साधारण चाळिशीच्या स्त्री-रुग्ण चिकित्सालयात आल्या होत्या. आकाशात ढग जमा झाले, पावसाळ्याचे वातावरण सुरू झाले की, यांचा सांधेदुखीचा त्रास लगेच वाढतो. असे बऱ्याच जणांचे होत असते. मात्र नेमकं याच काळात ही सांधेदुखी का होते हे मात्र यांना काही केल्या कळत नव्हते. वेदनाशामकच्या गोळ्या खाऊन तात्पुरते बरे वाटते. मात्र सतत वेदनाशामक गोळ्या खाल्ल्या की पित्त वाढते, पोट बिघडते, भविष्यकाळात किडनीच्या, पित्ताशयाच्या खडय़ाच्या विकारांना सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टींना आता त्या कंटाळल्या होत्या. काही तरी कायमस्वरूपी उपाय सांगा म्हणत होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मलाच हा त्रास का होतोय ते सांगा म्हणाल्या. वातावरणाच्या बदलाचा, माझ्या वयाचा, वाताचा आणि या दुखण्याचा काय संबंध हे त्यांना जाणून घ्यायचे होते. झोप झाली नाही, मानसिक ताण जाणवला, मुलांची काळजी वाटू लागली तरी यांचे दुखणे वाढत असे.
या सर्वाच्या मागचे कारण मात्र काही केल्या त्यांना समजत नव्हते. मी त्यांना सहज सोप्या भाषेत काय सांगता येईल याचा विचार करत होतो. कारण लोकांना आयुर्वेदातला ‘वात’ म्हणजे फक्त ‘गॅस’ एवढेच वाटते. सर्व तपासण्यांचे रिपोर्ट घेऊन मोठय़ा डॉक्टरकडे गेल्या तरी ते रिपोर्ट नॉर्मल असल्याने वातामुळे सांधे दुखत आहेत असे ते सांगतात. पण म्हणजे नक्की काय हे काही बऱ्याच जणांना कळत नाही. वातावरणातला ‘वात’, वाढलेल्या उतार वयातला ‘वात’, सांधेदुखीताला ‘वात’, वातूळ पदार्थामधला ‘वात’, रात्रीच्या जागरणाने वाढणारा ‘वात’ आणि भय, चिंता, काळजी यामुळे जसा रक्तदाब वाढतो तसाच वाढणारा ‘वात’ हे सर्व ऐकायला जरी वेगवेगळे ‘वात’ वाटत असले. तरी रुग्णाचा कोणता ‘वात’ वाढला आहे हे शोधून त्याला योग्य चिकित्सा देणे हे डॉक्टरला मात्र जरूर ‘वात’ आणणारे आहे आणि हे नाही समजले तर रुग्णाची ‘वाट’ लागणार आहे.
आहारीय व विहारीय घटकांचा या वातावर परिणाम होत असतो. जसे की हरभरा, आइस्क्रीम यांना कॅलरी, फॅट, प्रोटीन या भाषेत पाहणे हे एक शास्त्र आहे व याच घटकांना हरभऱ्याने वात वाढतो, आइस्क्रीममुळे कफ वाढतो या भाषेत पाहणे हे एक शास्त्र आहे. दोन्ही शास्त्रे आपापल्या जागी बरोबर आहेत. मग हा ‘वात’ म्हणजे नक्की काय हेच प्रथम आपण जाणून घेऊ. आयुर्वेदात ‘शूलं नास्ति विना वातात.’ असे सूत्र आले आहे. म्हणजे कोणतेही दुखणे वाताशिवाय असू शकत नाही आणि हलक्या हाताने दाबले तरी माणसाचे अंग दुखणे, डोके दुखणे, सांधे दुखणे थांबते. म्हणजे आपण दिलेल्या बाहेरील दाबाचा (प्रेशर) आणि आतील दाबाचा काही तरी संबंध असला पाहिजे. तर सोप्या भाषेत वाढलेला ‘वात’ म्हणजे तुमच्या शरीरावर आलेला अनावश्यक ‘ताण’ होय. मग आपल्या लक्षात येईल की, आपण किती वेळा अनावश्यक ताण घेत असतो आणि त्यामुळे आपला वात वाढत असतो. अगदी सकाळी उठण्याचासुद्धा आपल्याला ताण जाणवतो. मग प्रेशर देऊन मलविसर्जन करतो, हवेचे बदललेला दाबसुद्धा आपल्या शरीरातील वात वाढवायला कारणीभूत ठरते त्यामुळे दुखणे वाढते. म्हणून वेदनाशामक गाोळ्या घेऊन हे दुखणे मेंदूला कळविणे थांबवू नका. ज्यामुळे दुखणे आहे असा वात प्रथम कमी करा. यासाठी वातूळ पदार्थ जसे की पोहे, हरभरा डाळीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, बेकरी पदार्थ खाण्याचे टाळा.
पावसाळ्यात शरीराला तेलाची गरज असते म्हणून आहारात नियमित तेल-तुपाचे प्रमाण वाढवा आणि सर्वात सुंदर उपाय म्हणजे अंगाला नियमित तेल चोळणे अथवा एखाद्या वैद्याकडे जाऊन शास्त्रोक्त पंचकर्म करणे हा होय. यातील ‘बस्ती’ ही चिकित्सा वातासाठी श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आहे. पावसाळा हा पंचकार्मातील बस्ती करण्यासाठी सर्वात योग्य काळ. कारण याच काळात वाताचे आजार वाढत असतात. स्नेहन, स्वेदन व बस्ती आपल्या शरीरातील वाढलेला ‘वात’ कमी करतात, यामुळे अनावश्यक ताण कमी होतो व दुखणे बरे होते. दररोज स्नेहनाच्या निमित्ताने वाटीभर अंगात जिरलेले तेल हळूहळू वाताचे शमन करते. बस्तीमुळे वाताबरोबरच शरीराचीही शुद्धी होते. आपण मात्र काही तपासणी करायची असेल की लगेच तयार होतो. एक्स रे, सिटी स्कॅन इत्यादीमध्ये न दिसणारा ‘वात’ शोधतो पण त्या शरीरासाठी तो वात कमी करण्यासाठी काही करत नाही. मग ‘इथेच आहे पण दिसत नाही’ असा वात सर्वाना ‘वात’ आणतो.

वैद्य हरीश पाटणकर
harishpatankar@yahoo.co.in

Story img Loader