आजपर्यंत ‘आयुर्वेदाच्या स्मृतीतून’ या लेखमालेत आपण अनेक शारीरिक व्याधी आणि आज्जीबाईच्या बटव्यातील घरगुती औषधे पहिली. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या आरोग्याबाबतचे समज-गैरसमजसुद्धा पाहिले. पण या समारोपाच्या दोन भागांमध्ये आपण आपल्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा एका विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या शरीरात शारीरिक आणि मानसिक अशा दोन प्रकारचे आजार होत असतात. पैकी आजकाल माणसाला होणारे सत्तर टक्के आजार हे मानसिकच आहेत अशी एक मानसिकता वैद्यकीय क्षेत्रात उदयास येऊ लागली आहे. एवढेच नव्हे तर रेकी, संमोहन, हिप्नोटिझम, ब्रह्मविद्या, मानसोपचार, विपश्यना, निसर्गोपचार, योगोपचार असे सगळेच मनाची मानसिकता बदलणारे उपचारसुद्धा वेगाने पुढे येत आहेत. त्यातच भर म्हणून की काय, पण माणूस आज कितीही प्रगत झाला तरी जेव्हा वैद्यकीय क्षेत्रालाही त्याच्या आजाराचे निदान करता येत नाही तेव्हा त्यास तो एक तर ‘मानसिक’ आजार समजतो किंवा बा एखाद्या गोष्टीवर त्या आजाराचे खापर फोडून बुवा, भोंदू बाबा यांच्या आहारी जाऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालून नको ते उपचार करीत बसतो. मग प्रश्न पडतो की नक्की हे ‘मन’ म्हणजे आहे तरी काय? मन, आत्मा हे विषय आयुर्वेदीय परिभाषेत मांडले की लोकांना ते पटत नाहीत, मात्र हेच विषय माइंड किंवा सायकॉलॉजी या अनुषंगाने मांडले की लगेच पटतात हीसुद्धा लोकांची एक मानसिकताच म्हणावी लागेल. प्रत्येक साधू-संतसुद्धा ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’ असे सांगून गेले. आयुर्वेदातसुद्धा याच अर्थाचा एक श्लोक सांगितला आहे. ‘मन एव शरीरिणाम कारणं बंध मोक्षयो:’ म्हणजे आपले मनच आपल्याला एखाद्या बंधनात ठेवायचे की मुक्त करायचे, हे ठरवत असते. ‘विचार बदला, नशीब बदलेल’ असे तर जवळपास प्रत्येक जणच सांगत असतो. पण नक्की काय बदलायचे तेच लोकांच्या लक्षात येत नाही. जसे शरीराचे व्यायाम करून शारीरिक बल आपण वाढवतो तसेच मनाचे व्यायाम करून आपल्याला आपले मानसिक बलही वाढवायचे असते हे जणू आता आपण विसरून चाललो आहोत. पूर्वीच्या काळी आपण कोणालाही ‘काय चालू आहे?’ असा प्रश्न विचारला की तो ‘काही नाही, निवांत’ असे उत्तरसुद्धा अगदी निवांत देत असे. हेच आजकाल ‘फार बिझी’ असे मिळते. आजकाल शाळा-महाविद्यालये, घर, ऑफिस, व्यवसाय हे सगळेच जणू यांत्रिक होत चालले आहे. संवाद कमी होत आहेत. फेसबुकवर हजारो मित्र असूनसुद्धा मन मोकळे करायला एकही हक्काचा जवळचा मित्र नसणे हे दु:ख माणसाच्या मनाला जास्त त्रास देत आहेत. मग कोणतीही गोष्ट साठून राहू लागली की त्याची व्याधी होते असे आयुर्वेदाचे मत आहे. ‘यत्र संग: ख वैगुण्यात व्याधी तत्र उपजायते’ म्हणूनच मन बिघडू लागले की शरीरपण बिघडू लागते. आपल्याला राग आला की पित्त वाढते. ताण घेतला की वात वाढतो. फार आळशी राहू लागलो की कफ वाढायला लागतो. याप्रमाणेच आपल्या मानसिकतेच्या प्रत्येक प्रकारावर तो तो शारीरिक दोष बिघडू लागतो व आपल्याला आजार निर्माण करतो. आजकाल सर्वानाच स्ट्रेसमुळे होणाऱ्या रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात अशा आजारांबद्दल कल्पना आहेच. मात्र आधुनिक संशोधनानुसार स्त्रियांना होणाऱ्या स्तनाच्या, गर्भाशयाच्या कर्करोगाचे सत्तर टक्के वेळा कारणसुद्धा मानसिकताच आहे हे सिद्ध झाले आहे. आपल्या पचनसंस्थेच्या निम्म्यापेक्षा जास्त आजारांचे कारण हेही मनच असते. आपल्या शरीरातून स्रवणाऱ्या अनेक स्रावांचे प्रमाणसुद्धा आपल्या मानसिकतेवरच अवलंबून असते. हे स्राव म्हणजेच आपला मेंदू, थायरॉईड, यकृत, आमाशय, गर्भाशय अशा ठिकाणातून स्रवणारे हार्मोन्स. लक्षात ठेवा, मनाचे संतुलन बिघडू लागले की या हार्मोन्सचे संतुलनही बिघडू लागते आणि माणसाला नको असलेले अनेक आजार मागे लागतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा