आजकाल लहान लहान मुलेसुद्धा चष्मा लावलेली पाहायला मिळतात. खरंच हा चष्मा लागतो म्हणजे नक्की काय होतं? हा घालवता येतो का? हेच आज आपण जाणून घेऊ. आजकाल छोटा हॉल व मोठय़ा स्क्रीनचा टी.व्ही. सर्व घरांमध्ये पाहायला मिळतो. त्यातच सर्व मुलांकडे त्यांच्या आई-बाबांचा मोठय़ा स्क्रीनचा मोबाइल असतो, जो अनेकदा ते स्वत:च मुलांनी शांत बसावं म्हणून देतात, बाळ जन्मून काही तास होत नाही तोच त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकण्यासाठी त्याच्यावर पर्यायाने त्याच्या डोळ्यांवर अनावश्यक फ्लॅशचा मारा होतो. कमी वयात जास्त ताण या डोळ्यांवर येतो, मग डोळ्यांच्या पेशी ज्याप्रमाणे आपण उन्हात गेल्यानंतर आकुंचन पावतात व अंधारात गेल्यानंतर प्रसरण पावतात त्याप्रमाणे सततच्या ताणामुळे आकुंचित पावून त्याच स्थितीत बऱ्याच काळ राहिल्याने त्यांची फोकल लेन्थ बदलते व प्रतिमा दृष्टी पटलावर न पडता किंचित अलीकडे पडते व आपल्याला अंधूक दिसू लागते. मग ही प्रतिमा योग्य ठिकाणी पडण्याचे अंतर्वक्र अथवा बहिर्वक्र भिंग वापरतो, ज्याला बोलीभाषेत आपण चष्मा लागला असे म्हणतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण हा चष्मा लावावाच लागू नये, असे वाटले तर? त्यांना आजीबाईच्या बटव्यातील काही घराच्या घरी करता येणारे डोळ्यांचे व्यायाम व औषधे सांगतो त्याने मुलांचा चष्मा जातो. यामध्ये काही नियम पाळावे लागतात ते म्हणजे.. वर उल्लेख केलेली चष्मा लागण्याची सर्व कारणे टाळणे, तसेच रोज आहारातील अतिप्रमाणात सेवन होणारे मीठ, लोणचं असे पदार्थ कमी करणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर दोन अथवा चार तासांनी डोळ्यांवर पाणी मारून डोळ्यांवर आलेला अनावश्यक ताण कमी करणे. रोज सकाळी सूर्योदयानंतर दोन्ही डोळ्यांमध्ये दोन-दोन थेंब देशी गाईचे साजूक तूप अल्प कोमट करून घालणे. नंतर सूर्याकडे पाहत थोडा वेळ उन्हामध्ये बसावे. काही क्षण पाहिल्यानंतर ५-१० मिनिटे डोळे बंद करून बसलात तरी चालेल. नेत्राचे तुपामुळे स्नेहन व सूर्यामुळे स्वेदन होते. नेत्राच्या पेशींची ताकद वाढते, डोळ्यांवर आलेला अनावश्यक ताण कमी होतो आणि दृष्टी सुधारते, चष्म्याचा नंबर कमी होतो तर बऱ्याचदा चष्मा जातो. यासाठी कधी कधी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली रोज सकाळी त्रिफळा चूर्ण तूप व मधातून घेतल्यासही डोळ्यांना फार लाभ होतो. आमची आजी लहानपणी आमच्या डोळ्यांमध्ये काजळ घालायची. आयुर्वेदात ‘चक्षु तेजोमयं..’ असे सांगून त्यास कफाचे भय असल्याने नेहमी रासंजन घालण्यास सांगितले आहे. अगदी रासंजन रोज नाही पण विधिवत बनवलेले तुपान्जन तुम्ही रोज डोळ्यांना लावू शकता. उत्तम प्रतीचे बाजारात विकतही मिळते. आजकाल पूर्वीप्रमाणे काजळ बनवलं जात नाही व कसं लावायचं हेही माहीत नसल्याने संभाव्य तोटे टाळण्यासाठी डॉक्टर मंडळी ते न लावण्याचा सल्ला देतात. पण पूर्वीपासून चालत आलेल्या या परंपरेमुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य मात्र टिकून होते.चष्मा लावायची गरज पडत नसे.

अंधारात राहण्याची, पाहण्याची सवयसुद्धा लावली पाहिजे, रात्री दिवे लवकर बंद करून लवकर झोपी गेले पाहिजे. प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांचे स्नायू सतत संकुचित राहून त्यांच्यावरचा ताण वाढतो. सकस आहाराबरोबरच वरील बटव्यातील साधे सोपे उपचार मुलांना नक्कीच चष्मामुक्त करतात.

 

मराठीतील सर्व आयुर्वेदाच्या स्मृतीतून बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pediatric specs