‘‘सग्गळा गोंधळ या अमेरिकेमुळे झालाय बघा ’’
बागेतल्या आमच्या नेहमीच्या बाकावर टेकता टेकता त्या पोटतिडिकीने म्हणाल्या तेव्हा मला जरा आश्चर्य वाटलं. गेली पुष्कळ वर्षे या बाईंच्या तोंडून अमेरिकेचं फक्त कौतुकच ऐकत आले होते मी. अमेरिकेत संसार करणाऱ्या आपल्या कन्येकडे दोन वर्षांमधून एकदा जायचं, चार-सहा महिने ‘जिवाची अमेरिका’ करून यायचं आणि इकडे आलं की ऊठसूट त्या नंदनवनाविषयी भारावून बोलायचं ही त्यांची सवय. अमेरिकेतले स्वच्छ रस्ते.. ऐसपैस घरं.. भव्य मॉल्स.. खाण्यापिण्याची चंगळ.. सुक्यामेव्याची लयलूट याविषयी बोलताना थकत नसत त्या.
मी ताण हलका करण्यासाठी अंमळ चेष्टेचा सूर लावला. ‘‘काय झालं? खारे पिस्ते खवट निघाले की सालासकटचे पिस्ते पोकळ निघाले? खुळखुळ्यासारखे?’’
अगदी सुरुवातीच्या फेऱ्यांनंतर त्या अमेरिकेत मिळणाऱ्या खाऱ्या पिस्त्यांच्या सालांबद्दलसुद्धा कौतुकाने बोलायचा. (‘हुबेहूब एकसारखं दुसरं साल असतं तिथे. आपल्याकडल्यासारखी तूटफूट नाही.’ वगैरे गुणगान गात त्यांनी त्या सालांच्या नक्षीचं एक वॉलहँगिंगसुद्धा बनवल्याचं आठवतं. पिस्ते खायला दिल्याचं आठवत नाही.) पण आज त्या खुळखुळ्याच्या उल्लेखानेही खुलल्या नाहीत. स्वत:शीच बोलण्यासारखं उसासत म्हणाल्या,
‘‘फार- अंतर पडतं हो. फार म्हणजे फारच अंतर.’’
‘‘ते तर झालंच. अमेरिका आहेच आपल्यापासून लांब.’’
‘‘भूगोलातलं नव्हे, माणसांमधलं अंतर म्हणत होते मी.’’
‘‘शक्य आहे. आता आर्थिक, सामाजिक सगळी परिस्थितीच एवढी वेगळी आहे म्हटल्यावर तसं होणारच.’’
‘‘पण आपण आईबाप म्हणून एकच असतो ना. आपल्या तिथल्या मुलांसाठी काय, इथल्या मुलांसाठी काय, आपण वेगवेगळे कसे काय होऊ शकू? पहिला मधुचंद्राचा काळ बरा जातो सगळ्यांसाठीच. पुढे एकेक फटी पडायला लागतात. त्रास होतो.’’
त्रास त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. गेले काही दिवस त्यांची प्रकृतीही त्यांना त्रास देत होती. अशा त्रासात सापडलेल्या व्यक्तीला मनमोकळं करून बोलू दिलं तरी फायदा होतो. मी तेच केलं.
१५-१६ वर्षांपूर्वी या बाईंची मोठी कन्यका लग्न करून नवऱ्याबरोबर अमेरिकेला गेली आणि यांच्या जीवनात अमेरिकापर्व आलं. पर्वही आणि पर्वणीही! एकटय़ा कुटुंबप्रमुखाच्या सामान्य नोकरीत ५-६ माणसांचा प्रपंच टुकीने हाकणाऱ्या गृहिणी या. साधं वणीला किंवा कोल्हापूरला देवीची ओटी भरायला जायचं म्हटलं तरी त्यांना तीन-चार र्वष विचार करायला लागायचा. त्यांच्या भूगोलात एकदम न्यूजर्सी-बॉस्टन-फिलाडेल्फिया आलं. अमेरिकेनं ‘तिळा दार उघड’ केलं आणि प्रौढ वयात यांची ‘अॅलिस इन वंडरलँड’ झाली. नवऱ्याची नोकरी आणि धाकटय़ा दोन मुलांची शिक्षणं इथे होती म्हणून, एरवी यांचा पाय इथे ठरला नसता इतक्या या अमेरिकेला भाळल्या. प्रपंच मार्गी लागला, दुसऱ्या मुलीचं लग्न झालं, बेतासबात कुवतीच्या चिरंजिवांनी मालवाहतुकीचा छोटा व्यवसाय सुरू केला, जबाबदाऱ्या संपल्या, नवरा निवृत्त झाला. तोवर याही म्हाताऱ्या झाल्या. अमेरिकेवर भाळण्याचे क्षण संपले आणि सांभाळण्याचे प्रसंग पुढे ठाकले. असं काही झालंय की काय याचं? मी अंदाज करत बसले. जराशाने त्या हलकेच म्हणाल्या,
‘‘डॉक्टरीणबाई म्हणताहेत, आता पिशवी काढायलाच हवी. ऑपरेशनला पर्याय नाही.’’
‘‘म्हणून तुम्ही एवढय़ा अस्वस्थ आहात का?’’
‘‘नाही हो. आता वयानुसार एकेक गोष्टी जायच्याच. शरीराचा एक निरुपयोगी भाग गेला तर त्याचं एवढं काय? मुलांमधली एकी गेली याचं जास्त वाटतं. आपल्या डोळ्यासमोरच हे असं आहे. नंतर काय होईल?’’
‘‘ऑपरेशनच्या खर्चाचा दबाव वाटतोय का?’’
‘‘तो तर अजिबातच नाही. ‘ती’ केव्हाही हजारभर डॉलर पाठवायला तयार असते. तिनं तर सांगूनच ठेवलंय, कधीही पैसे लागले तर कळवा. पैशासाठी आबाळ करू नका. पण पैशानं सगळे प्रश्न सुटतात का?’’
ऑपरेशननंतर बाईंना दोन-तीन आठवडे विश्रांतीची गरज होती. त्याबद्दल त्यांनी इथल्या मुलांशी बोलणं केलं तेव्हा दोघांनीही अंग काढून घेतलं होतं. मुलाने स्पष्ट बोलून, मुलीनं मूक संमती देऊन. ‘‘दरवेळेला पैसे ‘फेकून’ तिनं सुटका करून घ्यायची आणि आम्ही इथे राहतो म्हणून सगळी खेकटी निस्तरायची हे नेहमीचंच झालंय. तिला म्हणावं, जातीनं इथे येऊन राहा आणि सगळी जबाबदारी घे’’
‘‘तिला अचानक एवढी रजा मिळत नाही.’’
‘‘आमच्या नोकऱ्ऱ्यांमध्येसुद्धा काही रजा घ्या, रजा घ्या म्हणून मागे लागत नाहीत. अधूनमधून तुमच्या सोनोग्राफीसाठी नाहीतरी एखाद्या व्रताच्या उद्यापनासाठी पगारी रजासुद्धा टाकण्याची वेळ येते आमच्यावर. कुठे नोंद होते का त्याची? अमेरिकेहून पैसे आले की गावभर डिंडोरा.’’
‘‘आधीच तिथलं आयुष्य धकाधकीचं आहे. त्यात आपला भार कुठे घाला?’’
‘‘इथे जऽऽऽरा घराबाहेर पडून बघा. गर्दी.. ट्रॅफिक.. महागाई.. दादागिरी.. रोजचा दिवस अजून अजून कठीण होत चाललाय आमचा.’’
‘‘कबूल आहे पण तिचं येणं जाणं कठीण आहे हे तरी मान्य कराल? दर एक वर्षांआड फारफार तर तीन आठवडय़ांसाठी येते बिचारी.’’
‘‘तिला सलग तीन आठवडे यायला-राहायला तरी जमतं. आम्ही भोज्ज्याला शिवायला आल्यासारखे येतो.. जातो.. जवळच आहोत, कधीही येता येईल असं म्हणतो म्हणून कधीच येत नाही निवांत. त्याचं तुम्हाला काही वाटत नाही. आम्ही थोडय़ाच चकचकीत गोष्टी घेऊन येतोय? तुमचा सगळा ओढा तिकडे! मग आता तिलाच कामाला लावा. तुमच्या स्थावर जंगमातलं सगळ्या मुलांना सारखंच मिळणार आहे ना पुढे? मग आता जबाबदारीपण सारखीच घ्यायची सगळ्यांनी.’’
मुलांनी एकदाची आणि एकदाच मनातली सगळी मळमळ ओकून टाकली. ती मोकळी झाली असतील पण यांना भरून आलं. मुलांच्या मनामध्ये इतकं काही खदखदत असेल असं यांना म्हणे जाणवलंच नव्हतं. अमेरिकेतली मुलगी अधूनमधून इथल्या मुलांचा हेवा केल्यासारखं बोलायची. यांची काय, मज्जा असते. आईवडिलांचा हक्काचा आधार मिळतो. पोरांना त्यांच्यावर टाकून हिंडताफिरता येतं. आजीआजोबांची माया नातवंडांना मिळते. नेसत्या कपडय़ानिशी कुठेतरी परक्या देशामध्ये जाऊन स्वत:साठी पायाखाली जमीन आणि डोक्यावर छप्पर मिळवण्याचा संघर्ष यांना काय कळणार? वगैरे वगैरे. पण इकडून उत्तर तयारच असायचं. आम्ही सांगितलं होतं जायला? एकूण काय, तर परदेशातल्या मुलांना भावनिकदृष्टय़ा निराधार वाटणार. देशातल्या मुलांना आई-बापांचा कमीजास्त आधार मिळवण्याची किंमत मोजावी लागणार. आधाराची खरीखरी गरज वाटण्याच्या टप्प्यावर आईबापांच्या वाटय़ाला काय येणार या संघर्षांतून?
हा विचार बाईंना छळत असणार. मध्येच खुंटा हलवून बळकट केल्यासारखं मला म्हणाल्या,
‘‘आपल्याला आपली सगळी मुलं सारखीच असतात ना हो?’’
‘‘हो. बहुधा तसंच.’’
‘‘आता रोजच्या माणसाचं अगत्य न राहणं, घरकी मुर्गी दालबराबर वाटणं हा मनुष्यस्वभावच असतो नाही का?’’
‘‘होतं खरं असं अनवधनाने.’’
‘‘लांब गेलेल्या व्यक्तीची जास्त काळजी वाटणंही नैसर्गिकच म्हणायचं.’’
‘‘हो.’’
‘‘म्हणजे या सगळ्यात त्यांचं वैभव, सुबत्ता यांना काही स्थान नाही. तरीही मग मुलं अशा तिरका विचार का करायला लागतात? का अगोदरपासून हे त्यांच्याच मनात असतं? तिकडचे बडे म्हणून त्यांची जास्त आवभगत होणार, गरीब बापडे आपण उगाचंच वेठीला धरले जातोय वगैरे?’’
‘माहीत नाही’ मी कबूल केलं. मला खरोखरच याचा अंदाज नव्हता. आधुनिक शहरी कुटुंबजीवनाचा एक वेगळा पेच या निमित्ताने माझ्यासमोर येत होता हे मात्र नक्की. देशाच्या अनेक (गैर) व्यवहारांमध्ये ‘परकीय शक्तींचा हात’ असतो हे आता ऐकून-वाचून पाठ झालंय. कुटुंबजीवनात, वेगळ्या अर्थाने परकीय शक्तीचा हात ढवळाढवळ करतोय की काय, हे कोण बघणार? आज अनेक घरांमधली एकेक, दोन-दोन मुलं जगभरात कुठे कुठे विखुरलेली आहेत, हात-पाय मारताहेत, पोटं भरताहेत, घरापासून दुरावताहेत, वेगळं जग जवळ करताहेत. त्यांच्या घरांमध्येसुद्धा नव्या राज्यात जुन्यांची अशीच घुसमट होत असेल का?
हा सगळा वार्तालाप घडला तो माझ्या घराच्या जवळच्या एका सार्वजनिक बागेत. बागेच्या कोपऱ्यामध्ये दोन-तीन बाकडय़ांचं एक कोंडाळं आहे. येता-जाता आम्ही काही ‘ज्येष्ठ भगिनी’ तिथे जरा टेकतो, चार सुख-दु:खाच्या गोष्टी बोलतो. वरचेवर भेटून सगळ्यांना सगळ्यांची बरीच व्यक्तिगत माहिती झालेली आहे. त्यामुळे खासगी, कौटुंबिक गोष्टीही बोलण्याच्या ओघात येऊन जातात. माझी नजर आपली ‘खुपते तिथे टिपते’ एवढंच. प्रश्नांची उत्तरं शोधण्याइतका वेळही नसतो आणि अनेकदा तेवढी कुवतही नसते. बऱ्याच घरगुती प्रश्नांना उत्तरंच नसतात ही गोष्ट अलाहिदा. त्या दिवशी मात्र त्या बाईंनी त्यांच्या मते एक खूप चलाख उत्तरही सुचवलं.
‘‘सगळा या अमेरिकेने केलेला गोंधळ आहे, तो तिच्याच पद्धतीने सोडवला पाहिजे.’’
‘‘म्हणजे कसा?’’
‘‘आपली पुढची पिढी तिथे शिकायला, नोकरीला जाते तेव्हा जाण्यापूर्वी अनेकांचे ४/८ दिवसांचे ओरिएण्टेशन प्रोग्रॅम्स घेतात. आमची लेकपण गेली होती अशा एका उपक्रमाला. तिथे जाताना काय तयारी करावी, नंतर कसं जमवून घ्यावं, अडचणीत आल्यावर काय करावं वगैरे वगैरे. बरंच सांगितलं होतं तिथे. तसंच मला वाटतं, ज्यांच्या संसाराचा एक पाय परदेशात असतो, म्हणजे एखादं अपत्य तिथे वसतं, त्या पालकांसाठीसुद्धा काहीतरी प्रशिक्षण वगैरे द्यावं. त्यांनी इथल्या मुलांशी कसं वागावं.. तिथल्या मुलांशी कसं वागावं.. स्वत:ला कसं सांभाळावं हे आता नव्याने शिकवायला नको? असा काही प्रोग्रॅम, कोर्स वगैरे निघाला ना, तर पहिलं नाव मी नोंदवेन.. आणि बहुतेक आपल्या बाकावरच्या बऱ्याचजणी मला तिथेच भेटतील..’’ त्या हसून म्हणाल्या. त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हसू मला परकं परकं वाटलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा