डॉ. आनंद कर्वे adkarve@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माणसं ‘मोठी’ होत असतात ती त्यांनी जगताना घेतलेल्या काही विशिष्ट निर्णयांमुळे आणि त्या निर्णयांचं काटेकोर पालन केल्यामुळे. आयुष्यात येत जाणाऱ्या कडू-गोड अनुभवातून शिकत शिकत स्वत:ला घडवणारे आणि बरोबरीने समाजालाही काही देणं देणारे अनेक मान्यवर आपण पाहिले आहेत. ही कर्तृत्ववान माणसं प्रत्यक्षात कशी होती, चांगल्या-वाईट अनुभवांना कशी सामोरी जात होती, हे त्यांच्या मुलांच्या नजरेतून बघणं नक्कीच औत्सुक्याचं असणार आहे.. आपल्यावर ‘आभाळमाया’ पसरणाऱ्या आई किंवा वडिलांचं त्यांच्या मुलांनी तटस्थपणे केलेलं हे चित्रण.. दर शनिवारी.

इरावती कर्वे – समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्राच्या अभ्यासातलं मोठं नाव. या संशोधक स्त्रीने सुमारे ६० वर्षांपूर्वी लिहिलेला ग्रंथ आजही जगभर भारताच्या समाजशास्त्रावरचा एक प्रमाणग्रंथ मानला जातो. १९०५ मध्ये जन्मलेल्या इरावती शिक्षणासाठी जशा आग्रही राहिल्या तशाच लग्न कुणाशी करायचं याबाबतीतही. परदेशात मानववंशशास्त्र शिकलेल्या, त्यासाठी जर्मन भाषा शिकलेल्या इरावतींनी आपल्या तीनही मुलांना शिक्षणाची योग्य तालीम दिली.  सजगपणे जगणाऱ्या, अभ्यासू, संशोधनपर लिखाणाबरोबर मराठी साहित्यातही मोलाची भर घालणाऱ्या इरावती कर्वे यांच्याविषयीच्या  खास आठवणी त्यांचा पुत्र आनंद कर्वे यांच्या शब्दात.

इरूचा, माझ्या आईचा जन्म १९०५ मध्ये ब्रह्मदेशातल्या इरावती नदीच्या काठी वसलेल्या म्यिंज्यान या गावी झाला. तिचे वडील, गणेश हरी करमरकर, हे पुण्याजवळच्या पौड गावातले, पण ते तरुण वयातच आपले नशीब आजमावण्यासाठी घरातून बाहेर पडलेले. इरूचा जन्म झाला तेव्हा ते म्यिंज्यान येथील एका ब्रिटिश मालकीच्या फॅक्टरीचे मॅनेजर होते. परदेशात राहणारे ब्रिटिश लोक ज्याप्रमाणे आपल्या मुलांना लहान वयातच शिक्षणासाठी मायदेशी पाठवून देत, त्याचप्रमाणे इरूच्या वडिलांनीही तिला तिच्या वयाच्या सहाव्या वर्षी शिक्षणासाठी पुण्याला पाठवून दिले आणि ‘हुजूरपागा’ या मुलींच्या शाळेच्या वसतिगृहात राहून ती शाळा शिकू लागली.

रँग्लर रघुनाथ परांजपे यांची मुलगी शकुंतला इरावतीच्याच वर्गात होती. सहा वर्षांची एक लहान मुलगी एखाद्या कुटुंबात न राहता अनाथ मुलीसारखी वसतिगृहात राहते हे परांजपे यांना न पटल्याने त्यांनी तिला आपल्या घरी आणले आणि जवळजवळ मॅट्रिक होईपर्यंत ती परांजप्यांच्या घरातच वाढली. माझे आजोबा म्हणजे धोंडो केशव कर्वे यांची आई आणि रँग्लर परांजपे यांचे वडील ही सख्खी भावंडे. त्यामुळे रँग्लर परांजपे हे धोंडो केशव कर्वे यांचे मामेभाऊ आणि आम्हा मुलांचे अप्पा-आजोबा. स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक व आर्थिक सुधारणा आणि शिक्षण यांना अधिक महत्त्व देणाऱ्या गोखले, रानडे, आगरकर, परांजपे इत्यादी व्यक्तींची त्या काळी पुण्यात ‘मवाळ’ या शब्दाने हेटाळणी केली जायची. कर्वे तर विधवेशी विवाह केल्यामुळे समाजातून बहिष्कृतच झालेले; पण पाश्चात्त्य पठडीतल्या उदारमतवादी आणि उच्चशिक्षित अशा परांजप्यांच्या घरी आणि पुण्यातल्या समाजसुधारकांच्या सावलीत वाढल्याने माझ्या आईच्या मनावर जे संस्कार झाले त्यांनीच तिच्या पुढच्या आयुष्याला एक विशिष्ट दिशा दिली असणार.

ती परांजपे यांच्या घरच्या बऱ्याच आठवणी सांगे. त्यांच्याकडे तिला मुख्यत: इंग्रजी आणि संस्कृत वाङ्मयाची गोडी लागली. पुढे तिचे वडील पुण्यात स्थायिक झाले आणि त्यांनी भारतात विविध व्यवसाय सुरू केले. पुण्यात त्यांचा एक सिगरेटचा कारखाना तर होताच, शिवाय हैदराबाद स्टेटमध्येही काही व्यवसाय होते. त्यानिमित्ताने माझा एक मामा हैदराबादमध्ये स्थायिक झाला होता. पुण्यात स्थायिक झाल्यावर त्यांनी इरूला परत आपल्या घरी आणले. तोवर इरूचे कॉलेज-शिक्षण सुरू झाले होते, पण तिच्या वडिलांनी तिच्या लग्नाचा घाट घातला. तिने त्यांना विरोध करून निदान बी.ए.पर्यंत तरी शिकू द्या, असा हट्ट धरला आणि बी.ए. झाल्यावर तिने लगेच एम.ए.साठीही नाव घातले. इरू ही पाच भावांमधली एकटीच बहीण. ती भावांबरोबर डेक्कन जिमखाना क्लबमध्ये टेनिस खेळायला जायची आणि त्यांच्याबरोबरच ती पोहायलाही शिकली असावी. माझे वडील १९२६ मध्ये जर्मनीतून रसायनशास्त्रातली डॉक्टरेट पदवी घेऊन पुण्यात फर्गसन कॉलेजमध्ये शिकवू लागले. ते डेक्कन जिमखाना क्लबचे आजीव सदस्य झाले आणि तेही तेथे टेनिस खेळत. कदाचित परांजप्यांच्या घरी राहात असतानाच इरूची कर्वे कुटुंबीयांशी ओळख झाली असेल किंवा पुढे टेनिस खेळताना माझ्या वडिलांशी ओळख झाली असेल, पण आपले शिक्षण पुढे चालू ठेवायचे असेल तर त्यासाठी स्त्रीशिक्षणाचे कैवारी असणाऱ्या कव्र्याच्या घरात लग्न करणे हा एक उपाय तिला दिसला असणार आणि तिने दिनकरशी लग्न करण्याचे ठरविले असणार. करमरकरांच्या मानाने दरिद्री आणि जातिबहिष्कृत कव्र्याच्या घरात मुलगी देण्यास तिचे वडील तयार नव्हते; पण मुलीच्या हट्टापायी त्यांनी अखेर माघार घेतली. त्यांचा होकार मिळविण्यासाठी कदाचित परांजपे यांनीही मध्यस्थी केली असेल, पण सासरे-जावयाचे काही फारसे सौहार्दपूर्ण संबंध नव्हते, हे मात्र खरे. एम.ए. पूर्ण होण्याआधीच तिचे लग्न झाले असणार, कारण एम.ए. पदवीवर तिचे नाव इरावती कर्वे असे दिसते.

इरूचे वडील एक धनवान व्यावसायिक, तर धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णा कर्वे हे पोटाला चिमटा घेऊन सामाजिक कार्य करणारे. त्यामुळे अत्यंत काटकसरीने संसार करणाऱ्या इरूच्या सासूला इरूची संसार करण्याची पद्धत उधळपट्टीची वाटल्यास नवल नाही. त्यावरून सासू व सुनांचे खटके उडायचे. एकदा अशाच एका वादावादीनंतर इरूने पातेलेभर दूध मोरीत ओतीन, अशी धमकी देऊन आपल्या सासूला सुनावले होते, की ती आणि तिचा नवरा दोघे मिळून पैसे कमावतात. ते कसे खर्च करावयाचे हे तिला दुसऱ्या कुणी सांगू नये. हा प्रसंग इरूनेच आम्हाला कधी तरी सांगितला होता. माझे लग्न इरूनेच ठरवले होते आणि तिच्यात व तिच्या सुनेत कधीही भांडण किंवा वाद झालेले नव्हते, पण माझे लग्न झाल्यापासून इरू कधीही आमच्या घरी राहावयास तर नाहीच; पण भेटीलासुद्धा आली नाही. आपण तिच्या संसारात लुडबुड करतो आहोत असे आपल्या सुनेला चुकूनही कधी वाटू नये हे त्यामागील एक कारण असावे असे मला आज वाटते. तिने आम्हा उभयतांशी संबंधच ठेवले नव्हते असे मात्र कोणी समजू नये. पुण्याला आलो की, आम्ही इरू-दिनूंकडेच राहात असू. आम्ही आलो की इरूला खूप आनंद होई, आमच्या दिलखुलास गप्पा व्हायच्या आणि ती आम्हाला नवनवीन पदार्थही खाऊ घालीत असे.

इरू ही कला शाखेची विद्यार्थिनी आणि तिची एम.ए. पदवी समाजशास्त्रातली; पण एम.ए. झाल्यावर ती मानववंशशास्त्रात पीएच.डी. करण्यासाठी जर्मनीला बर्लिन येथे गेली. हा विषय जर्मनीत मेडिकल फॅकल्टीत असूनही तिला त्यात पीएच.डी.साठी प्रवेश तर मिळालाच, पण शिवाय तिला जर्मन शासनातर्फे शिष्यवृत्तीही मिळाली. जर्मनीत तिला जर्मन भाषा तर शिकावी लागलीच, पण शिवाय प्रत्यक्ष मृतदेहांची चिरफाड करून मानवी शरीरशास्त्रही शिकावे लागले. जर्मनीतून परत आल्यावर तिने तिच्या विषयाशी संबंधित नसलेल्या अशा काही नोकऱ्या केल्या; पण मला आठवते तेव्हापासून ती डेक्कन कॉलेजमध्ये समाजशास्त्राची व्याख्याती म्हणूनच कार्यरत होती.

माझ्या आजूबाजूला दिसणाऱ्या इतर स्त्रियांपेक्षा माझी आई बऱ्याच बाबतीत वेगळी होती. तिचे इरावती हे नाव तर वेगळे होतेच, पण ती आपल्या नवऱ्याला दिनू अशा एकेरी नावानेच संबोधायची. तिचे ऐकून आम्ही मुलेही वडिलांना दिनू आणि वडिलांचे ऐकून आईला इरू असेच म्हणत असू. माझ्या लहानपणी आम्ही सहकुटुंब डेक्कन जिमखान्यावरील टिळक तलावात पोहायला जात असू. इरू अधेमधे न थांबता अगदी अर्धा-अर्धा किलोमीटर ब्रेस्ट-स्ट्रोकने पोहायची. त्या काळी इतर स्त्रिया कधी पाण्यात उतरल्याच तर त्या नऊवारी पातळ नेसत. लहान व तरुण मुलीसुद्धा आपल्या भावाचा शर्ट आणि अर्धी चड्डी घालून पोहत, पण इरू मात्र स्विमिंग कॉस्च्यूम घालायची; पण तिचा रोजचा पोशाख हा मात्र नेहमी काठापदराच्या लुगडय़ांचा असे. तिच्या साडेपाच फूट उंचीसाठी तिला मोठा पन्हा लागे म्हणून ती आपली पातळे मुद्दाम ऑर्डर देऊन हातमागावर काढवून आणायची. जॉर्जेट, व्हॉइल किंवा पिंट्रेड साडी मी तिच्या अंगावर कधीही पाहिली नाही. ती आणि परांजप्यांची शकुंतला अशा दोघी पुण्यात सायकलवर फिरत, असे तिने आम्हाला सांगितले होते. मी स्वत: तिला कधी सायकल चालविताना पाहिलेले नाही; पण जेव्हा भारतात लँब्रेटा स्कूटर आली तेव्हा पुण्यातली पहिली स्कूटर तिनेच खरेदी केली आणि ती घेतल्यापासून ती आमच्या एरंडवण्यातील बंगल्यापासून डेक्कन कॉलेजपर्यंत रोज स्कूटरनेच ये-जा करावयाची. ती कुंकू लावायची नाही किंवा गळ्यात मंगळसूत्रही घालावयाची नाही, पण लग्न समारंभ किंवा अन्य धार्मिक समारंभांत जाताना यजमान कुटुंबाला अपशकुन नको म्हणून मुद्दाम कुंकू लावून व मंगळसूत्र घालून जायची. एकदा मी तिच्याबरोबर गेलो असताना तिने मला टोपी घालायला लावली होती. तिचे मंगळसूत्र वैशिष्टय़पूर्ण होते. त्यात सोन्याच्या वाटय़ा नसत, तर अर्ध्या इंच व्यासाचा एक वर्तुळाकार पारदर्शक पिंगट-तपकिरी खडा असायचा. त्याच्या मध्यभागी डोळ्यातल्या बाहुलीसारखा दिसणारा एक काळा ठिपकाही होता. त्यामुळे हा खडा दिनूच्या डोळ्यांसारखा दिसायचा.

आमच्या घरी देवघर नव्हते आणि कधी पूजाअर्चाही होत नसे; परंतु मुलांना आपल्या चालीरीतींची ओळख व्हावी म्हणून आमच्याकडे दर वर्षी गणपती बसविला जाई. तसेच श्रावणी सोमवारी भरणाऱ्या पर्वतीच्या किंवा नवरात्रातील चतु:शृंगीच्या जत्रांनाही ती आम्हा मुलांना पाठवीत असे. आमच्याकडे ‘कथाकल्पतरू’ नामक एक मराठी पुस्तक होते. त्याच्या वाचनाने आम्हास रामायण, महाभारत आणि पुराणे यांची चांगली ओळख झालेली होती. अर्थात त्यांसोबतच हरी नारायण आपटय़ांच्या कादंबऱ्या, अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी, गोटय़ा अशी पुस्तकेही असत. पुढे शाळेत इंग्रजी शिकू लागल्यावर ती आमच्याकडून प्रसिद्ध इंग्रजी कादंबऱ्या मोठय़ाने वाचून घेई. हा कार्यक्रम रोज संध्याकाळी जेवल्यावर तासभर चाले. त्यामुळे मराठी माध्यमात शिकलेल्या आम्हा तिन्ही मुलांना इंग्रजी भाषेची कधी भीती वाटली नाही. याशिवाय मराठीतील अनेक चांगले ग्रंथ, कवितासंग्रह, नाटकांच्या संहिता याही माझ्या वाचनात लहानपणीच आलेल्या होत्या.

आमच्या घरी रोजच्या स्वयंपाकासाठी एक स्वयंपाकीण असायची; पण सणावारी श्रीखंड, बासुंदी, खीर, संक्रांतीचा तिळगूळ, दिवाळीचे पदार्थ, शिमगा-पाडव्याच्या पुरणपोळ्या, असे खास पदार्थ इरू स्वत: करीत असे. शिवाय विविध प्रकारच्या केक आणि पेस्ट्री, मटण रोस्ट, बीफ रोस्ट, फ्राइड फिश इत्यादी पाश्चात्त्य पद्धतीचे मांसाहारी पदार्थही ती करीत असे. ही कला तिने जर्मनीत आत्मसात केली असावी, कारण मराठा पद्धतीचे मटण किंवा सारस्वत पद्धतीचे मासे मी आमच्या घरी कधीच खाल्ल्याचे आठवत नाही. इरूच्या कार्याची माहिती करून घेण्यासाठी आमच्याकडे अनेक युरोपियन आणि अमेरिकन प्रोफेसर व विद्यार्थी यायचे आणि इरूने केलेले पदार्थ हात मारून खायचे. मिठाईवाल्याकडून विकत आणलेले पदार्थ आपल्या पाहुण्यांना खिलविण्याची उत्तर भारतीय प्रथा तिला मुळीच आवडत नसे.

इरू भारतातील नातेसंबंधांवरील माहिती गोळा करीत भारतभर फिरायची. त्या अभ्यासात हिंदुस्थानातल्या सर्व प्रदेशांमध्ये फिरून प्रत्येक प्रदेशातल्या जातीजमातींमधील कुटुंबसंस्था कशी असते, कोणत्या व्यक्तींचे मिळून कुटुंब बनते, त्यातल्या घटकांचे स्थान आणि कार्य काय, नातेवाईक कोणास म्हटले जाते, लग्ने कुणाशी केली जातात, ती कशी जमविली जातात, कुणाशी लग्न करणे वर्ज्य समजले जाते, कोण कुणाचे सुतक पाळते, आपल्या घरात कोणत्या विधवेला आश्रय दिला जातो (म्हणजे विधवा सून की विधवा मुलगी), दत्तक घेण्याचे काही दंडक आहेत का, इत्यादी माहिती गोळा करून त्यावर आधारित ‘Kinship Organization in India’ या नावाचे पुस्तक तिने लिहिले. सुमारे ६० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला हा ग्रंथ अजूनही जगभर भारताच्या समाजशास्त्रावरचा एक प्रमाणग्रंथ मानला जातो. ती आपल्या फिरतीवरून परत आली की तिचे अनुभव ऐकायला खूप गंमत यायची. तिने सांगितलेला सातपुडय़ातल्या भिल्लांच्या लग्नाचा एक किस्सा : या समाजात आपल्याला आवडलेल्या मुलीला पळवून न्यायची प्रथा आहे. मग पंचायतीसमोर मुलीच्या बापाने मुलाकडून योग्य तो हुंडा वसूल केला आणि त्या मुलाच्या बापाने पंचायतीचा दंड भरला, की जमात ते लग्न मान्य करीत असे. इरू अशा एका पंचायतीच्या सभेला हजर होती. मुलीच्या बापाने ५०० रुपये हुंडा मागितला, तेव्हा मुलाच्या बापाने म्हटले की, ५०० रुपये द्यायला ती काय दुभती म्हैस आहे? १०० रुपये देईन. अशा तऱ्हेने घासाघीस होऊन शेवटी हुंडा आणि दंड मिळून ३०० रुपयांवर सर्व जण राजी झाले. दुसऱ्या एका प्रवासानंतर तिने सागितलेली हकीगत एका महारोगी स्त्रीची होती. महारोगी म्हणून तिला गावातून हाकलून दिले होते, याचा गावावर सूड उगविण्यासाठी तिने तिथल्या पिण्याच्या पाण्याच्या एकमेव विहिरीत जीव दिला होता.

मी कॉलेजमध्ये जीवशास्त्र शिकायला सुरुवात केल्यावर ती मानववंशशास्त्रासंबंधीच्या तिच्या कल्पना मला सांगे. तिच्या म्हणण्यानुसार भारतातले सर्व लोक, अगदी आदिवासीसुद्धा, भारताबाहेरूनच आलेले आहेत, कारण भारतात सुमारे सत्तर हजार वर्षांपूर्वीचे कोणतेही मानवी अवशेष सापडत नाहीत. हे बाहेरून आलेले लोक टोळ्या-टोळ्यांनी आले. प्रत्येक टोळी दुसरीपेक्षा जनुकीयदृष्टय़ा थोडय़ाफार प्रमाणात भिन्न होती. जनुकीयदृष्टय़ा परस्परांहून भिन्न असणारे अनेक मानवी गट भारतात शेजारी-शेजारी राहतात, पण त्यांच्या जाती भिन्न असल्याने त्यांचे एकमेकांशी विवाह होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक जातीतले विशिष्ट शारीरिक गुणधर्म त्या जातीपुरतेच मर्यादित राहिले. उदाहरणार्थ, कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये बऱ्याच प्रमाणात आढळणारे घारे डोळे इतर जातींमध्ये क्वचितच दिसतात किंवा चंद्रकोरीच्या आकाराच्या लाल रक्तपेशी केवळ काही आदिवासींच्या समूहातच दिसतात. १९५६ नंतर मी उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेलो आणि आमच्यातील वैचारिक देवाणघेवाण बंद झाली, पण जातीजातींमधली जी सामाजिक रूढींची भिन्नता तिला तिच्या आधीच्या अभ्यासात आढळली होती तशीच भिन्नता शारीरिक पातळीवरही आहे हे सिद्ध करण्याचे तिचे प्रयत्न तिने चालू ठेवले होते. या संशोधनासाठी तिने महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांच्या पाच जाती आणि कुंभारांच्या पाच जाती निवडल्या आणि त्यांच्या शारीरिक वैशिष्टय़ांची परस्परांशी आणि महाराष्ट्रातील बहुसंख्य जात मराठा हिच्या शारीरिक वैशिष्टय़ांबरोबर तुलना केली. या अभ्यासासाठी तिने असे गृहीत धरले होते की, महाराष्ट्रात बहुसंख्येने आढळणारे मराठे हे इतरांच्या अगोदर महाराष्ट्रात स्थायिक झाले असावेत. जमविलेल्या माहितीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण केल्यावर तिला असे आढळले की, महाराष्ट्रातल्या पाचही ब्राह्मण जाती परस्परांपेक्षा भिन्न आहेत आणि प्रत्येक कुंभार जात हीसुद्धा अन्य कुंभारजातींहून भिन्न आहे; परंतु या जातींची मराठय़ांशी तुलना केल्यावर तिला असे आढळले की, देशस्थ ब्राह्मण, मराठा-कुंभार आणि मराठा या तीन जातींच्या शारीरिक गुणधर्मामध्ये अजिबात फरक नाही. यावरून तिने असा निष्कर्ष काढला की, एका मोठय़ा ब्राह्मण किंवा कुंभार अशा जातिसमूहाचे तुकडे होऊन त्यांच्या पोटजाती झालेल्या नाहीत, तर ज्या ज्या टोळ्या भारतात आल्या, त्या त्या टोळीतल्या विशिष्ट कार्य करणाऱ्या कुटुंबांना भारतातल्या जातिव्यवस्थेनुसार विशिष्ट जातीचे नामाभिधान मिळाले. समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र अशा दोन्हींचा अभ्यास असल्यानेच ती हे संशोधन करू शकली असणार.

मराठी साहित्यातील इरूच्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय हे निवेदन पूर्ण होणार नाही. तिने लघुनिबंध लिहिण्यास सुरुवात केली तेव्हा तिचा प्रत्येक लघुनिबंध प्रसिद्ध होण्यापूर्वी कुटुंबात वाचला आणि चर्चिला जाई. त्यामुळे त्या प्रत्येकाची पाश्र्वभूमी आणि तिला त्यात काय म्हणावयाचे होते, हे आम्हाला समजत असे. उदाहरणार्थ ‘परिपूर्ती’ या लेखात तिने असे लिहिले आहे की, तिच्या एका व्याख्यानापूर्वी तिची अमक्याची सून, तमक्याची बायको, अमक्याची वहिनी अशा प्रकारे ओळख करून दिली गेली, पण तिला ती अपुरी वाटली. घरी जाताना रस्त्यावरील काही मुलांनी ती पाहा, आपल्या वर्गातल्या नंदू कव्र्याची आई, अशा शब्दांनी तिला ओळखल्यावर, आता माझी ओळख पूर्ण झाली, असे तिला वाटले. हा लेख वाचून लेखिकेने मातृत्वाचा गौरव केला आहे असे वाचकांना वाटले, पण प्रत्यक्षात हा लेख व्याजोक्तिपूर्ण होता. इरूला म्हणायचे होते की, आपल्या समाजात एखादी स्त्री कितीही कर्तबगार आणि मोठी झाली तरी तिच्या दुर्दैवाने ती तिच्याशी संबंधित पुरुषांवरूनच ओळखली जाते.

साहित्य अकादमीने पुरस्कार दिलेल्या ‘युगांत’ या पुस्तकात महाभारतातल्या पात्रांचा केवळ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातूनच नाही तर मानसशास्त्राच्या दृष्टीनेही केलेला अभ्यास आहे. याही पुस्तकाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आमचा महाभारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला, असा अभिप्राय अनेक वाचकांनी हे पुस्तक वाचल्यावर दिला.

मला माझ्या आईकडून काय मिळाले, या प्रश्नाचे उत्तर मानववंशशास्त्रीय भाषेतच देता येईल आणि ते म्हणजे तिची जनुके. यांपैकी काही जनुकांनी माझे कायिक गुणधर्म घडविले हे तर निर्वविादच आहे; पण माझ्या मानसिक जडणघडणीवरही तिच्या जनुकांचा प्रभाव दिसतो. लहानपणापासून माझ्यावर केले गेलेले संस्कार हे कोणीही सुशिक्षित आणि सुजाण आई आपल्या मुलावर करील असेच होते; पण मला संशोधनकार्यात असलेला रस, निरीक्षणांमधून निष्कर्षांपर्यंत जाण्यासाठी लागणारी चिकाटी, प्रचलित मतांपेक्षा वेगळी मते मांडण्यास लागणारे धारिष्टय़, लोकांना मान्य नसली तरी शास्त्रज्ञ या नात्याने आपली मते मांडणे, हे माझ्यातले गुण मला माझ्या आईकडूनच मिळाले आहेत.

जातीजातींमधली जी सामाजिक रूढींची भिन्नता तिला तिच्या आधीच्या अभ्यासात आढळली होती तशीच भिन्नता शारीरिक पातळीवरही आहे हे सिद्ध करण्याचे तिचे प्रयत्न तिने चालू ठेवले होते. या संशोधनासाठी तिने महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांच्या पाच जाती आणि कुंभार समाजातील पाच जाती निवडल्या आणि त्यांच्या शारीरिक वैशिष्टय़ांची परस्परांशी आणि महाराष्ट्रातील बहुसंख्य जात मराठा हिच्या शारीरिक वैशिष्टय़ांबरोबर तुलना केली. या अभ्यासासाठी तिने असे गृहीत धरले होते की, महाराष्ट्रात बहुसंख्येने आढळणारे मराठे हे इतरांच्या अगोदर महाराष्ट्रात स्थायिक झाले असावेत. जमविलेल्या माहितीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण केल्यावर तिला असे आढळले की, महाराष्ट्रातल्या पाचही ब्राह्मण जाती परस्परांपेक्षा भिन्न आहेत आणि प्रत्येक कुंभार जात हीसुद्धा अन्य कुंभार जातींहून भिन्न आहे; परंतु या जातींची मराठय़ांशी तुलना केल्यावर तिला असे आढळले की, देशस्थ ब्राह्मण, मराठा-कुंभार आणि मराठा या तीन जातींच्या शारीरिक गुणधर्मामध्ये अजिबात फरक नाही. यावरून तिने असा निष्कर्ष काढला की, एका मोठय़ा ब्राह्मण किंवा कुंभार अशा जातिसमूहाचे तुकडे होऊन त्यांच्या पोटजाती झालेल्या नाहीत, तर ज्या ज्या टोळ्या भारतात आल्या, त्या त्या टोळीतल्या विशिष्ट कार्य करणाऱ्या कुटुंबांना भारतातल्या जातिव्यवस्थेनुसार विशिष्ट जातीचे नामाभिधान मिळाले. समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्राचा अभ्यास असल्यानेच ती हे संशोधन करू शकली असणार.

chaturang@expressindia.com