चेहऱ्यावर वय दिसू लागलेली वा प्रसूतीनंतर जाड झालेली अभिनेत्री असो, वा परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावूनही चेहऱ्यावर केस असल्यामुळे थट्टेचा विषय ठरलेली शालेय मुलगी असो… स्त्रीच्या शरीराबद्दल आणि दिसण्याबद्दलच्या पक्क्या धारणा अशा चर्चांच्या वेळी ठळकपणे दिसतात. लहानपणापासून व्यक्तीच्या भावविश्वाचा भाग असलेले खेळ, चित्रपट, गाणी, साहित्य, यातून अशा अनेक धारणा मनात बळकट होतात. या आरोपाचा कायम धनी ठरलेली ‘बार्बी’, तिचं सुडौल शरीर आणि त्या आधारानं उभ्या राहिलेल्या चर्चाविश्वाचा हा आढावा…
मागच्या काही लेखांमधून आपण स्त्रीचं शरीर आणि त्याभोवतीच्या चर्चाविश्वाचा आढावा घेतोय. बाईचं शरीर कसं असावं, मुख्यत: तिनं कसं ‘दिसावं’ याबद्दलच्या वादविवादांना अंत नाही. गेल्याच आठवड्यामध्ये उत्तर प्रदेशात दहावीच्या परीक्षेत बोर्डात पहिल्या आलेल्या प्राची निगम या मुलीला समाजमाध्यमांवर ‘ट्रोल’ केलं गेलं… कारण काय, तर तिच्या चेहऱ्यावर असलेले केस! ‘तुला तर दाढीमिशा आहेत. तू नक्की मुलगी आहेस ना?’ अशा कमेंट्स करत अनेकांनी तिची थट्टा उडवली. प्राची एका मुलाखतीत म्हणाली, की कदाचित तिला थोडे कमी गुण मिळाले असते, तर ती लोकांच्या नजरेत अशा प्रकारे आलीच नसती. पंधरा वर्षांच्या मुलीला स्वत:च्या यशाविषयी आनंद व्यक्त न करता अशा प्रकारच्या कमेंटस्ना उत्तरं द्यावी लागावीत, हे वाईटच. त्यानंतर अनेकांनी तिची बाजू घेतली, वरवरची मलमपट्टी करायचा प्रयत्न केला. परंतु इतकं असह्य ट्रोलिंग आयुष्यभर या मुलीच्या लक्षात राहील, हीच शक्यता जास्त.
हेही वाचा : ऑनलाइन जुगाराचा व्हायरस!
हे असं का झालं? याचं उत्तर म्हणजे, स्त्रीनं ‘कसं दिसावं’ याबाबतच्या खोलवर रुजलेल्या पक्क्या धारणा. त्या अर्थातच केवळ आपल्या देशात नाहीत. जगात सगळीकडेच स्त्रीचं शरीर कसं दिसावं, त्याची आदर्श परिमाणं काय आणि तशी ती नसतील तर काय करायला हवं, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतात. आजचा जमाना हा ‘बॉडी पॉझिटिव्हिटी’चा (शरीराबाबतची सकारात्मकता) आहे असं म्हणतात. पण वर उल्लेखलेली प्राची निगमसारखी घटना घडते आणि या वरवरच्या पुरोगामित्वाला सुरुंग लागतात.
मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला बहुचर्चित ‘बार्बी’ हा चित्रपट या जगप्रसिद्ध बाहुलीचं विश्व एका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न करतो. ग्रेटा गेर्विग या स्त्रीवादी दिग्दर्शिकेच्या या चित्रपटावर जशी ‘टोकाच्या स्त्रीवादा’ची आणि पुरुषांचा तिरस्कार केल्याची टीका झाली, त्याच वेळी अनेक जण तो आवडल्याचंही सांगत होते. ज्यांच्या तो पसंतीस उतरला, त्यांच्या मते त्यात ‘बार्बी’वर आतापर्यंत झालेले आरोप मान्य करून तिला एक नवं विचारविश्व प्राप्त करून देण्याचा प्रयत्न झाला. या चित्रपटाची प्रसिद्धीही आगळ्यावेगळ्या पद्धतीनं केल्याचं तुम्हाला आठवत असेल. बार्बीच्या गुलाबी रंगाचा आणि गुलाबी जगाचा पुरेपूर वापर करून घेत, विशेषत: स्त्रीवर्गात या चित्रपटाचा बराच बोलबाला झाला. बार्बीची एक ठरावीक ‘इमेज’ बदलण्याचा हा प्रयत्न जरूर पाहण्याजोगा आहे आणि त्या निमित्तानं बार्बी बाहुलीनं मुलींवर केलेल्या गारुडाबद्दलही पुन्हा नव्यानं बोलायला, लिहायला सुरुवात झाली. या सगळ्या चर्चा महत्त्वाच्या आहेत, कारण त्या स्त्रीनं कसं दिसावं, याच प्रश्नाभोवती फिरतात.
हेही वाचा : नृत्याविष्कार!
‘बार्बी’चा इतिहास मोठा रंजक आहे. अमेरिकेतील ‘मटेल’ या खेळण्यांच्या कंपनीनं बार्बी बाहुली सर्वप्रथम १९५९ मध्ये तयार केली. ‘मटेल’च्या संस्थापक रूथ हॅन्डलर यांच्या कल्पनेतून ती साकारली गेली होती. जन्मापासूनच ती वादग्रस्त ठरली. ती ज्या बाहुलीच्या धर्तीवर तयार करण्यात आली, ती जर्मनीतील ‘लीली’ बाहुली एका ‘अॅडल्ट कॉमिक स्ट्रिप’वर आधारित होती. आपल्या कमनीय रूपाचा वापर करून श्रीमंत पुरुषांना गटवण्यास सदैव तयार असलेली स्त्री, ही तिची प्रतिमा. ही लीली बाहुली बॅचलर पार्ट्यांमध्ये लोक एकमेकांना भेट म्हणून देत असत. त्यामुळे ‘अश्लील’ म्हणावी अशी पार्श्वभूमी बार्बीला लाभलेली आहे, यावर वाद झडले. त्या वेळेस बार्बी ही मुख्यत: ‘टीनएजर’ मुलींसाठी घडवलेली बाहुली होती. यथावकाश ती लहान मुलींनाही खेळायला दिली जाऊ लागली. सज्ञान स्त्रीचं शरीर लाभलेली बाहुली लहान मुलींना खेळायला द्यावी का, यावरही तेव्हा वाद होत असत. तिचा कमनीय बांधा, आदर्श म्हणावेत असे रेखीव नाक-डोळे आणि गोरा रंग, यांचा लहान मुलींवर नेमका काय परिणाम होतो, याबाबत चर्चा घडू लागल्या. अशा चर्चांचा ‘मटेल’ कंपनीला मात्र पुरेपूर फायदा झाला. बार्बीचा खप वर्षानुवर्षं वाढतच गेला. आजच्या घडीला जवळजवळ दीडशे देशांमध्ये बार्बीची विक्री केली जाते. लहान मुलांच्या- विशेषत: मुलींच्या विश्वात बार्बीनं महत्त्वाचं स्थान पटकावलं.
साठ आणि सत्तरच्या दशकात बार्बीनं अनेकानेक वाद ओढवून घेतले. उदा. बार्बीच्या बरोबर तिचं एक ‘डाएट बुक’ दिलं जात असे. त्यात एकच सल्ला असायचा- तो म्हणजे ‘डोन्ट इट’! बार्बी म्हणायची, ‘गणित कठीण असतं’ किंवा ‘मी माझ्या स्वप्नातल्या लग्नाची तयार करत आहे’. स्त्रीवाद्यांनी या सगळ्यावर यथोचित टीका केली. एकूणच बार्बीच्या विश्वात कर्तृत्वापेक्षा बाह्यरूपावर जास्त भर दिला जातो आहे, मुलींनी हुशार असण्यापेक्षा सुंदर असणं महत्त्वाचं असल्याचं ठसवलं जात आहे, असे आरोप केले गेले. हे विशेषकरून नमूद करायला हवं, की हा तोच काळ होता जेव्हा स्त्रीवादाची दुसरी लाट भरास आली होती. विवाह, घटस्फोट, लैंगिक अधिकार, सुरक्षित गर्भपात, यावर जोमानं चर्चा होत होत्या. खास स्त्रियांसाठी घडवण्यात आलेली उत्पादनं- अंतर्वस्त्रं, हाय हील्सचे सँडल्स वगैरे जाळले जात होते. दुसरीकडे हेच सगळं वापरणाऱ्या बार्बी बाहुलीचा खप वाढत होता.
हेही वाचा : सांदीत सापडलेले : मैत्री
बदलत्या काळाबरोबर ‘मटेल’ कंपनीनं बार्बीतही अनेक बदल केले. ‘बार्बी ही कोणीही असू शकते,’ हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गृहिणीपासून पायलट, इंजिनीअर, डॉक्टर असलेल्या बार्बी बाहुल्या तयार करण्यात आल्या. त्यांना त्यांच्या व्यवसायानुसार कपडे आणि इतर साधनं देण्यात आली. ठरवलं तर बार्बी देशाची पंतप्रधानही होऊ शकते, अशा प्रकारच्या वाक्यांचा भडिमार करण्यात आला. एक गोष्ट मात्र बदलली नाही, ती म्हणजे बार्बीनं रूढार्थानं कमनीय असणं. तिची ‘आदर्श’ म्हणावी अशी शरीराची ठेवण आणि तिचं श्वेतवर्णीय असणं. म्हणजे थोडक्यात ती आयुष्यात कोणीही होऊ शकत होती, पण सुंदर आणि ‘परफेक्ट’च दिसत होती.
बार्बीमुळे लहान वयापासूनच मुलींमध्ये ‘बॉडी इमेज’च्या समस्या(शरीराबाबतचा न्यूनगंड) उद्भवू लागल्या आहेत, असे आरोप होऊ लागले. मग ‘मटेल’ कंपनीनं वेगवेगळ्या वर्णाच्या आणि शरीररचनेच्या बाहुल्या तयार केल्या. आता जगातली सगळ्या प्रकारची विविधता बार्बी सामावून घेत आहे, अशी जाहिरात करण्यात आली. कृष्णवर्णीय, काळे केस असणाऱ्या, वेगवेगळ्या धाटणीचे कपडे घालणाऱ्या बार्बी बाहुल्या सर्वत्र दिसू लागल्या. तिच्या शरीराचा आकार तरीही बदलला नव्हता. २०१६ मध्ये ‘मटेल’नं हा दोष मान्य करत तीन वेगवेगळ्या आकारांच्या बाहुल्या बाजारात आणल्या. ‘कर्व्ही’ (बारीक नसलेली, तरीही सुडौल), ‘पेटिट’ (सुबक-ठेंगणी) आणि ‘टॉल’ (उंच) असे बार्बीचे तीन शरीरप्रकार तयार केले गेले. आधीच्या बार्बीवर झालेली प्रखर टीका हे यामागचं कारण होतंच, शिवाय बाजारात अनेक नव्या बाहुल्या येत असल्यामुळे बार्बीला स्पर्धा निर्माण होत असल्यानं व्यवसायासाठी अशी सुधारणा करणं क्रमप्राप्त होतं.
या विषयाशी निगडित काही रंजक सर्वेक्षणं उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, बार्बीशी खेळून झाल्यावर मुली कमी खातात आणि आरशात जास्त बघतात असं एक निरीक्षण केलं गेलं- जे इतर खेळ खेळल्यावर होत नव्हतं. बार्बी तीन वेगवेगळ्या आकारांत उपलब्ध असली तरी मुलींचा कल बारीक असलेल्या बार्बीकडेच अधिक राहिला. बार्बीशी खेळल्यामुळे अगदी लहान वयात (वय वर्षं ३ ते १०) मुली बारीक होण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करतात, असं आढळून आलं. अनेक मुलींच्या आईंनी नव्या बाहुल्यांच्या नावाबद्दल तक्रार केली. म्हणजे समजा एखाद्या मुलीला ‘कर्व्ही’ आकाराची बाहुली भेट म्हणून मिळाली आणि तिला ती तिच्या शरीरावरची टीका वा थट्टा वाटली तर? असे प्रश्न विचारले गेले. थोडक्यात, कितीही वेगवेगळ्या शरीरांना सामावून घेतलं तरी बाहुलीचं (आणि पर्यायानं स्त्रीचंसुद्धा) ‘आदर्श’ शरीर म्हणजे बारीक असणं, हेच समीकरण थोड्याबहुत प्रमाणात कायम राहिलं. नुसतं बारीक असणं नाही, तर मेकअप करणं, सुंदर कपडे घालणं, वॅक्सिंग करणं हेही महत्त्वाचं आहे, हे कळत-नकळत ठसवलं गेलं.
हेही वाचा : माझी मैत्रीण : लोणच्यासारखी मुरलेली मैत्री
१९६१ मध्ये बार्बीला सोबत म्हणून एक बाहुला तयार करण्यात आला. त्याचं नाव ‘केन’. या केनला स्वत:चं म्हणावं असं अस्तित्व नाही. बार्बीबरोबर राहणारा पिळदार, उंच, ‘माचो’ म्हणावा असा हा पुरुष. पुन्हा रूढार्थानं रुबाबदार आणि सुंदर पुरुष जसा दिसेल, तसाच केन दिसतो. केनमुळे पुरुषांसमोरही अतार्किक म्हणावी अशी ‘बॉडी इमेज’ तयार होतेय, असे आरोप झाले. पण मुळातच तो या सगळ्या प्रकल्पातलं महत्त्वाचं पात्र नसल्यामुळे बार्बीएवढी त्याची चर्चा कधी झाली नाही. समाजात स्त्रियांच्या शरीराबद्दल जेवढी चर्चा होते, तशी चर्चा पुरुषांबाबत होत नाही. पुरुषांचे वेगवेगळे शरीरप्रकार अधिक स्वीकारार्ह असतात, पण स्त्रीनं मात्र बारीक असावं अशी अपेक्षा दिसते. केनच्या शरीरावर तितकीशी चर्चा न होण्याचं हेही एक प्रमुख कारण असू शकेल.
‘बार्बी’ चित्रपटाच्या निमित्तानं या सगळ्यावर पुन्हा नव्यानं चर्चा रंगली आणि ती पुढे विविध व्यासपीठांवर सुरू राहिली. बार्बी आता ‘स्त्रीवादी’ झाली आहे. तिनं खूप यश मिळवलेलं आहे… पण हेही लक्षात घ्यायला हवं, की या चित्रपटातही बार्बी बारीकच आहे. केन उंच आणि पिळदारच आहे. इतर प्रकारच्या बार्बी आजूबाजूला आहेत, पण मुख्य भूमिकेत अजूनही ‘स्टिरिओटिपिकल’ (रूढार्थानं बारीक-सुंदर असलेली) बार्बीच आहे. त्यामुळे चित्रपटाचं खूप कौतुक झालं, तरी हा दोष अधोरेखित करायला लोक विसरले नाहीत.
हेही वाचा : जिंकावे नि जगावेही : नातं… माझं, माझ्याशी!
या सगळ्याचा सारांश असा, की बार्बी ही फक्त बाहुली कधीच नव्हती. वरवर उथळ वाटणारे खेळ, कलाकृती, गाणी, गोष्टी आपल्या जीवनाबाबतच्या धारणा विकसित करत असतात. स्त्रीचं आदर्श शरीर कसं दिसावं याबाबतच्या चर्चेत बार्बीनं नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली. त्या प्रतिमेत न बसणाऱ्या शरीरांची मग थट्टा उडवली गेली, त्यांच्यात न्यूनगंड निर्माण केला गेला. सुरुवातीला उल्लेखलेल्या प्राचीच्या घटनेच्या अनुषंगानं आपणही कळत-नकळत अशा धारणांचे बळी आहोत का, हे तपासण्याची वेळ आलीय. तसं असेल, तर सगळ्या प्रकारच्या शरीरांमध्ये सौंदर्य शोधणं प्रयत्नपूर्वक शिकावं लागेल.
gayatrilele0501@gmail.com