पूर्वीच्या काळी एक आख्यायिका ऐकायला मिळायची. एका राजकुमारीला अचानक ताप येतो. तिचे अंग जणू तापाने फणफणू लागते. राजकुमारी फार गळून जाते. तिचे सर्व अंग दुखत असते. राजा सर्व उपचार करून पाहतो, पण काही फरक पडायचे नाव नाही. शेवटी हा ताप तिला कशामुळे आला हे शोधायचे ठरते. ताप का आला हे कारण सापडले तर योग्य तो उपचार करता येईल व राजकुमारीला लवकर बरे करता येईल म्हणून राजा दवंडी पिटवतो व कारण शोधणाऱ्यास भरघोस बक्षीस जाहीर करतो. प्रजेतील सर्व हुशार मंडळी कारण शोधण्याच्या पाठीमागे लागतात. त्यात एका शास्त्रज्ञाला राजकुमारीच्या महालाच्या पाठीमागे एक पाण्याचे डबके साठलेले आढळते. तो त्या डबक्याच्या वर कोणत्या प्रकारच्या डासांची पैदास झाली आहे याचा शोध सुरू करतो. त्या डबक्याचे रोज निरीक्षण करतो, त्यावर वाढ होणाऱ्या जीवजंतूंची नोंद ठेवू लागतो. त्यावर डास निर्माण कसे होतात, कसे वाढतात, उठतात कधी, झोपतात कधी, माणसांना चावतात कधी याचा जणू पूर्ण प्रबंधच तो तयार करतो आणि मग अशा प्रकारच्या डासांमुळे तशा प्रकारचा आजार होतो हे तो प्रयोगशाळेत सिद्ध करून दाखवतो. त्या प्रत्येक प्रकारच्या डासावर तंतोतंत लागू पडेल असे औषध तो शोधून काढतो. हे सर्व एक शेतकरी अगदी शांतपणे निरीक्षण करत असतो. मग तो त्या शास्त्रज्ञाला सांगतो की, एवढे सगळे आपण करेपर्यंत जर ते पाण्याचे डबकेच स्वच्छ केले, काढून टाकले तर डासच निर्माण होणार नाही आणि डासच नसेल तर तापच येणार नाही. राजा मात्र हुशार असतो. तो त्या दोघांच्याही संशोधनास उचित बक्षीस देऊन गौरव करतो, कारण आता ताप येऊन गेला आहे म्हणून डबके स्वच्छ केले तरी काही ताप बरा होणार नाही. त्यासाठी त्यावरील योग्य औषधाचीच गरज होती आणि असे परत होऊ  नये म्हणून योग्य व सोप्या उपयाचीही गरज होती.

आजकाल मात्र आपल्या लोकांचा राजाश्रय आता पहिल्यासारखा राहिलेला दिसत नाही. म्हणून तर आजकाल लोकांना ताप आला की, तो कशामुळे आला याची तपासणी करण्यातच लोक दोन-तीन दिवस घालवत आहेत. मग त्याचे निदान झाले की, त्यानुसार त्यावर उपचार सुरू केले जात आहेत. मात्र कधीकधी तोपर्यंत आजार फार वाढलेला असतो. म्हणून आजकाल तो होऊच नये म्हणून आपण आपल्या शरीरात व परिसरातसुद्धा अशी गटारे निर्माण होऊ  दिली आहेत का हे शोधणे जास्त गरजेचे आहे. लोकांचे आजकाल आहार व विहाराचे तंत्र बिघडले आहे, त्यामुळे त्यांच्या शरीरातच आता अशी आजार तयार करणारी गटारे निर्माण होऊ  लागली आहेत. आयुर्वेद म्हणतो, कोणताही आजार अचानक आकाशातून पडत नाही. आपलेच काही तरी खाण्यात, पिण्यात, वागण्यात चुकले असेल म्हणून तर आपली व्याधी प्रतिकारक शक्ती कमी होते व आपण आजारी पडतो. ‘मिथ्या आहार विहाराभ्याम!’ असे म्हणून आयुर्वेदाने ज्वर उत्पत्तीची जगातली सर्व कारणे केवळ दोनच शब्दांत सांगून ठेवली आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया हे नावाने वेगवेगळे वाटत असले तरी त्याच्या उत्पत्तीची शारीरिक कारणे ही बऱ्यापैकी एकसारखीच असतात. आयुर्वेदात यास दोष-दुष्य संमुर्छना असे म्हणतात. त्यानुसारच तापाचे प्रकार पाडले जातात. कमीत कमी शंभर प्रकारचे ताप आयुर्वेदात वर्णन केले आहेत. माणसाच्या जन्माच्या व मृत्यूच्या समयी असणाऱ्या ज्वराला व्याधीचा पर्यायी शब्द म्हणूनसुद्धा वर्णन केले आहे. यावरून आयुर्वेदाचे ‘ज्वर’ म्हणजेच ताप निर्माण होण्याबद्दलची कारणे, लक्षणे व औषधी उपाययोजना याबद्दलचे ज्ञान किती प्रगत होते हेच समोर येते. त्यामुळे भविष्यात अशा नवीन लक्षणांच्या व नावसुद्धा माहिती नसणाऱ्या व्हायरस व बॅक्टेरियामुळे जरी एखाद्या प्रकारचा ताप निर्माण झाला तरी आयुर्वेद त्यास सक्षम उपाययोजना करू शकतो. योग्य व पोषक लघु आहार, भाताची पेज, मुगाचे कढण, उकळलेले पाणी, दुर्वाचा रस, हळद, आले, गवती चहा, तुळस यांचा काढा तसेच गुळवेलीचा काढासुद्धा कित्येक प्रकारच्या तापावरील परिणामकारक उपचार आहे. तसेच सुंठ, लवंग, तुळस, दालचिनी, गवती चहा यांपासून बनविलेला सुगंधी चहासुद्धा अनेक प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनवर उपयोगी पडतो हेही आता सिद्ध झाले आहे. म्हणून तर गरज आहे ती फक्त आयुर्वेदीय सिद्धांतांना समजून घेण्याची आणि आयुर्वेदात सुचवलेले उपाय वैद्याच्या सल्ल्याने अधिक वेळ न दवडता सुरू करण्याची.

 

वैद्य हरीश पाटणकर

harishpatankar@yahoo.co.in

Story img Loader