आरती अंकलीकर

गायकाला साथ-संगत करणारे तबलावादक, हार्मोनियमवादक, सारंगीवादक, तानपुरावादक.. या सगळय़ांनाही गायकाएवढाच संगीताचा रियाझ करावा लागतो. वाद्यावर प्रचंड हुकमत असतानाही गायकीवर कोणत्याही प्रकारे वरचढ न होता, अत्यंत संयमानं सुरात सूर मिसळणं हे कौशल्याचं काम आहे. दोघांच्या सुरांचं समीकरण जुळतं आणि एक नितांतसुंदर रागचित्र आकाराला येऊ लागतं, याचा अनुभव प्रत्येक प्रेक्षकानं घ्यायला हवा..

chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
suraj chavan shares reel video on riteish deshmukh ved song
रितेश देशमुखच्या सुपरहिट मराठी गाण्यावर सूरजचा जबरदस्त अंदाज! Video पाहून नेटकरी म्हणाले, “लय भारी…”
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
Viral Indonesian Siblings Render The Most Adorable Version Of Dhoom Track Dilbara
गिटार वाजवत मोठ्या भावाने गायले गाणे, छोट्याने किंचाळत…., इंडोनेशिअन भावाडांनी जिंकले नेटकऱ्यांचे मन, पाहा Viral Video

माझ्या वयाच्या पाचव्या वर्षी झोपाळय़ावर बसून सुरू झालेल्या मैफलींचं स्थळ दोन वर्षांत बदललं आणि या मैफली आमच्या घराच्या हॉलमध्ये सुरू झाल्या. आतापर्यंत श्रोता असलेल्या माझ्या आईची भूमिका बदलून संगतकाराची झाली- हार्मोनियमवादिकेची आणि बाबा तबलावादक! जसजशी माझी गाण्यात प्रगती होऊ लागली, तशी आई-बाबांनीदेखील संगतकाराची भूमिका गांभीर्यानं घ्यायला सुरुवात केली. त्या दोघांना आवड होती खूप, लहानपणापासून. थोडेफार शिकलेही होते, पण जीवनाच्या संघर्षांत मागे पडलेलं त्यांचं संगीत मला असलेल्या नैसर्गिक देणगीमुळे डोकं वर काढू लागलं. बाबा विलंबिताचा ठेकादेखील उत्तम वाजवू लागले. तशीच आई हार्मोनियमवर माझ्या सुरात सूर मिसळू लागली. ही माझी पहिली संगतकार जोडी!

 कालांतरानं गाण्याच्या क्लासमध्ये ठेका देण्यासाठी, संगत करण्यासाठी वेगवेगळय़ा तबलावादकांबरोबर गाण्याचा सराव होऊ लागला. तबलावादकाला गायकाच्या सुरामध्ये त्याचा तबला मिळवावा लागतो, त्या सुरात जुळवावा लागतो आणि त्या वादकाचं स्वरज्ञानही सूक्ष्म असावं लागतं, हे लक्षात येऊ लागलं. वेगवेगळे ताल, ठेके, तुकडे, तबल्याचं तंत्र, गायकीची समज, आवश्यक तिथे तुकडे वाजवण्याची समज आणि कसब. लयीचा अभ्यास, विलंबित लयीचं गांभीर्य. द्रुत लयीत जलद चालणारी बोटं, पण ठेक्याची लय वाढू न देणारा संयम, ही कठोर साधना तबलावादकाला निरंतर करावी लागते. आधी साधणं आणि साधलेलं जोपासणं हा प्रवास! वसंतराव कुलकर्णीच्या क्लासमध्ये आयतवडेकर बुवा येत असत संगतीला. उत्तम लयदार, वजनदार ठेका असे. गायकाला समजून वाजवत. तालात थोडय़ा कच्च्या असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर वाजवताना, विलंबिताच्या १२ मात्रांच्या आवर्तनात दहावी ‘ती र कि ट’ ही मात्रा झाल्यानंतरचा ‘धीं’ असा काही वाजवत, की ‘बायाँ’वरील  (डग्गा) ‘धीं’च्या जोरकस आघातानं आलापीमध्ये रमलेल्या बेसावध विद्यार्थ्यांना खाड्कन जाग येई! मग ते बंदिशीचा मुखडम गाऊन सम गाठत.

  मुख्य गायक-वादकाच्या बरोबरीनं साथसंगत करणारे सहवादक, सहकलाकार, साथीदार, अकम्पिनग आर्टिस्ट- यांपैकी कोणत्याही शब्दानं संबोधा..ते खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. १९८३ मध्ये माझी पहिली कमर्शिअल कॅसेट ‘म्युझिक इंडिया’नं प्रदर्शित केली- ‘प्रॉडिजी इन क्लासिकल म्युझिक- आरती अंकलीकर’ या नावानं! मी २० वर्षांची. उस्ताद सुलतान खाँसाहेबांसारख्या ज्येष्ठ सारंगीवादकांनी त्यात माझी संगत केली. गायकाच्या आवाजात बेमालूमपणे मिसळणारा सारंगीचा स्वर. सारंगी हे वाद्य गातंच म्हणा ना! गाण्यातील प्रत्येक अलंकार, मिंड, कण, बेहलावा, मुरकी, गमक हुबेहूब काढू शकणारं वाद्य म्हणजे सारंगी. बोटाचं नख संपून जिथे त्वचा सुरू होते, त्या भागाचा तारेला स्पर्श करून वाजवलं जाणारं हे अवघड वाद्य. कठोर मेहनतीची आवश्यकता असलेलं तंत्र. वाद्य सुरात जुळवणंही आव्हानात्मक. त्याउपर गायकीचा अभ्यास, रागांचा अभ्यास, शारीरिक व बौद्धिक रियाझ, हे ओघानं आलंच! काही कारणानं मैफलींमध्ये सारंगी कमी दिसू लागली आणि त्याची जागा हार्मोनियमनं घेतली.  रंगमंचावर मध्यभागी गायक. गायकाच्या उजव्या बाजूला तबलावादक. डाव्या बाजूला हार्मोनियम वादक आणि गायकाच्या दोन्ही कानांच्या एक फूट मागे दोन्ही बाजूला एक- एक तानपुरा वादक. हार्मोनियम वादकालाही संगतीसाठी वेगवेगळय़ा प्रकारचा अभ्यास करावा लागतो. विविध राग, त्यातील बंदिशी, घराण्यांच्या विविधतेनुसार रागांची मांडणी, तालाभ्यास, लयीचा अभ्यास, लयकारीचा अभ्यास, वादनातील तंत्र, त्याचं कौशल्य.. आपलं स्वत:चं सर्जनशील मन बाजूला ठेवून, गायकाच्या मेंदूत शिरून त्याच्याबरोबरीनं चालणारं मन, अनुषंगानं बोटंही तयार करणं, ही संगतकाराची साधना!

 पंडित रविशंकर आणि उस्ताद अल्लारखा खानसाहेब या जोडगोळीनं त्यांच्या काळात संगीतविश्व प्रचंड गाजवलं होतं. अशाच एका बहारदार मैफलीनंतर, अमेरिकेतील संस्थेचे सभासद मैफलीच्या अनुभवाबद्दल चार शब्द लिहिण्याची विनंती घेऊन पंडितजींकडे आले. पंडितजी उत्तम इंग्रजी बोलत. त्यांनी त्या वहीत आपल्या अलंकारिक इंग्रजीत २०-२५ वाक्यं लिहून स्वाक्षरी दिली. संस्थेच्या सभासदाची नजर आता खाँसाहेबांवर जाणार, हे पंडितजींच्या लक्षात आलं. पंडितजी म्हणाले, ‘‘हम दोनोंने बहोत सारी मैफ़िलों में साथ गाना-बजाना किया हैं।  जो मैंने इस किताब में लिखा हैं, वही खाँसाहब के भी विचार हैं। खाँसाहब, आप बस नीचे उर्दू में दस्तखत कर दीजिए।’’ सहवादन, संगत-सोबत, एकत्र प्रवास, एकमेकांना समजून घेणं, यातून आलेलं प्रेम आणि आदर, हे यात दिसतं.

 पंडित कुमार गंधर्वाच्या अनेक मैफलींना मी जात असे. पांढरा झब्बा आणि पायजमा असा त्यांचा साधा पोशाख. उजवीकडे तबलासंगतीला पं. वसंतराव आचरेकर. लयदार ठेका देणारे. पंडितजींना अभिप्रेत असलेली लय, तुकडे संयमानं वाजवणारे. डावीकडे हार्मोनियमच्या संगतीला पंडित गोविंदराव पटवर्धन. टीपकागदच जणू! जे काही पंडितजींच्या गळय़ातून येई, ते हुबेहूब, तंतोतंत वाजवण्याचं कसब असूनसुद्धा, पंडितजींच्या मनातलं रागचित्र ढळू नये, यासाठी आवश्यक तिथे केवळ षड्ज- पंचम भरदार देणारे गोविंदराव. ‘‘प्रत्येक गायक, ज्याला मी संगत करतो, त्याला माझा गुरू मानतो,’’ असं म्हणणारे गोविंदराव! कलाकाराला दिसलेलं रागचित्र हुबेहूब चितारण्यासाठी आपलं स्वत्व बाजूला ठेवून त्यात एकजीव होणारे हे सहकलावंत. मुंबईच्या मलबार हिलमध्ये एका धनाढय़ व्यापाऱ्याकडे गाण्याचा कार्यक्रम होता, पंडित अजय चक्रवर्तीचा! अजयदादांचा गळा पाण्यासारखा वाहणारा. क्षणात मंद्रातून तारसप्तकात जाणारा. चमत्कृतीपूर्ण सरगम आणि जलद ताना, विविध तिहाया. असं आवाज, ताल आणि सुरावर हुकमत असणारं गाणं त्यांचं. त्यांच्याबरोबर हार्मोनियमची संगत करणं म्हणजे तारेवरची कसरत! बोटं तयार हवीतच; पण कुशाग्र बुद्धी आणि अत्यंत ‘अलर्ट’ मन हवं पंडितजींना संगत करण्यासाठी. ही मैफल अविस्मरणीय होती. जितकी पंडितजींच्या गाण्यानं, तितकीच पंडित तुळशीदास बोरकरांच्या हार्मोनियम संगतीनं!

 गोव्यात एकदा माझं गाणं होतं. पंडित तुळशीदासजी संगतीला होते. मी ‘पुरिया धनाश्री’नं सुरुवात केली. मध्यंतरानंतर ‘बागेश्री’ गायचं ठरवलं. मंद्रात आलाप सुरू केले. धैवत, निषाद, षड्ज, गंधार- ‘ध नि सा ग’- हे स्वर घेऊन आलाप सुरू होते. ज्या क्षणी मी मध्यम लावला, बोरकरांची बोटंसुद्धा मध्यमावर गेली. एका क्षणात बोरकरांनी मध्यमावरचं बोट काढलं आणि म्हणाले, ‘‘श्रोतेहो, जरा माफ करा. मध्यम बेसुरा आहे. मला एका मिनिट द्या. मध्यमाची पट्टी तासून तो सुरात आणतो!’’ पंडितजींनी त्यांची टय़ुनिंगच्या साहित्याची पेटी उघडली. काही सेकंदांत तासून पेटी बंद केली आणि मध्यम छेडला. अत्यंत सुरेल, बागेश्रीचा मध्यम! १९८३ च्या सुमारास सीमा मिस्त्री या हार्मोनियमवादिकेशी माझी ओळख झाली.

१८-१९ वर्षांची असेल ती. हार्मोनियमवर लीलया चालणारी बोटं. उत्तम बुद्धी, कष्ट घेण्याची कायम तयारी असे तिची. पुढची ७-८ वर्ष आम्ही एकत्रच घालवली. रोज पाच-सहा तास रियाझ, एकत्र जेवणखाण, एकत्र मैफलींना जाणं आणि त्यानंतर आमची चर्चा रंगे. अनेक कार्यक्रम गायले-वाजवले आम्ही. एकमेकींच्या रंगात रंगून गेलो. पुण्याच्या एका कार्यक्रमाला भाईकाका (पु. ल. देशपांडे) आणि सुनीता वहिनी आले होते. सीमानं नमस्कार करून आपली ओळख दिली, ‘‘भाईकाका, ओळखलंत का? सीमा मिस्त्री.’’ त्यावर भाईकाका हसतहसत म्हणाले, ‘‘तू मुद्दाम ‘मी स्त्री’ असं सांगण्याची गरज नाही! आणि किती कार्यक्रम ऐकले आहेत मी तुझे आरतीबरोबर!’’      

 जसराजजींचं, दादरच्या छबिलदास सभागृहातलं गाणं आठवतंय मला. प्रचंड गर्दी जमली होती कार्यक्रमाला. भारतीय बैठक होती. बसायला जागा तर नव्हतीच, शिवाय मागे १००-१५० श्रोते उभे होते. संध्याकाळी ५ वाजता कार्यक्रम होता. साडेपाच होऊन गेले; पण रंगमंच रिकामा होता! लोकांची चुळबुळ सुरू झाली. रंगमंचावर आलेले तानपुरे, मागून येणाऱ्या गायकाची चाहूल देतात; पण तेही नव्हतं रंगमंचावर. श्रोत्यांची बेचैनी शिगेला पोहोचली. ६ वाजता तानपुरे, तबले, हार्मोनियम, हार्मोनियमवादक आणि पंडित जसराजजी स्वत:, असे सगळे रंगमंचावर स्थानापन्न झाले. तानपुरे झंकारू लागले. तबल्याच्या बाजूला तबलावादक मात्र दिसत नव्हता. कार्यक्रमाला उशीर होण्याचं कारण सगळय़ांच्या लक्षात आलं! निजामुद्दीन खाँसाहेबांना काही कारणामुळे विलंब होत होता; पण आता शेकडो श्रोत्यांना ताटकळत ठेवणं अशक्य होतं. पंडितजींनी रंगमंचावरूनच श्रोत्यांमध्ये हजर असलेल्या जगत्विख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्माना अभिवादन केलं. तबलावादक न आल्याचं शिवजींच्या लक्षात आलं. त्यांनी तबलासंगत करण्याची तयारी दर्शवली. पंडितजींनी होकार दिला आणि शिवजी संगतीला बसले! मैफल सुरू झाली.. रंग चढू लागला! अत्यंत समर्पक साथ केली शिवजींनी. पहिला राग संपण्याच्या ५-१० मिनिटं आधी निजामुद्दीन खाँसाहेब सभागृहात,  रंगमंचावर आल्यावर पंडितजींनी त्यांना नजरेनंच श्रोत्यांमध्ये बसण्याची खूण केली. मध्यंतरापर्यंत शिवजींनीच तबलासंगत केली. त्यांचा मान होता तो! गायक, वादक आणि संगत कलाकार या सगळ्यांचं मिळून एक कुटुंबच असतं. त्या सगळ्यांमधल्या सुरेल संवादातून संगीत झरतं.. आणि त्यांच्यातल्या विसंवादामुळे बेचैनी! संगतकारांबद्दल आणखी बरंच काही पुढच्या (२६ ऑगस्टच्या) लेखात..