.. त्या एका घटनेने मुलांच्या मनात वेगवेगळे विचार सुरू झाले. ‘आपण अजून काय करू शकतो?’ या विचाराने मुलं अस्वस्थ झाली. ‘आपण काही करायचंय’ नि ‘आपण काही करू या’ हे विचार मनात रुजायला लागले, याचाच शाळेला आनंद झाला. खरंच समाजाचं भान शाळेला यायलाच हवं. मुलांना शाळेत कोंडून ठेवून हे साध्य नाही होणार! शाळा लोकांपर्यंत पोचायला हवी. म्हणूनच या शाळेने अशा सहशालेय उपक्रमांची सुरुवात केली..
आजूबाजूला निर्माण झालेले अनेक प्रश्न शाळा पाहात होती. परिसरातले बदललेले वातावरणही शाळा अनुभवत होती. कारण माणसांपेक्षाही शाळेचे वय जास्त होते. दोन पिढय़ातल्या चर्चा शाळेच्या कानावर पडत होत्या. ‘‘आमच्या वेळी असं नव्हतं. किती तळमळीने कामं व्हायचं. मुलं पण किती आज्ञाधारक, शिस्तपालन करणारी होती. लोकांच्यातही किती आदर होता..’’ अशा प्रतिक्रिया ते ‘‘आजकाल पाहा! मुलांना वाचता येतं? लिहिता येतं? शिस्त आहे? मुलांचा नि लोकांचा काही संबंध आहे? आदरातिथ्य, लोकांशी संपर्क या गोष्टी राहिल्याच नाहीत. मुलं फक्त स्क्रीनवर..’’ अशा तक्रारी शाळेने ऐकलेल्या होत्या.
ही शाळा अशी वाक्यं ऐकून शाळा विचारात पडायची, कारण तिला ही गोष्ट चिंताजनक वाटत होती. म्हणूनच तिने ठरवले की आपल्या घरी घडणाऱ्या घटना आपल्या इतर मैत्रिणींना सांगायच्या. शाळा समाजजीवनाचा अभ्यास करायची. काळानुसार काय-काय बदल केले पाहिजेत हेही तिनं ठरवलं होतं. म्हणूनच प्रत्येक वर्ग संगणकाने सजला आणि डोक्यावर गवताचा भारा उचलणाऱ्या मुली संगणकासमोर दिसू लागल्या. इतकंच नाही तर शाळेनं हार्डवेअर आणून दिलं नि मुलांनी कॉम्प्युटर्सची जोडणी केली. ही गोष्ट संगणकतज्ज्ञांनी कौतुकानं गौरवली. आता मुलं मोबाइलही सहज वापरत होती. केवळ मेसेजसाठी नि गेम्ससाठी नाही तर निसर्गातले वेगवेगळे आवाज त्यांनी रेकॉर्ड केले, वेगवेगळ्या दृश्याचं चित्रीकरणही केलं आणि त्यावर मुलं चर्चा घडवून आणत होती. शाळेत टी.व्ही. आलाच होता, त्यावरचे शेती, आरोग्यविषयक कार्यक्रम मुलांच्या चर्चेचा भाग होते. नि शाळेतल्या गणित विषयाच्या मुलांचा ‘फिल्म क्लब’ही होता. पडद्याकडे पाहण्याची दृष्टीही मुलांना द्यायलाच हवी हा शाळेचा हेतू होता. मग ही फिल्म कधी ‘जिंकी रे जिंकी’ असेल किंवा ‘आनंदवन’वरची असेल. कधी इटालियन फिल्म असेल. मुलांना भाषा समजत नव्हती, नि इंग्रजीतील सबटायटल्स् वाचायची सवय नव्हती. मुलांना चित्र पाहून जो अर्थ समजायचा त्यावर मुलं बोलायची. अशा विविध देशातले चित्रपट मुलं पाहायची. शाळेला वाटायचे अशा उपक्रमातूनच मुलांच्यात ‘नेमके तेवढे निवडून घ्या’ हा दृष्टिकोन निर्माण होईल. तंत्रज्ञानाची गुलाम बनलेली मुलं शाळेला नको होती तर ‘मित्र’ बनलेली हवी होती. फक्त मित्र नाही तर ‘तंत्रज्ञान मुलांच्या हाती’ हे घडणं शाळेला अपेक्षित होतं. शाळेने केलेल्या बदलाची ही एक दिशा होती.
   एका बाजूला शाळा बघत होती. मुलं आपल्या कोशात गुरफटतायत, लोकांपासून दूर जातायत. मुलांना शेतात जायला आवडत नाही, आणखी काय-काय करायला आवडत नाही. कुणीच सांगत नाही-मला शेतकरी व्हायचंय. गावात काय चाललंय मुलांना माहीत नाही. शेतात कोणत्या प्रकारचं भात पेरतात हे मुलांना माहीत नाही. उलट शेतात जायची मुलांना लाज वाटतेय. असं होऊन कसं चालेल? मातीशी नाळ तुटून चालेल? काहीतरी केलं पाहिजे. या विचारातूनच एक वेगळंच काम शाळेत सुरू झालं.
८ वी ते १० वीच्या मुलांनी परिसरातल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून आल्या. तशा शेतकऱ्यांतल्या गैरसमजुतीही लक्षात आल्या. ‘प्रगत शेती’ विषयीचे वेगवेगळ्या देशातले प्रयोग मुलांनी समजून घेतले होते. खते, बी-बियाणे, माती, पाणी याविषयीची नेहमीपेक्षा वेगळी माहिती मुलांनी जमवली होती, इंटरनेटवरून डाऊनलोड करून घेतली होती. वाडीवाडीत ही माहिती द्यायचं ठरलं. शेतकरी काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मुलं नाराज झाली, पण धीर सोडला नाही.
  काही शेतकऱ्यांच्या घरातली सगळी माणसं शहराकडे गेली होती. जुन्या पिढीला वाईट वाटत होतं. शेतातलं उजाडपण डोळ्यात थिजत होतं. मुलांच्या एका गटाला हे जाणवलं. मुलं शिक्षकांना म्हणाली, ‘‘सर, आपण एक दिवस तरी त्यांचं शेत करायला जाऊ.’’ ‘‘एका दिवसानं काय होणार?’’ ‘‘काय करू या?’’ ‘‘गावचा पण सहभाग होता. आपल्याला सगळी मदत करता येणार नाही. थोडी फार तर करू या.’’
 विचार होत होता, पण नक्की काय करायचं याची दिशा मिळेना. तेव्हा शिक्षक वाडीवाडीतल्या प्रमुखांना भेटले. ही कल्पना तर लोकांना खूप आवडली. मुलांचे गट पाडायचे ठरले. मदत हा तर हेतू होताच, पण त्याहीपेक्षा श्रमानुभव हा हेतू होता. लोकांनाही असं वाटता कामा नये. फुकटात काम होतंय आणि मुलांनाही वाटता कामा नये आमच्याकडून काम करून घेतायत. शारीरिक श्रमाची सवय आणि शेतकऱ्यांच्या श्रमाची जाणीव हा हेतू रुजवण्यासाठी मुलांशी खूप बोलावं लागलं.
  गटागटाने मुलं वाडीवस्तीत कामाला गेली. ऐन धो-धो पावसात चिंब भिजत काम करताना मुलांना मजा आली. हा अनुभवच वेगळा होता. शाळेत सगळे जमले. पालकांनी मुलांबद्दल कौतुकोद्गार काढले. आपण इतरांसाठी चांगले काम करतो हा विश्वास मुलांना वाटला. जाणवलेल्या उणिवांवर चर्चा झाली. सुरुवातीला पालकांनी थोडा विरोध केला, ‘‘आमची मुलं दुसऱ्यांच्या घरी कामाला का पाठवणार?’’ पालकांना समजून सांगावं लागलं. ज्यांना पटलं नाही त्यांना कार्यानुभव, समाजसेवा व क्षेत्रभेट या नावाखाली हा अभ्यासाचाच भाग कसा आहे, हे सांगावं लागलं नि यासाठीही गुण असतात हे पटवून द्यावं लागलं. अभिव्यक्ती फलकावर मुलांची मतेही जाणून घेता आली. खरेच ज्यांच्या घरी मदतीला कुणी नव्हतं त्यांना मदत झाली. सुरुवातीचा विरोध मावळला आणि मुलांच्या सामाजिक जाणिवेत बदल झाला. सर म्हणाले, ‘‘खरंच मुलांनो, तुमच्यातली ऊर्जा वायाच जाते. पण अशा उपक्रमातून श्रमाचा अनुभवही येतो आणि आपण लोकांसाठी कामही केले पाहिजे असं वाटतं..’’
या एका घटनेने मुलांच्या मनात वेगवेगळे विचार सुरू झाले. ‘आपण अजून काय करू शकतो?’ या विचाराने मुलं अस्वस्थ झाली. ‘आपण काही करायचंय’ नि ‘आपण काही करू या’ हे विचार मनात रुजायला लागलं, याचाच शाळेला आनंद झाला. खरंच समाजाचं भान शाळेला यायलाच हवं. मुलांना शाळेत कोंडून ठेवून हे साध्य नाही होणार! शाळा लोकांपर्यंत पोचायला हवी. म्हणूनच या शाळेने अशा सहशालेय उपक्रमांची सुरुवात केली होती. शाळेचा विश्वास होता की यातून होणारे संस्कार मनावर होतात. हाताने मदत होते तशी शब्दांनी होते, सहवासाने होते, सोबतीने होते. या सगळ्या मार्गाची दिशा ही शाळा मुलांना दाखवत होती. याचा संदर्भ समाज वेगवेगळा लावत होता.
बदलत्या काळाच्या ठळक गोष्टी तक्रारींच्या स्वरूपात शाळा ऐकत होती. ‘आजकाल कुणी कुणाशी बोलत नाही.’ ‘कुणी कुणाकडे जात येत नाही..’ ‘आजारी कुणी पडलं तर मदतीला कुणी नसतं..’ ‘वृद्ध पिढीशी बोलायला वेळ नसतो.’ ‘मुलांना एकेकटं राहावं लागतं. घरात कुणीच नसतं..’ याला उत्तरं हवी असताना आणि ती उत्तरं फक्त शब्दातून नको असतात. तीच उत्तरं या शाळेने शोधली. उत्तरं प्रत्यक्ष पाहण्यातही मजा असते आणि ही उत्तरे मग प्रत्यक्षातही येतात.
मुलांना शिक्षकांनी एक स्वाध्याय दिला. अभिव्यक्ती फलकावर एक वाक्य लिहिलं- ‘माझ्या आजूबाजूच्या माणसांसाठी मी..’ बरेच दिवस फळा रिकामा होता. कारण काय लिहावं हेच मुलांना समजेना. संध्याकाळी सगळी मुलं घरी गेल्यावर सरांनीच लिहिली.. ‘मी गोष्टी सांगेन.’ ‘फोन लावून देईन.’ ‘पुस्तक वाचून दाखवेन.’ ‘ वेगवेगळी माहिती सांगेन..’ जराशी वाट दाखवणं गरजेचं होतं. मुलांच्या मनातला आशय किती पटकन वाचता येतो! गणित सुटल्यावर मुलं कशी चुटकी वाजवून जिंकल्याचा आनंद दाखवतात, हे शाळा पाहत होती. मुलांचा चेहरा आरशासारखा लख्ख असतो. निदान या वयात तरी! फक्त वाचता नि पाहता यायला हवं. त्या चेहऱ्यावरचे भाव वाचणं, मनातलं ऐकणं, त्या संदर्भानं त्यांच्याशी बोलणं आणि मग आपण लिहितं होणं.. मुलांच्यात निर्माण करायच्या या श्रवण, भाषण, वाचन, लेखन क्षमता अशा पद्धतीनं शिक्षकांतही शाळेनं निर्माण केल्या होत्या. म्हणूनच सामाजिकतेचं वेगळं भानही शाळा सर्व उपक्रमांतून निर्माण करत होती.
   शाळेला आनंद झाला होता. कारण प्रत्येक मुलात कमी-जास्त प्रमाणात हे भान आले होते. सगळे जण एकमेकांना सावरून घेणं, कुणी कुणाला वही देणं, घर नाही त्याला आपल्या घरी नेणं, वाढदिवसाला कुणाला कपडे देणं, दवाखान्यात वस्तूंची ने-आण करणं, कुणाच्या आजोबांना बँकेत नेणं, देवळात नेणं अशी कितीतरी कामं सहज होऊ लागली. यात अगदी सहजता होती, म्हणून आनंद होता आणि मुलं आनंदी म्हणजे शाळा आनंदीच. शिवाय कोणतीच गोष्ट कुणीतरी सांगतंय म्हणून घडत नव्हती तर मनापासून घडत होती. त्यामुळे ‘आम्ही कुणाला मदत करतोय. आम्ही कुणासाठी तरी काम करतोय ही भावना मुलांच्या मनात निर्माण नाही झाली; उलट यातला आनंद, समाधान यात मुलं मग्न होती आणि त्यांना पाहून शाळेला कृतार्थ वाटत होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा