मागच्या एका रशियाच्या फेरीदरम्यान एक रशियन गृहस्थ रुग्ण म्हणून भेटण्यास आले होते. त्यांना अनेक दिवसांपासून पोटात गोळा आल्यासारखे वाटत असे. अनेक एक्स रे, सोनोग्राफी तथा अन्य तपासण्या त्यांनी केलेल्या होत्या. काहीही ठोस निदान सापडत नव्हते. बरेच आधुनिक तसेच पारंपरिक उपचार झाले होते. रुग्ण अगदी हैराण होते. नाडी परीक्षण केल्यानंतर रुग्णास ‘वातज गुल्म’ असावा असे माझे निदान झाले. कारण वात हा दृष्य नसल्याने तो वरील कोणत्याही तपासण्यांमध्ये दिसत नाही आणि एखाद्या ठिकाणी अवरोध उत्पन्न झाला की, जसे निसर्गात चक्रीवादळ तयार होते तसेच हे वाताचे चक्र पोटात तयार झाले की त्यास वातज गुल्म असे म्हणतात. यामुळे क्वचित तीव्र उदरशूल, पोट गच्च गच्च वाटणे, पोटात सतत काहीतरी गोळा आहे असा भास होणे, शरीरात विविध ठिकाणी (हात, पाय इत्यादी) मुंग्या आल्यासारखे वाटणे, कधी पोटात गुडगुड आवाज तर कधी आध्मान झाल्यासारखे वाटणे, शौच विधीला जाऊनही पोट साफ न झाल्यासारखे वाटणे, फार कुंथावे लागणे अशी अनेक प्रकारची लक्षणे या आजारात दिसतात. गावाकडे अजूनही काही लोक यास वाट सरकणे, नळ फुगणे, पोटात गुबारा धरणे अथवा गोळा येणे अशा वेगवेगळ्या नावाने संबोधतात. मग काही लोक दोन्ही पायाचे अंगठे बांधून ठेवतात. काही पोटाला एरंडेल तेल चोळतात तर काही जो जे सांगेल ते सर्व करून बघतात. आमचे आजोबा त्या काळी गावात असे नळ फुगलेले, पोटात गोळा आलेले रुग्ण आले की आम्हाला लगेच एका वाटीत तांदूळ घेऊन यायला सांगायचे. मग देव्हाऱ्याजवळ जाऊन पूजेचा तांब्या, कापूर व काडेपेटी घेऊन यायला सांगायचे. आम्ही सगळे आता काय जादूचा प्रयोग होणार असे म्हणून बघायला तिथे जमायचो. आम्हाला यातील छोटी मोठी मदतीची कामे सांगितली जायची. तेव्हा या सर्व गोष्टींचे जणू नवलच वाटायचे. पण रोजचंच असल्याने याची सवय झाली होती. मग रुग्णाला पाठीवर झोपायला सांगून त्याच्या पोटावर नाभी प्रदेशी भरलेल्या तांदळाची वाटी ठेवून त्यात कापराच्या दोन तीन गड्डय़ा टाकायचे व काडेपेटीने पेटवायचे. मग हळूच तांब्या त्यावर उपडा ठेवून दाबून धरायचे. मग तांब्या अगदी घट्ट बसायचा काही केल्या निघायचा नाही. आम्हाला याची फार गम्मत वाटायची. मग ते हळुवार त्या तांब्याला वेगवेगळ्या दिशेत फिरवायचे व एका बाजूला बोट ठेवून हळूच तांब्या काढून घ्यायचे. असे दोन-तीन वेळा झाले की, रुग्ण एकदम बरा व्हायचा. त्याला आजोबांनी काही घरगुती औषधे व पथ्य सांगितलेली असायची. रुग्ण पुढच्या वेळी त्यांच्या पायाच पडायचा. मला हे सगळं चांगलंच जमत होतं म्हणून त्या रशियन रुग्णाससुद्धा आम्ही त्यांची व तेथील डॉक्टरांची संमती घेऊन हा प्रयोग केला. गंमत म्हणजे कोठेही बरा न झालेला रुग्ण या प्रयोगाने बरा झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा