डॉ. मंजूषा देशपांडे
प्रत्येक मैलावर बोलीभाषा बदलते, तशी प्रत्येक ठिकाणची खाद्यासंस्कृतीही बदलत असते. स्थलांतरितांना त्याची जाणीव सर्वात आधी होते, विशेषत: लग्न करून सासरी गेलेल्या नववधूंना तिथल्या खाद्यासंस्कृतीशी जुळवून घेताना कठीणच जातं. साहित्य तेच पण पदार्थ वेगवेगळे, ते करण्याच्या पद्धती वेगळ्या आणि चवीही वेगळ्या. त्यातून काही मजेशीर प्रसंग घडतात तर काही वेळा वेगळेच पदार्थ तयार केले जातात. खाण्याचा शरीरावर परिणाम होतोच, पण मनावर-भावनेवर तो जास्त होतो. यातूनच खाद्यासंस्कृती कशी घडत जाते ते उलगडून सांगणारा लेख. पुण्याची दंतचिकित्सक अर्थात डेन्टिस्ट विजया लग्न होऊन सासरी हिंगणघाटला आली. हिंगणघाट म्हणजे वर्धा जिल्ह्यातील एक तालुका. तिच्या सासरचे सगळेच डॉक्टर. त्याशिवाय घरची शेती होतीच. तिच्या माहेरच्या जेवणखाण्यापेक्षा साहजिकच सासरचे सगळेच पदार्थ तिला नवीन वाटायचे. पण हळूहळू एकेका पदार्थांची नावं आणि चवही तिच्या अंगवळणी पडत होती. तिच्या लग्नानंतरची पहिली संक्रांत आली.

हेही वाचा : ध्वनिसौंदर्य : असह्य कलकलाटातून सुस्वरांकडे…

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा

तिच्या सासूबाईंनी, शेतातून आलेले दोन किलो तीळ धुऊन वाळत ठेवले होते. ‘‘एवढे तीळ कशाला?’’ तिनं हळूच सासूबाईंना विचारलं. ‘‘तुहा तिळवा करावा लागते नं!’’ तिच्या आजेसासूबाईंनी सांगितलं. तिच्या सासूबाईंनी संक्रांतीच्या आदल्या दिवशी सगळे तीळ भाजले. तीळ आणि गूळ खलबत्त्यात कुटून कुटून त्याचे टेनिसच्या बॉलपेक्षा थोडे मोठे लाडू बांधले. भाजलेले तीळ कुटल्यामुळे त्यातलं तेल सुटून लाडू चवीला एकदमच छान झाले होते. मग विजयानंही मोठ्या हौसेनं, तिच्या पद्धतीनं गुळाच्या पाकातले लाडू बनवले, थोडे कडकच झाले ते. ते लाडू खाताना त्यांच्या शेजारची म्हणाली, ‘‘भल्ली सून भेटली वो डाक्तरीणबाई तुमाले, थे अगोदर लोकाईचे दात पाडन. मंग त्याहिले दवा दारू करंन! ह्ये का लाडू होय का?’’ तिनं केलेले ते लाडू खाऊन तिच्या घरातले कोणी काही प्रत्यक्ष बोलले नसले तरी त्यांचंही मत तसंच असणार हे तिच्या लक्षात आलं. तिच्या सासरी तिच्या माहेरहून आलेल्या पदार्थांची चव फारशी आवडत नाही हे तिला एव्हाना कळलं होतं. तिलाही खरं तर सासरच्या घरातलं कोणतंच खाणं आणि खाण्याशी संबंधित पद्धतीही आवडायच्या नाहीत. अनेकदा ते जेवण पचायचं नाही. तिच्या घरी केल्या जाणाऱ्या पालेभाज्या, आमटी अगदी गेलाबाजार भरल्या वांग्याची सरही इथल्या कोणत्याही पदार्थाला नाही, असं तिला मनोमन वाटायचं. पण सांगणार कुणाला?

ही कहाणी एकट्या विजयाची नाही. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकीची आहे. विजयाचं तिथं लग्न झालं असल्यामुळे ती त्या घरातील स्थलांतरित व्यक्ती आहे. मूळ ठिकाणी राहणाऱ्यांच्या खानपान पद्धतीला तिथल्या समाजात प्राथमिक दर्जा असतो. तेच दुसऱ्या ठिकाणाहून आलेल्या स्थलांतरित व्यक्ती आणि त्यांच्या पद्धतींना दुय्यम दर्जा आपोआपच मिळतो, निदान सुरुवातीला तरी. माणसं शिक्षण, नोकरीनिमित्त दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. स्थलांतरित व्यक्ती, त्यांची खाद्यासंस्कृती आणि स्थलांतरामुळे त्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम हा मोठा अभ्यासाचा विषय आहे; परंतु मुळात ‘स्थलांतराचा स्त्रियांवर होणारा परिणाम’ या विषयावर तुलनेनं खूपच कमी अभ्यास झालेला आहे.

वास्तविक लग्न करून सासरी गेलेल्या तरुणी या कायमच्या स्थलांतरितच असतात. लग्नामुळे होणारे स्थलांतर हे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक, मानसिक आणि भावनिक अशा सर्व प्रकारचं असतं. स्थलांतर कोणत्याही प्रकारचं असलं तरी त्याचा पहिला परिणाम स्थलांतरितांच्या खाद्यासंस्कृतीवर होतो. त्यात नववधूनं लगेचच सासरच्या स्वयंपाकघरात काम करणं अनेकांच्या घरी अपेक्षित असतं. कोल्हापूरच्या निलूचं लग्न मुंबईतल्या कुटुंबात झालं. तिच्या सासूबाईंना ‘फुलब्राइट फेलोशिप’ मिळाली नि त्या त्यांच्या कामात व्यग्र झाल्या. लग्नाच्या तिसऱ्या दिवसापासून तिलाच स्वयंपाक करायला लागला. त्यात तिच्या सासूबाई फारच सुगरण आणि ‘सुपर वूमन’ असल्यानं सगळा स्वयंपाक करून प्राध्यापकीही करत. सवय नसल्यानं निलूची फारच तारांबळ व्हायची. एवढं करूनही ‘आमची आई अमुक पदार्थ असा नाही करत, तसा करते, तुझा हा पदार्थ तसा चांगला झालाय, पण आईच्या हातची चव नाही,’ असं नवरा, सासरा, दीर आणि नणंद यांच्याकडून सतत ऐकावं लागे ते वेगळंच. निलूला अगदी पळून जावंसं वाटायचं.

अर्थातच हल्ली दळणवळणाची साधनं वाढलेली आहेत. ‘यूट्यूब’वर पाककृती चॅनल्स असतात आणि शहरांमध्ये अनेक गोष्टी उपलब्धही असतात. त्यामुळे लग्नानंतर जवळच्या शहरात स्थलांतरित झालेल्या मुलींच्या खाण्यापिण्यावर त्या मानाने कमी परिणाम जाणवतो. खरी पंचाईत होते ती लग्न होऊन वेगळी किंवा टोकाची वेगळी खाद्यासंस्कृती असलेल्या दुसऱ्या जिल्ह्यात, निमशहरात किंवा तालुक्यासारख्या ठिकाणी जाणाऱ्या मुलींची. अगदी समान परिस्थितीतल्या आणि त्याच गावातील कुटुंबात लग्न केलं तरी प्रत्येक घराची खाद्यासंस्कृती वेगळी असतेच. आपलं खाणं हे आपल्या मन आणि भावनांशी निगडित असतं. रेखाच्या घरचंच उदाहरण पाहा ना! रेखाच्या घरात पोहे करताना मिरच्यांबरोबर थोडंसं तिखटही (लाल मिरच्यांची पूड) घालतात. सवयीनं ती इथंही तेच करायची, तिच्या या पोह्यात तिखट घालण्याच्या सवयीचा सासरच्या सर्वांना मानसिक त्रास व्हायचा. प्रत्येक वेळी तिला त्याबद्दल ऐकून घ्यावं लागायचं आणि ती हिरमुसली व्हायची.

हेही वाचा : स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’

अनेकदा नवविवाहित मुलींना, सुरुवातीच्या काळात नव्या ठिकाणची खाद्याभाषा समजत नसते. साताऱ्यातली सुलेखा वर्ध्याला लग्न होऊन गेली. एकदा तिला सासूनं, कढीसाठी गोडलिंब आणायला सांगितला. गोडलिंब म्हणजे काय, ते तिला काही माहिती नव्हतं. तिनं सरळ त्यांच्यापुढे गोड लिंबाची बरणी ठेवली. ही घटना आजही तिच्या सासरी विनोदानं उगाळली जाते. पुण्यातल्या वनिताचं लग्न वर्ध्याच्या तरुणाशी झालं. त्यांच्या शेतातला तांबडा भोपळा घरात आल्याबरोबर ‘कोहळ्यांची बोंडं’ करण्याचा बेत सुरू झाला. तिनं त्या पदार्थाचं कधी नावही ऐकलेलं नव्हतं. मुळात त्यांच्याकडे तांबड्या भोपळ्यालाच कोहळा म्हणतात, हे पण तिला माहीत नव्हतं. ‘बोंडांच्या पाककृतीचं’ वर्णन ऐकून ती म्हणाली, ‘‘आम्ही तर त्याला भोपळ्याच्या घाऱ्या म्हणतो.’’ पण प्रत्यक्षात बोंडे आणि घाऱ्याचे घटक पदार्थ एकच असले तरी चवीत आणि रूपातही फारच फरक असतो. खरं सांगायचं तर घाऱ्यांपेक्षा बोंडं अधिक चवदार असतात. त्यामुळे वनिता हळूहळू उत्तम बोंडं करायला शिकली हा भाग वेगळा. वनिताच्या अगदी सख्ख्या मैत्रिणीचं लग्न तिच्या नवऱ्याच्या मित्राशी झालं. पश्चिम महाराष्ट्रात वाढलेली सुजाता फार सुरेख ज्वारीच्या भाकऱ्या करायची. तिच्या सासरी भाकऱ्या खायची पद्धतच नव्हती. तरी एकदा तिनं भाकरी, भरली वांगी, दही, ठेचा, पाटवड्या, खिचडी असा साग्रसंगीत बेत आखला. तिला तव्यावर भाकरी उलटण्यासाठी उलथनं हवं होतं. तिच्या सासू आणि नणंदेला ‘उलथनं’ हा शब्दच माहीत नव्हता. तिकडे ‘सराता’ म्हणतात. त्यामुळे बऱ्याच वेळानं तिला उलथनं मिळालं आणि सासरच्यांना वेगळी चव म्हणून तिचं त्या दिवशीचं जेवणही आवडलं. सुजाता मसालेभाताला ‘काळा भात’ म्हणायची. त्यावरून तिचं सासरी फारच हसं व्हायचं. पण ती आता दुर्लक्ष करायला शिकली आहे. सुजाताला रोज आमटी-भात खायची सवय होती. पण तिनं केलेली आमटी कुणालाच आवडायची नाही. उलट त्यांच्या घरातील आंबट-गोड फोडणीचं वरण शिकून घेण्याचा तिला आग्रह व्हायचा. खरं तर आमटी आणि फोडणीच्या वरणासाठी लागणारे घटक पदार्थ तेच असतात. चव मात्र पूर्ण वेगळी असते. आता सुजाता दोन्ही प्रकारे आमटी करते.

नव्या पदार्थांची सवय जिभेला आणि पोटालाही नसते. नवविवाहित मुलींना हमखास पोटाचा त्रास होतो. कोकणात किंवा गोव्यात वाढलेल्या मुली लग्न होऊन ‘घाटा’वर आल्या की त्यांना सुरुवातीला वाटपाशिवायचं जेवण अजिबातच जात नाही. मुंबईहून कोल्हापूरला लग्न होऊन आलेल्या मनीषाला हे स्थलांतर फार काही शिकवून गेलं. तिच्या सासरी साधा वरण-भात फक्त उपास सोडण्याच्या दिवशीच खात. त्यातही त्या वरणात फक्त मीठ आणि हळद घालत. एरवी कोल्हापुरी कांदा-लसणाच्या चटणीचा वापर करून केलेली पातळ आमटी असायची. भाज्या आणि उसळीतही तेच मसाले घालत असल्यामुळे सगळेच पदार्थ तिखट असायचे. त्यात सगळ्यांना आवडणारा रोजचा नाश्ता म्हणजे शिळ्या भाकरीवर चटणी आणि तेल घालून केलेला कुस्करा. सगळेच पदार्थ एवढे तिखट असायचे की तिला जेवण जायचंच नाही. लग्नानंतरच्या महिनाभरात तिचं वजन चक्क आठ किलोंनी कमी झालं. पण हळूहळू मनीषानं सासरी आवडणाऱ्या पदार्थांनाच नवं रूप दिलं. त्यामुळे खरोखरच आरोग्यदायी असलेली मनीषाची खाद्यासंस्कृती त्या घरानं स्वीकारली. तशीच कोल्हापूरच्या जैन समाजातली अरू, तिच्या कॉलेजमधल्या सहाध्यायाशी लग्न करून जळगावला लेवापाटील कुटुंबात सासरी गेली. तेव्हा तिला किती तरी नवीन पदार्थांची माहिती झाली. चवही छान असायची, तिला आवडायची, पण तिच्या पोटाला मात्र लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घातलेले पदार्थखायची सवय नव्हती. परिणामी, तिला अॅसिडिटी सुरू झाली. पण तिला त्या पदार्थांची चव इतकी आवडली की, तिनं त्या पदार्थांशी स्वत:ला जुळवून घेतलं.

नागपूरच्या शिल्पाचं लग्न पणजीतल्या तरुणाशी झालं. दोघेही नोकरीसाठी पुण्यात राहायचे. नवऱ्याला ज्यात त्यात ओलं खोबरं लागायचं. शिल्पालाही खरं तर खोबऱ्याचे पदार्थ आवडायचे, कोणते तर ओल्या नारळाच्या करंज्या आणि वड्या. ओल्या खोबऱ्याचा वापर भाजी, आमटी किंवा पोह्यावरही टाकायला केला जातो याची तिला सुतराम कल्पना नव्हती. तिला कोकम तर माहितीसुद्धा नव्हतं. शिल्पा तिच्या आईकडून मसाले आणायची. त्या कोरड्या, तिखट आणि मसालेदार भाज्या तिच्या नवऱ्याला मुळीच आवडायच्या नाहीत. त्या दोघांची खाण्याच्या पदार्थांवरून एवढी भांडणं व्हायला लागली की, प्रकरण अगदी लग्न मोडण्यापर्यंत गेलं, पण हळूहळू दोघांनीही एकमेकांच्या खाद्यापदार्थांना आपल्या सोयीनुसार रूप दिलं आणि लग्न वाचलं.

आपल्याला अतिशय आवडणारे उकडीचे मोदक आपल्या विदर्भातील सासरच्या लोकांना पाहायलाही आवडत नाहीत, याचा कोकणातून अमरावतीला लग्न होऊन गेलेल्या वीणाला त्रासच झाला, पण सर्वांत दुखावणारी गोष्ट म्हणजे तिनं केलेले उकडीचे मोदक त्यांना आवडलेच नाहीत. वास्तविक तिच्या सासरी संक्रांतीला तिळगुळाचे सारण भरून तांदळाच्या उकडीच्या करंज्या करतात. पण त्यानंतर त्या तुपात तळतात. तिनंही उकडीचे मोदक तळले पाहिजेत, असं तिच्या सासूबाई सांगायच्या तेव्हा वीणा अगदी वैतागून जायची.

हेही वाचा : रिकामटेकडी

पश्चिम महाराष्ट्रात खाद्यापदार्थ करताना विशेषत: बिगर शेतकरी कुटुंबात पदार्थांचा रंग, नाजूकपणा, खमंग चव आणि सजावट यालाही फार महत्त्व असतं. विदर्भ-मराठवाड्यात खाद्यापदार्थांची चवच महत्त्वाची असते. पदार्थांच्या बाह्यरूपाला तिथं फारसं महत्त्व दिलं जात नाही. नववधूंना ते तसं स्वीकारणंही जड जातं. बार्शीच्या पांढऱ्या शुभ्र शाळूच्या (ज्वारी) भाकरी खाणाऱ्या गौरीला लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात जळगावच्या काळसर दिसणाऱ्या कळणाच्या भाकरी मुळीच आवडत नसत.

अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्या पाहण्यात असतात. परगावी लग्न झाल्यानंतर म्हणजेच स्थलांतराच्या सुरुवातीच्या काळात किती जरी त्रास झाला तरी हळूहळू त्या तरुणींना, तिच्या आवडीनिवडींनाही नव्या घरात स्वीकारलं जातं. ती मुलगीही सासरच्या घरातल्या बऱ्याच गोष्टी स्वीकारते. स्थलांतराच्या प्रक्रियेत हळूहळू जुने पदार्थ विसरले जातात आणि नवे खाद्यापदार्थ पदार्थ जन्माला येतात. उदाहरणार्थ, साखर आणि गूळ घातलेली फार जाड आणि फार पातळ नसलेली पुरणपोळी, कच्चा मसाला भरून केलेल्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारचे भात, लोणची, चटण्या, कोशिंबिरी, भज्यांची आमटी. कोकणातल्या खांतोळ्याचे विदर्भातले रूप म्हणजे रवा आणि सुक्या खोबऱ्याच्या वड्या इत्यादी.

स्थलांतरामुळे निर्माण झालेली नवी खाद्यासंस्कृती हा खरं तर स्वतंत्र विषय आहे, पण खाद्यासंस्कृती समृद्ध होण्यासाठी स्थलांतराचा, तेही रोजचा स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांचा मोठा सहभाग असतो यात काही शंका नाही.

dmanjusha65@gmail.com

सासरमाहेरचं स्वयंपाकघर

काळाच्या ओघात प्रत्येक घराची अशी स्वतंत्र खाद्यासंस्कृती विकसित होत जाते. मात्र त्याआधी बरेच ‘पापड बेलने पडते है।’ तुमच्याही काही आठवणी असतीलच, विशेषत: स्त्रीवर्गाच्या. माहेरी स्वयंपाकाची एक पद्धत, तर सासरी दुसरी. काही पदार्थांची नावे वेगळी तर काही पदार्थच वेगळे, करण्याची पद्धत वेगळी त्यामुळे चवही वेगळी. त्यामुळे तुमच्यावर कोणकोणते ‘समरप्रसंग’ बेतले, की गमतीशीर घटना घडल्या, की तुम्ही काही वेगळंच शिकलात ते आम्हालाही कळवा. ‘माझी खाद्यासंस्कृती’ या नावाने, आमच्या ईमेलवर.

chaturang.loksatta@gmail.com

(लेखिकेने ‘स्थलांतराचा स्त्रियांवर होणारा परिणाम’ या विषयात पीएच.डी. केलेली आहे.)

Story img Loader