माधुरी ताम्हणे

भावी प्रशासक घडविणाऱ्या स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचं तरुणींचं प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाढलं आहे. प्रशासकीय अधिकारीपद आणि त्यातून लोकांसाठी काम करण्याची संधी मिळत असल्याने शिक्षणाकडे गांभीर्याने बघणाऱ्या मुली या क्षेत्राकडे वळत आहेत. मात्र या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बहुसंख्येने ग्रामीण क्षेत्रातून शहरात येणाऱ्या मुलींना नेमकं कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं? घरच्यांची कठीण आर्थिक परिस्थिती, एक मुलगी म्हणून कुटुंबातून तिच्या लग्नासाठी येणारं दडपण, आणि स्वत:ला या कठीण अभ्यासासाठी तयार करत, उत्तीर्ण होणं या सगळय़ामुळे अनेकदा या मुलींवर ताण येत राहतो. काय आहेत या मुलींचे अनुभव याविषयी..

Multi-candidate contests on most seats in Nashik 196 candidates in 15 constituencies
नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती; १५ मतदारसंघात १९६ उमेदवार
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
vidhan sabha election 2024
उमेदवारांच्या पारंपरिक प्रचारामुळे प्रिंटिंग व्यवसाय तेजीत
thane, navi mumbai, dombivali, kalyan gramin,
ठाणे-कल्याणच्या वेशीवर आगरी अस्मिता प्रभावी
upsc questions in exam
UPSC ची तयारी : UPSC मुख्य परीक्षा २०२४; प्रश्नांचे अवलोकन
Samvadini Group, Social Transformation,
शहरबात… कृतीतून बोलणारी ‘संवादिनी’
six ambedkarite parties
सहा आंबेडकरी पक्ष-आघाड्या विधानसभेच्या मैदानात

स्पर्धा परीक्षा हा कारणपरत्वे चर्चेला येणारा ज्वलंत विषय. भावी प्रशासक घडवणारं हे क्षेत्र २००० च्या दशकापासून मुलींना मोठय़ा प्रमाणावर खुणावू लागलं. ‘ड्रीम पोस्ट’चं स्वप्न पाहणाऱ्या मुली गावांमधून, घरादारापासून दूर नांदेड, औरंगाबाद, पुणे या शहरांकडे वळू लागल्या. राज्य सरकारने १९९२-९३ पासून प्रशासकीय पदांमध्ये स्त्रियांना तीस टक्के आरक्षण लागू केलं आहे. त्यामुळे सर्व अडथळे पार करत तरुण मुली वर्षांनुवर्ष शहरांमध्ये मुक्काम करत आहेत. तैलबुद्धीइतकाच अनेक मुलींचा भावनिक बुद्धय़ांकसुद्धा अधिक चांगला असल्यानं यशस्वी उमेदवारांच्या आकडेवारीत मुलींचं प्रमाण दरवर्षी लक्षणीय आढळत आहे.

शालेय/ महाविद्यालयीन परीक्षांमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या ग्रामीण क्षेत्रातील आपल्या मुलीला स्पर्धा परीक्षांसाठी शहरात पाठवायला पालकांची मानसिक तयारी असते. फक्त तिला स्वातंत्र्य देताना तिच्या सुरक्षिततेची काळजी मन पोखरत असते. मुलीनं उत्तम प्रशासकीय अधिकारी बनावं, तिला सन्मानाचं आयुष्य जगता यावं, असं पालकांना मनापासून वाटलं, तरी ग्रामीण भागातलं सामाजिक दडपण झुगारणं त्यांनाही खूपदा अशक्य असतं. त्यामुळेच ‘शक्य तितक्या लवकर परीक्षा उत्तीर्ण होऊन पद मिळवून घरी परत ये,’ या सांगण्याचं एक अदृश्य ओझं मुलीच्या मनावर लादलं जातं. मुलीच्या लग्नाला प्राधान्य देताना करिअरला दुय्यम स्थान मिळतं. त्यामुळे त्या करिअरच्या शिक्षणासाठी वर्षांनुवर्ष खर्च करण्याची पालकांची मुळातच मानसिकता नसते.

अशा पार्श्वभूमीवर अनेक मुली छोटय़ा गावांतून शहरात येतात, वेगळय़ा वातावरणाला सामोऱ्या जातात. नुकतीच साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदासाठी निवड झालेली तेजश्री सासवडे सांगते, ‘‘दररोज परिवहन सेवेच्या बसनं धक्काबुक्की सहन करत, उभं राहून प्रवास करत दूरच्या लायब्ररीत जाण्यापेक्षा मी आणि माझी मैत्रीण कविता हॉस्टेलजवळच्या एका सार्वजनिक उद्यानात अभ्यासाला जात असू. खूप प्रसन्न वातावरण असे तिथं. कडक उन्हं, मुसळधार पाऊस किंवा गारठवणारी थंडी असेल, तेव्हा मात्र पंचाईत व्हायची. बऱ्याचदा टारगट मुलं घिरटय़ा घालत, अश्लील कमेंट्स करत. काही वेळा मी एखाद्या आडबाजूच्या मंदिरात बसूनही अभ्यास केलेला आहे. आम्ही मोठय़ा आशेनं शहरात येतो, तेव्हा वाटतं की वर्षभरात परीक्षा पास करून पद मिळवू आणि जाऊ परत! पण पहिलं वर्ष तर अभ्यासाचं आणि परीक्षेचं स्वरूप जाणून घेण्यातच जातं. पुढे परीक्षा पद्धतीतील किचकट प्रक्रिया, निकाल लावण्यात होणारी अक्षम्य दिरंगाई (उदा. ४ ऑक्टोबर २०२२ ला घेतलेल्या परीक्षेचा निकाल अलीकडे जून मध्ये लागला.) तीव्र स्पर्धा आणि हवी ती पोस्ट मिळण्याची अनिश्चितता, यामुळे खूप नैराश्य येतं. बरं, यातलं घरी काहीही सांगण्याची सोय नसते.’’

वर्षां म्हस्के हॉस्टेलमधला तिचा अनुभव सांगते, ‘‘एकदा माझ्या पाकिटातून फीसाठी वडिलांनी पाठवलेले दहा हजार रुपये, ओळखपत्र, एटीएम कार्ड चोरीला गेलं. मी तेव्हा नुकतीच गावाहून आले होते. पटकन कुणावरही विश्वास ठेवत असे. मात्र वसतिगृहाच्या मालकिणीनं ‘पोलिसात तक्रार दिलीस तर इथून काढून टाकीन’ अशी धमकी दिली. तरीही मी पोलीस स्टेशनला गेले. मात्र तिथल्या अधिकाऱ्यानं तक्रार लिहून न घेता मलाच झापलं. एका ठिकाणी नोकरी करणारी मुलगी माझी रूममेट होती. तिचा टाइमपास करण्याची आणि माझी अभ्यासाची वेळ एकच. तिचा विरंगुळा म्हणजे फोनवर मोठमोठय़ानं गप्पा मारणं, व्हिडीओ बघणं. अशा कलकलाटात अभ्यास जमत नाही. त्यामुळे बक्कळ भाडं भरून ग्रंथालयात बसायला लागतं. पण अशा लायब्ररी गावात असतात आणि आमचा मुक्काम गावाबाहेर. पुन्हा परीक्षा जवळ आली म्हणून रात्रभर तिथं अभ्यासाला बसावं, तर तेही शक्य नाही. तरी अशा लायब्ररीतच आमची इतर विद्यार्थ्यांशी ओळख होते. पुस्तकांची, नोटस्ची देवाणघेवाण होते. चहा पिताना, जेवताना अनेक विषयांवर चर्चा होते, अभ्यासाला दिशा मिळते. आमचं एकसुरी आयुष्य बदलून जातं. अर्थात इथंच ‘सीनिअर्स’च्या प्रभावाखाली येणाऱ्या नवशिक्या विद्यार्थ्यांना सांभाळून राहावं लागतं. ते टाळून यशस्वी उमेदवारांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी कशा उचलायच्या आणि स्वत:ची प्रगती कशी साधायची, हेही आम्ही इथंच शिकत जातो.’’

सुवर्णा गायकवाड सांगते, ‘‘मी मूळची यवतमाळची. विदर्भात या परीक्षांविषयी फारशी माहिती नाही. तिथं तलाठी झालं तरी सत्कार-सोहळे होतात. माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी स्पर्धा परीक्षांची तयारी करायला पुण्यात आले. पुण्यात अनेक पेठांमधल्या घरांमधून वसतिगृहं चालवली जातात. पण तिथं गेल्यावर सर्वप्रथम आमचं आडनाव विचारलं जातं. ते मागासवर्गीय असेल तर ‘जागा उपलब्ध नाही’ असं तोंडावर सांगितलं जातं. आडनावावरून हॉस्टेलवर प्रवेश मिळणं, हे वास्तव मनाला दुखवून जातं. बरं, इतकं करून जे हॉस्टेल मिळतं, तिथं लॉकर, वायफाय अशा सुविधा असतीलच असं नाही. महिला वसतिगृहात ‘बंक बेड’ असतात. खालच्या बेडला जास्त भाडं. दरवर्षी त्या भाडय़ात पाचशे रुपयांनी वाढ होते.’’
वारंवार दिल्या जाणाऱ्या परीक्षा, त्यात अनुत्तीर्ण झाल्यामुळे होणारा कालापव्यय, यामुळे पालक, नातलग आणि गाववाल्यांची नजर गढूळते. या मुलींविषयी संशयाचं वातावरण निर्माण होतं आणि पालकांचा विश्वास डळमळीत होतो. याचा विदारक अनुभव सुवर्णानं घेतला आहे. ‘‘भावाच्या अकाली मृत्यूस मला जबाबदार ठरवून माझे नातलग त्या वेळेस मला प्रश्न विचारत होते, की ‘घरची परिस्थिती सुधारावी म्हणून तू काय केलंस? पाच वर्ष झाली, पण तू अजून परीक्षाच देत बसली आहेस.’ यावर मी काय उत्तर देणार? इतक्या कठीण परिस्थितीत अभ्यास करून जेव्हा अवघ्या एका मार्काने कमी पडतो तेव्हा रडू कोसळतं. खूप असहाय वाटतं. अशा वेळीच एखाद्या मुलीची एखाद्या मुलाशी जवळीक वाढते. तो मानसिक आधार देतो, प्रेम जमतं, त्या प्रेमातून नातेसंबंध निर्माण होतात. मात्र मुलींनी अशा वेळी खरंच सावध राहायला हवं, असं मला मनापासून वाटतं.’’

या सगळय़ा मुली हेही प्रामाणिकपणे कबूल करतात, की ‘अशा राहण्यातूनच आम्ही तडजोड करायला शिकतो, पैसा, वेळ आणि उपलब्ध साधनसामग्रीचं नियोजन शिकतो. गावात आम्ही जर घाबरट असू, तरी शहरात धीट बनतो. स्वत:चे प्रश्न स्वत: सोडवत असल्यानं आत्मविश्वास दुणावतो. स्वत:चं मत मांडण्याचं स्वातंत्र्य इथंच जाणवतं. त्यामुळे अंधानुकरणापासून आम्ही दूर राहतो. घरच्यासारखा आधार इथं मिळणार नाही, या वास्तवाची जाणीव झाल्यामुळे अक्षरश: प्रत्येक पाऊल जपून टाकतो. आईवडिलांच्या प्रेमाची खरी किंमत इथंच कळते. मेसमधलं बेचव जेवण जेवल्यामुळे आईच्या हातच्या जेवणाची चव, महत्त्व कळतं. पैसे तर नेहमीच तुटपुंजे असतात. त्यामुळे पैशांच्या योग्य नियोजनाची लहान वयात सवय लागते. गावात कुणीही ‘भाकरतुकडा खाऊन जा’ असं सहज बोलत. इथं पाणीसुद्धा विचारून दिलं जातं. अशा परिस्थितीत दुसऱ्याकडून आपलं काम चतुराईनं, गोड बोलून, नम्रतेनं कसं करून घ्यायचं, अनपेक्षित अडचणींशी कसा सामना करायचा, हे ही शहरंच आम्हाला शिकवतात,’ असं या सर्व मुली ठामपणे सांगतात. शेवटी प्रशासकीय सेवेत ‘सरकारी सेवक’ म्हणून काम करताना पुस्तकी ज्ञानाइतकंच या गुणांना महत्त्व असतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा बहुश्रुत, चतुरस्र, अष्टपैलू प्रशासक निर्माण करण्यास खूपच उपयुक्त ठरतो.

‘एमपीएससी’इतकंच ‘यूपीएससी’च्या परीक्षार्थी मुलींच्या संख्येतही आता खूपच वाढ झाली आहे. यूपीएससीची तयारी करणाऱ्या अनेक मुली शक्यतो दिल्लीची निवड करतात. काही वेळा आई-वडिलांची सुरक्षेच्या चिंतेतून येणारी नाराजी पत्करून एकटीदुकटी मुलगी दिल्लीत येते, तेव्हा सर्वात मोठा प्रश्न निवाऱ्याचा असतो. उच्चभ्रू वस्तीतलं भाडं परवडत नाही आणि उपनगरातील घरं लायब्ररी आणि मेसपासून दूर. दिल्लीत रात्री-बेरात्री एकटय़ा मुलीने फिरणं धोक्याचं मानलं जातं.

त्यामुळे तिघीचौघी मुली एखादीच्या फ्लॅटवर एकत्र अभ्यासाला बसल्या, तर वेळेत घरी पोहोचण्यासाठी अनेक वेळा अभ्यास अर्धवट टाकून घर गाठावं लागतं. गेली तीन वर्ष दिल्लीत राहून ‘यूपीएससी’ची तयारी करणारी भावना पाटील सांगते, ‘‘सुरुवातीला माझी रूममेट दाक्षिणात्य होती. तिचं इंग्लिश भारी. पण मी निलंग्याहून आलेली! मला तिचं बोलणं काही कळायचंच नाही. माझं मोडकंतोडकं हिंदी तिला कळायचं नाही. त्यामुळे आमच्यात संवाद शून्य. मैत्रीचे सूर जुळेचनात. मात्र एकदा ती आजारी असताना मी खूप मदत केली. तेव्हापासून ती खूपच बदलली. आता ती घरून येताना न चुकता माझ्यासाठी घरचे पदार्थ घेऊन येते. असेही चांगले अनुभव येतात. पण अभ्यासाचा ताण सतत असतोच.’’

दिल्लीतलं अति उष्ण आणि अति थंड हवामान महाराष्ट्रातून आलेल्या मुलींना झेपत नाही. स्वरा सांगते, ‘‘एवढय़ा तप्त हवेतून घरी आल्यावर थोडा वेळ झोपल्याशिवाय अभ्यासाला बसताच येत नाही. इथे हीटर आणि कूलर या जीवनावश्यक वस्तू असतात. माझ्या जलंधरच्या रूममेटच्या आईबाबांनी मोठी बॅग भरून गरम कपडे तिच्याबरोबर माझ्यासाठीही पाठवले. त्यामुळे गेली दोन वर्ष थंडी खूप सुसह्य झाली. पण इथलं जेवण म्हणजे ‘लौकी’ची (दुधी भोपळा) भाजी आणि जाड जाड पराठे. किती खाणार हो! रोज साध्या जेवणाची सवय असलेल्या आम्हा मुलींना इथले तेलकट, मसालेदार पदार्थ पचवायला पाचक औषधं घ्यावीच लागतात. इथल्या आणि आपल्या संस्कृतीतला फरक तर आवर्जून सांगण्यासारखा आहे. अभ्यासाचा विचार करता ‘यूपीएससी’ची काठिण्यपातळी तीव्र असल्यानं अभ्यासासाठी एखाद्या मुलाकडे मदत मागितली आणि निखळ मैत्रीऐवजी त्यानं मदतीच्या बदल्यात भलतीच मागणी केली, असंही घडलंय. असं ऐकल्यावर धक्काच बसतो. आमच्या इमारतीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधल्या विद्यार्थ्यांच्या जोडय़ा सर्रास बघायला मिळतात. आम्हाला मात्र याचं नवल वाटतं.’’

इतक्या विपरीत परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या मुलींना अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. पस्तीस वर्षांचा या क्षेत्रातील मार्गदर्शनाचा अनुभव गाठीशी असणारे ‘स्टडी सर्कल’चे संचालक डॉ. आनंद पाटील सांगतात, ‘‘स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हुशार मुलींकडे सहाध्यायांचं लक्ष असतं. तिनं स्वकष्टानं तयार केलेल्या नोटस् हस्तगत करण्याचा उद्योग सर्रास केला जातो. अनेकदा सीनिअर मुलं एखाद्या विषयात स्वत:ला तज्ज्ञ समजू लागतात आणि अशा हुशार मुलीला सुचवतात, की ‘तू असे पेपर सोडव. मी तुला तपासून देतो,’ अशा प्रकारे त्या मुलीला जाळय़ात ओढतात. एखादा मुलगा हुशार मुलीच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत तिला आर्थिक मदत करत तिला आपल्या जाळय़ात ओढतो. अशाही घटना घडलेल्या आहेत. अशांपासून मुलींनी खूप सावध राहिलं पाहिजे. मुलींच्या अशा शैक्षणिक व वैयक्तिक समस्यांसाठी आम्ही समुपदेशन केंद्र सुरू केलं आहे. मात्र अनेकदा उलटही घडतं. एकदा पोस्ट मिळाली की या मुलामुलींचा आर्थिक आणि सामाजिक स्तर एका रात्रीत बदलतो आणि त्यांचं वागणं-बोलणं बदलतं. प्रशासकीय सेवेला सुरुवात करण्यापूर्वीच समाजमाध्यमांवर झळकणाऱ्या मुलाखती, काहीवेळा रचून सांगितलेल्या यशोगाथांची पुस्तकं, सत्कार-सोहळे हे सर्व काही परीक्षार्थीच्या भावी पिढय़ांचं नुकसान करतंय हे कुणी लक्षातच घेत नाही.’’

जिल्हा उपनिबंधक (सहकार विभाग) विशाल जाधवर याचं वस्तुनिष्ठ विवेचन करतात. ‘‘स्पर्धा परीक्षांमधील यश हे साध्य नसून साधन आहे, हे मुळात लक्षात घ्यायला हवं. कारण एक वेळ परीक्षेत यश मिळवणं सोपं. पण प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना अनेक दडपणांना झुगारून देत, प्रलोभनांना बळी न पडता संघर्ष करत सामान्य नागरिकाला न्याय मिळवून देणं, सेवा देणं हे खरं अवघड कार्य आहे. त्यातून मुलींची परिस्थिती आणखी अवघड आहे. तरुण मुलींना परीक्षांसाठी पुरेसा वेळ न देता बोहल्यावर चढवलं जातं. सासरची मंडळी त्यांना पुढे शिकवण्याचं आश्वासन देतात. मात्र पुढे गरोदरपण, बाळंतपण, घरच्या जबाबदाऱ्या, सणवार, यात त्या मुलीची शिक्षणाची पूर्ण आबाळ होते. यावर उपाय म्हणून अनेक जणी प्राथमिक परीक्षेचा घरी अभ्यास करतात आणि पुढील परीक्षेच्या तयारीसाठी तान्ह्या बाळांना, पतीला घरी सोडून चार महिने शहरात येऊन राहतात. मात्र मुलींचं स्वतंत्र राहाणं, मोकळी मैत्री सासरच्या मंडळींना खटकते. स्पर्धा परीक्षांना सामोरी जाणारी मुलंमुली अशा अनेक आव्हानांना तोंड देत असतात. अशा गोष्टींवर मन शांत ठेवण्यासाठीचा एक उत्तम उपाय ध्यानधारणा आहे, हे मी स्वानुभवानं सांगतो.’’

जाधवर यांच्याच म्हणण्याला दुजोरा देत दिल्लीस्थित मेनका देशमाने सांगते, ‘‘आम्ही देत असलेली ‘यूपीएससी’ची परीक्षा केवळ ज्ञानाचीच नव्हे, तर आमच्या शारीरिक, मानसिक खंबीरपणाची परीक्षा पाहणारी असते. अनेकदा प्रश्नांचे पर्याय फसवे असतात. बुद्धिमत्ता चाचणी कमालीची अवघड असते. वर्षभराची मेहनत दोन तासांत पणाला लागते. पेपर लिहिताना एखादा प्रश्न अवघड गेला, तर मनावर ताण येतो. अशा वेळी परिस्थिती स्वीकारण्यासाठी संयम, धैर्य आणि मानसिक तयारी हवी. अशा नकारात्मकतेवर मात करण्यासाठी मी विपश्यनेला जाऊ लागले. ध्यानधारणेतून एकाग्रता वाढते. अचूक निर्णयक्षमता येते, मन:शांती लाभते, असा माझा अनुभव आहे. आम्हाला उच्च सरकारी पद मिळो वा न मिळो, एक उत्तम नागरिक आणि बहुश्रुत, प्रगल्भ, विचारी माणूस म्हणून जीवन जगण्याचं स्पर्धा परीक्षा हे अतिशय उत्तम साधन आहे असं आम्ही मानतो.’’
काहीशे पदांसाठी लाखोंच्या संख्येनं ‘एमपीएससी- यूपीएससी’च्या परीक्षेला बसणाऱ्या या मुलींशी बोलताना त्यांच्यातला समान धागा म्हणजे त्यांच्यापुढची खडतर वाट आणि प्रचंड कष्ट, हेच दिसत राहतं. यातल्या किती जणी ‘ड्रीम पोस्ट’पर्यंत पोहोचतील, असं कुतूहलसुद्धा वाटतं. त्यांच्याकडे बुद्धी, शारीरिक क्षमता, इच्छाशक्ती आहे. कुटुंबातून आणि मुख्य म्हणजे सामाजिक स्तरावर त्यांच्या जिद्दीला बळ मिळणं मात्र फार आवश्यक आहे. त्यातूनच तर अधिकाधिक मुली प्रशासकीय सेवेत येतील.

(या लेखातील काही मुलींची नावे बदलली आहेत.)
madhuri.m.tamhane@gmail.com