वीणा पाटील
‘‘नेमकं काय असेल आज त्यांच्या मनात? मुलांनी परिश्रमांची पराकाष्ठा करीत संबंधित क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला त्याचा आनंद की मुलं एकत्र नांदू शकली नाहीत त्याचं दु:ख? आयुष्य कृतार्थ झाल्याचं समाधान की आज मी पूर्वीसारखा
दे दणादण धडपडय़ा राहिलो नाही याची खंत?’’ व्यावसायिक वीणा पाटील यांनी घेतलेला वडील केसरीभाऊ पाटील यांच्या मनाचा, आयुष्याचा वेध..
‘‘मंडळी, माझी विनंती आहे तुम्हा सर्वाना, एखादी गोष्ट आवडली तर खुल्या दिलाने मन:पूर्वक दाद द्या, भरपूर टाळ्या वाजवा, प्रोत्साहित करा समोर बसलेल्या गायकवृंदाला, ते आपल्याला आनंद देण्यासाठी गाताहेत.’’ खुर्चीतून उठताना त्रास होत असूनही ते उठून उभे राहिले आणि सर्व श्रोत्यांना आवाहन केलं. मग मात्र प्रत्येक गाण्यानंतर सभागृहात टाळ्यांची बरसात व्हायला लागली. आणि मैफल उत्तरोत्तर जमत गेली.. निमित्त होतं, आमच्या भाचीने मुग्धा ठाकूरने आयोजित केलेल्या तिच्या वडिलांच्या सत्तरीपूर्तीच्या समारंभाचं. त्या समारंभात गाणं संपल्यावर टाळ्या कमी पडताहेत हे त्यांच्या तसंच आमच्या अनेकांच्या लक्षात आलं असेल पण एखादी गोष्ट खटकली की ती त्या वेळी सांगायची, मग समोरच्याला कधी वाईट वाटलं तरी चालेल हा त्यांचा खाक्या. हे धाडस माझ्यात नाही, ते तेच करू शकतात आणि म्हणूनच ते वडील आहेत आणि मला अजून बरंच काही शिकायचंय त्यांच्याकडून.
नाव- केसरीनाथ रावजी पाटील, वय वर्षे ८४, गाव- मंथाणे, कर्मभूमी- मुंबई, कार्यक्षेत्र- पर्यटन, संचार- जगात सर्वत्र. ही त्यांची थोडक्यात ओळख. मी त्यांची मोठी लेक. माझ्यात आणि त्यांच्यात तीस वर्षांचं अंतर. ते एवढे मोठे असूनही मी त्यांच्यावर हक्क गाजवला, अगदी आजतागायत. मध्ये वळवावरून पाणी वाहून गेलं, अनेक घटना घडल्या, पण बाप-लेकीची नाळ काही तुटली नाही. एकदा इगतपुरीला विपश्यना करायला गेले होते. दहा दिवस जगाशी संपर्क नाही, त्यात आला बाबांचा म्हणजे भाऊंचा वाढदिवस. ‘‘वडिलांचा वाढदिवस आहे, मला फोन जोडून द्याल का?’’ अशी विनंती मी तिथे विपश्यना कार्यालयात जाऊन केली तर म्हणाले, ‘‘वडिलांना शुभेच्छा द्यायच्यात नं, मग मनोमन द्या, त्यांना पोहोचतील त्या.’’ त्या वेळी राग आला समोरच्या माणसाचा. वाईटही वाटलं पण जे होतं ते चांगल्यासाठी. थोडय़ा वेळाने शांत झाल्यावर माझंच मला उमगलं की, खरंच शुभेच्छा द्यायला बोलायलाच पाहिजे असं कुठे आहे, मनोमन केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते तसंच एवढय़ा लांबवरून दिलेल्या शुभेच्छा वडिलांपर्यंत अवश्य पोहोचतील.
पाच वर्षांपूर्वी मी, सुधीर, नील, सुनिला आम्ही ‘केसरी’मधून बाहेर पडलो. वेगळा व्यवसाय सुरू केला तेव्हा सर्वाशीच बोलचाल पूर्ण थांबली होती, भाऊंची आठवण आली की आवंढा यायचा. त्यांना प्रचंड वाईट वाटलंय हे जाणवलं होतंच पण इलाज नव्हता. त्या वेळी विपश्यनामधली ती शिकवण कामी आली. त्यांच्या मन:पूर्वक शुभेच्छा माझ्या मनाला जाणवत होत्या आणि माझं न बोलता ‘हे ही दिवस जातील आणि सगळं काही होईल व्यवस्थित’ हा दिलासा त्यांच्यापर्यंत पोहोचत होता, असं अंतर्मनात वाटत होतं.
भाऊ हाडाचे शिक्षक. खरंतर, त्यांच्या बोलक्या स्वभावाला, खडय़ा आवाजाला साजेसं असं हे काम त्यांना मिळालं. उंची, व्यक्तिमत्त्व आणि आवाज यावरून मी त्यांना अजूनपर्यंत ‘आमचे अमिताभ’ म्हणून चिडवते. पालघर तालुक्यातील एडवण गावात काशिनाथ पाध्ये सर आणि उमा पाध्ये बाईंनी आपलं आयुष्य वेचून पंचक्रोशीतल्या मुलांना शिक्षण दिलं. त्यांच्याच ‘विद्याभवन एडवण शाळा’मध्ये भाऊंना नोकरी मिळाली शिक्षकाची. पाध्ये सरांनी भाऊंचं करिअर घडवलं तर पाध्येबाईंनी शाळेतीलच विद्यार्थिनी भाऊंसाठी जीवनसाथी म्हणून पसंत केली ती ‘बेबी राऊत’. भाऊंपेक्षा नऊ वर्षांनी लहान असलेली बेबी लग्न होऊन आली आणि झाली सुनीता पाटील. तीच आमची आई, सर्वाची जीजी आणि नातवंडांची जीज. (भाऊंचं नामांतर ‘अब्बू’मध्ये झालं ते नीलचा जन्म झाल्यावर. भाऊ काश्मीरला जायचे आणि आम्हीही त्यांच्याबरोबर. काश्मीरची माणसं खूप आतिथ्यशील. तिथली मुलं आजोबांना ‘अब्बूजान’ म्हणायची ते आम्हा सर्वाना आवडायचं. नातवांनी भाऊंना काय म्हणायचं यावरून आमच्यात बरीच चर्चा झाली. आज्जो, आजोबा, भाऊ, अब्बू या पर्यायातून ‘अब्बू’ निश्चित झालं आणि भाऊंचे ‘अब्बू’ झाले. )
शिक्षकाची नोकरी सुरू होतीच, पण भाऊंची समांतर आवड होती ती शेतीची. त्या गावी आमची जमीन होती, म्हणजे आहे ज्यामध्ये आई आणि भाऊ दोघंही स्थानिक माणसांच्या मदतीने भातशेती, भाजीपाला, आंबे, नारळ अशी शेती करीत होते. जळगाववरून केळीचे रोप आणायचे आणि त्याची वाडी करायची, पंजाबहून गहू आणून त्याची शेती करायची, शेतीला लागणाऱ्या खताची एजन्सी घ्यायची असे अनेक शेतीसंबंधित उद्योग त्यांनी शिक्षकी नोकरी सांभाळून केले आणि यशस्वीही केले.
आम्ही गावी शिकत होतो, चार भावंडं. मी वीणा, शैलेश, झेलम आणि हिमांशू. गावात तोपर्यंत वीज आली नव्हती. रोज संध्याकाळी कंदिलाच्या काचा स्वच्छ पुसून दिवाबत्ती केली जायची. त्याच प्रकाशात अभ्यास आणि गप्पागोष्टी चालायच्या. पहिला गॅस सिलिंडर त्यांनी आणला आमच्या घरात आणि आईच्या चूल पेटवण्याच्या आणि फुंकरी मारण्याच्या कष्टांना थोडा विराम मिळाला. जेव्हा ब्लॅक अॅण्ड व्हाईट टेलिव्हिजन आला तेव्हा भाऊंनी पहिल्यांदा तो आमच्या घरी आणला. रविवारी सिनेमा असायचा, मग भाऊ तो टी.व्ही. घराच्या ओटीवर लावायचे आणि आम्ही सर्व गावकऱ्यांसोबत तो चित्रपट एन्जॉय करायचो. मधूनच फ्रीक्वेंसी जायची. भाऊ घराच्या कौलांवर चढायचे आणि वर लटकवलेला तो उंच अँटेना नीट करायचे, चित्रपट सुरू व्हायचा. सगळ्यांना आनंद द्यायची ती धडपड असायची. त्यात ते दोनदा कौलावरून पडलेही, पण त्यांनी कधी ती धडपड थांबवली नाही.
आपण गावी राहात असलो तरी आपली मुलं मागे पडू नयेत असं त्यांना नेहमी वाटायचं. गावी वाडवळ भाषा बोलली जायची, पण मुलांना जर पुढील शिक्षणासाठी मुंबईकडे जावं लागलं तर त्यांची भाषा शुद्ध मराठी आणि अस्खलित असली पाहिजे यावर त्यांचा भर असायचा. वाडवळी भाषेत एक हेल असायचा तो आम्ही मराठी बोलताना आमच्या भाषेत येणार नाही याची काळजी ते घ्यायचे, म्हणजे चुकलो तर मारायचे. मला आजही आठवतं, ‘व्हॉट इज युवर नेम?’ असं ‘वाटी’सारखा काही शब्द आला की आपलं नाव सांगायचं असं मी मनातल्या मनात समजले होते. हो! नाव नाही सांगितलं तर आमचा हा अँग्री यंग मॅन रागवायचा नं. राग भाऊंच्या नाकावर, अगदी आजपर्यंत. अक्षर चांगलं असलंच पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष आणि आईची मेहनत, त्यामुळे आमची अक्षरं चांगली झाली. सुवाच्यपणा आणि सुव्यवस्था अंगात भिनायची सुरुवात तिथे झाली असं म्हणता येईल.
जसं शहरात गेल्यावर तुम्हाला कुठे कमी आहोत असं वाटू नये यासाठी त्यांनी आमच्या भाषा, शिष्टाचार आणि सवयींवर कटाक्ष ठेवला तसंच कोणत्याही कामाची लाज वाटू नये यासाठी आम्हाला सर्व प्रकारची कामं करायला लावायचे. पेरणी, लावणी, कापणी, झोडणी तसंच वाडीत बांधावर बसून भाज्या धुणं, वाडीत काम करणाऱ्या लोकांना जेवण म्हणजे शिदोरी घेऊन जाणं, त्यांना वाढणं, त्यांच्याबरोबर आपणही खाणं या गोष्टी त्यांनी करायला लावल्या. भाजी विकायला बाजारातही पाठवलं. १२ ते १३ वर्षांच्या वयात लाज वाटायची. आमच्या गावाजवळच मच्छीमार लोकांची वस्ती होती, तिथे त्यांना भाजी विकायची आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून मासे घ्यायचे हे बार्टरही त्यांनी करायला लावलं. मी एकदा अवसान गोळा करून म्हटलं, ‘‘आपल्याकडे आहेत नं माणसं मग तुम्ही मला का पाठवता?’’ तेव्हा पाठीत रट्टा पडलाच. म्हणाले, ‘‘लाज वाटायचं काय कारण आहे, काम कधीही कमी प्रतीचं किंवा उच्च प्रतीचं नसतं, आपण ते तसं बनवतो. आज तुला ही गोष्ट करायला लाज वाटली तर तुझ्या मनात भेदभावाची भावना निर्माण होईल ते मला नकोय. चल, चुपचाप जा, सांगितलंय ते कर.’’ त्या वेळी दातओठ खाल्ले पण आज त्याचं महत्त्व कळतंय. कोणत्याही कामाची लाज वाटणं ही गोष्ट मनाला स्पर्शतच नाही, त्यामुळेच मला वाटतं सव्र्हिस इंडस्ट्रीमध्ये टिकणं सोप्पं झालं.
शिस्तीचा अट्टहास, त्यासाठी प्रचंड आरडाओरड हा त्यांचा गुण आहे की दोष हे मला अजूनही उमजलं नाही. आम्ही एकदा आमच्या मामाच्या गावी जायला निघालो. आनंदात बसची वाट बघत बसलो. एसटी बस आली आणि त्यात चढणार तेवढय़ात भाऊ त्याच बसमधनं उतरले. भाऊ भेटले म्हणून आम्ही खूश. पण त्यांनी शैलेशला धरलं बखोटय़ाला आणि म्हणाले, ‘‘काय रे शर्टाच्या खाली बनियन का नाही? चल आधी उतर बसमधून, घरी जा, बनियन घाल आणि मग जा उद्या मामाकडे.’’ आम्ही चौघंही हिरमुसले होऊन घरी परत गेलो. आता हसू येतं त्या गोष्टीचं, पण अमुक एक गोष्ट अशीच करायची, त्याची एक पद्धत असते, ती झाली पाहिजे ही गोष्ट आम्ही शिकत होतो. ते जमदग्नी अवतार धारण करायचे म्हणूनच आमच्यात अंशत: ‘परफेक्शन’ आलं असं म्हणता येईल. माझा आणि भाऊंचा विसंवाद यावरूनच व्हायचा. एवढा आवाज करायची, आराडाओरडीची, स्वत:ला त्रास करून घ्यायची खरंच गरज आहे का? शांततेने कामं चांगली होतात हा माझा मुद्दा आणि त्यांचं म्हणणं, ‘‘ओरडल्याशिवाय शिस्त लागत नाही.’’ त्यांना तसं वागून यश मिळालं आणि मला शांत राहून, त्यामुळे आम्ही दोघंही आमच्या जागी घट्ट उभे. अर्थात कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला न्यायला एकच मार्ग असू शकत नाही त्यामुळे माझंच बरोबर आणि त्यांचं चूक हा अट्टहास नाही, पण तरीही अजूनही माझ्या मनात जहाल आणि मवाळ हे द्वंद्व सुरू आहेच.
भाऊंची शिक्षकी नोकरी आणि शेती सुरू असताना आमचं बालपण सर्वार्थाने घडत होतं, आनंदात होतं. रविवारी सुट्टी असली की ते त्यांची मर्सिडिज म्हणजे सायकल मेंटेनन्सला काढायचे. घराच्या ओटीवर सायकलचा पसारा असायचा. पार्ट न पार्ट मोकळा व्हायचा, स्वच्छ व्हायचा, आम्ही सभोवताली बसून पाना दे, स्क्रू ड्रायव्हर आण अशी कामं करायचो आणि डिसमेंटल केलेली सायकल स्वच्छ होऊन, टायरचं पंक्चर वगैरे काढून पुन्हा नव्या दिमाखात आमच्या घरासमोर अंगणात उभी राहायची. आता ती व्यवस्थित सुरू आहे की नाही हे चेक करण्यासाठी आम्ही पाचही जण त्या सायकलवरून प्रवास करायचो. उगाचच नाही मी त्या सायकलला मर्सिडिज म्हणाले, कारण आजच्या मर्सिडिजच्या प्रवासापेक्षा तो आनंद कितीतरी पटीने अधिक होता.
आयुष्यात काही काही गोष्टी अगदी अविस्मरणीय असतात तशी एक गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला घडवलेली मुंबईची सहल.
१ जानेवारीचा दिवस होता. मुंबईमध्ये शीवसृष्टीचा संपूर्ण सेट घडवून तो दर्शकांना खुला केला होता, तसंच तेव्हाच ‘मिलिटरी टट्ट’चं आयोजन केलं होतं सरकारने. या दोन्ही गोष्टी त्यांना आम्हाला दाखवायच्या होत्या आणि त्याचबरोबर ताजमहाल हॉटेलमध्ये बुफे जेवण द्यायचा प्लॅन त्यांनी आखला होता. आत्तापर्यंत ताजमहाल हॉटेल कसं व का बांधलं गेलं, तिथे
१ जानेवारीला स्पेशल बुफे कसा असतो, तो किती महाग असतो, तिथे जायचं कसं, खुर्चीत कसं बसायचं, काटा-चमचा कसा वापरायचा, जेवण कसं घ्यायचं याची थिअरी त्यांनी आम्हाला समजावली होतीच पण प्रॅक्टिकल बाकी होतं.
साधारण ७४-७५ चं वर्ष असेल, आम्ही प्रथम ताजमहाल हॉटेलला आलो. तिथल्या झगमगाटाने डोळे दिपून गेले होते. ताजच्या बॉलरूममध्ये लावलेला तो अवाढव्य बुफे आजही डोळ्यासमोर आहे. भाऊंच्या धाकात, त्यांच्या सूचनेबरहुकूम आम्ही खात होतो, पण सर्वानी आडवा हात मारला होता हे मात्र निश्चित. त्यानंतर शिवसृष्टी आणि ‘मिलिटरी टट्ट’ बघून आम्ही रात्री उशिराच्या गाडीने गावी परत गेलो. आम्ही पर्यटनात येण्याची मुहूर्तमेढ बहुतेक त्या एक दिवसाच्या सहलीने रोवली गेली असावी.
त्याच वेळी भाऊंच्या मोठय़ा भावाने म्हणजे राजा पाटील यांनी त्यांच्या नावाने पर्यटन संस्था सुरू केली होती, त्याचा व्याप वाढायला लागला होता. माणसं हवी होती तेव्हा त्यांनी भाऊंना आग्रह केला की, ‘नोकरी सोडून तू माझ्याबरोबर ये. आपण भागीदारीत व्यवसाय करू.’ आमचे आजोबा नाही म्हणत होते तरीही भाऊंनी भावाच्या प्रेमाखातर ‘हो’ म्हटलं आणि भाऊ पर्यटनक्षेत्रात आले. प्रचंड मेहनत होती तेव्हा, कारण हा व्यवसायच तसा नवीन होता. भाऊ सुट्टीत टूर मॅनेजर म्हणून सहलीवर असायचे आणि टूर्स नसताना ऑफिसमध्ये काम करायचे. आम्ही गावी आणि भाऊ मुंबईत ‘अप अॅण्ड डाऊन’ करायचे. मला आठवतं, आई आणि आम्ही चारही जणं गावच्या घराच्या झोपाळ्यावर बसून रात्री भाऊंची वाट बघत बसायचो. भाऊंची ओढ ही तेव्हापासून जास्त लागली असं वाटतं. दहावी झाल्यानंतर मी भाऊंबरोबर सहलीला गेले. काश्मीरला समर व्हेकेशनमध्ये, असिस्टंट म्हणून काम करायला. पर्यटनक्षेत्राशी माझी पहिली ओळख तिथे झाली. मी सहलीवर गेले खरी पण तिथलं वास्तव बघून मी अस्वस्थ झाले. शिस्तप्रिय आणि आदर्श असलेल्या आमच्या भाऊंना तिथे मिळणारी वागणूक प्रचंड मानहानीची होती. आपल्या वडिलांचा अपमान कोणती मुलगी सहन करील?. मी म्हटलं, ‘‘भाऊ मी मोठय़ा अपेक्षेने इथे आले काही शिकायला, ते मी तसंही तुमच्याकडून शिकेन पण तुमची अशी अवहेलना नाही सहन करू शकत. तुम्ही बाहेर पडा यातून, पुन्हा गावी जाऊ किंवा दुसरं काहीतरी करू किंवा तुम्हीच का नाही नवीन कंपनी सुरू करीत.’’ भाऊंच्या दृष्टीने मी जरा जास्तच बोलले होते. त्यांनी मला झापलंच तिथे. त्यांचं बंधुप्रेम वेगळ्या वाटेवरचं होतं. घरी आईला परिस्थिती सांगितली, तिचाही संताप झाला. भाऊंच्या मागे तीन वर्ष लागले की, ‘तुम्ही बाहेर पडा’ म्हणून. तोपर्यंत शैलेश, झेलम, हिमांशूही मोठे झाले होते. सर्वानी मिळून भाऊंना मानसिक बळ दिलं. ‘‘‘जो होगा सो देखा जायेगा’ पण इथे तुम्ही राहायचं नाही. भाऊ नेपाळच्या टूरला निघाले होते. त्यांना स्टेशनवर भेटायला मी आणि आई गेलो होतो. गाडी सुटायच्या आधी मी त्यांना म्हटलं, ही तुमची शेवटची सहल भाऊ, काय व्हायचं ते होईल, आपण रस्त्यावर आलो तरी चालेल, आम्ही तुम्हाला दोष देणार नाही. पण आता या सहलीनंतर हा प्रवास थांबवायचा नाहीतर मी तुमच्याशी जन्मात बोलणार नाही.’’ म्हटलं नं मी हक्क गाजवला भाऊंवर. भाऊंनी स्वत:ला बंधुप्रेमातून मुक्त केलं आणि तिथे सुरू झाली भाऊंची स्वत:ची संस्था. शून्यातून निर्माण झालेली ‘केसरी’ ही पर्यटन संस्था सर्वाच्या प्रयत्नाने नावारूपाला आली.
पुन्हा एकदा मी भाऊंवर हक्क गाजवला तो माझ्या लग्नाच्या निमित्ताने. भाऊ काश्मीरच्या सहली करायचे, एकदम उत्कृष्ट तऱ्हेने. त्यांची बारामुल्ला येथील शहीद स्मारकाजवळ दिलेली कॉमेंट्री आजही पर्यटकांच्या आठवणीत आहे. देशभक्ती, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज हे सगळे भाऊंचे आवडते आणि महत्त्वाचे विषय. बारामुल्ला, शहीद जवान यांच्याविषयीचं त्यांचं भाषण ऐकून पर्यटक हमसाहमशी रडल्याची उदाहरणं आहेत. मात्र त्यांचं स्मारकापाशी जाणं, तिथे भाषण देणं तिथल्या काही स्थानिकांना आवडत नव्हतं, काश्मीरचा माहोल बदलत चालला होता. एकदा काही लोकांनी येऊन त्यांना ‘परत इथे यायचं नाही’ ही धमकी दिली होती. ही गोष्ट १९८९च्या एप्रिल महिन्यातली. आम्ही म्हणत होतो की आता बारामुल्ला स्मारक सहल कार्यक्रमातून काढून टाकायचं, कारण आपल्याला स्थानिकांशी पंगा घ्यायचा नाही. पण भाऊंचं म्हणणं, ‘‘हे माझ्या भारतातलं स्मारक आहे आणि मला तिथे जायला कोण अडवणार?’’ झालं, आमची शाब्दिक चकमक सुरू झाली. भाऊ त्यांच्या भूमिकेतून बाहेर येईनात, शेवटी मी म्हटलं, ‘‘भाऊ तुम्ही जर बारामुल्लाला गेलात तर मी लग्न करणार नाही, माझी शपथ आहे तुम्हाला.’’ हे ब्रह्मास्त्र लागू पडलं आणि भाऊंनी बारामुल्लाच्या शहीद स्मारकाला सहल कार्यक्रमातून जड मनाने बाहेर काढले. बाप मुलीचं जास्त ऐकतो हे खरंय नाही का? आणि त्यात माझ्यासारखी भावंडात मोठी आणि थोडी ‘डॉमिनेटिंग’ मुलगी असेल तर बघायलाच नको. भाऊंनी आम्हाला शिस्त लावण्यासाठी रट्टे लगावले असतील, पण व्यवसायात त्यांनी आम्हाला अगदी मुक्त हस्त दिला होता. त्याबाबतीत त्यांनी आम्हाला कधीच ‘डॉमिनेट’ केलं नाही. आम्ही त्यांच्याकडून क्षणोक्षणी शिकत होतो, पण नवीन गोष्टी आमच्याकडून आत्मसात करण्यात कधीही कमीपणा मानला नाही.
भाऊंच्या नावाची संस्था सुरू झाली आणि माझी भाऊंबरोबरची भटकंतीही. भाऊ पुढे आणि फाइल घेऊन मी मागे. आम्ही प्रचंड प्रवास केला. हॉटेल्स बघितली, लोकांना भेटलो. आम्हाला नाव नव्हतं किंवा ते नावारूपाला आलं नव्हतं. त्यामुळे हॉटेलियर, ट्रान्सपोर्टर कुणी ढुंकूनही बघायचे नाही त्या वेळी. भाऊंना त्यांची खूप मनधरणी करावी लागायची. वेदना व्हायच्या ते बघताना पण व्यवसायात हे करावंच लागतं हे तेव्हा कळलं. भाऊ म्हणजे चालती बोलती इन्स्टिटय़ूट. आम्ही तेव्हा ट्रेनने, सेकंड क्लासने प्रवास करायचो. लोकांना भेटायचो, एका बोगीतून दुसऱ्या बोगीत.. असं दोन-चार वेळा ट्रेन पालथी घालायचो. टॉयलेटची दारं उघडी दिसली तर ते बंद करायचे प्रत्येक दार, उघडी टॉयलेट बघणाऱ्याला, जाणाऱ्या-येणाऱ्याला चांगली दिसत नाहीत म्हणून. हॉटेलमध्ये रुम्स बघायला गेल्यावर आधी मला टॉयलेट बघायला सांगायचे, म्हणायचे, ‘‘टॉयलेटच्या स्वच्छतेवरून तुला कळेल मॅनेजमेंट कशी आहे ते आणि मग आपण ठरवायचं यांच्याशी संबंध जोडायचे की नाही ते.’’ भाषणापूर्वी पॉइंट्स काढून ठेवणं, कुणाच्या भाषणात एखादा चांगला मुद्दा आला तर तो लिहून ठेवणं, कुणालाही पाणी घ्यायचं असेल तर पाण्याच्या ग्लासवर पाण्याचे शिंतोडे किंवा थेंब नको यावर त्यांचा कटाक्ष. पत्र लिहिणं आणि पुस्तकं भेट देणं हा त्यांचा आवडता छंद किंवा त्याहीपेक्षा ती त्यांची तळमळ असं म्हणता येईल. सुवाच्य अक्षरात अतिशय सुंदर प्रेरणादायी असं पत्र अधूनमधून येतच असतं. मध्ये आमचं बोलणं बंद झालं होतं तेव्हा हा पत्रव्यवहार मात्र त्यांनी सुरू ठेवला होता.
एकदा मी, आई, बाबा असे मिळून सीनियर्स स्पेशल टूर्सवर गेलो होतो. लंडनमध्ये पहिल्याच दिवशी भाऊंचा पासपोर्ट हरवला. भाऊंना वाईट याचं वाटलं की आपण पर्यटकांचे पासपोर्ट सांभाळतो, आपला पासपोर्ट हरवूच कसा शकतो? शनिवारचा दिवस, आता इंडियन एम्बसी सोमवारी उघडणार. आई पुढे गेली सहलीसोबत आणि मी भाऊंसोबत राहिले. रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही दोघंही लंडनच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत डबलडेकर बसमधनं फिरलो. तो दिवस होता ‘फादर्स डे’. जो कायम आठवणीत राहिला कारण कोणत्याही शेडय़ुलशिवाय तो दिवस भाऊंसोबत सेलिब्रेट करायला मिळाला.
आपण कितीही उंचीवर पोहोचलो तरी आपली मुळं किंवा आपण कुठून आलोय त्याचा विसर पडता कामा नये. एकदा मॅनेजर्सच्या ट्रेनिंग शेडय़ुलमध्ये मी एक ‘एक्सरसाइज’ केला. आपल्यातला सर्वात आदर्श टूर मॅनेजर कोण असेल तर तो म्हणजे भाऊ, मग सर्वानी मिळून भाऊंचे कोणते गुण होते जे सर्वाना अंगीकारावे लागतील त्या गुणांची उजळणी केली. इतके वेगवेगळे पॉइंट्स आले की त्या बोर्डचा फोटो काढला आणि त्याची एक भिंतच बनवली, जी आज आमच्या ऑफिसमध्ये दीपस्तंभासारखी उभी आहे मार्गदर्शन करीत, ज्याचं नाव आम्ही ठेवलं, ‘बॅक टू भाऊ’.
सतत त्यांनी सकारात्मक विचारांचाच पाठपुरावा केला आणि करताहेत. आम्ही विभक्त झाल्यानंतर आणि ‘वीणा वर्ल्ड’ व्यवस्थित मार्गी लागल्याचं दिसू लागल्यावर त्यांनी भूतकाळात न अडकता ‘समाजाला दोन पर्यटन संस्था दिल्या’ या भावनेत आनंद मानला. आणि तसं बघायला गेलं तर ते खरं आहे. वडिलांच्या नावासमोर-संस्थेसमोर मुलीने तिची संस्था उभी ठाकलीय हे ढळढळीत सत्य आहे. एकाच व्यवसायात असल्याने स्पर्धा अपरिहार्य आहे आणि ती होतेच. सध्याच्या जगात स्पर्धा असावीच तर पुढे जाता येईल, मात्र ती निकोप असावी, एकमेकांना संपवण्यासाठी नाही तर पर्यटकांना सर्वात चांगली सेवा कोण देतो यात असावी. चांगल्या कामाला आणि प्रामाणिक प्रयत्नांना अपयश अशक्य आहे. भाऊंचेही विचार हेच असतील याची मला खात्री आहे.
आजही भाऊ काठीच्या आधाराने (ही काठीही आत्ता आत्ता हातात घेतली अन्यथा कुणाचा हातही नको असायचा त्यांना आधाराला). संदेशची लस्सी, पणशीकरांकडचं पीयूष, आस्वादची मिसळ, प्रसाद बेकरीतले खारी टोस्ट, सीटी लाईट मार्केटमधून फळं, बांद्राच्या मार्केटमधून मासे, डॉक्टर विनय जोशींकडची दर आठवडय़ाची भेट या गोष्टी न चुकता करताहेत, आई आणि संगीता काळजी घेताहेत, नातवंडांची चिवचिव त्यांच्या मागेपुढे सुरू असतेच. अलीकडेच १ जानेवारीलाच बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा आम्ही सर्व जण ताजमहल हॉटेलमध्ये एकत्र भेटलो. ज्याने त्याने आपला बिझनेस सांभाळाचाय, पुढे न्यायचाय. आता भाऊंसाठी आणि आईसाठी असं एकत्र भेटणं आणि त्यांना अपेक्षित आनंद देणं, त्यांच्याही मनात जे काही झालं त्याचा असलेला सल कमी करणं हे मुलं आणि कुटुंब म्हणून आमचं कर्तव्य आहे.
वेगळं होणं ही कधी काळाची गरज असते. निकोप स्पर्धा करणं हे व्यवसायाच्या यशाचं गमक असतं. स्पर्धा करतानाही कुटुंब सांभाळणं ही कसोटी असते. बघू आम्ही किती खरे उतरतो या परीक्षेत..
veena@veenaworld.com
chaturang@expressindia.com