आपण आजपर्यंत हेच शिकत आलो की मनुष्य प्राण्याच्या जगण्याच्या मूलभूत तीनच गरजा आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा. पण आयुर्वेद म्हणतो ‘‘आहार, निद्रा आणि अ/ब्रह्मचर्य’’ या कोणत्याही प्राण्याला जगण्यासाठी लागणाऱ्या तीन मूलभूत गरजा आहेत. यांनाच आयुर्वेदाने आपल्या देहाचे ‘तीन उपस्तंभ’ असे म्हटले आहे. यांच्या सम्यक योगानेच माणसाचा देह टिकून असतो. जरा विचार करून पहा वस्त्र आणि निवाऱ्याशिवायही माणूस जगू शकतो. पूर्वीही जगत होता. माणूस सोडला तर अजून इतर प्राणीसुद्धा याच्याशिवायच जगत आहेत. पण तुम्हाला कोणीही निद्रा आणि अ/ ब्रह्मचर्याशिवाय जगताना दिसणार नाही. प्रसिद्ध पाश्चिमात्य लेखकांनीसुद्धा हे मान्य करून नमूद केले आहे की ‘फुड, सेक्स, अँड स्लीप आर द थ्री बेसीक नीड्स ऑफ अवर बॉडी.’ आयुर्वेदात फक्त पुत्रप्राप्तीसाठी संभोग सांगितला आहे. इतर वेळी संभोग करण्यासाठी काही नियम व औषधीची बंधने घालून दिली आहेत. प्रथम ब्रह्मचर्य आश्रमाचे पालन करावयास सांगितले आहे.
गृहस्थाश्रमात काही काल अब्रह्मचर्य व नंतर पुन्हा याचे पालन करायचे आहे. कारण शुक्र धातू हा सर्वात महत्त्वाचा धातू असल्याने त्याच्या नाशाने मृत्यूपण होऊ शकतो. म्हणून त्याचे बिंदू बिंदू स्वरूपात जतन करावयास सांगितले आहे. जास्त शुक्रनाश झाल्यास शरीराची व्याधी प्रतीकारक शक्ती कमी होते व मानवाला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आजकाल वेगवेगळ्या जाहिराती, बदललेली जीवनशैली, पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण यामुळे बरेच तरुण या शुक्रनाशाचे बळी पडत आहेत. स्त्रियांमध्येसुद्धा मासिक पाळी व तत् संबंधी तक्रारी वाढू लागल्या आहेत. नराश्य हे त्याचे प्रथम लक्षण आहे. कित्येक पाश्चिमात्य तरुणांना या आजाराने ग्रासले आहे. सत्तर टक्के आत्महत्या, बलात्कार, व्यभिचार, खून हे या शुक्रधातूशी संबंधित भावनांना आवर घालता न आल्याने होत आहेत. पण हे जगण्याचे मूलभूत साधन असल्याने आपण यापासून दूरसुद्धा जाऊ शकत नाही. म्हणून त्याचा सम्यक योग हेच आरोग्याचे व आनंदी जीवनाचे रहस्य आहे. सर्वानीच जर ब्रह्मचारी राहायचे ठरवले तर या जगात मनुष्य प्राण्याची पुढची पिढीच उत्पन्न होणार नाही व मानव जातच नष्ट होईल. तसेच इतर प्राण्यांचेही. म्हणून ग्रंथाला अ/ ब्रह्मचर्य अपेक्षित आहे व याचे महत्त्व ओळखूनच यास मूलभूत तीन उपस्तंभांत घेतले आहे. पण दुर्दैवाने आपल्या डोक्यात लहानपणापासून वेगळ्याच तीन मूलभूत गरजा शिकवल्याने सर्वाचा गोंधळ झाला आहे.
सुंदर आयुष्य जगण्यासाठी नक्की काय मिळवायचं हेच लोकांना कळत नाहीये. एका छोटय़ाशा घरासाठी आणि वितभर कपडय़ासाठी माणसाने आहाराकडे दुर्लक्ष केलं. दिवसरात्र जागून काबाडकष्ट करून माणूस घर आणि वस्त्र विकत घेऊ लागला. साठवू लागला. आज आमच्याकडे कित्येक रुग्ण येत आहेत ज्यांच्याकडे मुबलक वस्त्र व सुंदर घर आहे मात्र त्यांना कधीही झोप लागत नाही. निद्रानाश झाला आहे. कित्येकांना झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही, मग पुढे जाऊन गोळी घेऊनही झोप लागत नाही आणि मग अनेक नको असलेले आजार मागे लागतात. आता झोपेसाठी ते सर्व मिळवलेली संपत्तीसुद्धा खर्च करायला तयार असतात. अगदी वेडे बनतात. अनिद्रा ही वात व पित्त अशा दोन्ही दोषांना वाढवते व बिघडविते. सगळी सुखे निद्रेच्या आधीन आहेत. आहार बिघडला की झोप बिघडते, झोप बिघडली की शुक्रधातूची दुष्टी होते आणि हे तीन मूलभूत घटक बिघडले की आरोग्य बिघडते. सकाळी लवकर उठून रात्री लवकर झोपणे, नियमित व योग्य वेळी आहार घेणे, सम्यक ब्रह्मचर्य पालन करणे हीच खरी निरोगी आयुष्याची त्रिसूत्री आहे. सततची अनिद्रा विस्मरण निर्माण करते. म्हणून वैद्याच्या सल्ल्याने जायफळ दुधात उगाळून घेणे, जटामांसी फांट, ब्राह्मी, सर्पगंधा अशा आयुर्वेदातील अनेक औषधी प्राकृत निद्रा येण्यासाठी मदत करतात. ज्यांना कित्तेक दिवस निद्रानाशाने पछाडले आहे त्यांच्यासाठी तर शिरोधारा हे पंचकर्म एक वरदानच आहे.
एक दिवसाचा निद्रानाश हा पुढच्या दिवशीच्या निद्रानाशाचे कारण बनतो. म्हणून थोडक्यात लक्षात ठेवा, ‘जे जगण्याचे मूलभूत साधन आहे त्याचा चुकीचा वापर हा अनेक आजारांचे, शेवटी मरण्याचे मूलभूत कारण असणार हे नक्कीच.’
वैद्य हरीश पाटणकर
harishpatankar@yahoo.co.in