शिल्पा परांडेकर
लहानपणी सांगलीला आजोळी गेले की पदार्थाच्या असंख्य चवी चाखायला मिळत, त्या कायम आठवणीत राहिल्या. आता पश्चिम महाराष्ट्रात खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासासाठी फिरताना माझ्या आठवणींपेक्षा वेगळे आणि अतिशय चविष्ट पदार्थ मला कळले. त्या त्या ठिकाणच्या लोकांच्या राहणीमानाची, त्यांच्या आयुष्याची या पदार्थावर छाप आहे.. म्हणूनच ते अधिक आठवणीत राहात असावेत!
एक हवाहवासा जिव्हाळा, भरपूर लाड आणि जन्मभर खुद्कन हसवतील अशा आठवणींचं गाव म्हणजे ‘आजोळ’! माझा लहानपणीचा बराचसा काळ माझ्या आजोळी, सांगलीमध्ये गेला. प्रत्येक वेळी आजोळी जाताना एक वेगळी उत्सुकता, हुरहुर मनात असायची. कधी एकदाची तिकडे पोहोचते असं वाटायचं. तीच हुरहुर, उत्सुकता आजही होती. मी सांगली जिल्ह्याच्या प्रवासासाठी बाहेर पडले आहे, पण अगदी अनोळखी बनून, एका संशोधकाच्या भूमिकेत! कारण एखाद्या गोष्टीचं संशोधन किंवा अभ्यास करायचा असेल तर ‘मला तर हे माहीतच आहे’ ही भूमिका लांब ठेवणं अधिक महत्त्वाचं असतं. पण तरीही आपण आठवणींना तर थांबवू शकत नाही ना!..
आमराईतलं वनभोजन, आजीच्या हातचं श्रीखंड, आमरस.. वखार बागेतून आजोबा घेऊन यायचे ती शेव-पापडी आणि प्राण्यांच्या आकारातली बिस्किटं, चरकावरचा आलं घातलेला उसाचा ताजा रस, प्रतापसिंह उद्यानाबाहेरची ‘बटय़ाची भेळ’, ‘भगवानलाल कंदीची लस्सी’.. ही माझी यादी बरीच मोठी आहे. प्रत्येक पदार्थाबरोबरच्या आठवणींचीसुद्धा! आजही डोळे मिटले की या चवी जिभेवर जशाच्या तशा रेंगाळतात. सुट्टीमध्ये आम्ही हरिपूरला टांग्यातून जायचो. नदीकाठचं हरिपूर हे ठिकाण आणि तिथलं माझं आवडतं गणपतीचं मंदिर. या रस्त्यावर चिंचेची खूप झाडं होती. जाताना चिंचा पाडून गोळा करणं हा आमचा आवडता उद्योग. या मंदिरात खेळायला तर मला आवडायचंच, पण बरोबरीनं आवडायचं ते इथलं ‘सात्त्विक भोजन’. मंदिराच्या आवारात अनेक धार्मिक, मंगल प्रसंग पार पडत. तुम्हाला इथलं जेवण घ्यायचं असेल तर तशी त्यांना पूर्वकल्पना द्यावी लागायची. त्यातला आमटी-भात, मसालेभात, मोदक, चटण्या-कोशिंबिरी, वांग्याची भाजी, केवळ अप्रतिम! वांग्याच्या भाजीवरून आठवलं, कृष्णाकाठच्या भाज्यांना आणि विशेषत: काटेरी वांग्यांना विशेष चव असते, हे तुम्हाला माहिती असेलच.
लहानपण सरलं तसं आजोळ फक्त आठवणींमध्येच उरलं. मनात रुंजी घालणाऱ्या आठवणींना बरोबर घेऊन प्रवास सुरू झाला. प्रवास करताना वाटेत जर मला वेगळय़ा समाजातील किंवा शेतात काम करणारे लोक दिसले, तर मी आजही आवर्जून थांबते. घटकाभर त्यांच्याशी गप्पा मारण्यातून मला नवीन माहिती तर मिळतेच, पण भरपूर ऊर्जादेखील. अशाच एका दुपारी एक बाई शेतात झाडाखाली विश्रांती घेताना दिसल्या. मी त्यांच्या शेजारी बसून शेती, पीकपाणी, जुने पदार्थ यावर बऱ्याच गप्पा मारल्या. पूर्वी बऱ्याचशा घरांमध्ये चाळण नसायची त्या वेळेस मोदक, कानवले, वडय़ा, उंडे कसे उकडले जायचे, याची काही कल्पना आहे का तुम्हाला? चक्क पिकांचा पाला किंवा काटक्यांवर! महाराष्ट्रात पेडणी, दातंर, आतंर (आत्र/ दात्र) अशा विविध नावांनी ही पद्धत प्रचलित होती. चाळण आणि आता ‘स्टीमर’ आले, तशी ती मागे पडली. पीक काढल्यानंतर ज्वारीच्या सुकलेल्या काटक्या (बारीक काडय़ा), मक्याच्या कणसाचा सुकलेला पाला किंवा सुती कापड याचा वापर पदार्थ उकडण्यासाठी केला जायचा. भांडय़ात खाली पाणी घेऊन त्यावर हा पाला रचायचा किंवा कापड असेल तर ते कापड पातेल्याला बांधायचं आणि त्यावर पदार्थ ठेवून शिजवायचा. शेतात एखादी पूजा किंवा सहभोजन करायचं असेल, त्या वेळीही ही पद्धत कामी यायची. मोदक किंवा कानवले उकडण्याची आणखी एक पद्धत म्हणजे ते भातात शिजवले जायचे. भात शिजत आला की, म्हणजे पाणी आटत आल्यावर त्यात मोदक किंवा कानवले घालायचे. भाताबरोबर ते लवकर शिजतदेखील असत. या शेतकरी बाईंशी बोलता-बोलता मनातल्या मनात मी पेडणीवरच्या वांग्यांचा आस्वाद घेत होते! ती पाककृती आणि तिचं वर्णन ऐकताना माझ्या तोंडाला इतकं पाणी सुटत होतं सांगू! मसाल्याच्या वांग्यासाठी हल्ली अनेक प्रकारचे मसाले बाजारात मिळतात, त्याचा विषय निघाला. ‘‘पोरी, आमच्याईळी तर येवढं मसालेपिन मिळीत नव्हतं. हे तुम्हा लोकांचं ‘फॅड’ हाय.’’ त्या म्हणाल्या.
नांद्रे, माझ्या आजोबांचं जन्मगाव. ते गावातलं एक सर्वपरिचित आणि माननीय व्यक्तिमत्त्व असूनही मी कुठेही माझी किंवा त्यांची ओळख न सांगता तिथल्या स्त्रियांमध्ये गप्पा, गोष्टी, नृत्य करण्यात सहभागी झाले. इथल्या स्त्रियांचा उत्साह, ऊर्जा आणि आवाजही अगदी वरच्या पट्टीतला! (माझ्या माहितीत, कोल्हापूर, सांगली भागातल्या लोकांच्या बोलण्याची लय आणि आवाज नेहमी वरच्या पट्टीत असतो बरं का!) माडगं, डांगर, उंडे, मुटके, धपाटे.. सांगता सांगता अक्षरश: स्त्रियांना उसंत मिळत नव्हती. एकापाठोपाठ पदार्थ सांगणं सुरू होतं. श्रावणात (पावसाळय़ात) इकडे ज्वारीच्या आंबोळय़ा करण्याची पद्धत आहे. या आंबोळय़ा गुळवणीबरोबर खातात. पदार्थ तसा नेहमीचाच, पण त्याबरोबर सांगितल्या जाणाऱ्या कथा खूप रंजक- म्हणजे ‘ही आंबोळी कुणाला द्यायची नाही आणि दिल्यास त्याबदल्यात गहू किंवा तांदूळ घ्यायचे.’ किंवा ‘बाहेरून येऊन जर आंबोळय़ा केल्या, तर त्या उठत नाहीत (म्हणजे तव्यावरून नीट निघत नाहीत.)’ किंवा ‘आंबोळीचा बिडाचा तवा स्वत: विकत घ्यायचा नाही, तर तो कुणी तरी ओटीत घालायला हवा.’ (अशीच गोष्ट मी पाटा-वरवंटा, दगडी खलबत्ता किंवा जातं घेण्याबाबतही ऐकली आहे.) आता अशा ऐकण्यात किंवा मानण्यात आपल्याला तथ्य नाही वाटत आणि ते नसेलही. पण पूर्वी हे मानलं जायचं एवढं खरं.
खिद्रापूर हे कोपेश्वराचं सुप्रसिद्ध मंदिर. ‘कटय़ार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटामुळे ते सर्वपरिचित झालं आहे. मी या ठिकाणी लहानपणापासून जात आले आहे, मात्र इथल्या मंदिराच्या आवारात राहणाऱ्या लोकांना किंवा शेजारच्याच अकिवाट इथल्या लोकांना पहिल्यांदाच भेटत होते. म्हणतात ना, ‘पिकतं तिथं विकत नाही’ तसं काहीसं. आज जेव्हा अपरिचित होऊन परिचित ठिकाणी आले तेव्हा अनेक नवीन गोष्टी सापडल्या. मंदिराच्या आवारात राहणारे लोक अनेक वर्षांपासून कर्नाटकातून येऊन इथे वसले आहेत. परंतु त्यांचं मराठी तितकंसं चांगलं नव्हतं, त्यामुळे आमचा संवाद तोडकामोडकाच होत होता. भाषेवरून जाणवत होतं, की ते उत्तर कर्नाटकातील असावेत. आमच्या त्या संवादातून समजलेला एक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे ‘वागरा’ (म्हणजे मक्याचा पॉरिजसारखा प्रकार.)
या अभ्यासात मला उमगलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण लहानपणापासून ज्या परिसरात राहिलो, खेळलो, तिथेही आपल्याला माहीत नसणारी खाद्यसंस्कृती सापडते. आपपरभाव न ठेवता प्रवाशाच्या, भटक्याच्या उत्सुकतेनं हे सर्व पाहात (आणि चाखत) गेलो, तर किती तरी नवीन गोष्टी कळतात आणि आवडतातही!
पेडणीवरची वांगी
पेडणीवरच्या वांग्यांची पाककृती शेतकरी बाईंच्याच शब्दांत, त्यांच्याच भाषेत जाणून घ्यायची मजाच और आहे! ती अशी-
ताजी, मध्यम, गोल, काटेरी वांगी घ्यायची आन् त्याला असं मदोमद चार फाकं करून घ्यायचं. (पूर्ण चिरू नयेत). त्यात तुम्हाला आवडल त्यो मसाला- म्हंजी शेंगदाण्याचा कूट, झालं तर वाळलं खोबरं, तीळ, खसखस जराच्यानी भाजून, तिखट, मीठ, आवडत असलं तर चिंचेचं बुटुक, कोतमीर, लसूण चेचून, आसं समदं घेऊन, कुटून मसाला बनवून घ्यायचा. फाकं केलेल्या वांग्यांमदी भरायचा आणि द्यायची ठेवून वांगी पेडणावर. चांगली शिजली की काढायची आन् नुस्तीच खायची जेवनासंग. नुस्ती बी भारी लागत्यात. नाही तर ह्योच मसाला घालूनच्यान कालवण बनवायचं. भाकरीसंग लई गोड लागतया!
बाजरीचे उंडे
साहित्य- बाजरीचं रवाळ पीठ, गूळ, सुंठपूड, खोबऱ्याचा कीस.
कृती- बाजरी भाजून जाडसर दळून घ्यावी. या पिठाची भाकरी करून ती गरम असतानाच तिचा चुरा करून घ्यावा. गुळाचा पाक करून त्यात सुंठपूड व चुरा घालून मिश्रण एकत्र करावं. हाताला खोबऱ्याचा कीस लावून तयार मिश्रणाचे लाडू वळावेत. खातेवेळी (उंडय़ावर बोटानं खळगा करून वा उंडा फोडून) त्यात तूप घालून खावं. हे उंडे किंवा लाडू संक्रांतीच्या वेळी करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात उंडय़ांचे अनेक प्रकार व पाककृती प्रचलित आहेत. पूर्वी अनेक ठिकाणी लाडूंना ‘उंडे’ हाच शब्द प्रचलित होता.
वागरा
साहित्य- भरडलेले देशी मक्याचे दाणे (पॉलिश केलेले), दही, दूध, मीठ, सुंठ, वेलची पूड.
कृती- मक्याचे दाणे मीठ न घालता शिजवून घ्या. थंड झाल्यावर मीठ घालून थोडं कुस्करून घ्या. त्यात घट्ट दही, हवी असल्यास किंचित साखर, सुंठ व वेलची पूड घालून एकत्रित करा. गरम करून थंड केलेलं दूध घाला. यामुळे वागरा लगद्याप्रमाणे घट्ट होणार नाही. या पद्धतीनं केलेला वागरा हा शिदोरी म्हणून किंवा ‘गारवा’ म्हणून केला जातो. उन्हाळय़ात थंडावा म्हणून खायचा असेल तर त्यात लसूण, कढीपत्ता, जिरे-मोहरीची फोडणी करून घालता येते.
यातला ‘गारवा’ मुलीला सासरी जाताना दिला जातो किंवा वास्तुशांतीच्या प्रसंगी जाताना नातेवाईक-आप्त दुरडीमधून (वेताची छोटी टोपली) काही पदार्थ घेऊन जातात. वास्तुशांतीच्या प्रसंगी दहीभात, वागरा, आंबील असे थंड पदार्थ मुद्दामहून नेले जातात. संबंधित व्यक्तीच्या घरी कायम शांतता नांदू देत, अशी त्यामागची भावना असते.