विजांचा कडकडाट आणि धो-धो कोसळणारा पाऊस! मध्यरात्रही उलटून गेली आहे, दोन-अडीच वाजताची निरव शांतता! अशात मुंबईतल्या एका निर्मनुष्य रस्त्यावर गाडी बंद पडते.. त्या गाडीतली महिला चालक एकटी.. हिंदी चित्रपटाची पाश्र्वभूमी असती, तर ही परिस्थिती अत्यंत रोमॅन्टिक, नायकाने पडद्यावर प्रवेश घेण्यासाठी अत्यंत अनुकूल़ वास्तवाच्या पाश्र्वभूमीवर मात्र हीच परिस्थिती भय-चिंता-काळजी वगैरे निर्माण करणारीच़ त्यातही गेल्या महिन्या- दोन महिन्यांपासून महिलांच्या असुरक्षिततेबाबतचे जे काही मासले कानावर येत आहेत त्यामुळे तर कोणत्याही स्त्रीसाठी हा थरकाप उडवणारा प्रसंग़ ़ ़
पण विशेष म्हणजे अशा प्रसंगात सापडूनही ‘ती’ अजिबात डगमगली नाही़ तिने आपल्या कार्यालयात संपर्क करून मदत मागवली आणि तोवर जवळपासच्या रिक्षाचालकांच्या मदतीने धक्का मारत गाडी रस्त्याच्या कडेला नेली़ या वेळी तिथे जमलेल्या सगळ्याच पुरुषमंडळींनी संकटात सापडलेल्या या स्त्रीबद्दल यथायोग्य दाक्षिण्य दाखवलं. आवश्यक ते सगळे सहकार्य तर केलंच आणि शिवाय कार्यालयाकडून मदत येईपर्यंत तिच्यासोबत थांबून तिला धीरही दिला़ प्रत्येक अडचणीत आलेल्या किंवा एकटय़ा असलेल्या स्त्रीचा गैरफायदा घेतला जातोच असं नाही. समाजात आजही तिला समजून घेतलं जातं, याची पुन्हा एकदा ग्वाही देणारा हा प्रसंग ‘वीरा कॅब’ या कंपनीत महिला टॅक्सीचालक म्हणून काम करणाऱ्या जीता आरेकर यांनी गप्पांच्या ओघात सांगितला़
जीता गेली दीड र्वष ‘वीरा’मध्ये काम करीत आहेत़ घरात पक्षाघाताने बिछान्याला खिळलेला पती आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी असा परिवार आह़े आर्थिक चणचणीत दिवस कंठत असताना ‘वीरा कॅब’ नावाची महिला टॅक्सीचालक पुरविणारी एक संस्था आहे आणि संस्थेला महिला कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, अशी जाहिरात जीता यांच्या मुलीने ऐकली़ बस्स! तेव्हापासून आपल्या आईनेही नोकरी करावी आणि तीही टॅक्सीचालकाचीच, असं मुलीच्या मनाने घेतलं. तसा लकडाच तिने आईकडे लावला़ जन्मात ज्यांनी सायकलही चालवली नव्हती, त्या जीता यांनी शेवटी मुलीच्या हट्टामुळे ‘वीरा मोटर ट्रेनिंग स्कूल’मध्ये नाव नोंदवल़े आज जीता रात्र आणि दिवस अशा दोन्ही वेळांमध्ये पूर्णवेळ टॅक्सीचालक म्हणून काम करतात़ आठ हजार रुपये निश्चित, अधिक किलोमीटरनुसार मिळणारे पैसे, अशी सगळी गोळाबेरीज करून त्यांचे मासिक उत्पन्न १२-१५ हजार रुपयांच्या घरात पोहोचले आह़े त्यामुळे घराच्या ढासळत्या आर्थिक डोलाऱ्याला त्यांनी चांगलाच आधार देऊन तो सावरला आह़े
रात्री-अपरात्री घराबाहेर पडाव्या लागणाऱ्या किंवा तशाच प्रकारची नोकरी करणाऱ्या स्त्रियांना, स्त्रियांच्याच माध्यमातून हक्काची वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा हेतूने ‘वीरा कॅब’ आणि ‘प्रियदर्शनी कॅब’ या दोन संस्था उभ्या राहिल्या़ त्यामुळे रात्रीअपरात्री एकटय़ा-दुकटय़ाने प्रवास करण्यासाठी स्त्री प्रवाशांना सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आह़े सध्या वीरा कॅबकडे २० गाडय़ा आणि २५ महिलाचालक, तर ‘प्रियदर्शनी’ कडेही २० गाडय़ा आणि ३० महिलाचालक आहेत़
‘‘या कामासाठी महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांची मानसिकता तयार करणं हेच सुरुवातीला मोठं आव्हान होतं,’’ ‘वीरा’च्या प्रमुख प्रीती मेनन सांगतात़ रेवती रॉय यांची ‘फॉर शी’ नावाची महिला चालक असणारी टॅक्सी सेवा दिल्ली, बंगळुरू, मुंबईसारख्या महानगरांत काही वर्षांपूर्वी होती़ पुढे ती ढेपाळली़ परंतु, अशा प्रकारची सेवा स्त्रियांसाठी असायलाच हवी़ जेणेकरून महिलांना रोजगारही मिळेल आणि आणि स्त्री प्रवाशांची सोयही होईल, या विचाराने २०११च्या जानेवारी महिन्यात म्हणजे दोनच वर्षांपूर्वी मुंबईला केंद्रस्थानी ठेवून रेवती रॉय यांच्या सहकार्याने प्रीती मेनन यांनी ‘वीरा कॅब’ला सुरुवात केली़ ‘to train women for driving हे ब्रीद घेऊन ‘वीरा’ काम करत़े
उद्देश अर्थात एकच, स्त्रियांना रोजगाराचं एक नवं दालन उघडं करून देणं. पण तरीही त्यांच्या भविष्यकाळाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक स्त्री-कर्मचाऱ्याला विमा योजना, पीएफसारख्या सुविधाही दिल्या आहेत़ पण असं असूनही स्त्रियांना या क्षेत्राकडे वळविण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागत असल्याचं मेनन सांगतात़
प्रीती मेनन यांना असे अनुभव मुळीच नवीन नाहीत़ त्या सांगतात, ‘‘अनेकदा तर मुली पहिल्या दिवशी ड्रायव्हिंग व्हीलला हात लावायलाही घाबरतात़ मला हे जमणारच नाही, अशी त्यांनी स्वत:ची ठाम समजूत करून घेतलेली असत़े त्यामुळे आम्ही आता प्रशिक्षणाची सुरुवात स्टीम्युलेटरने (व्हच्र्युअल प्रशिक्षण) ेकरतो आणि एकदा स्टीम्युलेटरवर हात बसला की, मगच प्रत्यक्षात रस्त्यावर गाडी आणतो़ त्यामुळे आता नव्याने येणाऱ्या स्त्रियांची सुरुवातीची भीती कमी करण्यात आम्ही खूपच यशस्वी झालो आहोत,’’ असं मेनन सांगतात़.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा