मागील भागात आपण ‘विस्मरण’ म्हणजे काय ते पाहिलं. खरं तर ही देवाने दिलेली एक देणगीच आहे. माणूस जर का काही विसरू शकत नसता तर वेडाच झाला असता. संस्कारजन्य जे ज्ञान ते म्हणजे स्मृती होय. यापेक्षा वेगळे म्हणजे अनुभव. आयुर्वेदात ‘अष्टौज्ञानदेवता’ सांगितल्या आहेत. ‘बुद्धि: सिद्धि: स्मृति र्मेधा धृति: कीर्ति: क्षमा दया’- चरक संहिता. म्हणजे बुद्धी (निश्चयशक्ती), सिद्धी (यशशक्ती), स्मृती (स्मरणशक्ती), मेधा (आकलन शक्ती), धृती (धारणशक्ती), कीर्ती (कीर्तन शक्ती अर्थात बोलण्याचे सामथ्र्य) क्षमा आणि दया अशा या अष्ट ज्ञानदेवता ज्यांना आजकालच्या भाषेत आपण प्रत्येकाची आयडिया, सक्सेस पॉवर, मेमरी पॉवर, ग्रास्पिंग पॉवर, होल्डिंग पॉवर आदी नावाने ओळखतो. गंमत म्हणजे बऱ्याच जणांना बुद्धिवर्धक औषधांनी बुद्धी वाढत नाही असे वाटते. पण आयुर्वेदात मात्र फक्त बुद्धीच नाही तर तिच्या प्रकारानुसार प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळे औषध सांगून ठेवले आहे. लहानपणी आमची आजी जीभ जड असणारी, नीट बोलता न येणारी लहान बाळे आली की त्यांना ‘अक्कलकारा’ जिभेला चोळायला द्यायची. याने कीर्ती (बोलण्याचे सामथ्र्य) वाढते. एका महिन्यात त्यांना फरक जाणवायचा. स्मृती वाढविण्यासाठी ‘ब्राह्मी’ तर मेधा म्हणजे आकलनशक्ती वाढविण्यासाठी ‘शंखपुष्पी’ द्यायची. तर रोज बदाम, अक्रोड खाल्ल्याने धारणशक्ती म्हणजे धृती वाढते. तूप, दूध यामुळे दया भाव उत्पन्न होतो तर ‘जटामांसी’, ‘चंदन’ यामुळे क्षमाभावाची उत्पत्ती होते. या सर्वच वनस्पती ढोबळमानाने पहिल्या तर बुद्धिवर्धक आहेत. पण प्रत्येकाचे त्याच्या प्रकारानुसार कार्य वेगवेगळे आहे. म्हणून विस्मरणाच्या सर्व रुग्णांचे निदान व औषध वेगवेगळे असते. सर्वानाच एकाच साच्यात आयुर्वेदानुसार बसवता येत नाही. म्हणून अगदी लहान बालकांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंतच्या विस्मरणावर फार उपयुक्त औषधी आयुर्वेदात आहेत.
गरज आहे ती फक्त आपल्याला विस्मरण होऊ न देण्याची. आपल्या परंपरांची, आयुर्वेदाची!
-वैद्य हरीश पाटणकर
harishpatankar@yahoo.co.in