शाळेला सुट्टय़ा लागलेल्या म्हणून आनंदी तिच्या मामाच्या गावाला गेली होती. दोन दिवस मस्त पाहुणचार झाला. खायला-प्यायलाही वेगवेगळे पदार्थ मिळाले, पण त्या दिवशी रात्री १२ वाजता अचानक आनंदीची दाढ फार दुखू लागली. काही तरी वेगळं खाण्यात आलं होतं. घरातले सगळे चिंतेत पडले.
आनंदी म्हणजे शहरात राहणारी जणू सुकुमार राजकुमारीच. तिला असं रडताना पाहून कोणालाही काय करावं सुचेना. मामाला आजीची आठवण आली. घरी- गावी कोणाला असं काही झालं की आजी लगेच काही तरी घरगुती औषध सांगून बरे करायची. कधी कोणाला दवाखान्यातही जावं लागत नसे, मात्र आता आजीच राहिली नव्हती. मामाला काय करावं काही कळत नव्हतं.
आनंदीच्या वेदना वाढू लागल्या तसा रडण्यातला जोरही. त्याला माझी आठवण झाली आणि लगेच त्याने फोन लावला. काही तरी घरगुती औषध सांगा
म्हणाला. कारण त्याच्या घराजवळ कुठेच औषधांचं दुकान अथवा दवाखाना नव्हता. मी त्याला
आनंदीच्या दुखणाऱ्या दाढेत थोडी कापराची पूड आणि मोठय़ा मिठाचा खडा १० मिनिटं धरून ठेवायला सांगितला आणि काय गंमत, लगेचच आनंदीची
दाढ दुखायची राहिली. तिला शांत झोपही
लागली. तसा मामाचा मला फोन आला. गोष्ट छोटी असली तरी फार त्रासदायक होती. त्यावर तातडीने उपाय गरजेचा होता.
दाढदुखी ही लहान मुलांमध्ये अशी अचानक काही तरी गोड पदार्थ खाल्ले, ते दातात अडकून बसले की रात्री दातातील कृमी त्यांचे कोरण्याचे काम सुरू करतात त्या वेळी वाढायला लागते.
मीठ हे आयुर्वेदातील उत्तम कृमिघ्न औषध आहे आणि कापूर हा श्रेष्ठ कृमिघ्न व वेदनास्थापक सांगितला आहे. वेदनास्थापक म्हणजे तत्काळ शूल, वेदना कमी करणारा. यामुळे आनंदीची दाढदुखी लगेच थांबली. असो. अशीच गंमत आपल्या बाबतीतही नेहमी होत असते. पण अगदी आपल्या जवळ असणारे, सहज करता येणारे, घरच्या घरी अगदी मसाल्याच्या डब्यातदेखील एक आयुर्वेदिक दवाखाना लपला आहे हे आपण जणू आजी गेल्यामुळे विसरूनच गेलो आहोत.
आपल्या या काही जुन्या प्रथा, परंपरा.. घरगुती औषधींचा खूप मोठा वारसा आहे. त्याचा वापरही व्हायला हवाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा