लहानपणी आमचा एक ठरलेला उपक्रम असायचा. उन्हाळ्याच्या सुट्टय़ा लागल्या की आम्ही रानोमाळात, नदीच्या किनारी ‘मधाची पोळी’ शोधत फिरायचो. वेगवेगळ्या युक्त्या वापरून आम्ही मध गोळा करायचो. आमचा डोळा मधावर असायचा तर आमच्या आजीचा डोळा त्या शिल्लक राहिलेल्या मधाच्या पोळ्यावर. आमची आजी आम्हाला ते मधाचे पोळे बिलकूल टाकू द्यायची नाही. आम्हालासुद्धा ते पोळे टाकून देण्यापेक्षा आजीला दिलेले फायद्यात पडायचे, कारण आजी लगेच त्या बदल्यात काही तरी खायला द्यायची. पण आजी याचे काय करणार हा कुतूहलाचा विषय असायचा. तेव्हा लहान वय असल्याने याचे फार महत्त्व जाणवत नव्हते, मात्र आता मधापेक्षा पोळ्याचेच महत्त्व जास्त जाणवू लागले आहे. कारण आजी त्या पोळ्याला कढत ठेवायची आणि त्यापासून मेण तयार करायची. हे मेण ती कपाळाला कुंकू लावण्यापूर्वी ते छान चिटकून राहावे म्हणून लावायची. तसेच घरात कोणाचे ओठ फुटले असतील तर त्यावर रोज रात्री झोपताना लावायची. फुटलेले ओठ लगेच मुलायम होत असत. एवढेच काय पण कोणाच्या पायाच्या टाचांच्या भेगांवर हेच मेण पातळ करून सलग सात दिवस लावले की या भेगांपासून लगेच मुक्ती मिळत असे.
आजकाल कितीही महागडी औषधे व क्रीम यासाठी पायांना लावल्या तरी या पायाच्या भेगा काही जात नाहीत. शुद्ध मेण बाजारात विकत मिळत नाही, ते बनवावेच लागते. म्हणजे पाहा किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. मात्र काही रुग्णांच्या पायाच्या भेगा या मेणानेसुद्धा जात नाहीत. अशा वेळी आपल्याला कारण शोधावे लागते.
माझ्याकडे एक ३० वर्षीय आय. टी. सॉफ्टवेअरतज्ज्ञ तरुणी आली. तिच्या पायांना फार भेगा पडत. काही केल्या त्या कमी होत नव्हत्या. अनेक उपचार झाले होते पण फायदा होत नव्हता, असे का होत आहे याचे निदान मात्र होत नव्हते. आहार पण चांगला होता. मग मी एकूणच तिची सगळी दिनचर्या पाहून झाल्यावर तिला शेवटचा घाम कधी आला होता? असा खोचक प्रश्न विचारला आणि ती चक्क आठवतच बसली. कारण जाता येता ए.सी. असणारी चार चाकी, घरी ए.सी., ऑफिसमध्ये ए.सी. अशा पूर्ण वातानुकूलित वातावरणात तिला कित्येक महिने घाम आलेलाच आठवत नव्हता. सध्या शांत जेवायलाही वेळ नसल्याने ती व्यायाम अथवा जिमलासुद्धा जात नव्हती. माझ्याकडे असे निदान सापडणारे अनेक रुग्ण होते, त्यामुळे माझे निदान पटकन झाले.
त्यांना सर्वप्रथम अनावश्यक ए.सी. बंद करायला सांगितला. ए.सी.मुळे शरीरातील घर्मरंध्रे बंद होतात व शरीरातील पाणी स्वेदावाटे बाहेर न गेल्याने त्वचेची रूक्षता अधिकच वाढते. मग या रूक्षतेमुळे पायांच्या भेगादेखील वाढतात. म्हणून यावर सोपा उपाय म्हणजे दिवसातून एकदा तरी दरदरून घाम आला पाहिजे असे व्यायाम अथवा एखादे काम करणे. तसेच सायंकाळी चार-पाच लिटर मिठाचे कोमट पाणी करून त्यात १५ मिनिटं दोन्ही पाय भिजत ठेवावेत. मग स्वच्छ पुसून घेऊन त्यावर आमसुलाचे तेल, राळेचं मलम अथवा घरातील देशी गायीचे शुद्ध तूप काशाच्या वाटीने घासून लावावे. या पायांच्या भेगांमध्ये कधी कधी चिखल्या नावाचा आजारपण दडलेला असतो. तो पाण्याच्या सहवासात जास्त काम केल्याने होतो. त्यासाठी वैद्याच्या सल्ल्याने निदान करून ‘व्रणरोपक तेल’ रोज रात्री लावावे. याने चिखल्या बऱ्या होतात. काही जणांना ‘प्लांटर सोरीअसीस’मुळे पायांना भेगा पडतात. या मध्ये तळव्यांना खाज जास्त सुटते, खपल्या निघू लागतात, रूक्षता वाढते, लाली वाढते, क्वचित रक्तस्रावही होतो. अशा वेळी करंज तेल पायांना चोळून लावावे व कण्हेरीची १० पाने तोडून आणून त्यांच्या वाफेने शेकावे.
या सोप्या व घरगुती उपचारानेही पायांच्या भेगा बऱ्या होतात. आपल्या भेगा नक्की कशामुळे आहेत याचे मात्र निदान करून उपचार केल्यास आजीबाईच्या बटव्यातच पायांच्या भेगा बऱ्या होतात.
– वैद्य हरीश पाटणकर