मागच्या एका रशियाच्या फेरीदरम्यान मला एक वेगळाच अनुभव आला. त्या फेरीत बरेच रुग्ण एका विशिष्ट प्रकारच्या आजाराने ग्रस्त होते. गंमत म्हणजे त्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण मानसोपचारतज्ज्ञाची चिकित्सा घेत होते. आयुर्वेदात या आजाराबद्दलचे मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी एक डॉक्टरच त्यांना माझ्याकडे घेऊन आले होते. रुग्णाला सतत आपले पोट साफ झाले नाही असेच वाटत असे. काहीही खाल्ले तरी तो रुग्ण मलविसर्जन करण्यास जात असे, कोणतेही महत्त्वाचे काम असेल, शाळा, ऑफिस किंवा एखाद्या मीटिंगला जायचे असेल तरी रुग्ण मलविसर्जन केल्याशिवाय बाहेर जात नसे. एवढेच नव्हे तर त्या रुग्णाच्या बायकोची तक्रार अशी मजेशीर होती होती की ती म्हणे, हे सगळे कपडे वगैरे घालून रोज तयार होतात आणि पुन्हा प्रेशर आले आहे असे सांगून परत त्यांचा तोच उद्योग सुरू होतो. असे एखाद्या दिवशी नाही तर रोजचेच नाटक आहे यांचे आणि गेले की अध्र्या अध्र्या तासाशिवाय काही परत येत नाहीत.
ऑफिसमधून आले की पहिले कामसुद्धा हेच असते आणि ज्या दिवशी घरी असतात त्या दिवशी तर विचारूच नका सतत थोडय़ा थोडय़ा वेळाने उगीच टॉयलेटला जात असतात. बायको आणि डॉक्टरांच्या मते तर ते पक्के मानसिक रुग्ण होते आणि म्हणून त्यांनी ‘इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम’ असे निदान करून मनोरुग्णाची औषधेही चालू केली होती. मात्र त्यानेही फारसा फरक पडला नव्हता व रुग्ण या औषधांमुळे फ्रेश राहत नसे, सतत एखाद्या गुंगीत असल्यासारखा किंवा झोप लागल्यासारखा राहत असल्याने वेगळे काही आयुर्वेदात करता येईल का हे पाहण्यासाठी ते त्याला माझ्याकडे घेऊन आले होते. मग मी रुग्णाच्या सुद्धा काही तक्रारी ऐकून घेतल्या. त्याच्या मते त्यांना सतत पोटात काही तरी मळ शिल्लक राहिला आहे असे वाटते. सतत एखादा पोटाचा मोठा आजार झाला आहे की काय अशी भीती वाटते, कधी मूळव्याध होण्याची भीती वाटते तर कधी कर्करोग होण्याची. सतत पोटात गडगड असे आवाज होतात. कधी भूक लागते, कधी लागत नाही. कधी जळजळ होते तर कधी बारीक पोटात दुखत असते. कधी छान पोट साफ होते तर कधी होत नाही, कधी घट्ट होते तर कधी पातळ होते. आपण काही मोठे काम करू शकू की नाही यामुळे याची सतत भीती वाटते. कामात व्यत्यय येऊ नये म्हणून पोट साफ झाल्याशिवाय बाहेरच जात नाही किंवा महत्त्वाच्या कामाला जायचे झालेच तर एकदा जाऊनच येतो. डोके सतत पोटाचाच विचार करीत असते. कितीही आपण लक्ष द्यायचे नाही असे ठरवले तरी एक हात डोक्यावर आणि एक हात पोटावरच असतो. वैताग आलाय आता.
सगळे म्हणतात की, हे मानसिक आहे म्हणून पण मला नाही वाटत डॉक्टर तसे. तसे असते तर मी सांगितले असते. पण खरंच मला पोटाचा त्रास होतो हो, मी उगीच कशाला एवढा वेळ शौचालयात घालवू? पण हे कोणी समजूनच घेत नाहीत. त्यांना वाटतं हे नेहमीचंच आहे. आता तुम्हीच बघा नक्की काय झालंय ते.
मला आपल्या देशातही असे अनेक रुग्ण पाहायची सवयच होती. त्यामुळे माझे निदान रुग्णपरीक्षण केल्या केल्या लगेच झाले होते. या आजाराला आयुर्वेदात ‘ग्रहणी’ असे म्हणतात. खरं तर ग्रहणी हा आपल्या शरीराचा पचनसंस्थेचा एक महत्त्वाचा अवयव आहे. यात अन्नाचे ग्रहण करणे, पाचन करणे, विवेचन करणे आणि चांगला भाग व मल भाग वेगळा करणे असे कार्य केले जाते. याच्या कार्यात बिघाड झाल्यास रुग्णाला वर सांगितलेली सर्व लक्षणे दिसतात आणि त्या आजारालाही त्याच अवयवाचे नाव म्हणजे ‘ग्रहणी’ असे दिले जाते. आयुर्वेदात आजारांच्या नामकरणाची अशीही एक पद्धत आहे. उदाहरणार्थ ‘उदर’. या आजारात उदरात म्हणजे पोटात पाणी साठले की, त्यालाही फक्त ‘उदर’ असेच म्हणतात. अगदी तसेच. असो. हा मानसिक आजार नसताना कित्येक रुग्णांचे निदान नीट न झाल्याने ते विनाकारण मनोरुग्ण बनतात. यांना फक्त २१ दिवस आहारात ताकाचा प्रयोग केल्यास किंवा वैद्याच्या सल्ल्यानुसार औषधी व आहार सेवन केल्यास त्यांची या त्रासापासून कायमची मुक्तता होते. फक्त मुगाची भाजी आणि भाकरी किंवा फक्त तूपसाखर २१ दिवस खायला घालूनसुद्धा आमची आज्जी हा आजार बरा करत असे. लक्षात ठेवा ती नेहमी म्हणत असे की, ‘ज्या घरातील ‘गृहिणी’ चांगली ते घर चांगले आणि ज्या शरीरातील ‘ग्रहणी’ चांगली ते शरीर चांगले.’ यावरूनच आपल्याला या अवयवाचे आणि आजाराचेही महत्त्व लगेच समजून जाते.
वैद्य हरीश पाटणकर –harishpatankar@yahoo.co.in