परवा एक आई आपल्या तरुण मुलीला घेऊन अचानक चिकित्सालयात भेटायला आल्या होत्या. संपूर्ण शरीर पांढऱ्या डागाने म्हणजेच कोडाने भरले होते. डॉक्टर यावर काहीच उपाय नाही का? असे अगदी हतबल होऊन विचारत होत्या. त्यांच्या बोलण्यातून त्यांची मानसिक अस्वस्थता जाणवत होती, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हा ज्याला होतो फक्त त्यालाच त्याचे दु:ख काय आहे हे माहिती असते. खरे तर ‘कोड’ या आजाराबद्दल, त्याच्या निदानाबद्दल, त्याच्या होण्याच्या कारणाबद्दल आणि बरे होण्याच्या क्षमतेबद्दलचं ‘कोडं’ अजून वैद्यकशास्त्रालाही फारसे सुटले नाही. कदाचित म्हणूनच की काय, यास ‘कोड’ असे समर्पक नाव बोलीभाषेत रूढीनुसार पडले असावे. आयुर्वेदात मात्र यास ‘श्वित्र’ असे म्हणतात. कुष्ठ या त्वक रोगांच्या संग्रहातच याचे वर्णन केले आहे. सध्याच्या आधुनिक शास्त्राला न पटणारी, पण पूर्वजन्मकृत कर्मापासून ते कृमी, व्रण, विरुद्धांपर्यंत अनेक कारणे याच्या उत्पत्तीबद्दल सांगितली आहेत. आधुनिक शास्त्रात मात्र एखाद्या आजाराच्या पाठीमागचे कारण सापडले नाही तर सरळ त्यास ‘इडिओपथिक डिसीज’ म्हणून मोकळे होतात. तर पूर्वी आयुर्वेदात मात्र अशा वेळी या आजारांचे कारण पूर्वजन्मकृत कर्म अथवा दैव मानले जात असे. मात्र दोन्ही शास्त्रांचा अर्थ एकच ‘माणसाला व वैद्यकशास्त्राला न समजलेले असे निदान’. पण असे फार कमी वेळा होते. बहुतांशी वेळा कोड का झाला आहे याचे निदान त्या व्यक्तीच्या आहारविहारात दडलेले असतेच. मात्र समाजप्रबोधन नीट न झाल्याने कित्येक लोकांना या आजारामुळे लग्नापासून, अवहेलनेपासून ते अनेक प्रकारच्या मानसिक कुचंबणेपर्यंत सामोरे जावे लागते. त्या कोडाचा शारीरिक त्रास त्यांना काहीच नसतो, मात्र आतापर्यंत चांगले वागणारे लोक आपल्याला ‘कोड’ आहे हे समजल्यावर असे का वागतात याचं ‘कोडं’ जणू त्यांना स्वस्थ जगू देत नाही. हे मनाने खचलेले असतात. पायावरचे व हातावरचे कोड झाकण्यासाठी काही लोक पारंपरिक मेहंदी लावत असतात, तर काही हे झाकण्यासाठी मांडीची कातडी काढून ‘प्लास्टिक सर्जरी’चा मार्ग स्वीकारतात. मात्र असे कातडे बदलून परत दुसऱ्या ठिकाणी कोड उठला तर पश्चात्ताप करण्याशिवाय यांच्याकडे दुसरे काहीच राहत नाही. या श्वित्राचे व्रणज आणि दोषज असे प्रमुख दोन प्रकार बहुधा केले जातात. पैकी पहिला म्हणजे काही लागलं, भाजलं तरी काही लोकांना त्याचा पांढरा चट्टा पडतो. हा बरा करता येतो, तर अगदी बीजदोषापासून ते शरीरातील वात, पित्त, कफ अशा त्रिदोषांच्या दुष्टीने होणारा दुसरा प्रकार. आपल्याला उठलेला चट्टा कोडाचा आहे की नाही हे ठरवण्यासाठी जुन्या काळी आमची आजी शेवग्याच्या पानांचा रस एकवीस दिवस रोज एक-दोन चमचे या प्रमाणात रुग्णाला पिण्यास द्यायची. बऱ्याचदा तो जायचा, कारण ते डाग कृमींमुळे आलेले असायचे. मात्र तो न गेल्यास तो कोड आहे असे समजले जायचे. आयुर्वेदात या आजाराच्या निदानाचा खोलात विचार करून त्यावरील वेगवेगळी चिकित्साही वर्णन केलेली आहे. छोटय़ा कोडाच्या डागांवर वैद्याच्या सल्लय़ाने ‘बाकुची तेल’ लावले तरी बऱ्याचदा हा काही दिवसांत बरा होतो. त्वचेवर उठलेल्या दोन पांढऱ्या डागांची एकत्र येण्याची प्रवृत्ती असेल तर ते बरे व्हायला त्रास देते, तर त्याच डागांची विभक्त होण्याची प्रवृत्ती असेल अथवा पांढऱ्या डागांत काळे डाग निर्माण होत असतील तर ते लवकर बरे होते. ओठ, डोळे, योनी, लिंग प्रदेश अशा शुक्राच्या स्थानी उत्पन्न झालेले कोड बरे व्हायला त्रास देते अथवा असाध्य असते. मोठे, सर्व शरीरावर पसरलेले, जन्मजात व बरेच जुने झालेले श्वित्र असाध्य असते. बहुतांशी छोटे व लवकर उत्पन्न झालेले श्वित्र योग्य चिकित्सा मिळाल्यास बरे होतेच. मात्र हा आजार लपविण्याच्या आपल्या मानसिकतेमुळे तो छोटा असताना बऱ्याचदा उपचार सुरू होत नाहीत आणि फार मोठा डाग होऊन हा पसरल्यावर उपचारांचाही काही फायदा होत नाही. म्हणून लक्षात ठेवा- कोड, मधुमेह, कुष्ठ असे हे सगळे आजार वडाच्या झाडासारखे असतात. ते रोपटय़ासारखे असताना सहज उखडून फेकता येतात. मात्र याचाच वटवृक्ष झाला तर त्याला काढणे हे एक महाकठीण काम होऊन बसते. म्हणून योग्य वेळी योग्य शास्त्राची निवडसुद्धा एखाद्याचे आयुष्य बदलू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा