उद्या ‘वटपौर्णिमा’ भारतातील अनेक स्त्रिया हा सण अगदी मनात कोणतीही शंका येऊ न देता विधीपूर्वक व भक्तिभावाने साजरा करतील. काही फक्त करायचा म्हणून करतील त्यात त्यांची भक्ती असेलच असे नाही. तर काही अगदी फांदीला किंवा मोबाइलला धागा बांधून फेरे घेऊन हा पूर्ण करतील. काही आता हे मागासलेले बुरसटलेले विचार नकोत असे समजून हा सणच साजरा करणार नाहीत. प्रत्येकाचा विचार अथवा या मागील भावना काहीही असो पण वडाचे झाड हे आयुर्वेदिक वनौषधी आहे. मग त्या निमित्ताने याची महती जाणून घेणे मला जास्त योग्य वाटत आहे. आजीबाईच्या बटव्यातही याला फार महत्त्वाचे स्थान आहे. गरज आहे ती फक्त शास्त्र आणि संस्कृती यांची एक तर वैचारिक सांगड घालण्याची किंवा शास्त्राला शास्त्राच्या ठिकाणी ठेवून व संस्कृतीला संस्कृतीच्या ठिकाणी ठेवून समजून घेण्याची. वडाची झाडे कित्येक वर्षे टिकतात म्हणून त्यास ‘अक्षय्यवट’ असेही म्हणतात. ज्याच्याकडे जे आहे तो तेच देऊ शकतो हा निसर्गाचा साधा नियम आहे. म्हणून ज्याप्रमाणे आपण ‘आरोग्यमं भास्करात इच्छेत’ असे म्हणत सूर्याकडून आरोग्याची इच्छा करतो तसेच वडाच्या झाडाकडून आपण दीर्घायुष्याची, अक्षय्य-अखंड अशा आयुष्याची इच्छा करू शकतो. ज्याप्रमाणे ही इच्छा आपल्या प्रिय पतीदेवासाठी केली जाते त्याचप्रमाणे त्याची पूजा करताना आपल्या आरोग्यालाही त्याचे फळ मिळत असते. वडाच्या पारंब्या या केसांसारख्या पसरतात. त्यामुळे ज्या स्त्रियांचे केस गळत असतात त्यांनी या पारंब्यांपासून सिद्ध केलेले तेल लावल्यास त्यांचे केसही वटजटाप्रमाणे दाट व घन बनतात. पारंब्यांच्या टोकाला ज्या कोवळ्या पारंब्या येतात त्यांचा बारीक वाटून लेप केल्यास ज्या स्त्रियांमध्ये स्तन शैथिल्य आलेले असते ते शैथिल्य जाऊन स्तनांचा आकार सुधारतो. तसेच याच कोवळ्या पारंब्यांपासून खोबरेल तेलात सिद्ध केलेले तेल हे पायांना चोळून लावल्यास ज्या लहान मुलांना व स्त्रियांना रात्री पायांमध्ये गोळे येतात व पाय दुखतात त्यांना तात्काळ उपशय मिळतो. अंगावरून पांढरे जाणे, अधिक प्रमाणात पाळीच्या काळात रक्तस्राव होणे या विकारांवर अनेक वैद्य उक्तीपूर्वक याच्या सालीच्या काढय़ाचा उत्तर बस्ती देतात. एवढेच काय पण आजकाल ज्या आयुर्वेदातल्या ‘पुसंवन’ विधीबद्दल बरीच चर्चा केली जाते, त्यातील प्रमुख औषध म्हणजे हेच ते ‘वटश्रुंग’ वापरले जातात. पण याचा महत्त्वाचा उपयोग पाहिल्यास तो तंदुरुस्त अपत्यप्राप्तीसाठी सांगितला आहे. यावरून तुम्हाला वडाच्या झाडाची महती पटली असेल. एवढेच काय पण इतर औषधांबरोबर उक्तीपूर्वक याचा वापर हृद्रोग, वृक्काविकार, यकृताचे विकार तसेच आमवात, सांध्यांचे विकार इत्यादी जीर्ण आजारांवर केला जातो. पूर्वीच्या काळी आमची आजी घरात कोणालाही कसलीही जखम झाली, काही लागले की लगेच वडाच्या झाडाची साल आणून ती तव्यावर भाजून नंतर बारीक करून त्याची ‘मषी’ तयार करायची व ही मषी तेलात खलून जखमेवर लावली जायची. दोन-तीन दिवसांतच ती जखम खपली धरून लगेच बरी होत असे. आजकाल असे उपचारही हद्दपार झाले आहेत. ज्याप्रमाणे एखादा सण साजरा का करायचा त्याची जर शास्त्रोक्त माहिती समाजापर्यंत पोहोचत नसेल तर हळूहळू त्या सणातील शास्त्रीयत्व कमी होत जाते व तो सण साजरा करण्याचे प्रमाणही कमी होत जाते. तसेच आपल्या अवतीभवती असणाऱ्या व आपणास विपुल सावली, दीर्घायुष्य व आरोग्य देणाऱ्या या वृक्षांबद्दल शास्त्रीय माहिती व उपयोग समाजाला न समजल्यास ते त्यांना कापून टाकतील व पर्यायाने सहज उपलब्ध होणारी औषधी वनस्पतीसुद्धा हळूहळू ऱ्हास पावतील. कदाचित हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांचे जतन व्हावे या उद्देशाने ‘वटपौर्णिमा’ आली असेल. चला तर मग आपणही या निमित्ताने एक संकल्प करू यात की, ज्या ज्या आपल्या पारंपरिक सणांमध्ये अशा प्रकारे झाडांचा संबंध आला असेल त्यांची प्रथम आयुर्वेदोक्त शास्त्रीय माहिती जाणून घेऊ या, ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू या आणि पर्यायाने वृक्षांचेही जतन करू या.
वैद्य हरीश पाटणकर
harishpatankar@yahoo.co.in