अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर स्त्रियांच्या हक्कांचा आग्रह धरणाऱ्या स्त्रियांना अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावं लागतंय. कधी देशाबाहेर पळून जाऊन, निर्वासित म्हणून काम करत, कधी देशातच भूमिगत राहून काम करत, तर कधी धार्मिक चौकटीबाहेर न जाताही स्त्रीस्वातंत्र्याचा मुद्दा लावून धरत इथल्या स्त्रिया पुढे जाताहेत. अशाच झारा जोया आणि ताफसीर सेयापोश या तिशीतल्या तरुणींच्या धाडसाची गोष्ट..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अफगाणिस्तान हा दक्षिण आशियातला तिथल्या राजकीय अस्थिरतेमुळे सातत्यानं चर्चेत असणारा देश. २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबानचं पुनरागमन झालं. एक एक शहर जिंकत तालिबाननं संपूर्ण देशावर कब्जा मिळवला. आणि पुन्हा नव्यानं ‘इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तान’ स्थापन झाल्याची घोषणा केली. या शासनाला जगातल्या बहुतांश देशांनी अधिमान्यता दिलेली नाही. भारतही त्याला अपवाद नाही. त्यामुळे हा लहानसा भूवेष्टित देश आता अधिकच खोल अंधारात बुडाला आहे.

या अंधारात अफगाणिस्तानातल्या स्त्रिया चाचपडत आहेत. स्त्रियांवरचा अन्याय आणि अत्याचार ही आता नेहमीची बाब आहे. इस्लामी शरिया कायद्याच्या तालिबान्यांनी लावलेल्या अर्थानुसार स्त्रियांना समाजात जवळजवळ शून्य अधिकार मिळतात. त्यामुळे स्त्रियांनी घराबाहेर जाताना कोणीतरी पुरुष सोबतीला येणं अनिवार्य असणं, त्यांनी डोळेही जाळीनं झाकून घेणारा संपूर्ण बुरखा परिधान करणं, शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रांतून त्यांना पूर्णत: हद्दपार करणं, असे मधल्या काळात शिथिल झालेले अनेक कठोर नियम आता पुन्हा लागू केले गेले. २०२१ मध्ये सत्तेवर आल्या-आल्याच तालिबाननं संविधान रद्दबातल ठरवलं, संसदेची दोन्ही सभागृहं आणि महिला विकास मंत्रालय बरखास्त केलं. त्या जागी ‘मिनिस्ट्री ऑफ व्हर्च्यू अँड वाईस’ची स्थापना केली गेली. हा विभाग धर्माधिष्ठित ‘सदाचार आणि स्वैराचारा’वर पाळत ठेवण्याचं काम करतो. अर्थातच स्त्रियांवर ‘सदाचारी’ होण्याची सर्वाधिक जबाबदारी आहे हे वेगळं सांगायला नको.

अफगाणी स्त्रियांच्या अनेक कथा जगाला ठाऊक आहेत. अशाही अनेक गोष्टी असतील, ज्या कधी आपल्यापर्यंत पोहोचणारही नाहीत. डेबोरा एलिस लिखित ‘द ब्रेडविनर’ या कादंबरीमध्ये छोटया मुली मुलग्यांप्रमाणे वेषांतर करून काम करताना दाखवल्या आहेत. ज्यांच्या घरात एकही पुरुष सदस्य नाही, त्या स्त्रियांना अशा पळवाटा काढाव्याच लागतात. आता तीच वेळ अफगाणिस्तानातल्या स्त्रियांवर पुन्हा आली आहे. परंतु कठीण काळ आला तरीही न डगमगणाऱ्या, लढणाऱ्या आणि इतरांनाही जगण्याची उमेद देणाऱ्या अफगाण स्त्रियांमुळे आशेची पणती सतत तेवत राहते. अशाच दोघींची ही गोष्ट.

झारा जोया ही आज तिशीत असलेली एक अफगाण तरुणी. ती लहान असताना, नव्वदीच्या दशकात, तालिबानचं राज्य होतं. मुलींना शाळेत जाणं दुरापास्त होतं. परंतु झाराचे आईवडील आणि इतर नातेवाईक पुरोगामी होते. त्यांच्या भक्कम पांठिब्यामुळे झारा मुलासारखा पोशाख करून शाळेत जात असे. तिनंच तिचं नाव ‘मोहम्मद’ ठेवलं होतं. ती मोठी होईस्तोवर तालिबान्यांची सत्ता गेली आणि पुढील शिक्षणासाठी वाट मोकळी झाली. झाराला वकिलीत रस होता, परंतु कळत्या वयापासूनच ती पत्रकारितेकडेही ओढली गेली. तरुण वयात तिनं पेशा म्हणून पत्रकारिताच स्वीकारली. हळूहळू तिच्या लक्षात आलं, की अफगाणी माध्यमं अफगाण स्त्रियांच्या समस्यांचं सर्वांगानं आणि सखोलपणे विवेचन करत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ, स्त्रियांवरच्या अत्याचारांची बातमी तर होते, परंतु अशा प्रकारच्या घटनांचे त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतात, याबद्दल मात्र कुठेही चर्चा होत नाही. अफगाण स्त्री पत्रकारांची संख्याही तुलनेनं कमी असल्यामुळे स्त्रीविषयक मुद्दयांकडे दुर्लक्ष होत असल्याचं तिला जाणवलं. यामुळेच तिनं स्वत:चं स्वतंत्र माध्यम सुरू करायचा निर्णय घेतला. त्याचं नाव ठरवलं गेलं, ‘रुखशाना मीडिया’.

‘रुखशाना’ हे नावही विशेष आहे. अफगाणिस्तानात मुलींची जबरदस्तीनं लग्नं लावण्याचे प्रकार हमखास होत असतात. २०१५ मध्ये एका रुखशानानं अशाच जबरदस्तीच्या लग्नातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. उलट तिच्यावर व्यभिचाराचे आरोप ठेवण्यात आले. यासाठी रुखशानाला दगड मारून संपवण्यात आलं. त्याहून भयंकर बाब म्हणजे, याचा व्हिडीओ काढून समाजमाध्यमांवर फिरवला गेला. या घटनेमुळे झारा आणि तिच्यासारख्या संवेदनशील व्यक्तींना जबरदस्त धक्का बसला. तिची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी, तिला धैर्याचं प्रतीक मानून ‘रुखशाना मीडिया’ची २०२० मध्ये स्थापना करण्यात आली. ‘रुखशाना’चं स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आलं, तसंच समाजमाध्यमांवर- देखील नियमितपणे बातम्या, अहवाल वगैरे टाकणं सुरू झालं. याचं वैशिष्टय म्हणजे, हे स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेलं माध्यम आहे. संपूर्ण जगाला अफगाणिस्तानातील घडामोडी कळल्या पाहिजेत, असं झारा आणि तिच्या सहकाऱ्यांचं उद्दिष्ट आहे.

‘रुखशाना मीडिया’ची सुरुवात तर उत्साहानं झाली, परंतु लगोलग त्यात अनंत अडचणी येऊ लागल्या. २०२१ मध्ये करोना आणि तालिबान या दुहेरी संकटानं घेरलं.

स्त्री-पत्रकारांच्या कुठेही बाहेर जाण्यास निर्बंध घातले गेले. तालिबान सत्तेवर आल्यावर अनेक अफगाणी नागरिकांनी देशाबाहेर पळ काढला. झारा जोयासुद्धा तिचा देश सोडून लंडनमध्ये पळून येण्यास यशस्वी झाली. परंतु तिथूनही रुखशाना मीडियाचं काम सुरूच राहिलं. इतर बहुतेक सगळया स्त्री पत्रकार अफगाणिस्तानात भूमिगत राहून काम करतात. झाराचे आई-वडील आणि इतर अनेक नातेवाईक अजूनही अफगाणिस्तानातच आहेत. तेसुद्धा तालिबानच्या नजरेपासून दूर गुप्त ठिकाणी राहात आहेत.

एवढया सगळया अडचणींवर मात करत आजही त्यांच्या संकेतस्थळावर, इंस्टाग्राम आणि ट्विटर पेजवर सातत्यानं ताज्या बातम्या पुरवल्या जातात. हा लेख लिहीत असताना तिथूनच असं कळलं, की सध्या अफगाणिस्तानात मुलींसाठी ‘सिक्रेट स्कूल्स’ निर्माण झाल्या आहेत, त्याद्वारे मुलींना घरी शिक्षण दिलं जातं. हेरत जिल्ह्यातल्या अठरा वर्षांखालील जवळजवळ २५० मुली या उपक्रमात शिकत आहेत. शिक्षणानंच क्रांती घडून येईल असा त्यांचा अढळ विश्वास आहे. झारा जोयाला २०२२ मध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. ‘टाईम’ मासिकाचा ‘वूमन ऑफ द इयर’ हा सन्मान तिला मिळाला. याव्यतिरिक्त ‘बिल गेट्स फाउंडेशन’, ‘बीबीसी’ आदी प्रतिष्ठित संस्थांनी तिच्या कार्यास गौरवलं. परंतु प्रकाशझोतात येऊनही झाराला तिच्यासमोरच्या आव्हानांची कल्पना आहे. तिच्या सहकारी स्त्री वार्ताहरांना जिवाची जोखीम घेऊन काम करावं लागत आहे, याबद्दलची काळजी सतत तिच्या बोलण्यात डोकावते. निर्वासित पत्रकारांच्या एका चर्चासत्रात बोलताना ती म्हणाली, ‘‘अफगाण पत्रकारांसाठी सत्य सांगण्याची किंमत खूप मोठी आहे. काबूलमध्ये कुठेही स्वतंत्र माध्यमं उपलब्ध नाहीत. बहुतांश परदेशी माध्यमांवर तालिबाननं बंदी घातलेली आहे. त्यामुळे स्त्रियांच्या परिस्थितीचं खरं स्वरूप जगासमोर आणणं आम्हाला भाग आहे. निर्वासित होऊन पत्रकारिता करायला लागणं, हे काही चांगलं लक्षण नाही. आम्हाला आमच्या मूलभूत हक्कांपासून परावृत्त केलं जातंय हा कळीचा मुद्दा आहे. सगळया जगानं याची दखल घ्यायला हवी.’’

झारा जोया देशाबाहेर राहून हे काम करते आहे. परंतु अफगाणिस्तानात राहून, तिथल्या सत्ताधाऱ्यांशी संवाद करत स्त्रियांना अधिकाधिक हक्क मिळवून देण्याचे प्रयत्नही काही जणी करत आहेत. त्यातलं एक ठळक नाव म्हणजे ताफसीर सेयापोश. झारा जोयासारखीच ताफसीरही एक तिशीतली तरुणी. गेलं दशकभर ती अफगाण स्त्रियांचं स्वातंत्र्य, शिक्षण आणि समान राजकीय अधिकारांसाठी सातत्यानं काम करत आहे. तालिबाननं पुन्हा सत्ता मिळवल्यानंतर त्यांच्याशी वाटाघाटी अथवा संवाद करू शकणाऱ्या स्त्रिया अगदी बोटावर मोजण्याएवढया आहेत. ताफसीर त्यांच्यापैकी एक आहे. विशेषत: टीव्हीवरील चर्चासत्रांमध्ये ताफसीरचा सहभाग आवर्जून असतो. अर्थात, तिचे मुद्दे अगदी रास्त असले तरी ते खऱ्या अर्थाने ‘ऐकले’ जातात का, हा भाग वेगळा; पण ती सातत्यानं बोलत मात्र राहते. शेजारी तालिबानमधला प्रवक्ता बसलेला असला तरीही अजिबात डगमगत नाही. इंटरनेटवर या काही चर्चा उपलब्ध आहेत. त्यात दिसणारी तिची देहबोली आणि आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे.

ताफसीरचं वैशिष्टय म्हणजे, इस्लाम धर्माचा तिचा गाढा अभ्यास आहे. अफगाणिस्तान हा एक मुस्लीम प्रदेश आहे आणि इथली इस्लामी संस्कृती कायम राहणार आहे, असं ती पुन्हा पुन्हा सांगते. ती स्वत: जरीकाम असलेला काळा ‘अबाया’ नेहमी परिधान करते. परंतु शरियाच्या नावाखाली होणारं स्त्रियांचं दमन आणि शोषण तिला मान्य नाही. ‘कुराणात असे दाखले कुठेही दिलेले नाहीत आणि तालिबान निव्वळ मनमानी करत देशातल्या अर्ध्या जनतेला अंधारात लोटत आहे,’ असं विधान धर्मगुरूंसमोरही करताना ताफसीर कचरली नाही. ‘अल्लाचा पहिला संदेशच ‘वाचन करा’ असा आहे, तर मग मुलींच्या शाळा का बंद झाल्या आहेत?’ असा सवाल ती उपस्थित करते. एका वृत्तपत्र निवेदकानं तिला एकदा विचारलं, ‘‘तुझी स्वातंत्र्याची व्याख्या नेमकी काय आहे? तू तर इथे पुरुषाच्या बाजूला बसून चर्चा करत आहेस! आणखी किती स्वातंत्र्य स्त्रियांना हवं आहे?’’ यावर ती उत्तरली, ‘‘माझी स्वातंत्र्याची व्याख्या फक्त स्टुडिओत बसून चर्चा करू शकणं, अशी तर नक्कीच नाही. हजारो मुली शाळेच्या आणि नोकरीच्या बाहेर आहेत, त्यांना त्यांचे अधिकार परत मिळावेत ही मागणी आहे. आणि ती पूर्णपणे इस्लामला अनुसरूनच आहे. आमचा आवाज बुलंद करायची संधी आणि अवकाश मिळणं हेच स्वातंत्र्य आहे.’’

कुठल्याही सत्तेला आणि विशेषत: धर्माधिष्ठित शासनाला असं भिडणं नक्कीच सोपं नाही. चळवळया प्रवृत्तीच्या, स्वत:चा आवाज असणाऱ्या व्यक्तींवर तालिबानची वक्रदृष्टी कधी पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे या स्त्रियांच्या सुरक्षिततेची अथवा जीविताची कोणतीही खात्री देता येत नाही. पण तरीही, ‘अन्न, रोजगार, स्वातंत्र्य’ या अफगाण स्त्रियांच्या जुन्याच घोषणेला झारा आणि ताफसीरसारख्या तरुणींनी आणखी पुढे नेलं आहे. त्यांची सामाजिक आणि वैचारिक पार्श्वभूमी कदाचित निराळी आहे, परंतु ध्येय समान आहे. राजसत्तेच्या आणि पर्यायानं धर्माध पितृसत्तेच्या पाईक न होता एक स्वतंत्र पत्रकार, स्वतंत्र कार्यकर्ता होण्याची हिंमत त्यांच्या ठायी आहे. म्हणूनच त्या प्रेरणादायी ठरतात.

तालिबान्यांच्या धर्माधतेला आव्हान देणाऱ्या अफगाणी बहिणींना आणखी बळ मिळो आणि नव्या वर्षांत त्यांना आशेचा किरण दिसो, ही प्रार्थना आपण नक्की करू शकतो..

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A loud voice against terror bravery of zahra joya and tafseer seya posh taliban rule in afganistan and law against women dvr