डॉ. अंजली जोशी
आपण लहानपणापासून आई-बाबांना आदर्श म्हणून पाहात असतो. ते वागतील तसंच नकळत वागू लागतो, त्यांचे विचार आपले विचार होऊन जातात; पण मोठेपणी जग कळू लागल्यानंतर जेव्हा अनेक गोष्टी वेगळय़ा आयामासह डोळय़ांना स्पष्ट दिसू लागतात तेव्हा? अशा प्रकारे स्वत:ची मतं बनलेली व्यक्ती आई-वडिलांच्या, कुटुंबाच्या ठरीव मतांच्या रस्त्यावर वाटचाल करू शकेल?.. जगण्यातल्या मूलभूत गोष्टींबद्दलच्या मतभेदांतून सारखेच खटके उडू लागतात तेव्हा नेमकं कोण बरोबर?
भल्या पहाटे कसल्या तरी आवाजांनी झोपमोड झाली. पाण्याचा, भांडय़ांचा, कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज. मी डोळे उघडले. लक्षात आलं, की मी मुंबईतल्या माझ्या भाडय़ाच्या घरात नाही, तर आमच्या छोटय़ा शहरातल्या आईबाबांच्या घरी आहे.
माझी झोप आता पार उडाली. बाहेर आले तर आईची चहा-नाश्त्याची गडबड चालू होती. बाबा कुणाशी तरी फोनवर बोलत होते. त्यांचा आवाज खणखणीतपणे ऐकू येत होता. ‘‘हो. रश्मी आलीय. आतापर्यंत धावपळीत यायची. या वेळी म्हटलं रजा काढून चार दिवस ये निवांत! स्ट्रॅटेजिक हेड आहे ती. हो ना, तरुण वयात मोठी झेप आहे!’’ बाबा कौतुकानं बोलत होते खरे; पण आमच्या चॅनलवर मी जे अनेक सामाजिक विषय हाताळते, त्यात त्यांना कितपत रस होता, कुणास ठाऊक!
चहा पिता पिता मी आईला विचारलं, ‘‘इतक्या पहाटे कशाला उठता? बाबा तर हल्लीच रिटायर्ड झालेत. आरामात पडून राहायचं ना! दिवस मोकळाच असतो की!’’
‘‘एवढय़ा वर्षांची लवकर उठण्याची सवय आहे ना. जाग येतेच आपोआप! उगाच लोळत पडण्यापेक्षा वेळेवर उठलेलं बरं. तूही पूर्वी याच वेळेला उठायचीस की!’’ आई आठवण करून देत म्हणाली.
मी पूर्वी लवकर उठत होते, हे विस्मृतीच्या पार तळाशी गेलं होतं. बारावीनंतर या शहरातून बाहेर पडले ते थेट आता मुंबईतल्या मीडियातल्या नोकरीत स्थिरावलेय. हे क्षेत्र म्हणजे रात्री किती उशीर होईल याचा नेम नाही. पहाटे लवकर उठण्याची सवय तर पार कोलमडून- मोडून गेली आहे! माझ्या रुटीनमध्ये, सवयींत, विचारांत इतके बदल झाले आहेत; पण आईबाबांमध्ये तसे बदल झालेले दिसत नाहीत. वर्षांनुवर्ष त्यांचं एकच रुटीन ठरलेलं आहे.
सकाळचं आटोपून होईस्तोवर गिरिजा कामाला आली. मला बघून तिला आनंद झाला. ती काहीबाही विचारत राहिली. मला माहीत होतं की, आता आई चहा करेल. मग ती आणि गिरिजा गप्पा मारत चहा पितील. मग गिरिजा कामाला लागेल. तसंच झालं. आईने गिरिजाला चहा दिला. मलाही दिला; पण माझं बोलण्यात लक्ष लागेना. गिरिजाला आईनं वापरात नसलेला जुना कप दिला. तो मला काटय़ासारखा खुपत होता. गिरिजा गेल्या गेल्या मी विचारलं, ‘‘आई, तिला आपल्यातलाच कप का नाही दिलास?’’
‘‘पूर्वीपासूनच तिच्यासाठी वेगळा कप आणि ताट राखून ठेवलंय. तू लहान होतीस तेव्हापासून. आठवत नाही का?’’ ती सहजपणे म्हणाली. जणू यात तिला काही विशेष वाटत नव्हतं. ‘‘लहान होते तेव्हा स्वत:चे विचार नव्हते; पण आता करू शकतेय ना? म्हणूनच विचारतेय, की तिला वेगळा कप आणि ताट देऊन भेदभाव का करतेस?’’
आईला उत्तर सुचेना. मग म्हणाली, ‘‘अगं, ती कुठल्या वस्तीतून येते, स्वच्छता कितपत पाळते, माहीत नाही. काळजी घेतलेली बरी!’’
‘‘म्हणजे घरातली बाकीची कामं करते, तेव्हा स्वच्छतेचा प्रश्न येत नाही. फक्त खाण्यापिण्यापुरता येतो का? ही तर दांभिकता झाली! ती गरीब आहे म्हणून हा भेदभाव?’’ मी तडकून म्हटलं. ‘‘अगं, गिरीजा काहीच म्हणत नाही. तुला कशाला आलाय तिचा पुळका?’’ आई त्रासिक स्वरात म्हणाली.
‘‘तोच तर मुद्दा आहे ना! शोषितांना कळतच नाही, त्यांचं शोषण होतंय ते! त्यांचं कंडिशिनगच झालंय ना तसं, की चाललंय ते बरोबर आहे म्हणून!’’ मी पोटतिडिकीनं म्हटलं. ‘‘हे बघ रश्मी, गिरिजा काही शोषित वगैरे नाही. तिच्याशी माझे पूर्वीपासून घरच्यांसारखे संबंध आहेत. तिला अडीअडचणीला मी अनेकदा मदत करते. तू तिच्या डोक्यात नको ते भरवू नकोस. तू इथे चार दिवस आहेस. मग निघून जाशील मुंबईला आणि निस्तरायला लागेल मला! तुला जी काही क्रांती करायची आहे ती बाहेर कर. इथे नको!’’ आईनं चर्चेला पूर्णविराम दिला.
बाहेरच्या जगात कष्टकरी स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणारे कार्यक्रम मी करते; पण माझ्या स्वत:च्या घरी हा असला भेदभाव! मी माझे मुद्दे जीव तोडून मांडत राहिले; पण लक्षात आलं, की माझं बोलणं आईपर्यंत पोहोचतच नव्हतं. मग फार बोलणं झालं नाही; पण मनाला जखम झालीच. संध्याकाळी बाबांबरोबर फिरायला गेले. चालता चालता बाबा म्हणाले, ‘‘रश्मी, तू मेल-सिग्नेचरमध्ये she/ her असं लिहितेस. मुलींना संबोधताना she किंवा her हे अध्याहृतच आहे की! मग मुद्दाम कशाला ही सर्वनामं लिहायची?’’
‘‘बाबा, किती सहजपणे आपण गृहीत धरतो ना की मला मुलगी म्हणून संबोधलेलं आवडत असेल म्हणून! जगात असे अनेक आहेत, की असं गृहीत धरणं त्यांना नको असतं. त्यांना स्वत:बद्दल वेगळं वाटत असतं. त्यात ट्रान्सजेंडर किंवा नॉन-बायनरी ग्रुप्स येतात. ही सर्वनामं वापरणं म्हणजे सर्वनामाची स्वत:ची आवड सांगणं तर आहेच; पण आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असा या गटांना दिलेला संदेशही आहे.’’ मी शांतपणे सांगितलं.
‘‘हे पाश्चात्त्यांकडून आलेलं खूळ असेल! त्यांचे प्रश्न वेगळे आणि आपले वेगळे! आपल्यासारखी लोकसंख्या तिकडे नाही. इथे नॉर्मल लोकांचेच नोकरी, शिक्षण, आरोग्य यांसारखे महत्त्वाचे प्रश्न अजून सुटले नाहीत. ते सोडून अशा लोकांचे प्रश्न कशाला ऐरणीवर घ्यायचे?’’ बाबा म्हणाले.
‘‘असे लोक म्हणजे? ते कुणी वेगळे नाहीत. आपल्या समाजाचाच भाग आहेत ते! अमुक व्यक्ती नॉर्मल, अमुक व्यक्ती अॅबनॉर्मल हे कुणी ठरवलं? बाबा, हा नॉर्मल-अॅबनॉर्मलचा प्रश्न नाही. या गटांबद्दलच्या अशा गैरसमजुती समाजात खोलवर पसरलेल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध तर ते लढा देत आहेत. त्यांच्या पाठी उभं नको का राहायला?’’ मी कळकळीनं बाबांना सांगत होते; पण लक्षात आलं, बाबांना त्यात रस नव्हता. कारण त्यांनी विषयच बदलला; पण बाबांना पटवून न देता आल्याचं शल्य मनात राहिलंच!
उरलेल्या दिवसांतही वादाच्या ठिणग्या अधूनमधून उडतच राहिल्या. एकदा आईनं पूजेसाठी जेवायला ज्योतीमावशीला सवाष्ण म्हणून बोलावलं, तेव्हा फक्त विवाहित आणि नवरा हयात असलेल्या स्त्रीलाच का बोलवायचं, यावरून आईशी वाद झाला. असं करून स्त्रियाच स्त्रियांवर कसा अन्याय करतात, त्याबद्दल मी सांगायला लागले, तर आई म्हणाली, ‘‘हे बघ, तुझ्यासारखा कीस मी काढत नाही. ज्योती माझी मैत्रीण आहे. तिला भेटण्याचं एक निमित्त एवढाच हेतू असतो माझा! त्यानिमित्तानं आम्ही एकत्र भेटतो आणि आमचा वेळ छान जातो!’’
‘‘अगं, पण निमित्तच हवं असेल तर नुसतंही भेटता येतं की! पण यानिमित्तानं बोलावून चुकीच्या प्रथेला खतपाणी नाही का मिळत? पुन्हा पूजेला बोलावशील तेव्हा यात न बसणाऱ्या स्त्रियांनाही बोलाव की!’’ मी म्हटलं.
‘‘हे बघ, तुझ्या घरी तुला हवं ते कर. इथे काय करायचं ते मी बघून घेईन.’’ आईनं विषय आवरता घेतला.
एकदा बाबांना बाहेर जाताना पाहिलं, तेव्हा ते प्लास्टिकची पिशवी ड्रॉवरमधून काढत होते. आईनं त्या जमवून ड्रॉवरमध्ये ठेवल्या होत्या.
‘‘बाबा, कापडी पिशवी का नाही वापरत तुम्ही?’’ मी विचारलं.
‘‘अगं, प्लास्टिकच्या पिशवीची घडी करून खिशात ठेवता येते. या पातळ आहेत ना. कापडी असेल तर हातातच ठेवावी लागते.’’ बाबा म्हणाले.
‘‘बाबा, प्लास्टिकच्या पिशव्या रिसायकल होत नाहीत. प्लास्टिकनं पर्यावरणाची किती हानी होते माहीत आहे ना?’’ मी चिडून म्हटलं.
‘‘अगं, पण भाजीवाल्यापासून ते किराणा दुकानदार सगळेच सर्रास या पिशव्या देतात. त्यांच्यावरचे निर्बंध कडक केले की आपोआपच प्रश्न सुटेल!’’ बाबा म्हणाले.
‘‘जोपर्यंत तुमच्यासारखे पिशव्या घेणारे ग्राहक आहेत, तोपर्यंत निर्बंध घालून प्रश्न सुटणार नाही. त्यांनी पिशव्या न देण्याची आपण वाट का पाहायची? न वापरणं स्वत:पासून सुरू करू शकतो की! तुमची पिढी असा आत्मकेंद्रित विचार करते, म्हणून आमच्या पिढीला पर्यावरणाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय.’’ मी म्हटलं.
‘‘तू सामाजिक कार्यकर्त्यांच्या सान्निध्यात जास्त राहतेस का? प्रत्येक गोष्टीला विरोध करतेस!’’ बाबांनी शेरा मारला.
आता मात्र माझा संयम संपला. ‘‘बाबा, विरोध केला तरच बदल होतो. समाजात ज्या अनेक सुधारणा दिसतात, त्यामागे सामाजिक कार्यकर्त्यांचे परिश्रम असतात.’’ त्यांनी किती तरी रचनात्मक कार्यक्रम केले आहेत, त्यांची यादी मी सांगू लागले.
मला थांबवत बाबा हसत म्हणाले, ‘‘बघ, थोडीशी गंमतही मानवत नाही तुला! तुझी संवेदनशीलता नको इतकी टोकदार झाली आहे. काहीही बोलण्याचा अवकाश, तू एकदम हमरीतुमरीवर येतेस. जरा सबुरीनं घे की! बदल एका रात्रीत थोडाच होणार? सगळय़ा गोष्टींचा विचार आदर्शवादी भूमिकेतून करतेस, म्हणून तुला आमची प्रत्येक गोष्ट चुकीची वाटतेय. एकांगी भूमिकेतून विचार करू नकोस. कुठल्याही गोष्टीला अनेक बाजू असतात हे लक्षात घे.’’
माझ्या आतमध्ये खूप उफाळून येत होतं. मी ते कसंबसं थोपवून धरत होते. आईबाबा मला सुधारायला सांगत होते; पण त्यांच्यातल्या सुधारणांचं काय? त्यांच्या मनात इतके पूर्वग्रह आहेत, ते दूर करणं तर दूरच; पण ते आहेत, याची जाणीवही नाही त्यांना!
निघण्याचा दिवस जवळ आला, तेव्हा बोलायला फारसे विषयच उरले नव्हते. मी जात आहे म्हणून आईबाबांनी बहुधा सुटकेचा नि:श्वास टाकला असणार.
का घर्षण होतंय आमच्यात सतत? जणू काही आम्ही दोन ध्रुवांवरच आहोत. खरं तर हे घर्षण पूर्वीपासून थोडय़ाफार प्रमाणात जाणवत होतंच; पण वैचारिक दरी एवढी रुंद झाली असेल, याची कल्पना मात्र घरी जास्त मुक्कामाला आल्यावरच आली. मीही एके काळी याच मानसिकतेचा भाग होते; पण आता जाणिवा समृद्ध झालेल्या आहेत, दृष्टी खुली झाली आहे. चांगलं माणूस असणं पुरेसं नाही, तर स्वत:पलीकडे बघता आलं पाहिजे, हे कळतंय. आईबाबा मात्र संकुचित मानसिकतेला कवटाळून बसले आहेत. हे केवळ पिढीतलं अंतर नाही तर मानसिकतेतलं आहे. त्यांची मानसिकता बदलण्याचा मी जितका जास्त प्रयत्न करतेय, तेवढे ते माझ्यापासून दूर दूर जात आहेत! परत निघताना कुठे तरी वाचलेल्या कवितेच्या ओळी आठवत होत्या-
‘एकत्र प्रवास करताना,
कळलंच नाही की
मी कधी विरुद्ध दिशेला
चालू लागलेय ते!
मागे वळून पाहिलं तर
खोल दरी पसरली होती.
यावर पूल कसा बांधायचा,
याचं उत्तर आता शोधतेय!’
anjaleejoshi@gmail.com