टॅक्सीचालक होणं, हे आता अनेकींसाठी जगण्याचा एक महामार्ग ठरत आहे. प्रवाशांना त्यांच्या मुक्कामावर सुखरूप पोहोचवण्यासाठी बांधील असणाऱ्या त्या अनेक जणी.. मोलाचं म्हणजे स्त्रियाच आता इतर स्त्रियांची काळजी घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, टॅक्सीच्या माध्यमातून.. सध्याच्या काळात स्त्रीचालक आणि स्त्रीप्रवासी दोघांसाठीही महत्त्वाच्या ठरणाऱ्या या सहप्रवासाविषयी..
विजांचा कडकडाट आणि धो-धो कोसळणारा पाऊस! मध्यरात्रही उलटून गेली आहे, दोन-अडीच वाजताची निरव शांतता! अशात मुंबईतल्या एका निर्मनुष्य रस्त्यावर गाडी बंद पडते.. त्या गाडीतली महिला चालक एकटी.. हिंदी चित्रपटाची पाश्र्वभूमी असती, तर ही परिस्थिती अत्यंत रोमॅन्टिक, नायकाने पडद्यावर प्रवेश घेण्यासाठी अत्यंत अनुकूल़ वास्तवाच्या पाश्र्वभूमीवर मात्र हीच परिस्थिती भय-चिंता-काळजी वगैरे निर्माण करणारीच़ त्यातही गेल्या महिन्या- दोन महिन्यांपासून महिलांच्या असुरक्षिततेबाबतचे जे काही मासले कानावर येत आहेत त्यामुळे तर कोणत्याही स्त्रीसाठी हा थरकाप उडवणारा प्रसंग़ ़ ़
पण विशेष म्हणजे अशा प्रसंगात सापडूनही ‘ती’ अजिबात डगमगली नाही़ तिने आपल्या कार्यालयात संपर्क करून मदत मागवली आणि तोवर जवळपासच्या रिक्षाचालकांच्या मदतीने धक्का मारत गाडी रस्त्याच्या कडेला नेली़ या वेळी तिथे जमलेल्या सगळ्याच पुरुषमंडळींनी संकटात सापडलेल्या या स्त्रीबद्दल यथायोग्य दाक्षिण्य दाखवलं. आवश्यक ते सगळे सहकार्य तर केलंच आणि शिवाय कार्यालयाकडून मदत येईपर्यंत तिच्यासोबत थांबून तिला धीरही दिला़ प्रत्येक अडचणीत आलेल्या किंवा एकटय़ा असलेल्या स्त्रीचा गैरफायदा घेतला जातोच असं नाही. समाजात आजही तिला समजून घेतलं जातं, याची पुन्हा एकदा ग्वाही देणारा हा प्रसंग ‘वीरा कॅब’ या कंपनीत महिला टॅक्सीचालक म्हणून काम करणाऱ्या जीता आरेकर यांनी गप्पांच्या ओघात सांगितला़
जीता गेली दीड र्वष ‘वीरा’मध्ये काम करीत आहेत़ घरात पक्षाघाताने बिछान्याला खिळलेला पती आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी असा परिवार आह़े आर्थिक चणचणीत दिवस कंठत असताना ‘वीरा कॅब’ नावाची महिला टॅक्सीचालक पुरविणारी एक संस्था आहे आणि संस्थेला महिला कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, अशी जाहिरात जीता यांच्या मुलीने ऐकली़ बस्स! तेव्हापासून आपल्या आईनेही नोकरी करावी आणि तीही टॅक्सीचालकाचीच, असं मुलीच्या मनाने घेतलं. तसा लकडाच तिने आईकडे लावला़ जन्मात ज्यांनी सायकलही चालवली नव्हती, त्या जीता यांनी शेवटी मुलीच्या हट्टामुळे ‘वीरा मोटर ट्रेनिंग स्कूल’मध्ये नाव नोंदवल़े आज जीता रात्र आणि दिवस अशा दोन्ही वेळांमध्ये पूर्णवेळ टॅक्सीचालक म्हणून काम करतात़ आठ हजार रुपये निश्चित, अधिक किलोमीटरनुसार मिळणारे पैसे, अशी सगळी गोळाबेरीज करून त्यांचे मासिक उत्पन्न १२-१५ हजार रुपयांच्या घरात पोहोचले आह़े त्यामुळे घराच्या ढासळत्या आर्थिक डोलाऱ्याला त्यांनी चांगलाच आधार देऊन तो सावरला आह़े
रात्री-अपरात्री घराबाहेर पडाव्या लागणाऱ्या किंवा तशाच प्रकारची नोकरी करणाऱ्या स्त्रियांना, स्त्रियांच्याच माध्यमातून हक्काची वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा हेतूने ‘वीरा कॅब’ आणि ‘प्रियदर्शनी कॅब’ या दोन संस्था उभ्या राहिल्या़ त्यामुळे रात्रीअपरात्री एकटय़ा-दुकटय़ाने प्रवास करण्यासाठी स्त्री प्रवाशांना सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आह़े सध्या वीरा कॅबकडे २० गाडय़ा आणि २५ महिलाचालक, तर ‘प्रियदर्शनी’ कडेही २० गाडय़ा आणि ३० महिलाचालक आहेत़
‘‘या कामासाठी महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांची मानसिकता तयार करणं हेच सुरुवातीला मोठं आव्हान होतं,’’ ‘वीरा’च्या प्रमुख प्रीती मेनन सांगतात़ रेवती रॉय यांची ‘फॉर शी’ नावाची महिला चालक असणारी टॅक्सी सेवा दिल्ली, बंगळुरू, मुंबईसारख्या महानगरांत काही वर्षांपूर्वी होती़ पुढे ती ढेपाळली़ परंतु, अशा प्रकारची सेवा स्त्रियांसाठी असायलाच हवी़ जेणेकरून महिलांना रोजगारही मिळेल आणि आणि स्त्री प्रवाशांची सोयही होईल, या विचाराने २०११च्या जानेवारी महिन्यात म्हणजे दोनच वर्षांपूर्वी मुंबईला केंद्रस्थानी ठेवून रेवती रॉय यांच्या सहकार्याने प्रीती मेनन यांनी ‘वीरा कॅब’ला सुरुवात केली़ ‘to train women for driving हे ब्रीद घेऊन ‘वीरा’ काम करत़े
उद्देश अर्थात एकच, स्त्रियांना रोजगाराचं एक नवं दालन उघडं करून देणं. पण तरीही त्यांच्या भविष्यकाळाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक स्त्री-कर्मचाऱ्याला विमा योजना, पीएफसारख्या सुविधाही दिल्या आहेत़ पण असं असूनही स्त्रियांना या क्षेत्राकडे वळविण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागत असल्याचं मेनन सांगतात़ मुळात आपण गाडी चालवू शकतो किंवा व्यावसायिक चालक होऊ शकतो, ही संकल्पनाच मध्यमवर्गीय स्त्रियांसाठी नवीन आह़े त्यामुळे ठिकठिकाणच्या गरजू महिलांच्या भेटी घेणं, त्यांना प्रोत्साहित करणं, या व्यवसायाची उपयोगिता आणि महत्त्व यांची माहिती देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या क्षमतांची त्यांना ओळख करून देणं हे ‘वीरा कॅब’ सुरू करतानाचं सर्वात मोठं आव्हान होतं़ प्रशिक्षणासाठी आलेल्या महिलांचा उत्साह आणि धडाडी टिकवून ठेवणं हेही संस्थाचालकांपुढे एक दिव्य होतं़ पूर्वा पवार या वीराच्या महिला चालकाचा अनुभव याबाबत अधिक बोलका आह़े पूर्वा सांगतात, ‘‘मला तर गाडी चालवायला जमेल हे काही केल्या पटतच नव्हतं़ तरी रोजगार हवा म्हणून धाडस करून शिकायला सुरुवात केली़ पण मध्ये धर्य गळालं. वाटलं, नाहीच जमणार आपल्याला, सोडून दिलं प्रशिक्षणाला जाणं, पण प्रीती मॅडमनी पुन्हा धीर दिला़ ‘होतं सुरुवातीला असं, जमेल हळूहळू, प्रयत्न तर कर,’ असं समजावत पुन्हा बळेच माझे हात ड्रायव्हिंग व्हीलवर टेकवले आणि आज तेच व्हील माझ्या हातात लीलया खेळतंय़’’
प्रीती मेनन यांना असे अनुभव मुळीच नवीन नाहीत़ त्या सांगतात, ‘‘अनेकदा तर मुली पहिल्या दिवशी ड्रायव्हिंग व्हीलला हात लावायलाही घाबरतात़ मला हे जमणारच नाही, अशी त्यांनी स्वत:ची ठाम समजूत करून घेतलेली असत़े त्यामुळे आम्ही आता प्रशिक्षणाची सुरुवात स्टीम्युलेटरने (व्हच्र्युअल प्रशिक्षण) ेकरतो आणि एकदा स्टीम्युलेटरवर हात बसला की, मगच प्रत्यक्षात रस्त्यावर गाडी आणतो़ त्यामुळे आता नव्याने येणाऱ्या स्त्रियांची सुरुवातीची भीती कमी करण्यात आम्ही खूपच यशस्वी झालो आहोत,’’ असं मेनन सांगतात़.
टॅक्सी शोधून देणारी कंपनी
ओलाकॅब कंपनीने एक आज्ञावली बनविली आह़े या आज्ञावलीमुळे प्रवाशाला मुंबईतील कोणत्याही भागात आणि कोणत्याही वेळी तातडीने टॅक्सी उपलब्ध करून घेता येत़े त्यामुळे प्रवाशाचा वाहनासाठी वाट पाहण्याचा कालावधी कमी होतो़ कंपनीने अनेक कुल कॅबमध्ये आपली जीपीआरएस यंत्रणा बसवली आह़े ज्यामुळे ग्राहकाने वाहन नोंदविल्यावर कंपनीकडून ग्राहकाच्या सर्वात जवळच्या गाडीला त्याच्यापर्यंत पाठवण्यात येत़े टॅक्सीची मागणी नोंदवण्यासाठी कोणत्याही स्मार्ट फोनमध्ये चालणाऱ्या ओलाकॅबच्या आज्ञावलीत उपयोग करता येतो किंवा थेट कॉल सेंटरशी संपर्क साधून वा संकेतस्थळावरूनही आपली मागणी नोंदविण्यात येत़े
या कंपनी सुविधेचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे टॅक्सी किती अंतरावर आहे याची माहिती प्रवाशाला सतत एसएमएसच्या माध्यमातून पुरविण्यात येते आणि गाडीत बसल्यावर प्रवासी नियोजितस्थळी उतरेपर्यंत त्याच्यावर कंपनीकडून पूर्ण लक्ष ठेवण्यात येतं़ वाटेत एखादी आपत्परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशाने केवळ एसएमएस केल्यास त्याला आवश्यक मदत पुरविण्यात येत़े
सध्या महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांनंतर या कंपनीच्या माध्यमातून टॅक्सीची नोंदणी करणाऱ्या महिलांची संख्या वाढल्याचं कंपनीच्या जनसंपर्कप्रमुख रश्मी मधू यांनी सांगितलं.
याशिवाय स्वसंरक्षणाचे धडेही स्त्रियांना देण्यात येत असले, तरीही या संस्थांच्या सुमारे दीड-दोन वर्षांच्या कार्यकाळात अजून तरी त्याचा वापर करण्याची वेळ स्त्रियांवर आलेली नाही़ असा दिलासादायक अनुभव सगळ्यांनीच व्यक्त केला. ‘‘एक स्त्री गाडी चालवते हे पाहून बहुतेक प्रवाशांना आमचं कौतुकच असतं. आतापर्यंत खूप आणि खूप चांगलेच अनुभव आम्हाला आले,’’ अनिता पिसाळ आश्वासकपणे सांगतात़ ‘‘मुंबईतील रस्ते महिलांसाठी सुरक्षितच आहेत़ त्यामुळे आता कितीही वाईट बातम्या कानावर येत असल्या तरीही भीती अशी वाटतच नाही़ माझे पती पोलिसात चालक म्हणून काम करतात़ त्यांनाही माझ्या उत्पन्नाचा हातभार लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी चालविणं ही माझी पॅशन आह़े मला खूप आवडतं गाडी चालवायला, म्हणूनच मी या क्षेत्रात आले आणि अनेक स्त्रियांनी आलंही पाहिजे,’’ असं आवाहन त्या करतात़.
अर्थात ड्रायव्हिंग म्हणजे अपघाताचा अनुभवही येणं अपरिहार्य आहे. पूर्वा पवार यांनी आपल्या गाडीला झालेल्या अपघाताचा अनुभव सांगितला़ ‘‘एका मध्यरात्री भर रस्त्यात टायर पंक्चर होऊन टॅक्सी समोरच्या ट्रकला जाऊन आदळली़ मला मुका मार लागला़ थोडं घाबरायला झालं, पण प्रसंगावधान राखत मी माझ्या स्त्री-सहकारी चालकाला फोन केला़ माझा अपघात चारकोपला झाला आणि ती विरारहून भाडं पोहोचवून परतत होती़ तिने मला धीर दिला आणि गाडी टोइंगवाल्याकडे देऊन आम्ही परतलो़ तोवर कार्यालयाकडूनही मदत आली होती़ पण त्या प्रसंगाने प्रसंगावधान शिकवलं. आता तर फारच धर्य आलंय़ त्यामुळे मुलींसाठी या क्षेत्रात भीतिदायक असं काही नाही, असं मी खात्रीने सांगू शकते. आमच्या इथल्या अनेक मुलींनी तर आता नोकरी सोडून स्वत:ची ‘स्कूल व्हॅन’ही सुरू केली केली आह़े त्यामुळे हाही महिला चालकांसाठी एक चांगला पर्याय आहे आणि रिक्षाचालक किंवा शाळेत पोहोचवणाऱ्या ‘काकां’चे वाईट अनुभव सहज टाळणं शक्य असल्याने पालकांचीही अशा गाडय़ांना चांगली मागणी असल्याचं पूर्वा सांगत़े
पण, अजूनही स्त्रियांमध्ये या क्षेत्राबाबत जागृती नाही़ त्यामुळे ठिकठिकाणी कार्यशाळा, व्याख्याने आदी माध्यमांतून मुलींना या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित करावं लागेल, हे मान्य करत प्रीती म्हणतात, ‘‘आजही आम्ही भांडवल उभं करायला तयार आहोत़ नव्या गाडय़ा घ्यायला तयार आहोत़ परंतु, अधिकाधिक स्त्रियांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे,’’ मेनन यांना शासकीय मदतीचीही अपेक्षा आह़े वीराच्या मोटर प्रशिक्षण केंद्रामध्ये स्वसंरक्षणाच्या क्षमतेसह परिपूर्ण महिला चालक विकसित केला जातो़ त्यामुळे शासनाने कोणत्याही प्रकारचं साहाय्य देऊ केलं, तर उद्या रस्त्यांवर अनेक व्यावसायिक महिला चालक दिसतील, असं मेनन यांचं मत आह़े
‘वीरा’ आणि ‘प्रियदर्शनी’ या दोन्ही संस्था सुरुवातीचे तीन महिने स्त्रियांना वाहन चालविण्याबरोबरच स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण आणि मुंबईतील रस्त्यांची माहितीही देतात़ तसंच इंग्रजी भाषेचं जुजबी ज्ञानही चालकाला देण्यात येतं़ किमान आठवीपर्यंतचं शिक्षण झालेल्या आणि वीस र्वष वयापासूनची कोणीही स्त्री टॅक्सीचालक होऊ शकते आणि दिवसांतले ९ ते १० तास नोकरी करून महिन्याकाठी चांगली रक्कम घरी नेऊ शकतात, असं प्रीती मेनन म्हणतात़
‘प्रियदर्शनी’च्या संचालिका सुशीबेन शहा यांनी, ‘स्त्रीशक्ती केंद्र’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून संपर्कात येणाऱ्या स्त्रियांना या क्षेत्रात उतरविलं आह़े त्यातही आमच्याकडे असणाऱ्या ५० टक्क्यांहून अधिक स्त्रिया या अल्पसंख्याक समाजातील आहेत, असंही त्या सांगतात़ सध्या आम्ही ‘टी-परमिट’च्या गाडय़ा चालवत आहोत़ परंतु, रोज रस्यांवर धावणाऱ्या ‘काळी-पिवळी’चे परमिट जर आम्हाला उपलब्ध करून दिलं़, तर रोज रस्यावर दिसणाऱ्या टॅक्सींपैकी अनेक स्त्री-चालकांच्या असतील, असंही शहा यांनी सांगितलं.
नुकत्याच प्रीपेड टॅक्सी सेवेतही या दोन्ही संस्था उतरल्या आहेत़ विमानतळावरही त्यांचे नोंदणी कक्ष आहेत़ त्यामुळे दिवसभरात तेथे येणाऱ्या सर्वच स्त्री-पुरुष उतारूंना त्याचा लाभ घेता येतो़ रात्रीच्या वेळी मात्र ही सेवा केवळ स्त्री-प्रवाशांसाठीच असत़े
एकंदरीतच आतापर्यंत महिलांसाठी दिवास्वप्न वाटणारे टॅक्सी चालवण्याचे क्षेत्रही स्त्रियांसाठी वास्तव ठरत आहे. स्त्रियाच आता इतर स्त्रियांची काळजी घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. हे एक भरभक्कम पाऊल स्त्रीच्या सक्षमीकरणाच्या दिशेने. आश्वासक.. महत्त्वाकांक्षी ..