शिल्पा परांडेकर
गाजराची कढी, भाकरीवर ओतून कुस्करा करून खाण्यासाठीची बाजार आमटी, बैलपोळय़ाला कौतुकानं केला जाणारा ज्वारीचा करड भात, असे अनेक नेहमी ऐकायला-बघायला न मिळणारे पदार्थ मला पंढरपूर सफरीत सापडले. विविध जातीजमातींच्या व्यक्तींना भेटत त्यांच्या राहणीमानाचा अभ्यास यानिमित्तानं करता आला. माणसं रोजच्या जगण्याच्या रहाटगाडग्यातही परंपरा आणि विविध संस्कृती कशा आनंदानं जपतात, याचं उत्तम उदाहरणच तिथे पाहायला मिळालं.
सोलापूर जिल्ह्यात ऐतिहासिक, औद्योगिक परंपरेबरोबरच भक्तीची परंपरा आणि वारसादेखील मोठा आहे. पंढरपूर आणि विठू माऊली तर अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. पंढरपुरातल्या निमुळत्या गल्ल्या, जुने वाडे आणि त्यांच्या भक्कम भिंती आजही इतिहासाची साक्ष देतात. विनय बडवे यांच्या कुटुंबीयांचा सुमारे दीडशे-दोनशे वर्ष जुना वाडा. या वाडय़ातदेखील एक मानाचं विठ्ठलाचं मंदिर आहे. अनेक वर्षांपासून आषाढी एकादशीच्या काळात असंख्य वारकरी निवास आणि भोजनासाठी इथे येतात आणि हा वाडा मोठय़ा आनंदानं त्यांचं आदरातिथ्य करत आला आहे. मला पंढरपुरातल्या खास पदार्थाची माहिती देण्यासाठी तारामती खिस्ते काकू आल्या होत्या. अतिशय मितभाषी. आल्या-गेल्यांचं त्या अगदी निगुतीनं करत असणार, हे त्यांच्या बोलण्यातूनच जाणवत होतं. एका बाजूला बडवे आजोबांच्या नातवानं- तुषारनं आणलेला पंढरपुरातला सुप्रसिद्ध वडा-पाव खात तारामती काकूंकडून पारंपरिक पदार्थ समजून घेणं, असा दुहेरी आस्वाद मी घेत होते. कुळधर्म, नैवेद्यासाठी केल्या जाणाऱ्या पदार्थाची माहिती आणि महत्त्व त्या खूप छान समजावून सांगत होत्या. गुळपापडीचे लाडू, कडबोळी, कोंडय़ाच्या पापडय़ा, विविध पंचामृतं, हे आणि असे अनेक पदार्थ त्या सांगत होत्या. त्यांच्याकडे सर्वाना आवडणारा एक पारंपरिक पदार्थ- जो अंदाजे ऐंशी वर्षांहून अधिक जुना असेल आणि तो त्या त्यांच्या सुगरण सासूबाईंकडून शिकल्या होत्या. तो म्हणजे गाजराची कढी.
विनय बडवे आणि त्यांचा नातू तुषार स्वत: खवय्ये असल्यामुळे घरगुती पारंपरिक पदार्थाबरोबरच मला पंढरपुरातल्या प्रसिद्ध आणि रेस्टॉरंटमधील पारंपरिक पदार्थाचाही आस्वाद घेता आला. ‘बाजार आमटी’ आताशी बऱ्याच रेस्टॉरंट्समध्ये मिळू लागली आहे; पण पंढरपूर-टेंभूर्णी रस्त्यावरचं ‘हॉटेल महावीर’ त्यातलं सर्वात जुनं मानलं जातं. बाजार आमटी म्हणजे तूर डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ, मटकी डाळ, उडीद डाळ आणि मसाले वापरून केलेली एक झणझणीत आमटी. खाताना नाकातोंडातून पाणी आलंच पाहिजे. बाजार आमटी खाण्याचीदेखील एक पद्धत आहे. एका ताटात बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीचे तुकडे करून घ्यायचे, वरून बाजार आमटी ओतायची आणि हे कुस्करून खायचं. बाजार आमटीचा शोध लागला, तोच मुळी करकंबच्या बाजारात. असं सांगितलं जातं, की पूर्वी करकंबच्या बाजारपेठेत दूरवरून अनेक व्यापारी येत असत. काही काळ त्यांना तिथेच राहावं लागे. साहजिकच, पूर्वी आतासारखी हॉटेल्स वगैरेची सोय नसल्यामुळे व्यापारी, प्रवासी हे बरोबर आणलेली शिदोरी किंवा उपलब्ध होईल त्यातून अन्न शिजवून गुजराण करत असत. या भागात डाळींचं उत्पादन अधिक असल्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या मिश्र डाळी आणि गरम मसाले वापरून तयार झाली बाजार आमटी. असंही सांगतात, की आठवडी बाजारातून आणलेल्या डाळींपासून ही आमटी बनवली जायची.
मी बार्शीमध्ये पोहोचले त्या दिवशी तिथे बैलपोळा साजरा करण्याची लगबग सुरू होती. आजही बऱ्याच गावांमध्ये बैलपोळा, नागपंचमी, ऋषीपंचमी अशांसारखे अनेक सण गावातील स्त्री-पुरुष एकत्रित साजरे करतात. बैलपोळय़ाची रंगत तर काही औरच असते. आदल्या दिवशी ‘खांदे मळणी’. या दिवशी बैलांना सुट्टी. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना तेल वगैरे लावून, प्रेमानं न्हाऊ-खाऊ घालतात. पिठाच्या दिव्यांनी त्यांना ओवाळलं जातं. बैलांसाठी करड भात किंवा ज्वारीचा ठोंबरा करतात. घरी ओलवून भरडलेली ज्वारी शिजवून घ्यायची. मग खातेवेळी त्यात करडईच्या बियांपासून काढलेलं दूध घालायचं. यात करडईचं दूध घालत असल्यामुळे त्याला करड भात म्हणतात. काही ठिकाणी ज्वारीचा खिचडादेखील म्हटलं जातं. दुसऱ्या दिवशी- म्हणजे बैलपोळय़ाला गोडाचं जेवण. यासाठी पुरणपोळय़ा, सार (कटाची आमटी/ कटाचे सार), भजे (भजी), पापड असा बेत असतो. या दिवशी बैलांच्या अंगावर नवीन झूल पांघरली जाते, शिंगं रंगवून त्यांना फुगे, रंगीत रिबिनी बांधल्या जातात. मी गावात पोहोचले तेव्हा गावातले असे सजलेले सर्व बैल शिस्तीत एका ठिकाणी गाव प्रदक्षिणेसाठी (वाजतगाजत मिरवणूकसाठी) उभे होते. हलगी, ढोल यांचं वादन सुरू होतं. ज्यांचा नवस वगैरे होता अशी मंडळी समोर येत होती, बैलांसमोर गाऱ्हाणं मांडली जात होती. मला कोकणात देवांसमोर मांडली जाणारी गाऱ्हाणी माहीत होती; पण अशा प्रकारे बैलांसमोर गाऱ्हाणं मांडण्याचा प्रकार मी प्रथमच पाहात होते. गावकरी सांगत होते, ‘‘आमच्यासाठी, आमच्या शेतीसाठी राबणारा हा आमच्या कुटुंबातला महत्त्वाचा सदस्य आहे. आमच्याबरोबर आमच्या सुखदु:खातदेखील हा सहभागी असतो. आमच्या मनातल्या गोष्टी तो जाणतो.’’
पूर्वी धान्यं घरीच भरडली जायची. त्यासाठी धान्याला साधारण पाणी लावून ओलवून घेतलं जायचं व उखळात कांडलं जायचं. ओलावण्याच्या प्रक्रियेमुळे वरचं टरफल किंवा साल निघून जातं. धान्याचे बारीक कण होणं सोपं होतं. अशाच पद्धतीनं बाजरीचा ठोंबराही या भागात केला जातो.
‘हरीहरां भेद
नाहीं करूं नये वाद
एक एकाचे हृदयीं
गोडी साखरेच्या ठायीं
भेदकासी नाड
एक वेलांटीच आड
उजवें वाम भाग
तुका म्हणे एकचि अंग’
संत तुकारामांचा हा अभंग हरी (विष्णू) आणि हर (शिव) यांच्यामध्ये भेद करून अकारण वाद निर्माण करू नये, अशा आशयाचा. हा अभंग मला माझ्या खाद्यसंस्कृतीच्या या वारीला खूप समर्पक वाटतो. विविध अठरापगड जातीजमातींच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मग माझ्या या वारीतही या अठरापगड जातीजमाती कशा काय बरं सुटतील! खाद्यसंस्कृतीचा अभ्यास म्हणजे केवळ एखाद्या समाजाचा किंवा एकाच विशिष्ट जाती-जमातीतील खाद्यसंस्कृतीचा अभ्यास नव्हे. याकरिता मी आपल्या समाजातील विविध जाती-समुदायांच्या लोकांना भेटत असते. प्रत्येक समाजानं प्राप्त परिस्थितीनुसार आपापल्या खाद्यसंस्कृतीत मोलाचं योगदान दिलं आहे.
मंगळवेढय़ातल्या एका वडार वस्तीत काही स्त्रिया एकत्र बसलेल्या दिसल्या. नेहमीप्रमाणे मी त्यांच्यात जाऊन बसले आणि बोलायला सुरुवात केली. समाज किंवा गाव कोणताही असो, मी त्यांच्याबरोबर मांडी घालून नाही बसले, तर मला समाधान नाही मिळत. या वेळी संकोच ‘शहर आणि गाव’ असा नसून आपल्या खाद्यसंस्कृतीबद्दल त्यांना काय सांगावं, असा होता. मी पूर्वीचे घरगुती उपचार, एखादी वेगळी प्रथा, यावर बोलायला सुरुवात केली, तेव्हा कापल्यावर चुना कसा भरायचा, जखम झाल्यावर त्यावर दगडीपाला कसा ठेचून लावायचा, लहान मुलांना पोटदुखी असेल तर कारल्याचा पाला हातावर चोळून त्याचा रस कसा काढून पाजायचा, वगैरे उपचारांची यादीच त्यांनी मला दिली. आपल्या खाद्यसंस्कृतीत, तसंच सांस्कृतिक व धार्मिक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे (उदा. बारशात-बाराव्या दिवशी बळीराणा म्हणून वरवंटा महत्त्वाचा असतो. तसंच लग्नकार्यात उखळ आणि जातं) पाटे-वरवंटे, खलबत्ते, विहिरी, तळी, मंदिरं वगैरे घडवणाऱ्या हातांचं स्वत:ची विशिष्ट खाद्यसंस्कृती घडवण्याचं काम मात्र राहून गेलं, असं निदान त्यांच्याशी बोलताना तरी जाणवलं!
‘सुंदर माझें जाते गे फिरे बहुतेकें ओव्या गाऊं कौतुकें, तूं येरे बा विठ्ठला,’ असं म्हणावं आणि साक्षात आपल्या लाडक्या भक्ताच्या घरी दळण दळण्यासाठी स्वयं विठुरायानं यावंदेखील. आज महाराष्ट्रात ज्यांच्या या आणि अशा असंख्य जात्यावरच्या ओव्या आणि अभंग ऐकायला मिळतात त्या संत जनाबाई. त्यांचा संसार पाहायला मिळतो पंढरपुरातील गोपाळपूर येथील संत जनाबाईंच्या मंदिरात. तिथे संत जनाबाईंचं जातं आणि उतरंडी (खाली मोठं व वर लहान, अशा रीतीनं एकावर एक भांडी रचण्याची पद्धत), उखळ पाहायला मिळतं. संत जनाबाईंच्या ओव्यांतून दळणं, कांडणं, सडणं, वैरणं (पिठ्ल्यासाठी, बेसनासाठी पीठ वैरणं), आंधणं (उकळत्या आधणात एखादा पदार्थ शिजायला टाकणं/ शिजवून घेणं) अशा स्वयंपाकातल्या अनेक क्रियांचा उल्लेख आढळतो.
भक्ती-अध्यात्माच्या जाणिवेनं, आपल्या सामर्थ्यांनं खाद्यसंस्कृतीला सक्षम करणाऱ्या स्त्रियांच्या प्रेरणेतून, विविध पदार्थाच्या रुचकर, विशेष चवींच्या आठवणींतून सोलापूर जिल्ह्याचा हा प्रवास कायम मनात कोरून राहिला आहे.
गाजराची कढी
साहित्य- दोन गाजरं, ताक, साखर, मीठ, आलं, कढीलिंब, डाळीचं पीठ (बेसन)
कृती- गाजर किसून तेलावर वाफवून घ्यावं. ताकाला पीठ लावून घ्यावं व त्यात चवीनुसार साखर, मीठ, हळद घालून एकत्रित करावं. फोडणी करून वरील ताकाचं मिश्रण व नंतर वाफवलेलं गाजर घालून ढवळत कढी गरम करून घ्यावी.
ज्वारीच्या पिठाचे कडबोळे
साहित्य- ज्वारीचं पीठ, तेल, जिरे, तिखट, मीठ, हळद, पाणी
कृती- पिठात तिखट, मीठ, हळद घालून पीठ गार पाण्यात मळून घ्यावं. फोडणी करून साधारण दीड-दोन वाटी पाणी घालावं. आधणात आवश्यकतेनुसार मीठ व तिखट घालून उकळी आणावी. हातावर पिठाच्या शेंगोळय़ा (लांब वळय़ा) किंवा चकलीप्रमाणे वळून आधणात टाकून १०-१५ मिनिटे शिजवून घ्यावं.
महाराष्ट्रात शेंगोळे करण्याच्या अनेक पद्धती आहेत. तसंच वेगवेगळी धान्यं व कडधान्यांपासूनदेखील शेंगोळे बनवले जातात. मात्र झटपट होणारा किंवा बदल म्हणून केला जाणारा हा पदार्थ आता फार कमी प्रमाणात केला जातो.
करड भात/ ज्वारीचा ठोंबरा
साहित्य- भरडलेली ज्वारी, मीठ, करडईचं दूध (नसल्यास नेहमीचं दूध किंवा तूप)
कृती- भरडलेली ज्वारी उकळत्या पाण्यात घालून चांगली खिचडीप्रमाणे मऊ होईपर्यंत शिजवावी. खातेवेळी त्यात दूध किंवा तूप घालावं.