तिने दिलेल्या मोरपिसाने मला भूतकाळात फिरवून आणलं होतं. किती आठवणी दाटून राहिल्या होत्या त्या मोरपिसाभोवती, पण ते देणारी ती कुठे आहे..
एक पावसाळी ओली दुपार, घरात मी एकटीच. बाहेर मळभ दाटून आलेलं, घरात मलाही एका अनामिक हुरहुरीनं घेरलेलं. काय करावं काहीच सुचत नव्हतं. टी.व्ही. तरी किती बघावा अन् पुस्तकही वाचून झालं होतं. सहज माळ्यावर लक्ष गेलं आणि ‘चला, आज हा पसारा आवरून टाकू, तेवढाच वेळ तरी जाईल जरा’ असं म्हणून मी माळ्यावरच्या एक-दोन सुटकेस खाली काढल्या. एका सुटकेसमध्ये माझ्या काही आवडत्या, काही कुणीतरी प्रेमाने मला भेट म्हणून दिलेल्या अशा वस्तू होत्या. मी त्यातील एकेक वस्तू हातात घेऊन ‘खूप जुनी झाली ही, टाकून देऊ या आता’ असं स्वत:लाच समजावत बाजूला टाकत होते आणि क्वचित ‘नको, राहू दे अजून थोडे दिवस, तिची काय अडचण होते आपल्याला’ असं पुन्हा स्वत:शीच पुटपुटत उचलून जागेवर ठेवत होते. माझ्या कितीतरी आठवणी त्या वस्तूंशी जोडल्या गेल्या होत्या ना, शेवटी ती सुटकेस जशीच्या तशी बंद करून मी दुसरी सुटकेस उघडली. यामध्ये माझ्या खूप म्हणजे खूपच जुन्या अशा काही वह्य़ा, डायऱ्या भरून ठेवलेल्या होत्या. त्यातील कित्येकांची पाने जीर्ण होऊन पिवळी पडली होती. मी सावकाश त्यातील एकेक वही उचलत होते. त्यात लिहिलेला मजकूर वाचत होते अन् त्या अक्षरांचे बोट धरून थोडा वेळ भूतकाळात फिरून येत होते. त्यातलीच, अशीच एक डायरी उघडून त्यावर नजर फिरवत हळुवारपणे माझ्या गालांवर फिरवलं. त्यातल्या मोरपीसाचा तो मऊसर स्पर्श तनमनावर एक शिरशिरी उठवून गेला. मोर आणि मोरपीस हे तर माझे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय. नाहीतरी मोरासारखा देखणा पक्षी बघायला कुणाला आवडत नाही.
मोर प्रत्यक्ष बघायला तर मलाही आवडतोच. म्हणजे आजकालच्या भाषेत मी मोराची आणि मोरपिसाची फॅनच आहे म्हणा ना. कपडय़ांच्या दुकानात गेल्यावर एकदा मोराचे प्रिंट असलेले कपडे दिसले की दुकानदाराने दुसरे कितीही कपडे दाखविले तरी माझी नजर पुन:पुन्हा त्या मोराच्या प्रिंटकडेच वळणार आणि मी तेच कपडे विकत घेणार हे ठरलेलंच. तीच गत दागिन्यांची. मोरांचे डिझाइन असलेले नाजूक कलाकुसरीचे दागिने ही माझी पहिली पसंती. त्यातील ते गहिरे, तेजस्वी रंग माझे मन आकर्षून घेतात.
तीच गत रांगोळीची, ताटांभोवती रांगोळी काढायची असली तरी दोन्ही बाजूला दोन मोर विराजमान होणार मग ते रांगोळीने रेखलेले असोत किंवा तयार केलेले पुठ्ठय़ाचे वा थर्मोकोलचे असोत. जेवायला येणारा पाहुणा न सांगताच ओळखतो ही रांगोळी कुणी काढली असेल ते!
शोकेसमध्ये ठेवायला धातूचे रंगीत खडे बसवलेले चमचमते मोर, सुपारीच्या फायबरच्या डबीवर नाचरा, पंख उघडणारा – मिटणारा जाळीदार मोर, घराच्या एका कॉर्नरवर स्वत: बनवलेला वेल्व्हेटच्या कपडय़ाचा, निळा निळा, खऱ्यासारखा दिसणारा डौलदार मोर, भिंतीवरील फ्रेम्समध्येसुद्धा पिसांचा बनवलेला, जरी-अरी वर्कचा, पेपर-क्विलिंगचा, असे मोरच मोर, मोराच्या अशा विविध प्रकारच्या रूपांची मला नेहमीच भुरळ पडते.
एवढंच काय, सरस्वती ही विद्येची देवता म्हणून मला प्रिय आहेच. तिचं ते पांढऱ्याशुभ्र पातळातील वीणाधारी रूप किती छान दिसतं, पण तिचं वाहन म्हणून असलेला तो शांत बसलेला माझा आवडता मोर.. माझ्या घरात सरस्वतीची अशी मोरावर बसलेली पितळीची खूप जुनी मूर्ती आहे. खूप जपत असते मी तिला. साहजिकच आहे ना ते.
लहानपणी मात्र हे मोरपीस मिळविण्यासाठी कितीही आटापिटा करण्याची तयारी असे. जैन साधू-साध्वींजवळ या मोरपिसांची पिंछी असते. त्यांनी आशीर्वाद म्हणून आपल्याला एखादे पीस द्यावे यासाठी त्या अजाणत्या वयात त्या साध्वींजवळ कितीही वेळ बसण्याचे, त्या सांगतील ते ऐकण्याचे काहीच वाटत नसे आणि मग जेव्हा एखादे मोरपीस हातात पडे तेव्हा कृतकृत्य होऊन कधी ते मोरपीस सगळ्यांना दाखवून मिरवतो, असे होऊन जाई.
त्या शाळकरी वयात पुस्तकात मोरपीस हमखास ठेवले जायचेच. ते दाबून सर्वापेक्षा जास्त फुलविता आले तर कोण आनंद व्हायचा. तेव्हा आपला आनंदही असाच छोटय़ा छोटय़ा बिनपैशाच्या गोष्टींत सामावला असायचा.
आता एखादे मोरपीस पुस्तकात ‘बुकमार्क’ म्हणून ठेवले जाते. पुस्तक वाचायला घेतल्यावर खुणेचे पान काढताना आधी त्या देखण्या बुकमार्कला न्याहाळल्याशिवाय पुस्तक वाचण्यास सुरुवातच करू शकत नाही मी.
या मोरपीस भिंतीत खोचण्यावरून आठवले, माझं नुकतंच लग्न झाल्यावर आम्ही दोघंच नोकरीनिमित्ताने एका लहानशा गावात राहात होतो. तेथील घरात खूप पाली होत्या. मला तेव्हा पालीची खूप भीती वाटायची. पाल दिसली रे दिसली की मी पळत जाऊन माडीवर राहणाऱ्या घरमालकिणीला बोलावून आणायची घरमालकीण जरा वयस्कर होती, पण ती बिचारी धावपळत यायची तोवर आतापर्यंत माझ्याकडे डोळे वटारून पाहणाऱ्या पाल मॅडम झरझरा आपली शेपटी हलवत दाराबाहेर गेलेल्या असायच्या. शेवटी मालकीणबाईने कंटाळून एक दिवस माझ्या हातात दोन लांब दांडय़ांची मोरपिसं आणून दिली आणि म्हणाली,
‘ही घे, अन् त्या भिंतीवरच्या खोबणीत खोचून ठेव.’
‘हो, हो, द्या नं, किती छान आहेत. मस्त दिसतील भिंतीवर.’ माझ्या चेहऱ्यावर शाळकरी मुलीसारखाच आनंद.
‘अगं बयो, भिंत छान दिसायसाठी नाही दिली मी. ही भिंतीवर लावल्यावर पाली येणार नाहीत घरात. त्या पिसांवरील डोळ्याला घाबरतात म्हणे पाली.’ मला हसावं की रडावं कळेना. इतकं सुंदर मोरपीस आणि त्याचा उपयोग त्या ओंगळवाण्या पालीला घाबरविण्यासाठी ..?
याउलट मोरपिसाची ही एक छानशी आठवण. एकदा मी एका सांस्कृतिक कार्यक्रमाला गेले होते. आमंत्रितांचं स्वागत करण्यासाठी कार्यक्रमस्थळीही ३-४ युवती नटूनथटून प्रवेशद्वाराशी उभ्या होत्या. मी त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यातील एकीने माझे गुलाबपुष्पाऐवजी मोरपीस देऊन, तर दुसरीने कमलाकार कागदी पुष्पात पेढा देऊन स्वागत केले. ते पाहून ‘व्वा! क्या बात है’ असेच उद्गार माझ्या तोंडून निघाले. तरीच आज हातात घेतल्याबरोबर चुरगाळून इतस्तत: टाकलेल्या आणि पायदळी तुडविल्या जाणाऱ्या गुलाबाच्या पाकळ्या आजूबाजूला दिसत नव्हत्या. मला खात्री आहे, माझ्याप्रमाणे प्रत्येकानेच ते मोरपीस आणि कागदी कमलपुष्प जपून घरी नेले असेल. खरंच..
मोरपिसाचा स्पर्श म्हणजे जणू..
तान्ह्य़ा बाळाचं रेशमी, मऊसूत जावळं
आईच्या डोळ्यांतील मायेचं तळं
अबोल बाबांचा पाठीवरील हात सख्या-सोबत्यांच्या आठवणींची साथ
घडय़ाळात सहाचे टोल पडले आणि मी भावसमाधीतून जागी झाले. संध्याकाळ उतरत आली होती. पसारा आवरता आवरता मीच आठवणींच्या पसाऱ्यात गुरफटून गेले होते म्हणायचे. एका मोरपिसाने मला कुठे कुठे फिरवून आणले होते. सर्वजण घरी येण्याच्या आत आवरून ठेवावे म्हणून मोरपीस ठेवण्यासाठी मी डायरी उघडली तोच एक फोटो टपकन पाठमोरा पडला. कुणाचा बरं असावा ? हळूच उचलून अपुऱ्या प्रकाशात नीट निरखून पाहिला. ब्लॅक अँड व्हाइटच्या जमान्यातील जुना-पिवळा पडलेला फोटो होता तो. फोटोत दोघी शाळकरी मुली दिसत होत्या. त्यातील एक मी होते आणि पुढे लांब वेणी घेऊन बसलेली ही.. ही.. ही तर नीला .. माझी जिवलग मैत्रीण..
त्या अबोध, अश्राप वयातील सख्खी मैत्रीण.. एकच चिंचेचं बुटुक वाटून खाणारी हक्काची मैत्रीण.. सगळ्या शाळेत आमची मैत्री प्रसिद्ध होती. या मैत्रिची आठवण म्हणून तेव्हाच आम्ही हा दोघींचा एकत्र फोटो काढला होता आणि तिनं मला हे मोरपीस दिलं होतं..
एकदा कशावरून तरी आम्हा दोघींत क्षुल्लक गोष्टींवरून गैरसमज झाले होते, पण गोष्ट जितकी क्षुल्लक तितकाच अहंकार मोठ्ठा होता. त्या अहंकाराच्या विळख्यानं मैत्रीची बंधनं जरा सैल झाली होती, पण ही काही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही अशा वेळेस आमची तिसरीच मैत्रीण आमच्या कट्टीची बट्टी करून देत असे आणि आम्ही हसू-बोलू लागत असू. चिंचेचं बुटुक हातात ठेवून या वेळीही तसंच होईल याची आम्ही वाट पाहात होतो. मला वाटतं शालेय जीवनात याचा अनुभव आपण प्रत्येकानेच घेतला असावा. असे काही दिवस गेले आणि एक दिवस नीला शाळेत आलीच नाही.
‘हं, नसेल आली, असेल काही तरी काय.’
मी मनात असं म्हणत होते तरी नजर मात्र सारखी तिच्या रिकाम्या जागेकडे वारंवार जात होती. दुसऱ्या.. तिसऱ्या दिवशीही तिची जागा रिकामीच राहिली. मनात थोडीशी चुटपुट.. ठरवलं.. आता ती आल्यावर आपणच बोलायचं.. आणि दुसऱ्या दिवशी कळलं की, ती तापाने आजारी आहे. ‘असेल सर्दी- पडशाचा ताप, तो काय कुणालाही होतो.’ मी स्वत:लाच समजावलं. असे आणखी २-३ दिवस गेले आणि शाळेत बातमी आली.
‘नीला गेली..’
‘गेली ? .. म्हणजे..’
‘वारली.’
‘काय ?..’
आम्हा सर्वानाच हा अनपेक्षित धक्का होता. २-३ दिवसांच्या साध्या तापाने कुणी असं तडकाफडकी उठून कसं काय जाऊ शकतं? माझा तर माझ्या कानावर विश्वासच बसेना. मी मटकन खाली बसले. हातातील चिंचेचं बुटुक पडलं होतं. डोळ्यांतून दु:खाचे.. अन् हो .. पश्चात्तापाचेही अश्रू घळघळा ओघळत होते.
‘नीला.. नीला.. मी खरंच आपणहून बोलणार होते गं तुझ्याशी, आपला मैत्री शप्पथ..!
पण माझ्याशी असलेली कट्टी तशीच ठेवून नीला आता नेहमीसाठी निघून गेली होती..
आणि आज.. आता त्या फोटोवर पडलेलं ते मोरपीस माझ्या डोळ्यांतील अश्रूंनी भिजत होतं.