बाल लैंगिक शोषणाचा प्रश्न   समाजाला कधी नव्हे इतका भेडसावू लागला आहे. तीन महिन्यांपासून १८ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील कोणतीही मुले या शोषणाला बळी पडू शकतात. मुलाचं आयुष्यच धोक्यात आणणाऱ्या या लैंगिक अत्याचाराविरुद्ध पत्रकार, लेखिका पिंकी विराणी यांनी आपल्या ‘बीटर चॉकलेट’ या पुस्तकाद्वारे आणि अभिनेत्री, कळसूत्री बाहुलीकार मीना नाईक यांनी ‘वाटेवरती काचा गं’ या नाटकाद्वारे २००० सालामध्ये आवाज उठवला. त्याचं एक तप पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने या बारा वर्षांतील त्यांचे अनुभव सांगणारे हे लेख.. भारताचे उद्याचे भविष्य असलेल्या आपल्या मुलांचे लैंगिक संरक्षण करण्याची गरज व्यक्त करत त्यांच्याभोवती आपल्या मायेचं संरक्षक कडं उभारण्याचे महत्त्व स्पष्ट करणारे ..
‘वाटेवरती काचा गं.. ’ या बाल लैंगिक शोषणावरील नाटकाचा पहिला प्रयोग नोव्हेंबर, २००० मध्ये ‘आविष्कार’च्या नाटय़गृहात झाला. त्याला १२ वर्षे झाली. नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत, असं प्रत्येकालाच वाटतं. मात्र या नाटकाच्या बाबतीत मी म्हणते, या नाटकाचे प्रयोग वा सीडी शो आजही करायला लागताहेत हे दुर्दैवी आहे. खंतावणारी बाब ही की त्याची गरज जास्तीत जास्त वाढतच चालली आहे, शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही.
बारा वर्षांपूर्वी प्रथमच बाललैंगिक शोषणाचा प्रश्न मी नाटकाद्वारे या नाटकाद्वारे रंगमंचावर आणला. तोपर्यंत बालकांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी समाजात जाणीव नव्हती असं नाही, पण एक प्रकारची ना-कबुली होती, गैरसमज होते. गैरसमज असा, की असे अत्याचार फक्त आधुनिक पाश्चात्त्य संस्कृतीतच होतात, आर्थिक, सामाजिक कनिष्ठ दर्जाच्या कुटुंबातच होतात किंवा फक्त मुलींच्या बाबतीतच घडतात. हे सगळे गैरसमज दूर करून ही एक गंभीर समस्या आहे, अवघड आणि गुंतागुंतीची आहे, हे लोकांच्या लक्षात आणून द्यायचं होतं. अवघड अशाकरिता, की या व्यवहारातील शोषणकर्ता हा बहुधा कुटुंबातील एक सदस्य किंवा कुटुंबाच्या मित्रांपैकीच एक असतो. हे सत्य समोर आणणं म्हणजे धक्कादायक असणार होतं. समस्या गंभीर अशाकरिता की, शारीरिक शोषण झालेल्या मुलांचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्याचं शारीरिक, मानसिक, भावनिक खच्चीकरण होतं आणि त्याचे परिणाम त्या बालकाला आणि कुटुंबीयांनाही भोगावे लागतात.
अशा या अक्राळविक्राळ समस्येबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना बोलतं करणं हा उद्देश समोर ठेवून १९९५ मध्ये ‘बाललैंगिक शोषणविरोधी मंच’ अस्तित्वात आला. या समस्येची दुसरी बाजू होती कायदा. शोषित मुलाला किंवा त्याच्या कुटुंबाने न्याय मागण्यासाठी धाव घेतली, तर कायद्याची काहीच तरतूद नव्हती. तर त्याही दृष्टीने बदल घडावेत असाही हा मंचाचा हेतू होता.
त्यासाठी ‘बाललैंगिक शोषणविरोधी मंचाने’ १९९७ मध्ये साहित्य, नाटय़, कला क्षेत्रातील व्यक्तींना, मानसशास्त्रज्ञ, मानसरोगतज्ज्ञ, वकील, डॉक्टर अशा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना आणि बालनाटय़ चळवळीशी संबंधित आणि कळसूत्रीकार म्हणून मलाही बोलावलं होतं. तोपर्यंत मलाही या गंभीर समस्येबाबत फारशी माहिती नव्हती. परंतु मनातून असं वाटत होतं, की माझ्या कळसूत्रीच्या साहाय्याने ही समस्या मी निश्चितपणे लोकांसमोर मांडू शकेन. त्यासाठी समस्येची सर्वतोपरी ओळख करून घेणं आवश्यक होतं. ‘बाललैंगिक शोषणविरोधी’ मंचाने मला याबाबतीत पूर्णत: मदत केली. डॉ. राणी रावते यांनी अधिक माहिती पुरवली. विविध कार्यशाळांना उपस्थित राहिले. शोषित मुलांना संस्थांमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेटले. त्याच सुमारास १९९८ मध्ये कोलंबो येथे युनिसेफ नॉर्वे आणि वर्ल्ड व्ह्य़ू इंटरनॅशनल यांनी  ‘बाल-हक्कां’वर एक जागतिक परिषद बोलावली होती. त्याकरिता भारतातून मला निमंत्रित केलं होतं. तेव्हा ‘बाल-हक्क’ आणि त्याविषयीची सनद यांची माहिती मिळाली. संयुक्त राष्ट्र संघाने ही जी सनद तयार केली  होती. तिला भारतानेही १९९२ मध्ये मान्यता दिली होती. परंतु १९९८ पर्यंत जनमानसाला त्याचा ठावठिकाणा नव्हता. बालकांचे हक्क म्हणजे काय? ते कोणते आहेत ? यांची नेमकी माहिती नव्हती, पण कोलंबांच्या परिषदेत कळलं की ‘लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणे’ हासुद्धा मुलांचा हक्क आहे. बाल हक्क सनदेमध्ये अनेक कलमं आहेत. त्यातील हे एक कलम. आणि तेव्हा या समस्येवर नाटक करण्याचा माझा विचार दृढ झाला. कोलंबोहून परत आल्यानंतर अधिक जोमाने संशोधन सुरू केलं. एक छोटासा पपेट-शो सादर केला. पण त्याने माझं समाधान झालं नाही. अनेक नाटककारांनी या विषयावर लिहिण्याचा नकार दिल्यामुळे मी त्रस्त झाले होते.  आणि मग तीन वर्षांनी मला अक्षरश: देव भेटल्याचा आनंद झाला. डोक्यात पात्रं, नाटकाची आखणी, दृश्ये हे पक्कं ठरलं होतं. पण लेखक भेटत नव्हता. एक दिवस माझी मैत्रीण डॉ. अश्विनी भालेराव गांधी हिने डॉ. अनिल बांदिवडेकरांचं नाव सुचवलं. डॉ. बांदिवडेकरांनी तत्काळ माझी मागणी स्वीकारली आणि एक एक प्रवेश लिहीत नाटकाचे हस्तलिखित मला देत राहिले.
नाटकाचा नाजूक विषय प्रथमच लोकांसमोर मांडताना तरलतेने सादर करायचा होता. त्याकरिता योग्य ते बदल करण्याची परवानगी मला बांदिवडेकरांनी दिली. तेव्हा विद्या आपटे यांच्या मदतीने मी तीन वेळा संहिता लिहिली. त्यामध्ये पुरुष पात्रं पूर्णत: टाळली. त्यासाठी छाया-बाहुल्यांचा उपयोग केला आणि कुठल्याही प्रकारचे गैरसमज होणार नाहीत याची खबरदारी घेतली. लेखक मिळाला पण कलाकार मिळायला अडचण निर्माण झाली. खास करून लहान मुलांचे पालक परवानगी देईनात. अनेकांना या विषयाचं महत्व पटवून द्यावं लागलं. १४ नोव्हेंबर २००० ला प्रथम प्रयोग सादर केला. नाटक एक तासाचं, पण त्यानंतर आम्ही प्रेक्षकांशी संवाद साधायचो कारण, समस्येचे अफाट स्वरूप तासाभराच्या नाटकात कसं काय लोकांसमोर ठेवणार ? शिवाय दोनतीन तासाचं नाटक  करण्यापेक्षा त्या नाटकावर लोकांनी विचार करावा, हे आम्हाला अपेक्षित होतं. म्हणून नाटकानंतरच्या चर्चेत आम्ही सगळे मुद्दे प्रेक्षकांसमोर मांडायचो. प्रेक्षक मंडळी आपले अनुभव सर्वाना कथित करायचे. त्यांची ती एक प्रकारे तणाव मुक्तीच असे.
नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासून आतापर्यंत क्वचित एखाददुसरा सोडून कधीच अनुचित प्रतिसाद मिळालेला नाही. या नाटकाचे मोठय़ा नाटय़गृहात, छोटय़ा सभागृहात असे पाचशेवर प्रयोग झाले असतील. प्रत्येक प्रयोगानंतर किमान एक तरी मुलगी किंवा मुलगा रंगमंचाच्या आसपास रेंगाळताना दिसतो. मग धीर करून स्वत: तर कधी मित्र-मैत्रिणीसोबत पुढे येऊन मला भेटतात. आपल्या आयुष्यात आलेल्या घृणास्पद अनुभवाचं कसंबसं कथन करतात. डोळ्यातून अश्रुधारा वाहत असतात. त्यांना प्रथम शांत करावं लागतं. प्रेमाने गोंजारावं लागतं. त्यानंतर दिलासा द्यावा लागतो. योग्य ते मार्गदर्शन करावं लागतं. पण अनुभव नेहमीचा.
औरंगाबादच्या एका प्रयोगाला तर १० वीचा मुलींचा एक संपूर्ण वर्गच मला भेटायला आला. त्यांनी त्यांचे योग शिक्षक कसे गैरवर्तन करतात ते सांगितलं. त्याबद्दल त्यांनी त्यांच्या  मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली होती. १० वीचं वर्ष असल्याने आमचं अभ्यासात लक्ष लागत नाही, हेसुद्धा मुख्याध्यापिकेला सांगितलं. परंतु महिला असूनही मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनींनाच सुनावलं. योग शिक्षकाविरोधात काहीच कारवाई केली नाही. सुदैवाने त्याच प्रयोगाला कॉलेज ऑफ सोशल सायन्सेसचे काही प्राध्यापक आले होते.  ‘याबाबतीत पुढील कारवाई तुम्ही करा’ असं सांगून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली.
या नाटकाला शहरी भागातच चांगला प्रतिसाद मिळेल असं वाटत होतं, परंतु ग्रामीण भागातही हे नाटक व्यवस्थित पोचतं. आनंदवन, वरोरा येथे आमचा विदर्भातील ग्रामीण महिलांसाठी प्रयोग झाला. एक महिला प्रयोग सुरू झाल्यापासून रडत होती. शेवटी मला भेटून म्हणाली, ‘माझ्या मुलीला तिचा मास्तर असाच त्रास देत होता. पण मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. तिला मारून मुटकून त्याच मास्तराकडे पाठवलं. आता ती माझा द्वेष करते. माझी चूक झाली. हे नाटक पाहून मला कळलं. आता मी सांभाळेन तिला.’
एका निवासी मेळाव्याकरिता आलेल्या विदर्भातील या महिला रात्रभर गटागटात अशाच आलेल्या अनुभवांविषयी चर्चा करत होत्या. मला आमच्या खेडेगावात येऊन या नाटकाचे प्रयोग करा, म्हणून गळ घालत होत्या. इतके हे अनुभव आता सार्वत्रिक होत आहेत. आणि त्याबाबत त्या महिलांना जाणिवजागृती महत्वाची वाटत होती हे विशेष.
पृथ्वी थिएटरच्या एका प्रयोगात एक उच्चभ्रू महिला अशीच नाटकभर सतत रडत होती. प्रयोग संपल्यानंतर भेटून म्हणाली, ‘माझा मुलगा बोर्डिग स्कूलमध्ये राहत होता तेव्हा त्याच्याबाबतीत असंच घडत होतं. पण त्याचा लैंगिक छळ होतोय हे आमच्या फारच उशिरा लक्षात आलं. तोपर्यंत त्याने त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे गमावला होता. आता सतत आम्हाला त्याला सांगावं लागतं, की तू आम्हाला हवा आहेस. तू आम्हाला आवडतोस. आज तो घरातून बाहेर पडून समोरच्या दुकानातही जाऊ शकत नाही. त्याच्या भविष्याविषयी खूप काळजी वाटतेय आता. आमची खूप मोठी चूक झालीय. आता पश्चात्ताप होतोय, पण काय करणार?’ पुढच्या प्रयोगाला  ती तिच्या त्या १४-१५ वर्षांच्या देखण्या मुलाला आणि अशाच प्रकारच्या अनुभवातून गेलेल्या २० मुलामुलींना घेऊन आली होती. त्या सगळ्यांनी ते नाटक एकत्र अनुभवलं.
अलीकडे लैंगिक शोषणाच्या तक्रारींमध्ये वाढ झालेली दिसून येते हे नक्की, मात्र याचा अर्थ पूर्वी असं होत नव्हतं, असं नाही. आमच्या या नाटकाच्या प्रयोगानंतरच्या चर्चेमध्ये अनेक सत्तरी ओलांडलेल्या महिला/ पुरुष हे आपल्या आयुष्यात आलेल्या लैंगिक अनुभवाचे कथन करतात. तेव्हा ही आजची टीव्हीमुळे, हिंदी सिनेमामुळे निर्माण झालेली प्रवृत्ती नाहीये. फक्त आज त्याविषयी बोलण्याचं धाडस लोकांमध्ये निर्माण झालं आहे. तज्ज्ञांच्या मते ही घटनांची वाढ नसून, लेखी तक्रार केलेल्या घटनांच्या संख्येची वाढ आहे. अलिकडे पालक सजग झाले आहेत. ते पुढे येऊन लेखी तक्रार करतात. मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्यांना योग्य ते उपचार देतात. तरीपण काही सुशिक्षित पालक वगळता याचं प्रमाण खूपच कमी आहे, असं म्हणावसं वाटतं.  
अनेक कार्यकर्त्यांच्या आणि संस्थांच्या प्रयत्नाने या निर्णयाच्या कायद्यातही बदल झाला आहे. यापुढेही ‘बाल-संरक्षण कायद्याची संहिता’ तयार होणं अत्यावश्यक आहे. खरंतर प्रत्येक पोलीस ठाण्यावर एक ‘बाल-संरक्षक’ अधिकारी असायला पाहिजे असा नियम आहे. पण प्रत्यक्षात आपल्याला असं कोणी दिसत नाही.
अलिकडेच मध्य प्रदेशातील विदिशा या ठिकाणी झालेली ही घटना. निवासी शाळेत राहणाऱ्या दोन मुलांवर त्यांचे मुख्याध्यापक शारीरिक अत्याचार करत होते. मुलं थोडी मोठी होती. ती पोलिसांकडे एफआयआर दाखल करायला गेली तर इन्स्पेक्टरने ती नाकारली. त्याला या कायद्याविषयी माहितीच नव्हती. त्यानंतर ती मुलं बाल हक्क आयोगाकडे गेली. तेथल्या वरिष्ठांनी इन्स्पेक्टरला कायद्याची प्रत दिली. तोपर्यंत चार दिवस उलटले होते. त्यानंतर मुलांची वैद्यकीय तपासणी झाली. पण ती सुस्पष्ट नव्हती. मुख्याध्यापक दोन दिवस बेपत्ता होते. त्यांच्या विरोधात पुरावा नव्हता. परंतु त्यांच्याकडे २००६ मधील ‘अश्लील चित्रफितींचे’ काही पुरावे सापडले. त्या रॅकेटमध्ये तो सामील असल्याचे धागेदोरे मिळाले. त्यामुळे आयोगाला पुढची कारवाई करता आली.
अर्थात, लैंगिक अत्याचाराला प्रत्यक्ष बळी पडलेल्या मुलांचे त्यांच्या पालकाचे असे अनुभव येतातच. अनेक जण मुद्दाम भेटून त्याचं मन मोकळं करतात पण अनेकदा विचित्र अनुभवही येतात, एकदा ठाण्याच्या एका माँटेसरी शिक्षिकेने सांगितलेला अनुभव ऐकून मी सुन्नच झाले. त्या म्हणाल्या, ‘माझ्या वर्गातल्या एका छोटय़ा मुलीने आपण ज्या रिक्षातून येतो तो रिक्षावाला आमच्याबरोबर कसे चाळे करतो ते लाजत लाजत सांगितलं. म्हणून मी तिच्या आईला बोलावून रिक्षावाल्याच्या गैरवर्तनाची तक्रार केली. त्याचबरोबर रिक्षातून येणाऱ्या इतर बालकांच्या पालकांनाही जागरूक करायला सांगितले. त्यावर त्या मुलीची आई उत्तरली, की ‘अहो, आमच्या भागातून येणारी ती एकमेव रिक्षा आहे. उद्या तो यायचा बंद झाला, तर आमच्या मुलांना शाळेत कोण पोचवणार?’
तसाच अनुभव महापालिकेच्या शाळेतील मुलांचा. ही मुलं चटकन बोलत नाहीत. पण त्यांना बोलतं केलं की ते मोकळे होतात. कारण त्यांना असे अनुभव वारंवार येत असतात. त्यांच्या घरी राहाणारे गाववाले किंवा खाणावळीत येणारे लोक त्यांचं विविध पद्धतीने लैंगिक शोषण करत असतात. त्यांच्या त्यांच्या आईला हे सर्व माहीत असतं. पण ती त्याकडे काणाडोळा करते. कारण तिची आर्थिक गरज भागवली जात असते.
अशा अनेक कारणांनी पालकही बऱ्याचदा दुर्लक्ष करत असतात. किंवा त्यातलं गांभीर्य त्यांच्या लक्षात येत नाही. मुलं आपाआपल्या परीने असे अनुभव देणाऱ्या व्यक्तींबद्दल विरोध दर्शवतात. पण पालकांना तेही जाणवत नाहीत. उदा. एखादा काका-मामा घरी आला की पालक मुलांना त्याला पापी द्यायला सांगतात. मुलं देत नाहीत. तरीही जबरदस्तीने घेतलीच तर मुलं गाल पुसून टाकतात. कधी एखादा चुलत-मावस भाऊ आला की मुलं स्वयंपाक घरात जाऊन लपतात. बाहेरच येत नाहीत. प्रत्येक वेळेस मुलांना या व्यक्तींकडून असाच अनुभव आला असेल असं म्हणता येणार नाही, पण पालकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. याशिवाय हे शोषण होत असताना मुलांमध्ये अचानकपणे बदल झालेले दिसून येतात. अर्थात पालकांनी किंवा शिक्षकांनी काटेकोरपणे त्याकडे पाहिले तरच तत्काळ कळतात. मूल अचानकपणे त्याची एकाग्रता गमावून बसतं, तोंडात अश्लील शब्द वारंवार येतात. कधीकधी बिछाना ओला होतो तर कधी अभ्यासातील प्रगती खुंटते, हे अचानक का झालं हे बराच काळ लक्षात येत नाही. पण जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करुन उपयोगी नाही.
त्याचबरोबर पालकांनी मुलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांच्या बोलण्याचा मान राखला पाहिजे. म्हणजे ज्या वेळी असे प्रसंग मुलांवर ओढवतात, तेव्हा मुलं तत्काळ आईवडिलांकडे त्याविषयी बोलतात.
बंगलोरच्या ‘एनआयएमएचएनएस’ नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ आणि नुरो सायन्स’ मधील मानसरोगतज्ज्ञ विभागाचे प्राध्यापक शेखर शेषाद्री म्हणतात, की ‘मुलं चलाख असतात. ते समोरच्याची चाल अचूक ओळखतात. मुलांना वेळीच जाणीव आणि विश्वास दिला तर ते शोषणकर्त्यांच्या पहिल्याच सूचक हालचालींना विरोध करतात. पालकांनी मुलांना विश्वास आणि स्पर्शज्ञानाची ओळख दिली, तर शोषणकर्त्यांला ते वेळीच ‘नाही’ म्हणून दूर सारू शकतात.’
लैंगिक अत्याचाराच्या संपूर्ण व्यवहारात मुलांचा काहीच दोष नसतो. ती निष्पाप असतात. परंतु लाज, भीती, संकोच यामुळे आपणच दोषी आहोत, असं त्यांना वाटतं राहातं आणि म्हणून ती बोलत नाहीत. आपल्या समाजात याविषयी मोकळेपणाने घरीही बोललं जात नाही आणि शाळेतही त्याचं शिक्षण दिलं जात नाही. त्यामुळे मुलांना आपला अनुभव शब्दात मांडता येत नाही. असे अनुभव समाजातील कुठल्याही थरातील मुलांना येत असतात. त्यामध्ये गतिमंद, मतीमंद, मूक-बधिर यांच्याबद्दल विशेष सावधगिरी बाळगावी लागते.
चेन्नईतील एका शाळेने याबाबतीत एक चांगला उपक्रम सुरू केला. ११ वीच्या विद्यार्थ्यांनी इतर शाळेतील मुलांना बोलावून ‘शारिरीक अत्याचार’ या विषयावर चर्चा केली. हा विषय नेहमीच दडपला जातो. पण त्याला आपल्यालाच सामोर जावं लागतं. तेव्हा आपल्या सुरेक्षेसाठी आपणच शहाणं व्हायला पाहिजे. स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. कारण हे दु:ख आपल्याला भोगावं लागतं. असं म्हणून सर्वानी या विषयावर उघडपणे, मोठय़ाने बोलावं म्हणून मोहीम सुरू केली.  ९ वी, १० वी च्या दोनशे विद्यार्थ्यांनी पोस्टर्स स्पर्धा घेतली, तर इतरांनी   being safe वर गाणी रचली – नृत्याविष्कार सादर केले. ‘लैंगिक अत्याचाराला ‘नाही म्हणा’ घोषणा केल्या. या उपक्रमासाठी शाळेच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.
मला अनेक दुर्दैवी मुलांची पत्रं येतात. ‘आयुष्य नकोसं झालंय. आत्महत्या करावीशी वाटते, माझ्याच नशिबी हा अनुभव का आला?, शोषण करणारा ‘तो’ उजळ माथ्याने फिरतोय, मी मात्र आतल्या आत जळतोय,’ अशी निराशाजनक पत्रं येतात, फोन येतात. पत्रावर कधी नाव असतं, कधी नसतं. फोन करून भेटायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. फोन करून भेटायला येणारे पहिल्याच वेळेस येत नाहीत. तीनचार वेळा फोन करून वेळ घेतात, पण येत नाहीत. मी समजते. त्यांच्या मनाची तयारी होऊन बोलण्याची हिंमत त्यांच्यामध्ये यायला थोडा वेळ जातो. पण भेटतात तेव्हा अश्रू अनावर झालेले असतात. मन मोकळं होईपर्यंत डोळ्यांना खळ नसतो. ही मुलं २० ते ३५ वयोगटातील असतात.
कुटुंबातील व्यक्तीकडून लैंगिक शोषण झालेल्या १० ते १८ वयोगटातील मुलांचे प्रमाण जवळपास ६४ टक्के आहे. ७२ टक्के मुलं याविषयी कुणाकडेच बोलत नाहीत. सहन करत राहतात. हे इतकं प्रमाण पाहिल्यानंतर वाटतं अजून आम्हाला खूप ठिकाणी पोहोचायचं आहे.
 २०१० पर्यंत महाराष्ट्रात आणि देशातल्या इतरही भागात  हिंदी-मराठी भाषेमध्ये आम्ही या नाटकाचे प्रयोग केले. नाटकातील छोटय़ा मुली पटापट मोठय़ा दिसू लागत. त्यामुळे वरचेवर तालमी घेऊन नवीन कलाकार तयार करणं हे नित्याचं झालं. शिवाय एकूणच महागाईमुळे प्रयोगाचा खर्चही वाढू लागला. नाटक बंद करणं तर शक्यच नव्हतं. कारण दुर्दैवाने नाटकाची मागणी वाढतच होती. म्हणून या नाटकाचं व्हिडीओ रेकॉर्डिग करून त्याची सीडी काढली. ही सीडी आता अनेक संस्था, शाळा, पालक माझ्याकडून घेऊ लागले. त्याचबरोबर मी स्वत: जाऊन ही सीडी महापालिकेच्या शाळेत, आदिवासी भागातील शाळेत, संस्थांमध्ये नेऊन दाखवते. नाटकाप्रमाणेच सीडी दाखवल्यानंतर प्रेक्षकांबरोबर संवाद साधते. प्रेक्षकांना बोलतं करते. शोषित मुलांचं समुपदेशन करते. समस्या अधिक गंभीर असेल, तर त्यांना मार्गदर्शन करून योग्य अशा समुपदेशकाकडे पाठवते.
नाटक किंवा या शोनंतर मी कार्यशाळाही घेते. ज्यामध्ये मी पपेट्सचा उपयोग करते. हातात पपेट्स असतील तर छोटे आणि मोठेही पटकन मनातील बोलून टाकतात. पपेट् ही एक वेगळी व्यक्ती आहे, असं समजून ती बोलतेय या विचाराने त्यांच्या दु:खाचा निचरा होतो. ही उपचारपद्धती मी नाटकातही वापरली आहे. अनेकदा मुलं बोलत नाहीत. तेव्हा नाटकानंतरच्या चर्चेत आम्ही मुलांना प्रश्न, शंका कागदावर लिहून द्यायला सांगतो. त्यामध्ये नावाचा उल्लेख नसतो. या प्रश्नांवरून असं दिसून येतं, की मुलांच्या मनात खूप कुतूहल असतं, पण त्याची अचूक माहिती त्यांना कुणाकडून मिळत नाही. मग समवयस्क मुलांकडून किंवा हल्ली इंटरनेटवरून ते माहिती मिळवतात. ती बऱ्याचदा विकृत, विपर्यास केलेली असू शकते. त्याकरिता घरी पालकांनी किंवा शाळेत शिक्षकांनी त्यांना खरी माहिती देणं खूप गरजेचं आहे.
या नाटकात आम्ही कविवर्य विंदा करंदीकर यांच्या बालकवितांचा उपयोग केला आहे. त्यातल्याच एका कवितेतील ओळ ‘वाटेवरती काचा ग.. ’ ही शीर्षक म्हणून वापरली आहे. करंदीकरांनी माझं नाटक पाहिलं, तेव्हा ते नि:शब्द झाले होते. बालकविता लिहिताना त्यांना मी काढलेला अर्थ अपेक्षित होता की नाही माहीत नाही पण त्यानंतर ते मला जेव्हा जेव्हा भेटत, तेव्हा तेव्हा म्हणत, ‘‘तुम्ही फार चांगलं काम करत आहात. माझे तुम्हाला आशीर्वाद आहेत.’’ त्यांच्या आशीर्वादामुळेच गेली बारा वर्षे मी या नाटकाच्या आधारे लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं व्रत निभावते आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा