हे नातं त्यांनी अर्थातच लपवलं. शर्मिष्ठेपासून त्याला मुलंही झाली. एके दिवशी योगायोगानं ती मुलं देवयानीसमोर आली, ‘‘तुम्ही कुणाची मुलं?’’ असं तिने विचारताच त्यांनी ययातिकडे अंगुलिनिर्देश केला आणि देवयानीला धक्काच बसला. व्यथित होऊन ती माहेरी तिचे वडील म्हणजे असुरांचे गुरू शुक्राचार्य यांच्याकडे गेली. मुलीच्या दु:खाने संतापलेल्या शुक्राचार्यानी तत्क्षणी ययातिला शाप दिला आणि ययाति क्षणात वृद्ध झाला. त्याने उ:शापाची विनवणी करताच शुक्राचार्यानी शाप जरा शिथिल केला आणि म्हणाले, ‘‘तुझ्या पुत्रांपैकी कुणाला तरी तुझं वृद्धत्व देऊन त्या बदल्यात त्याचं तारुण्य घेऊन तू पुन्हा तरुण होऊ शकशील.’’ त्यानंतरचं ययातिचं वागणं मला नेहमीच स्तिमित करत आलं आहे. एक क्षणही त्याचं मन द्विधा झालेलं दिसत नाही. आपण आपल्या पुत्राचं तारुण्य घेतलं तर आपल्या पुत्राचं काय? हा विचारही त्याच्या मनाला शिवल्याचं मी तरी ऐकलं-वाचलेलं नाही. तो त्याच्या सर्व मुलांकडे त्यांचं तारुण्य मागतो. सर्व मुलं नकार देतात; फक्त धाकटा ‘पुरू’ सोडून. ‘पुरू’ हा त्याला शर्मिष्ठेपासून झालेला धाकटा मुलगा. तो त्याचं तारुण्य वडिलांना देऊन क्षणात वृद्ध होतो आणि ययाति तरणाबांड होऊन तारुण्यातली सगळीच सुखं विशेषत: शृंगारसुख अनुभवायला आनंदाने मोकळा होतो. त्या काळात सगळय़ांची वयं कितीही असू शकायची. त्यामुळे हजार वर्षे ययाति हे तारुण्य छान उपभोगतो. मला सारखं वाटतं ती हजार वर्षे ‘पुरूचं’ काय होत गेलं असेल? असं अकाली एकदम वृद्धच होऊन बसण्यानं? तारुण्याची काही सुखं उपभोगताच न आल्यानं? ययातिनं भले राज्य पुरूच्या नावावर केलं असेल, पण आपण आनंदात तारुण्य उपभोगताना आपला मुलगा वृद्ध जर्जर फिरतो आहे, याची टोचणी लागायला ययातिला हजार वर्षे लागावी? हजार?
 काही दिवसांपूर्वी एका मोठय़ा नटाच्या मुलाशी ओळख झाली, मैत्रीही झाली. त्याचे वडील यशस्वी, श्रीमंत नट. त्यांचा मुलगा यातलं काहीच नाही. तो अभिनेता नाही. त्याला व्हायचंही नाही. पण त्याला निवडीचा अधिकारच नाही. त्यानं त्याचं वडील व्हायचं अशी त्याच्यावर सक्ती आहे. त्यानं त्याचे ‘तरुणपणीचे वडील’ जसे होते तसं व्हायचं आहे. तंतोतंत. वडिलांचं स्टारपद जुनं होत चाललेलं. त्यानं ते परत नव्यानं मिळवायचं आहे. कारण वडिलांना म्हातारं होणं मान्य नाही. त्यांना कायमच ‘स्टार’ आणि ‘राजा’ राहायचं आहे. आता त्यांना त्याचं आयुष्य जगायचं आहे या तरुण मुलाकरवी. त्यामुळे त्या मुलाला अभिनयाचा गंध नसला तरी दुसरी कुठलीही वाट चालण्याची परवानगीच नाही. त्याला जे येतंच नाही ते तो कसं मिळवू शकणार, या जीवघेण्या दडपणानं तो तरणाबांड मुलगा अकाली वृद्ध होऊन बसला आहे. आणि त्या तरुण मुलाला मारूनमुटकून ‘हिरो’ करण्याच्या इर्षेने ते म्हातारे वडील एक उत्साही तरुण बनत चालले आहेत. त्या मुलाला या सगळय़ा दडपणांनी अनेक मानसिक आजार जडलेत. त्यानं कितीतरी वेळा मनगट कापून आत्महत्येचे प्रयत्न केले आहेत. मी त्याच्या मनगटावरचे ते व्रण बघून धसकून त्याला म्हटलं, ‘‘तू मानसोपचारतज्ज्ञाची मदत का नाही घेत?’’ यावर तो म्हणाला, ‘‘बाबा म्हणतात तू माझा मुलगा आहेस, या सिंहाचा मुलगा, आणि माझा मुलगा शूर असतो. तो मानसोपचार वगैरे फालतू गोष्टींची मदत घेण्याइतका पेद्रू नसतो!’’ तो मुलगा परत परत अयशस्वी होतो, तेव्हा ते वडील कुणा ज्योतिषाला बोलावतात. ज्योतिषी सांगतो, ‘‘अजून तमुक वर्षांनी साडेसाती संपेल. मग यशच यश!’’ वडिलांचे डोळे पुन्हा एकदा लकाकतात. ते अजून तरुण होतात. नव्या जोमानं सिक्स पॅक करून देणाऱ्या नव्या व्यायाम मास्तरला बोलावतात. मुलाचा व्यायाम वाढवतात. मुलाला खायची खूप आवड आहे. पण परवानगी नाही. घरात एवढी श्रीमंती असताना, त्याची भावंड उंची-उंची चविष्ट पदार्थ ओरपत असताना याचं मात्र कडक उपवासाचं ‘डाएट’ सुरू असतं. तो मिटक्या मारणाऱ्या आपल्या भावंडाकडे असुसून पाहत त्याच्या ताटातल्या हिरव्या-कच्च्या पानांचं बेचव जेवण जेवतो. ययातिनं आपलं सगळं राज्य ‘पुरू’च्या नावावर केलं तसं हे आधुनिक ‘ययाति’सुद्धा त्यांची सगळी संपत्ती या आधुनिक ‘पुरू’च्या नावे करतीलही कदाचित. पण तोवर त्या पुरूचं ओझं तो कुठवर पेलू शकणार आहे? मी या क्षेत्रात नवीन होते तेव्हा मला अभिनेते मोहन जोशी यांनी सांगितलेली एक गोष्ट मी कधीच विसरणार नाही. ते म्हणाले होते, ‘‘हे बघ, अनेक जणं यशस्वी होतात. यशाचा सिंहासनावर जाऊन बसतात. ते ठीकच आहे. पण प्रत्येकाच्या आयुष्यात सिंहासनावरून उतरायची वेळ येते. दुसरा कुणी नवा, तरुण त्या सिंहासनापाशी येऊन पोचलेला असतो. या उतरायच्या वेळी उदार मनानं सिंहासनावरून उठून ‘आता तू बस!’ असं म्हणता आलं पाहिजे! ’’    
सिंहासनावरून उतरायच्या वेळी भल्याभल्यांचे ‘ययाति’ झालेले मी पाहते आहे आणि त्यांच्या पोटी आलेल्या पुरूंचे हाल बघून अस्वस्थ व्हायला होतं आहे. तरी काही जणं सिंहासनापर्यंत पोचतात तरी. काही जण तिथपर्यंत पोचण्याआधीच दमतात आणि मग आपलं दमणं विसरून आपल्या मुलांना सक्तीनं त्याच वाटेवर चालायला लावतात. नव्या आंधळय़ा आशेनं, ‘मी नाही तर माझा मुलगा तरी तिथं पोचेल’ या धडपडीनं. त्यांची मुलं मग लहान वयातच या क्षेत्रात येतात. लहानपणीच जाहिराती, सिनेमे करून पैसे कमवायला लागतात. घर चालवायला लागतात. लहानपणीच मोठी होऊन बसतात. अर्थात सगळय़ाच मुलांचं असं असतं असं नाही. काही मुलांना आतूनच या क्षेत्रात यायचं असतं. आवडत असतं. पण काहींना नसतं यायचं. जाहिरातींच्या निवड चाचण्यांना अशी अनेक मारूनमुटकून आणलेली मुलं मी पाहते. तिथं त्यांनी संवाद नीट बोलावेत म्हणून समोरून त्यांचे आई-बाबा डोळे वटारत असतात. त्यांना फटक्यांच्या धमक्या देत असतात. त्या धमक्यांना घाबरून कशीबशी ती निवडचाचणी पार करून ती मुलं प्रत्यक्ष जाहिरातीच्या चित्रीकरणाला येतात. तासन्तास प्रखर दिव्यासमोर चित्रीकरण करून थकतात- कंटाळतात. मग संवाद येईनासे होतात. मग त्यांना ओरडा बसायला लागतो. त्या ओरडय़ानं डोळय़ात तरारणाऱ्या पाण्याचे आवंडे गिळत कसंबसं तोंड हसरं ठेवून शॉट देतात तेव्हा त्यांचे रडवेले, पण हसू पाहणारे चेहरे मला सुरकुतलेले आणि वृद्ध दिसतात. गप्पागप्पांमध्ये मग त्या लहानांचे आई किंवा वडील सांगतात, ‘‘माझी खूप इच्छा होती या क्षेत्रात यायची, पण जमलंच नाही. आता माझी छोटी माझं स्वप्न पूर्ण करेल.’’ मला आधुनिक काळातल्या या सगळय़ा आधुनिक ययातिंना विचारायचं आहे, ‘स्वप्न पूर्ण होणं’ असं खरंच काही असतं का? तुमच्या मुलांनी नक्की किती जाहिराती केल्या, किती पैसे कमवले, किती सिनेमे केले की तुमचं स्वप्न पूर्ण झालं असं समजायचं? या सगळय़ाला अंत आहे? एक स्वप्न पूर्ण होणं पुरेसं आहे? मग पुढच्या स्वप्नाचं काय? ‘शेवटचं’ स्वप्न असं काही आहे का ज्यानंतर सगळं संपेल? स्वप्नांच्या या मिथ्या रस्त्यावर नेमकं कुठं थांबायचं हे कोण ठरवणार? मला वाटतं समजूत ठरवणार. आपणच आपली घातलेली समजूत. सिंहासनापर्यंत पोचूच न शकणं किंवा सिंहासनावरून खाली उतरायला लागणं, दोन्हीचं दु:ख जीवघेणं असतं. पण ययातिंनो, हे तुमचं दु:ख तुम्ही तुमच्यापाशीच ठेवाल का? त्या दु:खाचा उतारा तुमच्या मुलाला सक्तीनं तुमचाच रस्ता चालायला लावणं हा नाही हे समजून घ्याल का? मला ययातिच्या गोष्टीचा शेवट आठवतो. ययातिनं हजार वर्षे तारुण्याचं सुख उपभोगल्यावर त्याला साक्षात्कार झाला, त्यानंतर तो म्हणाला, ‘‘लोभावर ज्याचा ताबा नसेल त्याला जगातली सर्वोत्तम खाद्य, संपत्ती, स्त्रिया हे सगळंच्या सगळं जरी उपभोगायला दिलं तरी तो समाधानी होणार नाही. लोभाला बळी पडून लोभ संपत नाही तर वाढत जातो. आगीत तूप टाकावं तसा. म्हणून ज्याला शांतता आणि समाधान हवं असेल त्यानं अशा कशाच्या तरी मागं जावं जे कधीच वृद्ध होत नाही. आणि शरीर वृद्ध झालं तरी संपतही नाही’’ या साक्षात्कारानंतर त्यानं पुरूचं तारुण्य त्याला परत केलं आणि स्वत:चे वृद्धत्व पुरूकडून परत घेऊन तो अध्यात्माच्या अभ्यासात रममाण झाला.
महाभारत काळात चमत्कार होत होते. त्यामुळे हजार वर्षांनंतर ययाति पुरूचं तारुण्य त्याला परत करू शकला. पण आत्ताच्या काळात तुमच्या मुलाचे हे एकुलतं एक आयुष्य असं अकाली वृद्ध होण्यात निघून गेलं तर कुठल्या शक्तीनं त्याचं गेलेलं बालपण आणि तारुण्य तुम्ही त्याला परत देऊ शकणार आहात? ययातिंनो, तुम्ही तुमच्या पुरूंना त्यांच्या त्यांच्या वेगळय़ा रस्त्यांनी जाऊ द्याल का? त्यांना तरुण असू द्याल? तुम्हाला महाभारतातल्या पुरूच्या अकाली वृद्धत्वाची शपथ!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा