पूर्वीच्या काळी एक आख्यायिका ऐकायला मिळायची. एका राजकुमारीला अचानक ताप येतो. तिचे अंग जणू तापाने फणफणू लागते. राजकुमारी फार गळून जाते. तिचे सर्व अंग दुखत असते. राजा सर्व उपचार करून पाहतो, पण काही फरक पडायचे नाव नाही. शेवटी हा ताप तिला कशामुळे आला हे शोधायचे ठरते. ताप का आला हे कारण सापडले तर योग्य तो उपचार करता येईल व राजकुमारीला लवकर बरे करता येईल म्हणून राजा दवंडी पिटवतो व कारण शोधणाऱ्यास भरघोस बक्षीस जाहीर करतो. प्रजेतील सर्व हुशार मंडळी कारण शोधण्याच्या पाठीमागे लागतात. त्यात एका शास्त्रज्ञाला राजकुमारीच्या महालाच्या पाठीमागे एक पाण्याचे डबके साठलेले आढळते. तो त्या डबक्याच्या वर कोणत्या प्रकारच्या डासांची पैदास झाली आहे याचा शोध सुरू करतो. त्या डबक्याचे रोज निरीक्षण करतो, त्यावर वाढ होणाऱ्या जीवजंतूंची नोंद ठेवू लागतो. त्यावर डास निर्माण कसे होतात, कसे वाढतात, उठतात कधी, झोपतात कधी, माणसांना चावतात कधी याचा जणू पूर्ण प्रबंधच तो तयार करतो आणि मग अशा प्रकारच्या डासांमुळे तशा प्रकारचा आजार होतो हे तो प्रयोगशाळेत सिद्ध करून दाखवतो. त्या प्रत्येक प्रकारच्या डासावर तंतोतंत लागू पडेल असे औषध तो शोधून काढतो. हे सर्व एक शेतकरी अगदी शांतपणे निरीक्षण करत असतो. मग तो त्या शास्त्रज्ञाला सांगतो की, एवढे सगळे आपण करेपर्यंत जर ते पाण्याचे डबकेच स्वच्छ केले, काढून टाकले तर डासच निर्माण होणार नाही आणि डासच नसेल तर तापच येणार नाही. राजा मात्र हुशार असतो. तो त्या दोघांच्याही संशोधनास उचित बक्षीस देऊन गौरव करतो, कारण आता ताप येऊन गेला आहे म्हणून डबके स्वच्छ केले तरी काही ताप बरा होणार नाही. त्यासाठी त्यावरील योग्य औषधाचीच गरज होती आणि असे परत होऊ नये म्हणून योग्य व सोप्या उपयाचीही गरज होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा