जेव्हा संदेशने व्हीलचेअरवरून मला ढकलत डॉक्टरच्या केबिनपर्यंत नेलं, तेव्हा त्या काही फुटाच्या अंतराने मला पुढच्या एका लांबच लांब रस्त्यावर चालायला भाग पाडलं. माझ्या आरोग्याचा रस्ता.. डोळे पुसता पुसताच ठरवलं, ‘‘मी थांबते आहे. माझ्या आरोग्यापाशी. उशीर झाला आहे. पण खूप नाही. अजून वय माझ्या बाजूनं आहे..‘‘चदरिया झिनी रे झिनी’’ चा प्रत्यय मी घेणार आहे..
नसिरुद्दीन शाह यांचा राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातला पहिला क्लास. ते शिकवायला येणार म्हणून ते यायच्या किती तरी दिवस आधीपासून भारून गेलो होतो आम्ही सगळे . आणि तो दिवस उगवला. क्लासच्या वेळेच्या आधीच आम्ही आरसे लावलेल्या आमच्या अभिनयवर्गात डोळ्यांत आणि कानांत प्राण आणून बसलो होतो. ते काय सांगतील, ‘अभिनय’ नावाच्या या न संपणाऱ्या प्रवासाची आमची सुरुवात ते कशापासून करून देतील, इतक्या मोठय़ा नटाच्या लेखी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल.. अशा उत्सुकतेत आम्ही असतानाच आमच्या वर्गाचं दार धाडदिशी उघडून नसीरसर आतमध्ये आले. त्यांच्या हातात एक पांढऱ्या रंगाची गुंडाळी होती. आत येताच त्यांनी ती फर्र्रदिशी उघडली. मी उत्सुकतेनं पाहिलं आणि माझा चेहराच पडला. तो मानवी शरीराचं चित्रं दाखवणारा एक तक्ता होता. शाळेत वर्गातल्या भिंतीवर लटकवलेला असतो तसा. एक पुरुषाची आकृती. त्याच्या आत अन्ननलिका, श्वासनलिका, फलाणा, ढीमका, छोटं आतडं, मोठं आतडं, प्लीहा का काय म्हणतात अशी अवयवांची नावं. त्या अवयवासमोर बाण ओढून लिहिलेली – ही सुरुवात! नसीरुद्दीन शाह यांच्या क्लासची. शरीर काय दाखवत बसलेत. शास्त्रात शिकलो आहोत म्हणावं आम्ही हे सगळं. असं मनात असतानाच सर प्रत्येक अवयव शरीरात नेमकं काय काम करतो ते सांगायला लागले.
एका अभिनेत्यासाठी किंवा खरं तर कुठल्याही माणसासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं शरीर. हे वाक्य तसं घिसंपिटं वाटणारं, पण ते अत्यंत मनापासून म्हणाले. काही तरी महत्त्वाचं सांगायचं सोडून हे काय सांगत बसलेत. काही सुचत नाही आहे वाटतं, असं मी मनात धुसफुसत असतानाच ते म्हणाले, ‘‘माझे मूड्स बऱ्याचदा माझ्या शरीराच्या स्थितीवरच अवलंबून असतात. म्हणजे समजा एखाद दिवशी मला खूप डिप्रेस्ड वाटत असेल, तर माझ्या लक्षात येतं, की माझ्या मेंदूला रक्तपुरवठा नीट होत नसणार. मग मी काय करतो, शीर्षांसन करतो. मग माझ्या मेंदूला छान रक्त पोहोचतं आणि एकदम तरतरीत आणि आनंदी वाटायला लागतं.  श्ॉल वुई ट्राय धीस?’’ ते एका  मनस्वी उत्साहानं म्हणाले. मी तोपर्यंत आयुष्यात एकदाही शीर्षांसन केलं नव्हतं. धाबंच दणाणलं. भीतीने अजूनच राग आला. दोन दोन लोकांचे गट केले गेले. एक जण शीर्षांसन करणार, दुसरा त्याचे पाय धरणार. मी आणि माझी साथीदार धडपडू लागलो. मी आधी शीर्षांसन करायला घेतलं. जिवाचा हिय्या करून भिंतीला पाय लावले. चपळाईनं तिनं ते पकडले. अचानक माझं जग सुलटय़ाचं उलटं होऊन गेलं. मी खाली डोकं वर पाय, या अवस्थेत असतानाच सर क्लास संपल्याची घोषणा करून ऐटबाजपणे वर्गाबाहेर पडताना दिसले. त्यांचा निरोप घ्यावा म्हणून मी घाईघाईने उलटय़ाची सुलटी होताहोताच लक्षात आलं, आमचा अख्खा वर्ग खिदळत शीर्षांसन करण्यात मग्न होता. आमचं खिदळणं बघता आमच्या मेंदूला तरतरी आली होती हे स्पष्ट दिसत होतं!
तेव्हा त्या गोष्टीचं फार काही महत्त्व वाटत नाही. पुढे एकदा डॉ. लागूंकडून पण ऐकलं. ‘‘शरीर हे अभिनेत्याचं वाद्य असतं. हे शंभू मित्राचं वाक्य मला फार मोलाचं वाटलं.’’ पण तेव्हासुद्धा, ‘‘वा, खरंच मस्त आहे ना वाक्य,’’ असं म्हणून सोडून दिलं. मुळात माझं शरीर तेव्हा निमूट शहाण्यासारखं वागत होतं. म्हणून त्याच्यापाशी थांबून त्याचा विचार करण्याची मला अजिबातच गरज वाटत नव्हती. माझं काम माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. कामातली मज्जा, कामातली नशा, व्यायाम राहू दे, खाणं वगैरे होईल नंतर, आधी काम. मग आसपासच्या काही चर्चा ऐकू यायच्या. अमुक नटीनं चार ताप अंगात असतानासुद्धा पाण्यात भिजत तमुक गाणं शूट केलं. मनापासून कौतुक वाटायचं. तोच आदर्श वाटायचा.
‘ती फुलराणी’ नाटक करताना अशीच मज्जा यायची. त्याचे दौरे, प्रयोग चालू असताना मी खाणं-पिणं काहीच वेळेवर करायचे नाही. म्हणजे करता आलं असतं तर नक्कीच, जर मला ते जितकं महत्त्वाचं वाटलं असतं तर. डॉ. लागूंसारख्या नटानं इतके नाटकांचे दौरे करूनही आपली तब्येत नीट राखलीच की. पण मला तब्येत महत्त्वाची वाटलीच नाही तेव्हा. आणि मग माझं शहाणं शरीर निमूटपणा सोडून अखेर माझ्याशी बोलायला लागलं. आधी आवाज बसला. मी दुर्लक्ष केलं. मग डोळे बोलू लागले. एके दिवशी मला प्रकाशाकडे बघताक्षणी डोळ्यांत तीव्र वेदना व्हायला लागली. पण त्या दिवशी तर प्रयोग होता. माझ्यामुळे तो बंद पडता कामा नये, या ध्येयानं मी प्रयोगाला गेले. साधा प्रकाश पण मला सहन होत नव्हता. रंगमंचावरचा प्रकाश तर याहून प्रखर असतो. डोळ्यांतून  मेंदूपर्यंत तीव्र वेदना जात होती. डोळ्यांची बाहुली सुजून आकुंचन का काय पावली होती. विश्रांती न घेतल्याने. डाव्या डोळ्यांची. मी त्या दुखऱ्या डोळ्यावर कापूस ठेवला. त्यावर फुलीच्या आकाराच्या चिकटपट्टय़ा लावल्या. ‘कॅप्टन कूक’ कंपनीच्या मिठाच्या किंवा कणकेच्या पॅकवर एक डोळा बंद असलेला कॅप्टन कूक दाखवतात ना, अगदी तशी दिसत होते मी. लेडी कॅप्टन कूक! त्या दिवशी साक्षात कॅप्टन कूक फुलराणीच्या वेशात गजरे विकताना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. माझ्या डोळ्यांविषयी प्रेक्षकांना पूर्वसूचना दिलेली असतानाही पडदा उघडून माझी एन्ट्री होताक्षणी प्रेक्षकांच्या डोळ्यांत दचकून भीतीची लहर गेल्याची मला रंगमंचावरून स्पष्ट दिसली. उशिरा येणारे प्रेक्षक तर आधी हसऱ्या चेहऱ्याने आनंदात सीटवर येऊन बसत. पण कौतुकाने रंगमंचावर पाहत. मी दिसताच हॉरर चित्रपटातील भूत दिसल्याप्रमाणे दचकत हबकून शेजारच्या प्रेक्षकाला, हे काय? विचारत. काय ते कळल्यावरही त्यांच्या डोळ्यांतलं भय न जाता ते करुणेनं रंगमंचाकडे पाहत. त्या दिवशी त्यांचा माझ्या फुलराणीच्या विनोदावर हसण्याचा प्रयत्न फारच केविलवाणा होता. त्या दिवशी मी फार काहीतरी भारी केलं आहे, असं मला वाटलं.
मी माझ्या डोळ्यांचंही ऐकलं नाही म्हटल्यावर माझ्या शरीराचा नाइलाज होत गेला. माझ्या उजव्या पायाला सायटिकासारखा त्रास सुरू झाला. तरीही मी कामाच्या नशेतच. पाय जाम व्हायचा. अक्षरश: मला ‘थांब’ म्हणत असायचा.  मी दुर्लक्ष करून कामाच्या नशेत आणि अखेर ती वेळ आली. त्या रात्री मला पायातल्या वेदनेनंच जाग आली. मी नवऱ्याला- संदेशला- उठवलं. मला हलताच येत नव्हतं. एक पाऊलही टाकता येत नव्हतं. कशीबशी सकाळपर्यंत कळ सोसून आम्ही आमचा मित्र
डॉ. चंद्रशेखर फणसळकरच्या हॉस्पिटलला निघालो. मला त्याच्या केबिनपर्यंत जाता येईना म्हणून चक्क व्हीलचेअर मागवावी लागली. मी त्यावर बसले मात्र, एका क्षणात हबकून भानावर आल्यासारखं वाटलं. त्या वयात व्हीलचेअरवर बसून हॉस्पिटलच्या दारापासून ते डॉक्टरच्या केबिनपर्यंत जेव्हा संदेशने मला ढकलत नेलं, तेव्हा त्या काही फुटाच्या अंतराने मला पुढच्या एका लांबच लांब रस्त्यावर चालायला भाग पाडलं. माझ्या आरोग्याचा रस्ता. त्या व्हीलचेअरवर बसल्यावर इतक्या लहान वयात आपल्याला विसंबावं लागतंय याची जाणीव डोळ्यांमधल्या पाण्यावाटे झरायला लागली आणि ते डोळे पुसता पुसताच ठरवलं, ‘‘मी थांबते आहे. माझ्या आरोग्यापाशी. उशीर झाला आहे. पण खूप नाही. अजून वय माझ्या बाजूनं आहे.’’
मी आयुष्याकडे आरोग्य मागितल्यापासून आयुष्यानंही अनेक सुंदर रस्त्यांनी ते माझ्याकडे पाठवायला सुरुवात केली. लुईस एल. हे या लेखिकेचं ‘यू कॅन हील युवर लाइफ’ वाचलं. तिनं कॅन्सर ज्या पद्धतीनं बरा केला स्वतचा, ते वाचून जाणवलं ‘वय, दुर्धर रोग – नथिंग मॅटर्स! इच्छाशक्ती काहीही घडवू शकते. काहीही! लुईसनं माझा एक सुंदर प्रवास सुरू केला. तो अजूनही चालू आहे. अजूनही शरीरमनाचा खूप संवाद बाकी आहे. पण अनेक संवादाच्या सुरुवाती झाल्या आहेत. आता वेदना पूर्ण संपली असं नाही. पण तिच्यापासून पळणं संपत चाललं आहे. आता वेदनेचा राग येत नाही. भीतीपण नाही. ती दुवा आहे माझं मुकं शरीर आणि माझ्यामधला. ती मला सांगते, ‘‘पाय दमला, डोकं शिणलं.’’ मग मी आहे तिथेच थांबते. माझ्या दुखऱ्या भागावरून हात फिरवते. मला माझ्या शरीराची भाषा शिकवणारे अनेक उत्तम आरोग्यगुरूलुईसनंतर भेटत आहेत. वेदनेला खूप आतून समजून घेऊन तिच्याशी हळुवार संवाद साधणारी, मला रंजकतेनं माझ्या व्यायामाकडं नेणारी माझी फिजिओथेरपिस्ट हिमानी कोलटकर भेटली. आता सध्या एका खूप सुंदर ठिकाणाचा शोध लावून दिला आहे, माझ्या गिरीश कुलकर्णी या मित्रानं. पुण्यातलं संप्रसाद विनोद यांचं शांतिमंदिर. तिथे श्वासाकडे लक्ष देत सहज संथ लयीत योगा करायला शिकते आहे. ही योगापद्धती माझा श्वास, शरीर आणि मन यांची तिहेरी वेणी गुंफून मला माझ्या अंतर्मनाकडे घेऊन जाते आहे. एकाच एका व्यायामाचा कंटाळा येतो म्हणून वेगवेगळे रंजक व्यायाम शोधते आहे. पोहायला जाते. पाणी जादू आहे. ते माझ्या मना-शरीराला सैल, थंड करत नेतं.
आणखीही एक, खूप महत्त्वाचं. लुईसनं मला शारीरिक रोगांच्या आपल्या मनोवस्थेशी असणाऱ्या संबंधांची ओळख करून दिली. शरीराचे गुंते हे मनाच्या गुंत्यांशी खोलवर जुडलेले आहेत. हे सत्य शांतपणे मान्य करून मी माझ्या मनाकडेही लक्ष देते आहे. एका उत्तम मानसोपचारतज्ज्ञाच्या साहाय्यानं. या सगळ्या सुंदर रस्त्यांमधल्याच एक महत्त्वाचा रस्ता आहाराचा. ऋजुता दिवेकरनं तिच्या पुस्तकातून सांगितलेल्या कितीतरी आहारयुक्त्या मला, माझ्या आरोग्याच्या जवळ नेत चालल्यात. या सगळ्या वाटांनी चालता चालता आज नसीरसरांच्या पहिल्या क्लासचं महत्त्व पुरेपूर कळत चाललं आहे. मला माझ्या ‘शरीर’ नावाच्या नियंत्याच्या चमत्काराविषयी अजून अजून जाणून घ्यायचं आहे. त्या तक्त्याच्या प्रत्येक अवयवाशी ओळख करून मैत्री करायची आहे.
कबिराचा एक दोहा आहे – ‘चदरिया झिनी रे झिनी’ हे शरीर म्हणजे परमेश्वरानं आपल्याला दिलेली नाजूक चादर आहे. त्यात तो शेवटी म्हणतो – दास कबीरा ज्यूँ की त्यूँ धर दिनी. कबिरानं ती चादर जशीच्या तशी परत केली. तिला नीट सांभाळून. तशीच मलाही माझी  चादर नीट वापरून, सांभाळून, प्रेमाने जमेल तितकी जशीच्या तशी परत करायची आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा