निनाद देशपांडे
‘‘एक कलाकार म्हणून पपांचे आणि आईचे मराठी रंगभूमीसाठी योगदान वादातीत होते. व्यावसायिक तसेच समांतर रंगभूमीसाठी दोघांनीही वाहून घेतले होते, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. मलाही त्यांचं सांगणं असायचं, ‘‘तुला स्वत:ची ओळख स्वत:च बनवायची आहे. लागेल ती मदत आम्ही करू. पण तुला रोल द्या, असे कोणालाही सांगणार नाही. आम्ही दोघांनीही कोणाकडे काम नाही मागितले. स्वत:ला सिद्ध केले आणि लोक आमच्याकडे आले. तुझ्याकडून आमची तीच अपेक्षा आहे.’’ ते शब्द अजूनही लख्ख चमकतायत मेंदूत आणि हृदयात. असे आईवडील लाभणे हे भाग्य फार कमी जणांच्या नशिबात येते.’’ सांगताहेत, निनाद देशपांडे आपले आई-पपा अरविंद आणि सुलभा देशपांडे यांच्याविषयी.
अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे
पपा आणि आई
माणूस आणि कलाकार
मला खरंच यात फरक नाही करता येत आणि मी तसा प्रयत्नही करणार नाही. दोघेही जितके श्रेष्ठ कलाकार होते तितकेच माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते. या कलाकार दाम्पत्याच्या पोटी जन्म झाल्यापासून एक उत्तम माणूस म्हणून माझ्यावर आई-पपांनी जे संस्कार केले त्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋ णी राहीन.
पपा नेहमीच आनंदी, हसतमुख! माझ्यावर रागावलेले आठवतच नाहीत. ते खाते आईकडे होते. अर्थात, ती अकारण कधीच रागावली नाही. पण स्वत: शिक्षिका असल्याने शिस्त होतीच. मात्र ‘छडी लागे छम छम’ पद्धतीची नव्हती. समजावून सांगायची, पण त्यातही एक ठामपणा होता. पपा आणि आई दोघांच्याही कुटुंबात रंगभूमी कैक पिढय़ांपासून होती. पपांचे आजोबा ‘महाराष्ट्र संगीत नाटक मंडळी’ या संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळातील एका नामांकित कंपनीचे आधारस्तंभ होते तर आईचे वडील वसंतराव कामेरकर हे ‘एचएमव्ही’मध्ये वरिष्ठ ध्वनिमुद्रणकार होते.
मला आमचे रानडे रोडवरचे घर अजूनही आठवते, जिथे दशरथ पुजारी, बाबूजी सुधीर फडके, जितेंद्र अभिषेकी आदी दिग्गजांच्या मैफिली व्हायच्या. आई-पपांचे लग्नच मुळात ‘रंगभूमी सोडायची नाही’ या अटीवर झाले होते. त्या दोघांची घरे साधारण चार-पाच मिनिटांच्या अंतरावर होती, त्यामुळे मी दोन्हीकडे वाढलो. शाळा पण जवळच. बालमोहन विद्यामंदिर! आई, पपा आणि दादासाहेब रेगे यांनी नकळत्या वयात जे संस्कार केले ते कळत्या वयात झालेल्या ‘आविष्कार चंद्रशाळे’च्या संस्कारांइतकेच महत्त्वाचे होते. माझी बालवर्गात असतानाची आईची एक आठवण अजूनही ताजी आहे. मी शाळेतून एक खडू घेऊन घरी आलो होतो. तो आईने माझ्याबरोबर ताबडतोब उलटपावली येऊन शाळेत परत द्यायला लावला होता. ‘जे आपले नाही त्याला हात नाही लावायचा’ हे मी त्या वयात शिकलो, ते आजतागायत!
पण एक गोष्ट मात्र नक्की की पपा किंवा आई ते फक्त ‘माझे’ कधीच नव्हते. ‘आविष्कार चंद्रशाळे’च्या तमाम बालगोपाळांचे ते आई आणि पपाच होते. जसे अरुण काकडेकाका. आई आणि पपांनी एक वर्ष पूर्णपणे व्यावसायिक रंगभूमी करायची असे ठरवले. ‘आविष्कार’ होतेच. ती मानसिक गरज होती. पण बरोबरीने आर्थिक बाजू सांभाळणेही भाग होते. १९७४-७५ मध्ये मलासुद्धा स्वावलंबनाची सवय लागावी म्हणून बालमोहन शाळेच्याच तळेगाव दाभाडे इथल्या ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’ या शाळेच्या वसतिगृहात त्यांनी मला एक वर्ष पाठवले. खरं तर इतक्या मोठय़ा कलाकार दाम्पत्याचा मुलगा असणे हे जसे माझे भाग्य आहे, तशीच माझ्यावर ते नाव राखण्याची मोठी जबाबदारीही होती-आहे. एक तर आई-पपांच्या अपेक्षांवर खरे उतरायचे आणि त्याचबरोबर त्यांचा मुलगा म्हणून इतरांच्या.. सोपे काम नाहीय भाऊ!
आईकडून तिचा मनस्वीपणा जसा माझ्यात आलाय तसाच पपांकडून त्यांचा मिश्किलपणाही. पपांकडे प्रचंड ‘सेन्स ऑफ ह्य़ुमर’ होता. एक आठवण सांगतो. पपांनी एका मोठय़ा कंपनीचे स्टीलचे कपाट ऑर्डर केले होते. दोन-तीन वर्षे झाली तरी ते घरी येईना. एक दिवस पपा त्या दुकानात गेले आणि म्हणाले की कंपनीचा कोणी वकील आहे का. मला मृत्युपत्र करायचंय. म्हणजे मी गेल्यानंतर माझ्या मुलाच्या नावावर हे कपाट होईल. खरं सांगतो. दुसऱ्या दिवशी कपाट घरी आलं. त्यानंतर आम्ही चार-पाच जागा बदलल्या असतील, पण ‘ते’ कपाट अजूनही माझ्याकडे आहे आणि राहील.
आई छबिलदास मुलींच्या शाळेत शिक्षिका होती. त्यावेळच्या आईच्या विद्यार्थिनी अजूनही फोन करतात. मला वाटते ती आत्मीयता हल्लीच्या शिक्षकांमध्येही नाहीय आणि विद्यार्थ्यांमध्येही. ‘आविष्कार’च्या उभारणीत आई, पपा, काकडेकाका, विजय तेंडुलकरकाका, माधव साखरदांडे, प्रेमा साखरदांडे अशा अनेक जणांचा हातभार होता.
‘आविष्कार चंद्रशाळे’ने जेव्हा ‘दुर्गा झाली गौरी’ हे नृत्यनाटय़ गुरू पार्वतीकुमारांच्या आणि पुरवसरांच्या मार्गदर्शनाखाली बसवायला घेतले तेव्हा माझ्यासकट अनेक मुलांच्या दृष्टिकोनात आणि जीवनात आमूलाग्र बदल झाला. ‘दुर्गा.’ हे एक अत्युत्तम सांघिक महाकाव्य होते. माधव साखरदांडेचे लिखाण, नेपथ्य आणि वेशभूषा प्रदीप मुळें यांची, शशांक आणि सुनील कट्टींचे संगीत, पार्वतीकुमारांची रचना सोबत चंदर होनावर यांची अनोखी प्रकाशयोजना. जगावेगळा अनुभव. तीन-चार महिने तालमी चालल्या. मे महिन्याच्या सुट्टीत सकाळी नऊ ते रात्री नऊ, दोन डबे आणि अभ्यासाची पुस्तके घेऊन साठ-सत्तर मुलं-मुली ‘छबिलदास’ शाळेच्या हॉलमध्ये एकत्र यायची. काकडेकाका आणि आई-पपांवर पूर्णत: विश्वास ठेवून पालकही निर्धास्तपणे घरी जायचे. पण जसजसे नाटक आकार घेऊ लागले तसतशी पालकांची उपस्थितीही वाढू लागली. अर्थात इतर सर्व मुलांना जी वागणूक मिळायची तीच मलाही. त्यांचा मुलगा असल्याची कसलीच मुभा नव्हती, उलट माझ्यावर वेगळी जबाबदारी होती. तालीम संपल्यावर जवळपास राहणाऱ्या सर्व मुलींना घरपोच सोडून शेवटी मावसबहीण क्षमाला पोहचवून मी घरी जायचो. एकदाच कधीतरी मी क्रिकेटची मॅच पाहायची म्हणून लवकर घरी पळालो होतो. आईला कळले मात्र, तिने उलटपावली मला परत पाठवले आणि सर्वाना घरी सोडूनच परत यायचे अशी तंबी दिली. तेव्हापासून कानाला खडा. अर्थात यामागे इतर मुलांच्या काळजीबरोबरच स्वत:च्या मुलाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणे हाच उद्देश होता.
मी शाळेत असताना असाही एक काळ होता, जेव्हा आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती. पण आई-पपांचा एकमेकांवर ठाम विश्वास होता. त्या काळातही मला त्यांनी काही कमी पडू दिले नाही, पण त्याचबरोबर गोष्टी गृहीत न धरणे हेही शिकवले. तेव्हा आम्ही आईच्या माहेरी म्हणजे कामेरकरांकडे राहत होतो. आमचे नवे घर तयार व्हायला पाच-सहा वर्षे लागली. तोपर्यंत सगळे आजीकडे दोन खोल्यांमध्ये.
आईपपांचे समकालीन रंगकर्मी, कमलाकर आणि लालन सारंग. दामू आणि ललिता केंकरे. विजय तेंडुलकर आणि भेंडे पती-पत्नी.. सगळे दिग्गज. आई पपांचा मित्रपरिवार फक्त रंगभूमीपुरता मर्यादित नव्हता. राजकीय, उद्योग क्षेत्र, सामाजिक क्षेत्र यात त्यांचे अनेक मित्र होते. केवळ कलाकार म्हणून नाही तर एक माणूस म्हणून दोघेही किती श्रेष्ठ होते हे शब्दात नाही सांगता येणार. प्रीमियर ऑटोमोबाईलचे सर्वेसर्वा विनोद दोशी आणि त्यांच्या पत्नी शरयू दोशी हे तर आमच्या कुटुंबाचाच भाग होते. विनोदकाका पपांचे कॉलेजपासूनचे मित्र. त्यावेळी त्यांनी पपांच्या प्रेमाखातर नाटकांतून कामेही केली.
‘रंगायन’मधून वैचारिक मतभेदांमुळे बाहेर पडल्यानंतर रंगभूमीवरच्या प्रेमाखातर आई-पपा, काकडेकाका आदी समवयस्क आणि समविचारी मंडळींनी ‘आविष्कार’ची स्थापना केली. हे नाव सुचवले आईने. आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय हा त्यामागचा विचार. पहिलंच नाटय़पुष्प बादल सरकारांचे ‘तुघलक’. हे शिवधनुष्य होते. अनेक पदरी नेपथ्य, पीरियड ड्रामा असल्याने तशी वेशभूषा-संगीत- प्रकाशयेजना- सगळेच भव्य. प्रसिद्ध प्रकाशयोजनाकार तापस सेन यांनी त्यासाठी वेळ काढला. दामू केंकरे- विनोद आणि शरयू दोशी या प्रयोगात कोण गुंतले नव्हते विचारा. त्या काळचा मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अरुण सरनाईक ३५-४० दिवस सगळी शूटिंग्स् बंद ठेवून यात गुंतून गेला. सांगायचा उद्देश हाच की रंगभूमीवरचे प्रेम आणि निष्ठा आई-पपांना जीव की प्राण होती.
‘दुर्गा..’चे आमचे दौरे व्हायचे होते. लहान मुलांची एक बस आणि मोठय़ांची एक बस. का कोण जाणे पण मला बससमोर नारळ फोडायला द्यायचे नाहीत. योगायोगाने का होईना, पण दोन-तीन वेळा मी नारळ फोडल्यानंतर त्या बसला काही ना काही अडचण आली होती. तशी एका पुण्याच्या दौऱ्यावेळीही आली. मी नारळ फोडला. पहिल्यांदा पनवेलजवळ बसचा रेडिएटर फाटला मग पुढे टायर पंक्चर झाला. तो टायर काढला. कर्जतला डेपोमध्ये नेला. तिथून दुसरा टायर आणून चढवला. बाकी सगळी मुले हुंदडत होती. पण मी ड्रायव्हर आणि क्लीनरला मदत करत होतो. घामाने भिजलो होतो. कपडे खराब झाले होते. पण मला माझ्यावरच्या जबाबदारीची जाणीव होती. पाच-सहा तासांच्या उशिराने बस पुण्याला पोहोचल्यावर पपांनी सगळी परिस्थिती जाणून घेतली आणि पहिला प्रश्न विचारला, ‘टायर पंक्चर झाला तेव्हा निनाद काय करत होता?’ मी काय काय केले हे कळल्यावर.. ते फक्त हसले. मला पावती मिळाली. आई-पपांच्या चेहऱ्यावरचे ते हसू मला बरंच काही सांगून गेले. देऊन गेले.
नाटकातील सर्वच मुलांमध्ये पपांबद्दल आदर आणि प्रेम तर होतंच, पण धाकही होता. एक प्रसंग असा आला होता की एका गोष्टीवर मुलांमध्ये दोन गट पडले. सह्य़ांची मोहीम काढली गेली. पपा शांतपणे म्हणाले की जर असा काही प्रकार करायचा असेल तर मी ‘दुर्गा’ बंद करेन. आईनेही मुलांना समजावले. मुलांना चूक कळली. कधी-कधी प्रेमाबरोबरच शिस्तही आवश्यक असते ती अशी. आज ३७ वर्षांनंतरही ‘दुर्गा’चे आम्ही सगळे जण एकमेकांच्या संपर्कात आहोत. अजूनही आमच्यापैकी प्रत्येकाचे पाय ठामपणे जमिनीवरच आहेत. काही जण कर्तृत्वाने खूप मोठे झाले. सुकन्या, संध्या पोरेचा, मेघा, निशिगंधा वाड, प्राजक्ता दिघे, वरदा पंडित, सुषमा सावरकर, उषा-सुपर्णा किती नावे घेऊ. यातल्या काहींनी डॉक्टरेट मिळवलीय. काही जणींनी परदेशात ‘दुर्गा’चे प्रयोग बसवले. आजही आम्ही एकमेकांसाठी १९८२ मधलेच आहोत. आई-पपांचे त्या वयात झालेले संस्कारच त्या मागे आहेत.
पपांनी दिग्दर्शित केला तो ‘शापित’ हा चित्रपट खूप गाजला होता. राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे रजतकमळही मिळाले होते. हृदयविकाराच्या झटक्यामुळे पपांना तो चित्रपट मध्येच सोडावा लागला. जो पुढे राजदत्त यांनी पूर्ण केला. त्यात माझीही एक महत्त्वाची भूमिका होती. पण त्यासाठी मला इतर मुलांबरोबर स्क्रीन टेस्ट द्यावी लागली आणि निवड समितीत पपा नव्हते. या चित्रपटाच्या शूटिंगच्या एके दिवशी मला बोलावून घेतले, पूर्ण दिवस बसवून ठेवले. एकही शॉट माझ्यावर चित्रित झाला नाही. माझ्या डोक्यात हवा गेली होती, तिरमिरीत मी म्हटलं, ‘‘माझा दिवस फुकट घालवला, आता मी दुसऱ्या दिवशी येणार नाही.’’ कोणी तरी हे पपांपर्यंत पोहचवले. घरी आल्यावर पपा म्हणाले, ‘‘हे बघ निनाद, तू दिवस दिलायस ना, तेव्हा तक्रार करायची नाही. शूटिंग झाले, उत्तम. नाही झाले तर त्यापाठी अनेक कारणे असतात. ते विचारण्याइतका तू अजून मोठा नाही झालास.’’ हे वाक्य माझ्यासाठी ब्रह्मवाक्य झालं. आपण दिवस दिलाय ना, मग त्यात शूटिंग करायचे की नाही.. किती करायचे हा विचार करण्यासाठी वेगळे लोक आहेत. त्याचमुळे आजही दिवसाचे बारा तास शूटिंग झाले किंवा फक्त एक तास झाले काय माझी तक्रार नसते. आई-पपांनी माझी सतत पाठराखण केली, पण कोणाकडे भलामण नाही केली. जे करायचंय ते स्वत:च्या हिमतीवर आणि कुवतीवर कर, अरविंद आणि सुलभा देशपांडेंचा मुलगा म्हणून नको, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. ते म्हणायचे, ‘‘तुला स्वत:ची ओळख स्वत:च बनवायचीय. लागेल ती मदत आम्ही करू. पण तुला रोल द्या असे कोणालाही सांगणार नाही. आम्ही दोघांनीही कोणाकडे काम नाही मागितले. स्वत:ला सिद्ध केले आणि लोक आमच्याकडे आले. तुझ्याकडून आमची तीच अपेक्षा आहे.’’ ते शब्द अजूनही लख्ख चमकतायत मेंदूत आणि हृदयात. असे आई वडील लाभणे हे भाग्य फार कमी जणांच्या नशिबात येते. कलाकार म्हणून त्यांचा स्तर गाठणे जमणार नाही कदाचित, पण माणूस म्हणून त्यांच्या अपेक्षांना जागण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. त्यात तसूभरही कसूर नसेल.
एक कलाकार म्हणून पपांचे आणि आईचे मराठी रंगभूमीसाठी योगदान वादातीत होते. व्यावसायिक तसेच समांतर रंगभूमीसाठी दोघांनीही वाहून घेतले होते, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. मराठी नाटकांच्या इतिहासात काही भूमिका आठवल्या की एका विशिष्ट कलाकाराचे नाव आपोआप जोडले जाते. जसे ‘तुझे आहे तुजपाशी’ मधले ‘वासुअण्णा’ म्हटलं की अरविंद देशपांडे हे नाव डोळ्यासमोर येते. तसेच ‘ती फुलराणी’मधले प्रोफेसर, ‘अजून यौवनात मी’मधले वायकूळ किंवा ‘प्रेमाच्या गावा जावे’ या अजरामर नाटकातले आजोबा, ‘शांतता कोर्ट चालू आहे’मधले सुखात्मे वकील अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. ‘पाहिजे जातीचे’मधला बेरकी चेअरमन नवीन आलेल्या प्रोफेसरला उद्देशून ‘आम्ही तुम्हाला ठेवले’ अशा काही सुरात उच्चारायचा की हास्यकल्लोळ उठायचा.
एक घटना अजून आठवतेय, त्यावेळी ‘नाटय़दर्पण रजनी’ व्हायची. साधारण २५ वर्षे हा उपक्रम चालला. ज्या वर्षी मोहन वाघांच्या ‘चंद्रलेखा’ संस्थेचे ‘प्रेमाच्या गावा जावे’ हे नाटक रंगमंचावर आले, त्या वर्षी आई आणि पपा ‘नाटय़दर्पण रजनी’चे सूत्रधार होते. या नाटकात पपांची ‘आजोबा’ ही मध्यवर्ती भूमिका होती. खरं तर आजोबा हे त्या नाटकाचे हिरो होते. नेमकं त्यांना त्या वर्षी विशेष लक्षवेधी अभिनेताचा पुरस्कार जाहीर झाला. पपांनी उद्घाटनाच्या भाषणातच सांगितले की आजोबाची मध्यवर्ती भूमिका असल्याने मी विशेष लक्षवेधी अभिनेता हे पारितोषिक मी स्वीकारणार नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की मी सूत्रसंचालन करणार नाही. तो विषय वेगळा..हे कार्य वेगळे. त्यांनी नाही स्वीकारले पारितोषिक. आयुष्यभर आई-पपांनी एक तत्त्व जपले. ते म्हणजे तत्त्वाशी तडजोड नाही. त्यामुळे त्यांना जितके महत्त्व मिळायला पाहिजे होते तितके मिळाले नाही, असे मला वाटते.
सुलभा देशपांडे हे नाव उच्चारले की ‘शांतता कोर्ट’मधली बेणारेबाई डोळ्यांसमोर उभी राहते. आईने ती भूमिका केवळ तिच्यासाठीच लिहिली असावी अशी अजरामर केली. विशेषत: बेणारेबाईचे नाटकाच्या शेवटी असणारे भलेमोठे स्वगत! नाटय़लेखनातला एक कळसाध्याय समजतात. त्याचीही एक वेगळीच कहाणी आहे. लेखक म्हणून विजय तेंडुलकरांना त्याची गरज वाटत नव्हती. मात्र एक दिग्दर्शक म्हणून पपांना ते अत्यावश्यक वाटत होते. ‘फरफट झालेल्या बेणारेबाईंनी आपल्या मनाची व्यथा मोकळेपणाने मांडली नाही तर त्या भूमिकेला न्याय मिळणार नाही’ या एक दिग्दर्शक म्हणून आपल्या मतावर पपा शेवटपर्यंत ठाम राहिले आणि एका अजरामर स्वगताचा जन्म झाला.
आई-पपांनी नाटक आणि रंगभूमीला एक व्यवसाय न मानता सर्वस्व मानले. आईने पपांपेक्षा अधिक हिंदी रंगभूमी केली. पंडित सत्यदेव दुबे, अमरीश पुरी, अमोल पालेकर अशा सगळ्या दिग्गजांसह कामं केली. आमच्या माहीमच्या घरी आई आणि सत्यदेव दुबे या दोघांचे संवादापेक्षा वादच जास्त व्हायचे. अर्थात सगळे रंगभूमीशी निगडित. दुबेजींच्या मते आई ही नटीच नव्हती. अर्थात त्यांची स्वत:ची काही कारणे होती. गंमत अशी की आमच्याकडे एक कुत्रा होता, सनी. पोमेनेरियन जातीचा, पांढराशुभ्र. त्या बिचाऱ्याच्या मते घरी आईचा आवाज शेवटचा. त्यावर कोणी आवाज चढवला की तो सरळ त्याच्या अंगावर धावायचा. आणि दुबेजींची एक खासियत होती. ते तावातावाने वाद घालायचे आणि सनी त्यांच्या अंगावर धावून जायचा. शेवटी ते शेजारी माझ्या मावशीकडे- म्हणजे डॉ. ज्योत्स्ना कार्येकरांकडे यायचे आणि आईला तिथे बोलवून घ्यायचे. आई तिची प्रत्येक भूमिका शब्दश: जगली. हिंदी चित्रपटातही आईने विविध भूमिका केल्या. भूमिका कितीही छोटी असली तरी आईमुळे ती लक्षात राहायची. चौकट राजामधली तिची ‘आई’ प्रभावळकरांच्या भूमिकेइतकीच गाजली. १९७५ मध्ये पपांनी ‘डार्लिग डार्लिग’ नावाचा फार्स बसवला होता. अशोक सराफ यांचे मला वाटते रंगभूमीवरचे पदार्पण असावे. नाटकात विनोदाचे दोन बादशहा होते. राजा गोसावी आणि अशोकमामा. आईचे ‘घेतले शिंगावर’ हे नाटकही गाजले होते. आई, अविनाश मसुरेकर, रमेश देशपांडे- मस्त कास्ट होती. त्या नाटकावर ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा मराठी चित्रपटही त्यावेळी येऊन गेला. त्यातली अशोक सराफांची सॅनिटरी इन्स्पेक्टरची भूमिका लक्षवेधी होती.
माझे आई-पपांबरोबरचे नाते म्हटले तर सरळ साधे पण तरीही थोडे वेगळे होते. लहानपणापासून आई-पपांना समाजात मिळत असलेला आदर डो़ळ्यासमोर असल्याने अभिमान होताच, शिवाय आपलेपणापलीकडचा आदरही होता. खरे सांगतो, अजूनही विचारल्याशिवाय मी सुलभा आणि अरविंद देशपांडेंचा मुलगा आहे असे स्वत:हून सांगत नाही. थोडंफार रंगभूमी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्यामुळे लोक ओळखतात आणि आपोआपच नाव आणि नातं जोडलं जातं. ‘स्वत:ची ओळख स्वत: निर्माण कर’ हे माझ्या आईवडिलांचे शब्द सतत मला साथ देतायत.
आईची माझ्या लहानपणीची अजून एक आठवण आहे. मी पाच-सहा वर्षांचा असेन. मला खूप ताप आला होता आणि दुबेजींच्या एका नाटकासाठी आईला कोलकाताला जायचे होते. दुबेजी आईला न्यायला आले. मनात आलं, ‘मी आजारी असताना हा माणूस माझ्या आईला घेऊन चाललाय.’ मी इतका रागावलो होतो त्यांच्यावर की पुढची दोन वर्षे त्यांच्याशी बोलत नव्हतो. आता आठवले की हसायला येते.
पपा गेले तो दिवस मला अजूनही आठवतोय. शुक्रवार होता. ते गच्चीत फिरून आले आणि त्यांना दरदरून घाम फुटला. तातडीने केईएममध्ये दाखल केलं, पण ह्रदयविकाराचा तो तीव्र झटका होता. नाही वाचवू शकलो त्यांना. त्या दिवशी मला वडिलांपेक्षा माझा मित्र गेल्यासारखं वाटलं. त्यांच्या शेवटच्या क्षणांत मी त्यांच्याबरोबर होतो याचे समाधानही आहे. ते गेल्यानंतर गेली ३२ वर्षे ‘आविष्कार’तर्फे ‘अरविंद देशपांडे स्मृतीमहोत्सव’ भरवला जातोय. आईनेही तिच्या शेवटच्या दिवसांत खूप दु:ख सोसलं. तिला झालेल्या असाध्य आजाराने तिची शारीरिक क्षमताच संपली होती. आयुष्यभर सतत कार्यरत राहिलेल्या आईला अंथरुणावर खिळलेले पाहवत नसे. पण एक समाधान होते की शेवटच्या दिवसात ती पपांसारखीच आपल्या माणसांमध्ये होती. दोघांच्याही अंत्ययात्रेला उसळलेला जनसमुदाय त्या दोघांच्या जनप्रियतेची साक्ष होता. एक समान गोष्ट होती दोन्ही अंत्ययात्रांमध्ये- त्यात सामील झालेली असंख्य लहान मुले!
ninad2407@yahoo.co.in
chaturang@expressindia.com