आरती अंकलीकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गुरू विजयाबाई जोगळेकर यांच्यानंतर पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडून गाण्याची तालीम घेतली. त्यानंतर किशोरीताई आमोणकरांकडे गाणं शिकावंसं वाटू लागलं. पण पं. कुलकर्णी सरांना कसं सांगायचं? आणि किशोरीताई शिकवायला हो म्हणतील का?.. प्रश्नांचं प्रचंड दडपण आलं. विचारांचा कल्लोळ माजला, आणि..’ सरांचा, पं. वसंतराव कुलकर्णी यांचा क्लास म्हणजे अनेक गायक, वादक, विद्वानांचं एकत्र येण्याचं आवडीचं ठिकाण होतं. सर वक्तशीर असल्यानं सकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ४ ते ९ क्लासमध्येच असत. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे (२२ एप्रिल) मी आई-बाबांबरोबर निघाले होते त्यांना भेटायला, त्यांच्या क्लासवर. धाकधूक होती मनात. सरांना फोन करून सांगितलं होतं, आम्ही येतोय ते. त्यांनाही कल्पना असावी कशासाठी येतोय याची. ते आले. समोरच बसलो. मी सरांना ताईंकडे (किशोरी आमोणकर) शिकायला जाण्याची इच्छा सांगितली. सांगताना माझ्या डोळय़ांतून पाणी वाहू लागलं. सरांची भीती, त्यांना दुखवण्याचं दु:ख, सगळं डोळय़ांत दाटून आलं एकत्र! सरांनी परवानगी दिली. पण मनातले भाव तेदेखील लपवू शकले नाहीत. मी ताईंकडे शिकायचं ठरवलं होतं हे सरांना सांगण्याच्या परीक्षेत जेमतेम पास झाले होते. पण पुढची परीक्षा मोठी होती, ताईंना मला शिकवण्यास राजी करण्याची!

खरंतर याआधीची दोन वर्ष तशी खूप आव्हानात्मक आणि व्यग्रतेत गेली होती माझी. दहावीची परीक्षा, त्यानंतर कॉलेज निवडणं, गाण्याच्या कार्यक्रमासाठी मिळालेल्या वेगवेगळया संधी इत्यादींमध्ये! त्यातल्या काही महत्त्वाच्या सांगायच्या झाल्यास सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी दिलेली संधी आठवतेय. ते लहान मुलांसाठी एका चित्रपटाची निर्मिती करत होते- ‘राजा रानी को चाहीए पसीना’. सुखी माणसाच्या सदऱ्याची गोष्ट. संपूर्ण चित्रपट पद्यामध्ये होता. अनेक गाण्यांची शृंखला. या चित्रपटाचा संगीतकार होता सारंग जसराज- पं. जसराजजींचा मुलगा. यासाठी माझी ऑडिशन झाली, निवड झाली. मी, साधना सरगम, दुर्गा जसराज, रतनमोहन शर्मा, सगळे गायलो त्यात. समृद्ध करणारा अनुभव होता तो. महिनाभर तालीम झाली गाण्यांची शांतारामजींच्या ‘राजकमल’ स्टुडिओमध्ये, परळला. स्वत: शांतरामजी हजर असत तालमींना. पांढरेशुभ्र कपडे, उत्साही-उमदं व्यक्तिमत्त्व. संध्याजीसुद्धा (सुप्रसिद्ध अभिनेत्री) असत तालमींना. शांतारामजी तर रेकॉर्डिगलाही येत. मंगेश देसाई रेकॉर्डिस्ट होते त्या वेळी. नंतर शेकडो चित्रपटांमध्ये त्यांचं नाव रेकॉर्डिस्ट म्हणून वाचल्यावर लक्षात येई, की आपल्याला किती मोठय़ा, अनुभवी व्यक्तीसमोर गाण्याची, शिकण्याची संधी मिळाली. शांतारामजींचा कटाक्ष असे शब्दोच्चार, त्यातील भाव यावर. अनेक गाणी गायले मी त्यात.

त्या सुमारास- म्हणजे साधारण १९७८ चा काळ. ‘नाटय़दर्पण रजनी’ हा मोठा कार्यक्रम होत असे दरवर्षी. रवींद्र नाटय़मंदिरात. एकांकिका, गाणी, नाटय़प्रवेश, मुलाखती असा भरगच्च कार्यक्रम असे. रात्रभर चाले. रात्री ९ ते पहाटेपर्यंत. ‘नाटय़दर्पण’ मासिकाचे प्रकाशक सुधीर दामले हा कार्यक्रम करत. तेही खूप उत्साही. १९७८ च्या कार्यक्रमात त्यांनी मला गायला आमंत्रित केलं. ‘का धरीला परदेस’ हे गीत बसवून घेतलं माझं पं. गोविंदराव पटवर्धन यांनी. गोविंदराव अगदी साधे, मितभाषी, बोटांमध्ये जादू. गाणारी पेटीच जणू! भाव व्यक्त करणारी पेटी.. शब्द पोहोचवणारी पेटी.. ज्या कलाकारांसोबत संगत केली, त्याला गुरू मानतो, असं म्हणत ते. टीपकागद असतो ना तशी संगत करत. गायकाचा प्रत्येक सूर, हरकत, मुरकी, भाव त्यांच्या वादनात उमटत असे. पं. कुमार गंधर्वाच्या मैफलीमध्ये अनेक वेळा ऐकलीय मी त्यांची संगत. जिथे हवं तिथे हुबेहूब स्वरसमूह वाजवत आणि काही वेळा अतिशय भरदार असा केवळ षड्ज पंचमाचा भराव देत असत. अद्भूत संगत. जणू गायकाच्या मनात शिरून, त्याला ओळखून, त्याला हवी तशी संगत करणारे गोविंदराव. त्यांनी मला ‘का धरीला परदेस’ या गाण्यातील काही विलक्षण सुंदर जागा शिकवल्या. मी कधीही न ऐकलेल्या, आधी आणि नंतरदेखील. अचाट बुद्धिमत्ता, वादनकौशल्य आणि संयम यांचा संगम. या ‘नाटय़दर्पण’च्या कार्यक्रमात पं. वसंतराव देशपांडे यांना सन्मानित करण्यात आलं होतं. सत्कारानंतर नाटय़गृहातील पहिल्या रांगेतल्या मधल्या सीटवर बसून ते कार्यक्रम ऐकत होते. आमच्या गाण्यांचा कार्यक्रम सुरू झाला. माझं गाणं संपलं. टाळय़ांचा कडकडाट झाला. गोविंदरावांनी सुरेख बसवून घेतलं होतं गाणं. मी भरपूर रियाझ केला होता. आत्मविश्वासानं, तन्मयतेनं मी ते सादर केलं, कोणत्याही दडपणाशिवाय. योग्य तो परिणाम साधला होता गाण्यानं. श्रोत्यांनी पावती दिली. इकडे पं. वसंतराव आपल्या खुर्चीवरून उठले. त्यांच्या सत्कारावेळी त्यांना घातलेला हार हातात घेऊन ते रंगमंचावर आले. मी लगेच उठून नमस्कार केला. त्यांनी त्यांच्या हातातला हार उत्स्फूर्तपणे माझ्या गळय़ात घातला आणि माझी पाठ थोपटली. कौतुक केलं. अविस्मरणीय क्षण होता तो. इतक्या मोठय़ा कलाकारानं एका लहान कलाकाराचं केलेलं कौतुक त्या कलाकाराला त्याच्या आयुष्यातल्या मेहनतीच्या गाडीसाठी आयुष्यभराचं इंधन देऊन जातं. किती
मोठेपणा त्यांचा!

त्या काळी अनेक मोठे कलावंत इतर कलाकारांच्या कार्यक्रमांना उपस्थित असत. पं. जसराजदेखील अनेक वेळा येत असत होतकरू गायकांच्या कार्यक्रमांना. मनापासून दाद देत असत. प्रोत्साहन देत. वेगळाच काळ होता तो. गुंतागुंतीचा नव्हता. एकमेकांना द्यायला वेळ होता, प्रेम होतं, आत्मीयता होती. मुख्य म्हणजे समाजमाध्यमं नव्हती. क्षणात जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवणारे, वर्तमानातून स्वप्ननगरीत नेणारे फोन नव्हते. जीवनाची विलंबित लय आणि गायनाची विलंबित लय माझ्या आवडीची.

१९७९ मध्ये ‘नाटय़दर्पण रजनी’ मध्ये अभिषेकीबुवा (जितेंद्र अभिषेकी) ‘मत्स्यगंधा ते महानंदा’ कार्यक्रम सादर करणार होते. दामले काकांनी (सुधीर दामले) मला त्यात गाण्यासाठी आमंत्रित केलं. बुवा स्वत:, अजित कडकडे, आशाताई खाडिलकर, राजा काळे आणि मी गाणार होतो कार्यक्रमात. या निमित्तानं बुवांकडे शिकण्याची संधी मला मिळाली. ‘लागी कलेजवा कटार’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘तुझ्या अंगसंगाने काजळले अंग’ यासारखी अनेक नाटय़पदं बुवांनी शिकवली मला. त्या अनुषंगानं येणारे काही राग, बंदिशीदेखील शिकवल्या. एकाहून एक दर्जेदार रचना बुवांच्या. अद्भुत सौंदर्यदृष्टी असलेले सर्जनशील बुवा. मितभाषी, प्रचंड रियाजी. संगीताला जीवन वाहिलेले कलावंत विद्वान. अविरत विद्या मिळवत राहिलेले. उत्तम गुरू. अनेक शिष्यांना स्वत:च्या घरी ठेवून विद्या देऊन त्यांच्या त्यांच्या पायावर उभं केलं बुवांनी. एकदा हा कार्यक्रम पुण्याला होणार होता. (तेव्हाची एक वेगळीच आठवण आठवतेय.. आम्ही सर्व मंडळी सकाळच्या ट्रेननं मुंबईहून पुण्याला निघालो. कर्जत स्टेशन आल्यावर दिवाडकर वडेवाले डब्यासमोर आले. बुवांनी खुणेनंच विचारलं, ‘‘तुम्ही वडा खाणार ना?’’. मी नको म्हटलं. गायचं होतं ना संध्याकाळी! बुवांनी मात्र मला वडा खायला लावला. ‘काही होत नाही. खा आणि उत्तम गा’ म्हणाले.)त्यांनी शिकवलेल्या बंदिशी, त्यातला सौंदर्यपूर्ण विचार अजूनही डोक्यात पक्कं बसलेलं आहे. वेळोवेळी शिकवणारे असे महान गुरू. शिकता शिकता विद्यार्थी स्वत: गुरू होतो. प्रत्येक क्षणही गुरूच!

माझे गुरुजी पं. वसंतराव हे खाँसाहेब खादिम हुसेन खानांकडे शिकत असत तेव्हाची गोष्ट. आग्रा घराण्याचे विद्वान आणि त्यांचे शिष्य यांचा एक ग्रुप होता, ‘सजन मिलाप’. त्यात खाँसाहेब, लताफत हुसेन खाँसाहेब, पं. बबनराव हळदणकर, ललिता राव, माझे गुरुजी वसंतराव कुलकर्णी आणि इतर अनेक आग्रा घराण्यातली मंडळी होती. आम्ही कधी पं. के.जी.गिंडेजी, पं. भटसाहेब यांच्या वल्लभ संगीत विद्यालयात कार्यक्रम ऐकायला जात असू. अशा कार्यक्रमात अतिशय उच्च दर्जाची लयकारी ऐकायला मिळाली. तालाला आपला गुलाम करून त्यांना जेव्हा हवी तेव्हा ‘सम’ हजर होते आहे असं वाटे. अतिशय जटिल लयकारी सहजतेनं, लीलया करत आग्रा घराण्यातील मान्यवर. उत्तम बंदिशी, पेचदार, पल्लेदार. शब्दोच्चारण अतिशय प्रभावी. आवाजाचा लगाव थोडा अनुनासिक, नुकीला प्रभावी. आचंबित करणारं असं गाणं. सरांनी ग्वाल्हेर गायकीचीदेखील तालीम घेतली होती. ग्वाल्हेर आणि आग्रा या दोन्ही घराण्यांची तालीम सरांकडून घेतलेली मी किशोरीताईंकडून जयपूर घराण्याची आणि ‘किशोरीताई घराण्या’ची तालीम घ्यायला सज्ज झाले होते.. विजयाताई, माझ्या प्रथम गुरू, ताईंकडे शिकत होत्या. त्या मला ताईंकडे नेणार होत्या. त्याआधी ताईंबद्दल खूप ऐकलं होतं. त्यांच्या अनेक मैफिली ऐकल्या होत्या. काळजाला भिडणारा त्यांचा स्वर, अचाट बुद्धिमत्ता, चतुरस्र गळा, त्यांच्या गळय़ातील आध्यात्मिकता सगळंच विलक्षण होतं. पण त्यांच्याबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलदेखील अनेक गोष्टी ऐकल्या होत्या उडत उडत. त्याचं दडपण होतं खूप. ताईंनी विजयाताईंना वेळ दिली.
मी, विजयाताई आणि बाबा ताईंच्या वरळीच्या घरी पोहोचलो सकाळी ९ वाजता. ताईंच्या म्युझिक रूममध्ये बसवलं आम्हाला. भोवतालच्या कपाटांमध्ये सुरेख नक्षीकाम असलेले तानपुरे. ताईंची अनेक अवॉर्डस्. आम्ही बसलेल्या सतरंजीवर समोर एक बैठक. त्या बैठकीच्या बाजूला एक सुबक स्वरमंडल. पं. जसराजजींच्या हातात पाहिलं होतं. अर्धा एक तास बसलो होतो बहुधा आम्ही. एवढय़ात पं. वामनराव देशपांडे- पं. सत्यशील देशपांडे दादांचे वडील आले. आम्ही सगळे ताईंची वाट पाहात बसलो होतो. दडपणानं कळस गाठला होता. मनात अनेक प्रश्न होते. ताई काय विचारतील? गायला लावतील का? मी काय गाऊ? गाणं ऐकून काय म्हणतील? नाही झाल्या तयार तर? कल्लोळ! बाहेर भीषण शांतता आणि आत विचारांचा कल्लोळ!
एवढय़ात ताई आल्या. देवळातील गाभाऱ्याचा दरवाजा उघडावा असं वाटलं. साक्षात सरस्वती यावी तसं. पं. वामनरावजी आणि त्यांच्या काही गप्पा झाल्या आणि विजयाताईंनी माझ्याबद्दल ताईंना सांगितलं. ताईंसमोर गाताना मनातले भाव आठवतायत मला माझे, पण काय गायले ते मात्र नाही आठवत. १५-२० मिनिटे गायले. बरी गायली असावे. पं. वामनरावजींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ताईंचा चेहरा वाचता येत नव्हता. गाणं संपल्यावर पं. वामनराव म्हणाले, ‘या मुलीला तू शिकवच’. ताईंनी त्यांना होकार दिला. आणि मला दुसऱ्या दिवशी सकाळी तालमीला यायला सांगितलं. मी सातव्या आस्मानावर होते. स्वर्गात! ज्यांची इतकी वर्ष पूजा केली होती त्या दिसल्या, भेटल्या. माझं गाणं ऐकून मला शिकवायला तयार झाल्या आणि आता रोज, नित्यनियमानं मला तालीम देणार होत्या. कल्लोळ संपला होता. मनात सुरू असलेल्या वादळाचं रूपांतर शांत निर्मळ प्रवाहात झालं होतं. एकाच भेटीत!

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarti anklekar song lessons from vasantrao kulkarni music amy