daanसमाजसेवेचे व्रत घेणारे आणि ते आयुष्यभर सांभाळणारे अनेक जण समाजात दिसतात. त्यांच्या छोटय़ा छोटय़ा कृतीतून अनेक आयुष्य घडवली जातात. अशाच काही सेवाव्रतींविषयी..
आमच्या कट्टा ग्रुपचं गेल्या एप्रिलमध्ये (२०१५) पूर्वाचलला जायचं ठरलं तेव्हा पूर्वतयारी म्हणून मी प्रथम
डॉ. प्रतिभा आठवले यांचं ‘पूर्वरंग-हिमरंग’ हे पुस्तक वाचायला आणलं. प्रतिभाताई गेली १४ वर्षे देशसेवेच्या भावनेतून या अतिपूर्वेकडील दुर्गम भागात प्रतिवर्षी २१ दिवसांचा विनामूल्य दंत शिबीर घेत असल्याने या पुस्तकाने जणू माझ्यासाठी अलिबाबाच्या गुहेचं दारच उघडलं. पुस्तकातून पूर्वाचलचं अनुपम निसर्गसौंदर्य तर उलगडलंच पण त्याहीपेक्षा मनाला भिडलं ते तिथल्या अप्रगत देशबांधवांसाठी आपलं घरदार सोडून अंतरीच्या ओढीने नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या सेवाव्रतींचं जगणं.
आजवर अनभिज्ञ असलेल्या या सेवायज्ञाची अशी तोंडओळख झाल्यापासून या ट्रीपमध्ये किमान एका सेवाव्रतीला भेटून जाणून घेणं ही माझी सर्वात ch10महत्त्वाची निकड झाली. त्यानंतर ‘इच्छा तिथे मार्ग’ या न्यायाने मेघालयात पूर्णकालीन काम करणारे सेवाभारतीचे सुरेंद्रजी तालखेडकर यांच्याशी माझी गोहाती (गुवाहाटी) येथे भेट झाली आणि विशाल जगण्याची ओळख झाली.
मूळचे परभणीचे असलेले सुरेंद्रजी वयाच्या २१व्या वर्षी पूर्ण वेळ प्रचारक बनले (आजचं वय ४५) आणि पहिली ५ वर्षे गोवा, सिंधुदुर्ग येथे काम करून १९९६   पासून मेघालयात सेवाभारती या उपक्रमाची जबाबदारी सांभाळत आहेत. विवेकानंद केंद्र, सेवाभारती, विद्यार्थी परिषद, कल्याणाश्रम, अरुणाचल विकास परिषद आदी संघभावनेने काम करणाऱ्या संस्थांचे एकूण २०० जीवनव्रती (एक पैसाही मानधन न घेता पूर्ण आयुष्य झोकून काम करणारे कार्यकर्ते) आणि अल्प मानधन घेऊन काम करणारे १००० प्रचारक पूर्वेकडील मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालॅण्ड या संवेदनशील भागात ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून तेथील बांधवांच्या सर्वागीण उन्नतीसाठी झटत आहेत.
 सेवेच्या माध्यमातून माणसाला सुखी करण्याच्या उद्देशातून जन्माला आलेला उपक्रम म्हणजे सेवाभारती. संस्थेची पूर्वाचलमधील स्थापना १९९८ मध्ये झाली असली तरी काम बरंच आधीपासून (१९५०) सुरू होतं. सुरेंद्रजी इथे आले तेव्हा परिस्थिती बिकटच होती. जनमानसात विश्वास निर्माण करणं ही पहिली गरज होती. त्यासाठी सुरेंद्रजींनी प्रथम तिथल्या भाषा शिकायला सुरुवात केली. गारो, खांसी, कोच, हजंग, राभा आदी जमातींच्या भाषा आता ते अस्खलितपणे ch11बोलतात. खाणंही त्यांच्याप्रमाणेच. भात व एखाद्या कंदमुळाची भाजी. असं त्यांच्यातील एक बनून, त्यांच्या वेदना संवेदना जाणून, सतत मदतीचा हात पुढे केल्याने हळूहळू त्यांना आपले विचार तिथल्या लोकार्ंपत पोहोचवता आले.
या कालखंडात परीक्षा पहाणारे अनेक क्षण सुरेंद्रजींच्या वाटय़ाला आले. एकदा दुसऱ्या गावाला जंगलातून मोटारसायकलने जाताना अचानक तीन उग्रवाद्यांनी त्यांना घेरलं. एक मागच्या सीटवर तर दुसरा उलटा बॉनेटवर बसला आणि तिसरा समोर उभा. बंदूक दाखवून पैशांची मागणी करण्यात आली. सुरेंद्रजींजवळ जाण्या-येण्यापुरते पैसे होते. पण ते समाजाचे पैसे, त्यांचे रक्षण केले पाहिजे ही भावना पक्की होती. त्यांच्या तोंडून अभावितपणे उद्गार आले, ‘मैं तो यहाँ का फादर हूँ। मेरे पास पैसे कैसे हो सकते हैं मेरे चाइल्ड?’ सुरेंद्रजी म्हणाले की मी काहीसा गोलमटोल. अंगावर लेंगा झब्बा. त्यामुळे फादर म्हणून सहज खपलो आणि मग येशूच्या नावाने त्यांना चार चांगल्या गोष्टीही सुनावल्या.
डॉ. अरुणकुमार बॅनर्जी बंगालमधून १९९९ला आरोग्यसेवा देण्यासाठी इथे प्रथमच आले आणि मग इथलेच झाले. आज इथल्या दुर्गम भागात सेवाभारतीचे १२ हजार प्रशिक्षित आरोग्यमित्र सेवा देत आहेत. १५/१६ वर्षे काम केल्यावर डॉ. बॅनर्जी यांना मिळणारं आजचं मानधन आहे महिना ८००० रुपये. सेवाभारतीच्या ५५० शाळा आणि १०५ कायमस्वरूपी योगकेंद्रे यातील शिक्षक तर महिना दीड ते तीन हजार रुपयांवर काम करताहेत, पण समाधान किती आहे याची गणतीच नाही.
आसामधील सेजूसा या गावातील छोटय़ाशा टेकडीवर विवेकानंद केंद्राचं निवेदिताविहार हे मुला-मुलींसाठी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आहे. इथल्या वसतिगृहात केंद्राच्या भगिनी कार्यकर्त्यां मुलींसह मोठय़ा हिमतीने राहतात. इयत्ता ६वी, ७वीपासूनच इथल्या मुली बांबूपासून कलाकुसरीच्या सुबक वस्तू, सुंदर गालिचे बनवतात. या मुली सोनोलू या आदिवासी जमातीच्या आहेत. या जातीत आजही गुलामाची प्रथा आहे. गुलामगिरीच्या बेडय़ातून या मुलींना सोडवून स्वत:च्या पायावर उभं रहाता यावं म्हणून हे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आहे. इथल्या लोकांना समजावून त्यांच्या मुलांना शिकवून आत्मनिर्भर करण्याचं अवघड काम केंद्राच्या सेवाव्रतींनी हाती घेतलंय.
विद्यार्थी परिषदेने पूर्वाचलमध्ये चीनच्या युद्धानंतर म्हणजे १९६५ मध्ये पहिलं पाऊल टाकलं. त्या वेळी तिथल्या नागरिकांमधील असुरक्षिततेची, असंतोषाची भावना, भारताबद्दलची चीड या प्रश्नांना त्यांना प्रेमाने उत्तर द्यायचं ठरवलं आणि त्यानुसार आखलेल्या आंतरराज्य छात्र जीवन दर्शन या उपक्रमांतर्गत प्रथमच तिकडची १७ मुलं काही दिवसांसाठी इथे आणली व घराघरातून ठेवली. पुढच्याच वर्षी या उपक्रमाला ‘भारत माझं घर’ या आणखी एका प्रकल्पाची जोड दिली गेली. या वेळी इयत्ता पाचवीत, सहावीत शिकणारे १७/१८ विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी मुंबई-पुण्यातील कुटुंबात सामावून घेतले गेले.
यातला एक मुलगा   सुधीर फडके (बाबूजी) यांच्या घरी तब्बल १६ वर्षे राहिला. त्याला शाळेत घालताना बाबूजींनी त्याचं ‘लेकी फुंगसो’ हे नाव बदलून दीपक सुधीर फडके असं लावलं. या मानसपुत्रावर बाबूजी व ललिताताईंनी श्रीधरइतकंच प्रेम केलं. पुढे एम.ए. पूर्ण करून तो अरुणाचलला गेला आणि आज दीपक सुधीर फडके हे त्या ठिकाणी ‘डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्री’ या पदावर कार्यरत आहेत. या नात्याची वीण एवढी घट होती, आहे की ललिताताईंच्या अखेरच्या आजारपणात दीपक एक महिना रजा घेऊन शुश्रूषेसाठी इथे येऊन राहिले होते. परिषदेच्या देश जोडो अभियानाचं यश या विद्यार्थ्यांच्या मनात अंकुरलेल्या आणि बहरलेल्या प्रेमात आहे.
२००४ पासून परिषदेतर्फे तिथली बेरोजगारी आणि त्यातून जन्माला येणारा आतंकवाद यावर उपाययोजना म्हणून गोहाती येथे युवा विकास केंद्र सुरू करण्यात आलंय. इथे २० प्रकारची कौशल्यं शिकवली जातात आणि नोकरी मिळवण्यासाठी मदत केली जाते. या केंद्राची धुरा गेली १० वर्षे आशीष भावे हा मराठी युवक सांभाळतोय.
आमचा इथल्या १० दिवसांच्या मुक्कामात इथं प्रवास करणं आजही किती कठीण आहे याची आम्हाला जाणीव झाली. अरुणाचल हा तर पर्वतांचा प्रदेश. रस्ते घाटा-घाटांचे, दरडी कोसळणं नित्याचं. त्यामुळे संपर्क कायम तुटलेला. त्यातच ब्रह्मपुत्रेच्या पुरामुळे आसपासची जमीन दलदलीची. पाय रुतणाऱ्या चिखलातून चालणं महाअवघड. त्यात हातात सामान आणि डोक्यावर पाऊस असेल तर बघायलाच नको. फोनलाइन्स सुरू असतील तो दिवस भाग्याचा. अशा प्रतिकूल परिस्थितीत इथले सेवाव्रती संस्काराच्या बिया पेरत चाललेत. यात अनेक मुलीही आहेत. काहींनी आयुष्याची ३ वर्षे दिलीत, काहींनी ५ तर काही जणींनी अवघं आयुष्यच पणाला लावलंय. मधू लिमये हे ऋषितुल्य जीवनव्रती आज ९०व्या वर्षीही कार्यरत आहेत तर औरंगाबादच्या सुनीता हलदेकर या गेली २५ र्वष सेवाभारतीच्या आरोग्यसेविका म्हणून काम करताहेत.
गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि राज्यकर्त्यांची उदासीन वृत्ती यामुळे हा प्रदेश दुर्लक्षित राहिलाय. बाहेरून येणारी मदत तिथल्या लोकांना व्यसनाधीन बनवतेय. येथील आघाडय़ांवर सेवाव्रतींची लढाई सुरू आहे.  
 सुरेंद्रजी म्हणाले, इतक्या वर्षांच्या तपश्चर्येनंतर इथल्या वृत्तपत्रातून आता आमच्या विचारांचं प्रतिबिंब दिसू लागलंय. मेघालयात तर असं एकही गाव नाही जिथे आमचा संपर्क नाही. अजून बराच पल्ला गाठायचाय पण पूर्वाचलबरोबरच उर्वरित भारताचं नातं लवकरच दृढ होईल असा आम्हाला विश्वास आहे.  
 अंत:करणातून आलेले त्यांचे बोल ऐकताना मन म्हणत होतं, या शूर सरदारांनी देव, देश अन् धर्मासाठी प्राण हाती घेतलेत पण या देशबांधवांसाठी आमचं कर्तव्य कोणतं? यासाठी दोन पर्याय आहेत. एक तुमच्या अंगी कोणतंही कलाकौशल्य असल्यास तुम्ही तुमचा वेळ देऊ शकता (१५ दिवसांपासून कितीही). सेवाभाव जोडप्यांचंही इथे स्वागत. अन्यथा पैशांची मदत पाठवून या सेवाव्रतींचे हात बळकट करणं हा सोप्पा मार्ग आहेच. तुम्ही कोणता निवडताय?    
संपदा वागळे – waglesampada@gmail.com
    
संपर्क – सुरेंद्रजी तालखेडकर
०३६१- २५२६१६०/ ०९४३५५९१४३०
Surendratalkhedkar@gmail.com
आशीष भावे- ०९४२२६८८६८५
bhave.aashish@gmail.com

attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
Narendra Modi statement regarding the middle class in a meeting in Pune news
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो’; पुण्यातील सभेत विधान
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा