पूर्वीच्या काळी लोक अनवाणी पायांनी रानावनात फिरायचे, त्यामुळे पायात काटा मोडणे हे जणू नेहमीचेच असायचे. माझे बालपणसुद्धा खेडेगावात गेले. कित्येकदा पायात काटे मोडले, कुरूप झाले तरी कधी कोणत्या दवाखान्यात जायची वेळ नाही पडली किंवा कधी साधी corn cap सुद्धा नाही वापरली. आमची आज्जी पायात काटा मोडल्यास बाभळीचा पाला आणून तव्यावर परतून पायाला बांधून ठेवायची, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आराम मिळायचा. कुरूप झाले की त्यावर गुळाचा चटका द्यायची किंवा खापराच्या तुकडय़ाने चटका द्यायची. ते कायमचे बरे व्हायचे. कुरूप यालाच आयुर्वेदात ‘कदर’ असे म्हणतात. तसे पाहायला हा एक क्षुद्र रोग असला तरी कित्येक जणांना याने अगदी हैराण केले आहे. काहींनी तर यापासून सुटका मिळविण्यासाठी शस्त्रक्रियासुद्धा केल्या आहेत. दहा दिवस ते महिना महिना विश्रांती घेतली आहे. तरीपण याच्या त्रासापासून अनेकांची सुटका झाली नाही. आजकाल लोकांच्या पायात काटा मोडत नाही, पण कुरूप मात्र काही जणांना होते. कारण आजकाल सतत शूज-सॉक्समध्ये सुरक्षित असणाऱ्या पायांत नकळत कधी देवदर्शनाला जातानासुद्धा हळूच एखादा बारीक खडा रुततो व तो हळूहळू कुरूप तयार करतो. खरं तर कुरूप ही आपल्या शरीराने तो खडा अजून आत जाऊ नये म्हणून त्याभोवती निर्माण केलेल्या जाड पेशीचा थरच असतो. मात्र त्यांची वाढ अधिक होऊ लागली की, मग त्या वेदना देऊ लागतात. बाजारात मिळणारे Salicylic Acid किंवा कॉर्न कॅपच्या पट्टीने ते फक्त अजून नरम पडते व हळूहळू जळू लागते. छोटे कुरूप असल्यास बऱ्याचदा याने बरे होतेही, मात्र ज्यांना जास्त कुरुप आहेत त्यांचे काही केल्या या उपचारांनी बरे होत नाही. त्यासाठी पोटातून औषधेपण घ्यावी लागतात. कारण काहीवेळा कुरूप हे शरीरातील मांस धातूच्या विकृतीमुळेसुद्धा होते. त्यामुळे बऱ्याचदा ते होण्यामागील कारण शोधून चिकित्सा द्यावी लागते. आमच्याकडे अनेक कुरूप झालेले रुग्ण येतात. त्यांना आम्ही गूळ, खापराच्या चटक्याबरोबरच आयुर्वेद शास्त्रोक्त अग्निकर्म चिकित्साही करतो. यामध्ये सुवर्ण, ताम्र, लोह अथवा पंचधातूच्या शलाका वापरल्या जातात. अग्निकर्माने कुरूप झालेली जागा जळून जाते. एक-दोन वेळा अग्निकर्म केल्यास कुरूप कायमचे बरे होते. अग्निकर्म केल्यावर अवघ्या दोन मिनिटांत रुग्ण स्वत:च्या पायांवर चालू शकतो. पाच मिनिटांत हमखास व कायमस्वरूपी कुरूपापासून मुक्ती देणारी ही चिकित्सासुद्धा काळाच्या ओघात लोप पावू लागली आहे. लक्षात ठेवा आजकाल शरीरातील विकृत पेशी जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्वाट्री, रेडीएशन या चिकित्सेच्या मागील तत्त्वेसुद्धा हीच आहेत. फक्त काळानुसार साधने बदलली. म्हणून तर आपल्या समृद्ध परंपरेतील अशा काही अघोरी वाटणाऱ्या व लोप पावू लागलेल्या चिकित्सा पद्धतीतील शास्त्र आपण प्रथम समजून घ्यायला हवे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा