जयश्री काळे
‘‘भाऊंच्या प्रतिभेचा स्पर्श जरी आम्हाला लाभला नाही तरी ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे; घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत’ याप्रमाणे भाऊंच्या देणाऱ्या हातांचा परीसस्पर्श थोडाफार झाला. त्यामुळेच कॉलेजमध्ये असताना श्रद्धानंद महिलाश्रमात शिकवणे, बँकेत असताना वेश्यावस्तीत जाऊन तिथल्या स्त्रियांची बचत आणून बँकेत सुरक्षित ठेवणे, स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर ‘जागृती’सारखी संस्था उभी करणे शक्य झाले. त्यांच्या आभाळमायेतून मिळालेली ऊर्जा मला आयुष्यभर पुरून उरणारी आहे.’’ सांगताहेत विंदा करंदीकर यांच्या कन्या जयश्री काळे.
आज मागे वळून पाहताना, भाऊंचं अर्थात विंदांचं साहित्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची थोडीफार जाण आलेली असताना प्रकर्षांने लक्षात येतं की विंदांचे त्यांच्या वाङ्मयातून व्यक्त होणारं व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील आचारविचारांशी सुसंगत होते. कवितेत एक, विचारसरणीत दुसरे आणि प्रत्यक्ष व्यवहारात तिसरे असं जीवन ते कधीही जगले नाहीत, हे आम्ही मुलांनी अगदी जवळून पाहिलंय..
मी साधारण चार वर्षांची असल्यापासून ते चोवीस वर्षांपर्यंत आमचं सात-आठ जणांचं कुटुंब माहीमच्या बेडेकर सदनातील चाळीतल्या दोन खोल्यांत वास्तव्याला होतं. आम्ही तिघं भावंडं, कोकणातून शिकायला आलेली भाचेमंडळी आणि धाकटी बारा वर्षांची सोनीआत्या. ती माझ्या वडिलांना ‘भाऊ’ म्हणायची म्हणून आम्हीही भाऊ म्हणू लागलो. भाऊ रुईया आणि नंतर एसआयईस महाविद्यालयात शिकवायचे. ते घरी आले की आधी तास-दोन तास दुसऱ्या दिवशी काय शिकवायचं त्याची तयारी करीत. त्यात पंचवीस वर्षांत कधीही खंड पडला नाही. चालीचालीवर वर्गातल्या मुलांसमोर व्याख्यान देणं किंवा इतर कुठलंच काम करणं त्यांना मान्य नव्हतं. शेक्सपियरच्या ‘किंग लियर’चे आणि जर्मन महाकवी गटेच्या ‘फाऊस्ट’चे भाषांतर करताना एकेका शब्दाला अचूक अर्थाचा, वजनाचा आणि लयीचा शब्द मिळवण्यासाठी ते दोन दोन दिवस झटत असत. आपोआप हीच पद्धत माझ्याही अंगवळणी पडली. पदव्युत्तर शिक्षणानंतर मी एक वर्ष मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकवलं आणि गेली वीस र्वष ‘जागृती सेवा संस्था’ या समाजसेवी संस्थेत वस्तीपातळीवर शिकविताना त्याचा खूप उपयोग होतो आहे.
घरात काय घडतंय-बिघडतंय ते भाऊंच्या बरोबर लक्षात येत असे. मी साधारण आठ-नऊ वर्षांची असताना बेडेकर सदनात आवई उठली की शेंदरी रुमाल बोटावर धरून ‘जय हनुमान’ म्हणत कपाळाच्या मध्यभागी एकशे एक वेळा घासला की मारुती दिसतो. मी चूपचाप हा प्रयोग केला. हनुमान दर्शन काही झालं नाही, पण डोकं दुखायला लागलं, चेहरा सुजला, कपाळ लाल होऊन मोठी जखम झाली. मी घाबरतच घरात आले, कारण आता नक्की ओरडा बसणार याची खात्री होती. भाऊंनी काही न विचारता प्रथम मलमपट्टी केली. पोळीचा लाडू खायला दिला आणि झोपायला सांगितले. उठल्यावर भाऊंनी मला जवळ बसवले आणि न ओरडता गंभीरपणे समजून सांगितले की अशा अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. थोडा विचार करायचा, घरच्यांशी बोलायचं. देव प्रत्यक्षात नसतात, आपल्या मनातील सद्भावनांचे ते प्रतीक असतात इत्यादी. शेवटी पुन्हा असं होता कामा नये असा सज्जड दमही दिला. लहान वयातली ही घटना आणि त्यावर भाऊंनी केलेलं समुपदेशन माझ्या मनात इतकं खोलवर बिंबलं की मी नंतर कधीच बाबा-बुवा, धार्मिक कर्मकांड यांच्या भानगडीत पडले नाही. इतकंच नाही तर या सगळ्यात भाबडेपणाने आपली शक्ती, वेळ आणि पसा खर्च करणाऱ्या अनेक गोरगरीब बायाबापडय़ांना ‘जागृती’ संस्थेच्या माध्यमातून त्यापासून परावृत्त केले.
याच सुमाराला एका गंभीर घटनेला भाऊंना सामोरं जावं लागलं. माझा धाकटा भाऊ उदय पाच वर्षांचा होता. चांगला गोंडस आणि खेळकर होता. एकाएकी कसल्या तरी अनामिक भीतीने त्याला ग्रासलं. जेवतखात नव्हता, रात्री-बेरात्री किंचाळत उठायचा. वैद्यकीय उपचार सुरू होते, पण फारसा गुण नव्हता. मुलाला दृष्ट लागली, करणी केली असं बोललं जाऊ लागलं. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र याबद्दल सुचवलं गेलं, पण भाऊ त्या वाटेला जाणारे नव्हते. पेचप्रसंग निर्माण झाला की खंबीरपणे भावुक न होता आपलं बुद्धिकौशल्य वापरून ते मार्ग काढीत. उदयचं मन रमविण्याकरता, भाऊ त्याच्याच खेळातील पतंग, चेंडू घेऊन त्यावर कविता करून साभिनय म्हणून दाखवू लागले. कवितेतील लय आणि ताल यांच्यामुळे उदयला त्या तोंडपाठ होऊ लागल्या. कवितांच्या नादात उदय त्याची वेडी भीती विसरला, पण भाऊंच्या शब्दात सांगायचं तर बालकविता लिहायचं जे वेड त्यांना लागलं ते कायमचंच. मुलांच्या भावविश्वाशी समरूप होऊन लिहिलेल्या या कविता मुलांना तर रिझवतातच, पण मोठय़ांनाही एक वेगळा अर्थ सुचवून मजा आणतात. या बालकवितांनी आम्हा मुलांचे आणि नातवंडांचेही बालपण समृद्ध झाले. माझी मुलगी अमृता हिला लागलेली साहित्याची गोडी आज अमेरिकेतही मराठीत लेखन करून ती जोपासत आहे.
आणखी एक घटना आठवतेय. सातवीची शिष्यवृत्ती मला मिळाली नाही आणि माझ्याबरोबर अभ्यास करणाऱ्या दोन मत्रिणींना मिळाली म्हणून मी खूपच खट्ट झाले होते. शाळेत त्यांच्याबरोबर न जाता एकटीच जात असे. एक दिवस भाऊ पेढय़ांचे तीन पुडे घेऊन आले आणि म्हणाले, ‘‘यातला पहिला पेढा आईला दे. ती तुझा अभ्यास घेते. दुसरा तू खा. कारण तू अभ्यास केलास. परीक्षेला बसलीस हे शिष्यवृत्ती मिळवण्याइतकंच महत्त्वाचं आहे. उरलेले दोन पुडे शिष्यवृत्ती मिळवलेल्या मत्रिणींना देऊन ये.’’ मी तयार होईना. मला जरा जबरदस्तीनेच भाऊ त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यांच्या घरी खूप आनंद झाला आणि त्यांनी प्रेमानं आमचं आदरातिथ्य केलं. त्या सगळ्या आनंदसोहळ्यात माझी मरगळ केव्हाच दूर झाली. आम्ही तिघी मत्रिणी परत पहिल्यासारख्या हसतखेळत शाळेत बरोबर जाऊ लागलो. भाऊंच्या कवितेतील ओळीप्रमाणे ‘सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यामध्ये ब्रह्मानंद’ याचा प्रत्यय आला.
भाऊंनी आम्हा मुलांना विचारपूर्वक मराठी माध्यमाच्या शाळेत घातले होते. लहान वयात मातृभाषेतून शिक्षण घेण्याने विषयाचं आकलन चांगलं होतं, अभिरुची अधिक संपन्न बनते असं त्यांचं मत होतं. अर्थात इंग्रजी ही जगाची भाषा आहे ती यायला पाहिजे याबद्दल दुमत नव्हतं. आमच्या वेळी आठवीमध्येच इंग्रजीची प्रथम ओळख व्हायची. शिक्षकही व्याकरणात गुंतवून टाकणारे होते. मला त्यामुळे इंग्रजी आणि गणित हे विषय फारसे आवडायचे नाहीत. एक दिवस आमच्या मुख्याध्यापिकांनी आई- वडिलांना शाळेत बोलावून नीटपणे समजावून सांगितले की मुलगी बुद्धीने चांगली आहे, पण तिच्या गणित आणि इंग्रजीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. घरी आल्यावर भाऊंनी मला ‘माय फॅमिली’ या विषयावर दहा ओळी लिहायला सांगितल्या. त्यातल्या असंख्य चुका पाहून ते व्यथित झाले. मग त्यांनी माझं इंग्रजी सुधारण्याचा चंग बांधला. ते व्याकरण शिकवायच्या भानगडीत पडले नाहीत. त्यांनी इंग्रजी वाचनावर भर दिला. वाचनामुळे भाषेची लकब आणि मांडणी आपोआप आपल्या डोक्यात ठसते आणि लिहिताना काही चूक झाली तर ती आपोआप बोचते. मला त्यांनी प्रथम ‘सॉमरसेट मॉम’ आणि ‘मोंपासा’ यांच्या लघुकथांची दोन पुस्तकं वाचायला दिली.
पुस्तक निवडताना भाषा सोपी असावी, गोष्टी माझ्या वयाला आवडणाऱ्या, त्यातील रस, उत्सुकता टिकून राहील अशा असाव्यात याबद्दल त्यांनी दक्षता घेतली. सोबत शब्दकोशही दिला. सुरुवातीला शब्द सारखेच अडायचे. प्रत्येक वेळेला त्याचा अर्थ शोधण्यामुळे रसभंग व्हायचा आणि वाचायचा कंटाळा यायचा. भाऊंनी ते ओळखले आणि शब्द अडला की मला विचार असे सांगितले. संध्याकाळी सात ते नऊ भाऊ नेमाने विविध विषयांवरचं अवांतर वाचन करत. मीही त्यांच्या शेजारी माझं पुस्तक घेऊन वाचायला बसू लागले. आठएक दिवसातच आज गोष्टीत काय वाचायला मिळणार या उत्सुकतेपोटी भाऊंनी हाक न मारता मी आपणहून सुरुवात करीत असे. तिथून इंग्रजी वाङ्मयाची जी गोडी लागली तिने आजपर्यंत छान सोबत दिली. दर सुट्टीत भाऊ आम्हा मुलांना घेऊन पुस्तकांच्या दुकानात जात. पुस्तके घेण्यामध्ये कधीच काटकसर नसे. परीक्षेत साहजिकच इंग्रजीमध्ये चांगले गुण मिळाले तेव्हा आमच्या बाईंनी सगळ्या वर्गात, ‘‘आता हिनं विंदांच्या मुलीला साजेसा पेपर लिहिलाय’’ म्हणून कौतुक केलं. तेव्हा जाणवलं की आपल्या वडिलांना समाजात काही प्रतिष्ठा आहे आणि त्याला कमीपणा येईल असं आपल्या हातून काही होता कामा नये.
इंग्रजीशी माझी गट्टी झाली तरी गणिताशी शत्रुत्व कायम होतं. त्यामुळे एसएससीला गणित विषय साफ सोडून देण्याचं मी ठरवलं. तेव्हा भाऊ मध्ये पडले. ते म्हणाले, ‘‘गणिताच्या अभ्यासानं आपली विचारशक्ती अधिक तर्कशुद्ध होते, मांडणी नेमकेपणे करता येते. तेव्हा निदान एसएससीला तरी गणित घे.’’ भाऊ भूमिती खूप चांगली समजावून सांगायचे. परिणामी मला गणितात शंभरपकी सत्याण्णव गुण मिळाले. पुढे हा प्रवास एम.ए.ला गणित घेऊन मुंबई विद्यापीठात पहिली येण्यापर्यंत झाला. या वाटचालीत भाऊंची खूप मदत झाली. कॉलेजमधली अतिशय अवघड, क्वचित प्राध्यापकांना न सुटणारी गणितं ते सहजपणे सोडवून द्यायचे. ‘सॉलिड स्टेट जोमेट्रीतल्या’ त्रिमिती रचना ते त्यांच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर अचूक करून देत. प्रज्ञा आणि प्रतिभा यांचं एक वेगळंच समीकरण त्यांच्यामध्ये होतं. गणिती, लेखक आणि तत्त्ववेत्ता बटरड्र रसेल यांचं साहित्य ते आवडीने वाचत. रसेलचं ‘ऑन एज्युकेशन’ हे पुस्तक त्यांनी मला मुद्दामहून वाचायला सांगितलं. त्यामुळे मुलांच्या शिक्षणपद्धतीबाबतचं माझं आकलन अधिक प्रगल्भ झालं. त्याचा उपयोग ‘जागृती’त झोपडपट्टीतल्या मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम सुरू करताना झाला.
मला मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये लगेचच गणिताची प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. परंतु स्पर्धा परीक्षांच्या उत्सुकतेपोटी मी बँकिंगच्या परीक्षांना बसले आणि नंतर दोन इंटरव्ह्य़ू, ग्रुप डिस्कशन या चाचण्या सहजपणे पार करत ‘बँक ऑफ बरोडा’मध्ये अधिकारी म्हणून निवडली गेले. खरं तर हे बँक प्रकरण मी फारसं गंभीरपणे घेतलं नव्हतं. पण नातेवाईक, मित्रमत्रिणी यांनी ही संधी सोडणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे वगरे सांगून भरीला घातलं. फक्त भाऊ म्हणाले, ‘‘तुला शिकवायला आवडतं आणि जे आवडतं ते करावं.’’ पण मी बँकेत जायचा निर्णय घेतला. २३ र्वष नोकरी करून ४५ व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेऊन मिळालेल्या प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेतून ‘जागृती’ ही वस्तीपातळीवर शैक्षणिक आणि आरोग्यविषयक काम करणारी संस्था सुरू केली. झालेल्या आनंदाप्रीत्यर्थ भाऊंनी पहिली देणगी दिली. सावकारी पाशात अडकलेल्या गोरगरिबांना बँकेचं कर्ज मिळवून देण्यासाठी मी त्यांना जवळच्या ‘भगिनी निवेदिता सहकारी बँके’च्या शाखेत घेऊन जात असे. एक दिवस बँकेच्या संचालक मंडळावर येण्याविषयी विचारणा झाली. सहकारी बँकांतील कार्यसंस्कृती आपल्याला कितपत रुचेल याविषयी मी साशंक होते. भाऊंना जेव्हा भगिनी बँक पूर्णपणे स्त्रियांनी सर्वासाठी चालवली आहे हे कळले तेव्हा ते लगेचच म्हणाले, ‘‘ही नक्कीच स्वच्छ आणि भक्कम बँक असणार.’’ गेली २० र्वष मी या गुणवत्तापूर्ण प्रगती करणाऱ्या बँकेच्या संचालक मंडळावर आहे. स्त्रीशक्तीविषयी भाऊंना विश्वास आणि आस्था होती. स्त्रियांचा सोशीक कणखरपणा, निर्मितीक्षमता, अष्टावधानी कार्यक्षमता याबद्दल ‘झपताल’, ‘फितूर जाहले तुला अंबर’ यांसारख्या अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहेत.
भाऊ आम्हाला सल्ला जरूर देत, पण कुठल्याच बाबतीत त्यांचं मत आमच्यावर लादत नसत. माझा भाऊ आनंद आयआयटी पवईमधून बी.टेक. होऊन नंतर कोलकात्याच्या मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमधून आय.आय.एम. झाला. काही दिवस नोकरी करून तो नंतर उदगीरसारख्या दुष्काळी भागात परिवर्तनवादी चळवळीत रोजगारनिर्मितीसाठी काम करू लागला. तेव्हा भाऊंना काळजी जरूर वाटायची पण आतून कुठे तरी समाधानही होतं. ते स्वत: कठीण परिस्थितीतही नोकरी सोडून हैदराबाद मुक्तिसंग्रामात उतरले होते आणि तुरुंगवास भोगला होता. आम्हा मुलांना आपल्या पसंतीचा जोडीदार निवडायला पूर्ण मुभा होती. जात, धर्म, पसा, प्रतिष्ठा असे कोणतेही अडसर नव्हते. मी आणि आनंदने तसे निवडले. पण उदयला ते जमलं नाही. तेव्हा त्याच्यासाठी प्रयत्नपूर्वक दुसऱ्या जातीतील मुलगी सर्वाच्या पसंतीने निवडली गेली. विधी, गोत्र यांना फाटा देऊन केलेले लग्न उत्तमपणे यशस्वी झाले. भाऊंच्या कवितेलील ओळींप्रमाणे, ‘रक्तारक्तातील कोसळोत भिंती, मानवाचे अंती; एक गोत्र.’ हेच खरं. आता पुढच्या पिढीतही हीच प्रथा सुरू आहे.
भाऊंना जशी गणितात गती होती तसेच विज्ञान, तंत्रज्ञान यामध्येही रस होता. विज्ञाननिष्ठा त्यांच्या जीवनधारणेत महत्त्वाची होती. ती दर्शवणाऱ्या ‘आइनस्टाइन’, ‘यंत्रावतार’ अशा अनेक कविता त्यांनी लिहिल्या. घरात चपलाबुटांपासून ते टीव्ही, फ्रिजसारख्या विजेच्या उपकरणांची दुरुस्ती ते स्वत: करत. त्यांचं पाहून बारीकसारीक गोष्टींसाठी इलेक्ट्रिशियन, प्लंबर यावर विसंबून न राहण्याची सवय लागली. भाऊ सुतारकोम उत्तम करायचे. सातवीच्या परीक्षेत ते सुतारकामात सबंध जिल्ह्य़ात पहिले आले होते. एकवेळ त्यांच्या कवितेला कोणी बरंवाईट म्हटलं तर त्यांना फारसा फरक पडत नसे. पण त्यांनी केलेलं टेबल, कपाट छान झालंय म्हटलं की एकदम खूश. घरात ओटय़ावर उभ्यानं चिरताना माझी पाठ दुखायची. म्हणून नव्वदाव्या वर्षी त्यांनी आम्ही नको नको म्हणत असताना हातात करवत घेऊन सुयोग्य असा विळीचा पाट बनवून दिला. त्याचा खरेच उपयोग झाला. आजही मी ती विळी वापरत आहे. आईलाही त्यांनी छानसा देव्हारा बनवून दिला होता. भाऊ नास्तिक तर आई श्रद्धाळू. पण तिच्या श्रद्धांचा त्यांनी कधी अनादर केला नाही. हीच संवेदनशीलता नकळत आमच्यातही रुजली.
भाऊ तबला उत्तम वाजवायचे. शास्त्रीय संगीताचीही त्यांना चांगली समज होती. त्यामुळे साहित्य आणि संगीत क्षेत्रातली अनेक मान्यताप्राप्त तसंच चिं.त्र्य.खानोलकर, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे यांसारख्या धडपडणाऱ्या तरुण मंडळींची घरी ये-जा असे. चर्चा, वादप्रतिवाद कधी खडाजंगी होत असली तरी परस्पर आदरभाव असे. मोकळेप्रमाणे स्वत:चे विचार मांडणे, इतरांचे समजून घेणे, मतं वेगळी असली तरी मनं जुळलेली ठेवणे हा सगळा ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ याचाच वस्तुपाठ असायचा.
कोणाच्या गरजेला उपयोगी पडता आलं तर भाऊंना त्याचा फार आनंद व्हायचा. म्हणूनच स्वत:च्या गरजा मर्यादित ठेवून पुरस्काराच्या रूपाने मिळालेले सगळे आणि स्वत:चे असे काही लाख रुपये सामाजिक, वाङ्मयीन कामासाठी त्यांनी देऊन टाकले. वाटय़ाला आलेली वडिलोपार्जति दोन एकर जमीन गावात शाळा बांधायला दिली. स्वातंत्र्यसनिकाचे मिळणारं पेन्शन त्यांनी कधी घेतलं नाही. ते म्हणायचे, मी देशासाठी जे केलं त्याचा मोबदला नको. तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत याची त्यांना खंत वाटे. विश्वासला, माझ्या नवऱ्याला, मुकंद स्टीलमधील चांगली नोकरी सोडून उत्पादन क्षेत्रात स्वत:चं काही सुरू करावं असं वाटतं होतं. भाऊंनी त्याला सर्वार्थाने प्रोत्साहन दिलं. ते म्हणाले ‘‘जयाला चांगली नोकरी आहे. घरात दोघांनी नोकरीच्या जागा अडवण्याऐवजी तू नव्या नोकऱ्या निर्माण कर.’’ विश्वासनं स्वत:चा व्यवसाय सुरू करून तो चांगला वाढवला. भाऊ कॉलेजमध्ये इंग्रजी विभागप्रमुख असताना त्यांच्या विभागातील तात्पुरत्या जागेवर विलास सारंग हे तरुण हुशार लेखक रुजू झाले. सहा महिन्यांनंतर त्यांची नोकरी जाणार तेव्हा वयाच्या बावन्नाव्या वर्षी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन सारंगांची नोकरी कायम केली. बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न वाढत्या लोकसंख्येपाशी येऊन ठेपतात असं त्यांचं मत होतं. म्हणून कुटुंबनियोजन करणाऱ्या संस्थेला त्यांनी बऱ्यापकी देणगी दिली. संस्थेने नियोजित इमारतीला भाऊंचे नाव द्यायचे योजलं. भाऊं म्हणाले, ‘‘नाव देऊ इच्छिणारे देणगीदार तुम्हाला मिळतील. त्यांना शोधा, निधीत भर घाला आणि काम वाढवा.’’ त्यांचं दातृत्व हे निरपेक्ष आणि नि:शब्द होतं.
आईनं सगळ्याच बाबतीत भाऊंना मनापासून साथ दिली. ती दोघं मिळून रोज अंधशाळेत शिकवायला जात. अंधजनांबद्दल त्यांना विशेष ममत्व होतं. माझ्या घरी अंध मुली शिक्षणासाठी राहत. म्हणून पुण्याला येताना ते त्यांच्यासाठी खाऊ आणि गाण्याच्या कॅसेट्स घेऊन येत. काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे मानधन ते ‘कवितेला मूल्य आहे’ या तत्त्वाशी कठोर राहून संबंधित संस्थेकडून घेत. पण संस्थेचे काम पटलं की ते मानधनाच्या पाकिटात आणखी स्वत:चे काही घालून पाकीट गुपचूप आयोजकांकडे परत करीत. मीरा बडवेंचे ‘निवांत अंध विद्यालय’, विजयाताई लवाटेंची ‘मानव्य संस्था’, माधुरी सहस्रबुद्धे यांचं ‘बालरंजन केंद्र’ ही पुण्यातली काही उदाहरणं.
वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षांपासून सोबतीला असलेल्या मधुमेह आणि उच्चदाब या व्याधींशी उगाचच झटापट न करता भाऊंनी त्यांना मित्रत्वाच्या नात्यानं सांभाळलं. पासष्टाव्या वर्षी झालेल्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेचा आणि हृदयविकाराचा त्यांनी कधी बाऊ केला नाही. शेवटच्या १५ दिवसांपर्यंत हिंडत फिरत ते शांतपणे त्राण्णव्या वर्षी गेले. जाताना त्यांनी आणि आईनेही आपले नेत्र आणि देहदान केले. गेली अनेक वष्रे मी देहदान आणि नेत्रदान मोहिमेत सहभागी होऊन त्यानुसार अंतिम व्यवस्थापनाला हातभार लावत आहे.
भाऊंच्या प्रतिभेचा स्पर्श जरी आम्हाला लाभला नाही तरी ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे; घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत’ याप्रमाणे भाऊंच्या देणाऱ्या हातांचा परीसस्पर्श थोडाफार झाला. त्यामुळेच कॉलेजमध्ये असताना श्रद्धानंद महिलाश्रमात शिकवणे, बँकेत असताना वेश्यावस्तीत जाऊन तिथल्या स्त्रियांची बचत आणून बँकेत सुरक्षित ठेवणे, स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर ‘जागृती’सारखी संस्था उभी करणे शक्य झाले.
भाऊंचा मुलीविषयीचा नैसर्गिक जिव्हाळा, त्यांचे वाङ्मय, व्यक्तिमत्त्व आणि जीवनविषयक दृष्टिकोन मला दीपस्तंभासारखे नेहमीच आधार देत दिशा दाखवत आले आहेत. या आभाळमायेतून मिळालेली ऊर्जा मला आयुष्यभर पुरून उरणारी आहे.
vish1945@gmail.com
chaturang@expressindia.com