परवा एका शाळेत व्याख्यानाला गेलो होतो.. इयत्ता १० वीचा वर्ग होता. व्याख्यान चालू असताना सहज विचारलं, ‘‘किती मुलांना केस गळण्याचा त्रास आहे?, किती जणांचे केस पांढरे आहेत?’’ आश्चर्य म्हणजे जवळपास ६० टक्के मुलांना केस गळण्याचा तर २० टक्के मुलांना केस पांढरे होण्याचा त्रास जाणवत होता. सर्वजण अगदी सधन कुटुंबातील होते. म्हणजे पोषण कमी होत आहे असं म्हणण्याला वावच नव्हता.
आजकाल हा प्रश्न सर्वानाच सतावत आहे. टी.व्ही.वरील जाहिराती पाहून कितीही तेल लावलं तरी केस गळणं काही थांबत नाही. हल्ली कमी वयातच केस पिकण्याचं प्रमाणही वाढलं आहे. मुलांनाच विचारलं की तुम्हाला काय वाटतं आहे? कशामुळे तुमचे केस गळत आहेत? तर मुलांनी उत्तरं दिली की, व्हिटामिन ‘डी’ च्या कमतरतेमुळे तर काही जण म्हणाले की ‘प्रोटीन’च्या कमतरतेमुळे तर काही म्हणाले की, परीक्षेच्या, अभ्यासाच्या ताणामुळे. पण या वयात? एक-दोन मुले तर अगदी अकाली वृद्धत्व आल्यासारखी दिसत होती. मग मुलांना विचारलं, ‘‘तुम्ही रोज तेल लावता का?’’ तर काहीजण म्हणाले की, आम्ही ‘जेल’ लावतो. काहीजण लावतच नाहीत, तर काहीजण हल्ली ‘स्पाइक’ करत असल्याने वेगवेगळी क्रीम लावत होते. आयुर्वेदात केश हा ‘अस्थी’चा उपधातू सांगितला आहे. याचे पोषण चांगले करायचे असेल तर कठीण कवच असणारी फळे खाल्ली पाहिजेत. व्हिटामिन, प्रोटीनच्या भाषेबरोबरच वात-पित्त-कफ यांचीही भाषा समजून घेतली पाहिजे.
तेलाने टाळू भरणं हेसुद्धा कमी होत चाललं आहे. पूर्वीच्या काळी लहानपणीच मुलांची छान टाळू भरली जायची, तास तास तेलाने मसाज केला जायचा. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला अंघोळीनंतर आजीच्या नऊ वारीत गुंडाळून ठेवलं की बाळ छान झोपी जायचं. डोक्याच्या हाडांची व केसांची त्यामुळे छान वाढ व्हायची. बाळ २-३ वर्षांचे होईपर्यंत हे आजीचे नित्याचे काम होते. त्याचा कस अगदी तारुण्यापर्यंत टिकायचा. त्यामुळे आजकाल पहा ना आजोबांचे केस छान असतात मात्र नातवाला ‘टक्कल’ पडलेलं असतं. त्यात हल्लीच्या लो कॅलरी डायटमुळे तर स्निग्धांश शरीराला मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शरीरातील रूक्षता वाढत आहे. यासाठी बाह्य़ तेला बरोबरच पोटातूनही स्निग्ध पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत. खोबरं, बदाम, मनुके, अक्रोड यांच्याबरोबरच आहारातील तुपाचे प्रमाण ही वाढविले पाहिजे. केरळच्या मुलींच्या केसांच्या वेण्या पाहिल्या की या आहाराचं महत्त्व पटतं.
प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याचे केस गळण्याची कारणंसुद्धा वेगवेगळी असतात. त्या कारणांचा जवळच्या वैद्याकडून शोध घेतल्यास आयुर्वेदात केस गळणे व पिकणे यावर उत्तम उपाय मिळतात. मात्र केस ही अशी गोष्ट आहे की ते जाण्यापूर्वीच त्याचे उपाय केले पाहिजेत.