वसुंधरा साबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘महाराष्ट्राचे शाहीर ठरलेल्या बाबांनी लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली. कार्ल मार्क्‍सचा कम्युनिझमचा विचार अशिक्षित कामगारांनाही समजेल अशा भाषेत, पोवाडय़ाच्या रूपात लिहून काढला, ‘मोबाईल थिएटर’ची कल्पना खिशाला खार लावून साकार करण्याचं धाडस दाखवलं. काळाच्याही पुढे पाहणारी प्रहसनं, मुक्तनाटय़ं लिहिली.. ते उत्तम गायक तर होतेच, पण उत्तम संगीतकार, अभिनेते आणि निर्मातेही होते. खरं म्हणजे आपल्याकडे लोककलाकारांना फार सन्मानाची वागणूक मिळत नाही. पण बाबांनी स्वत:च्या गुणांवर ती मिळवली. त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ही मिळाला, पण त्यापुढची पद्म पुरस्कार मिळण्याचीही त्यांची योग्यता होती.’’ सांगताहेत कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात शाहीर साबळे यांची कन्या वसुंधरा साबळे.

१२ वर्षांच्या लग्नाच्या गाठी तोडण्याचा निर्णय जेव्हा माझ्या आई-वडिलांनी घेतला तेव्हा त्यांच्या पदरात चार मुलं होती..तीही अवघी ७ ते ३ या वयोगटातली.. या फारकतीचं कारण काय असावं यावर घरात कधीच वाच्यता झाली नसल्याने आम्हीही त्याबद्दल अनभिज्ञ होतो. खरं तर त्या दोघांचा प्रेमविवाह होता. माझी आई भानुमती ही फलटण इथल्या डॉ. बारसोडे या सुस्थितीतल्या ब्राह्मण कुटुंबातली मुलगी होती आणि बाबा साताऱ्यातल्याच वाई तालुक्यातल्या पसरणी गावात राहाणाऱ्या एका निर्धन मराठा कुटुंबातील थोरले चिरंजीव. ती उत्तम कविता करायची. त्या दोघांनी एकमेकांच्या गुणांवर प्रेम केलं की कसं हे मला तरी माहीत नाही, पण आईने अगदी घरातून पळून येऊन बाबांशी लग्न केलेलं.

आई-बाबांच्या लग्नाची कथाही गमतीशीर आहे. बाबा फलटणवरून आईला घेऊन पसरणीत आले त्याच्या दोन दिवसांनी गावची जत्रा सुरू होणार होती. भानुमतीला त्यांनी आपल्या घरी न नेता मित्राच्या घरी ठेवलं. मित्राने त्याच्या घरात ‘पावणी जत्रा बघाय आलीय,’ असं सांगून वेळ मारून नेली खरी, पण पुढे हालचाल झटपट करायला लागणार होती.. शेवटी वाईत राहाणाऱ्या जेजुरीकर नावाच्या एका वयस्कर समाजसुधारकाच्या कानावर बाबांनी ही गोष्ट घातली. त्या काळी ब्राह्मण आणि मराठा यांच्यातला विवाह ही सरसकट होणारी घटना नव्हती. शेवटी जेजुरीकरांनी ऐन जत्रेत गर्दी गडबडीत लग्न उरकून घ्यायचा निर्णय घेतला. धडधडत्या काळजाने बाबांनी तो मान्य केला खरा, पण स्वत:च्या घरातही याची वाच्यता केली नाही.

जत्रा जोमात सुरू झाली. बाबांची आई घरी जत्रेच्या ताज्या पोळ्या करायच्या गडबडीत होती आणि वडील देवळात देवदर्शनाला गेले होते. बाबांचे वडील देवळाकडून चावडीकडे यायला निघाले आणि एक गावकरी त्यांना आश्चर्याने विचारू लागला, ‘‘अवं साबळे हितं काय करताय? तिकडं पारावर तुमच्या लेकाचं लगीन लागतंय की..’’ आजोबा झपाझप पावलं टाकत पाराकडे निघाले. इकडे घरी पोळ्या करत बसलेल्या आईला एका शेजारणीनं येऊन गडबडीत सांगितलं, ‘‘लक्ष्मे पोळ्या टाक तिथंच, तुझ्या लेकाचं लगीन लागतंय म्हनं पारावर.’’ आजी पोळ्यांचा हात लुगडय़ाला पुसत पळत सुटली.. लग्न लागून गेलं होतं.. काय करणार? आजोबांनी बाबांना सुनेला घरी घेऊन यायला सांगितलं. तसे बाबा आईला घेऊन घराकडे आले. ते दोन-तीन खणी अंधारघर बघून ऐसपस वाडय़ात राहणाऱ्या भानुमतीच्या मनात प्रथम काय विचार आले असतील याचा मी आजही विचार करते. दरिद्री घराच्या उंबरठय़ावर नवी नवरी आली. आजोबांनी नव्या सुनेच्या हातावर ‘ज्ञानेश्वरी’ ठेवत ‘मी तुला इतकंच देऊ शकतो,’ म्हणत आशीर्वाद दिला आणि माप ओलांडून भानुमतीने सुखवस्तू आयुष्यातून एका खडतर आयुष्यात प्रवेश केला. वरणभात, तूप खाणारी मुलगी एकदमच कोरडय़ास-भाकरीच्या जगात आली होती. पण बाबांना आईच्या भावना समजत होत्या. त्यावर त्यांनी पुढे अनेक मार्ग काढत आईला होईल तितकं सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला होता.

चार मुलं होईपर्यंत हा संसार बहुतेक रेटतच चालला असावा. कारण मूल झाल्यावर आई म्हणून त्यांच्या संगोपनासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो हे बहुधा आईला ज्ञात नसावं. बाबाच रात्रीचे कितीही दमून आले तरी आम्हा मुलांना दूध गरम करून पाजत बसण्याचं काम करायचे. मात्र ज्यावेळी दोघांनी विभक्त व्हायचा निर्णय घेतला तेव्हा आई आम्हा चारही मुलांना घेऊन माहेरी निघून गेली आणि मुलांविना जगताना बाबांना ब्रह्मांड आठवलं.. मुलं आपल्याच ताब्यात असावीत म्हणून बाबांनी आईच्या बहिणीचा म्हणजेच माझ्या मावशीचा आणि तिच्या पतीचा आधार शोधला. ते दोघेही आई-बाबांचा संसार जवळून पाहात होते. कोण चुकीचं कोण बरोबर हे त्यांना पूर्ण माहीत होतं. त्यामुळेच दोघांनीही मदतीचा हात दिला आणि आम्ही चारही भावंडं बाबांकडे परत आलो.

खरं म्हणजे तो काळ बाबांच्या उमेदीचा काळ होता. आपल्या लोकगीतांच्या आणि प्रहसनांच्या माध्यमातून बाबा आता  कुठे लोकप्रिय होऊ लागले होते. त्यात आमची चौघांची जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर घेतली. चौघांमध्ये आम्ही तिघी मुलीच. आमचं सगळं बाबाच करत होते. त्यावेळी त्यांचं ‘यमराज्यात एक रात्र’ हे मुक्तनाटय़ व्यावसायिक रंगभूमीवर गाजत होतं.. तसं बघायला गेलं तर आईला एक कवयित्री म्हणून बाबांनी पूर्ण प्रोत्साहन दिलं होतं. लग्नानंतर जेवढी प्रहसनं, मुक्तनाटय़ं त्यांनी केली, त्यात गाणी लिहिण्याची संधीही त्यांनी आईलाच दिली होती. मुंबईत आणि मुंबईबाहेर होणाऱ्या कविसंमेलनात भाग घ्यायला प्रोत्साहनही दिलं होतं. इतकंच काय, पण लग्न होताना मॅट्रिक पास असणाऱ्या आईचं पुढचं शिक्षणही त्यांनी पूर्ण करायला लावलं होतं. ते स्वत: सातवीही पास नव्हते. पण आईला आणखीन काय हवं होतं हे मला कधीच समजलं नाही..

घटस्फोटानंतर जवळपास तीन वर्ष बाबांनी एकटय़ाने आमचा सांभाळ केला. त्यावेळी आम्ही काळाचौकी इथल्या ‘अभ्युदय नगर’मध्ये राहात होतो. शेजारीही मदत करत होते, पण कोण किती दिवस मदत करणार? आता बाबांचं कामही वाढू लागलं होतं. व्यवहार आणि संसार याचा ताळमेळ घालताना त्यांची पुरती दमछाक होत होती. शेवटी मित्रांच्या सततच्या सल्ल्याला मानून त्यांनी दुसरं लग्न करायचा निर्णय घेतला..

पण त्या तीन वर्षांत बाबांनी जास्तीत जास्त आईची भूमिका निभावली होती. आम्ही तिघी बहिणी लहान होतो. त्यामुळे आमच्या केसांची निगाही बाबाच राखत होते. आमचे केस धुणं, विंचरणंही करत होते. त्यांना आमच्या वेण्या घालता यायच्या नाहीत. मग ते एक किंवा दोन पोनी टेल बांधून द्यायचे. पण त्यांची स्वच्छता या फ्रंटवर लढणं बाबांसाठी कठीण होऊन बसलं. मग त्यावर उपाय म्हणून त्यांनी आमचे केसच कापून टाकले. मला हे सगळं आजही आठवतं. कधी फार मोठय़ा दौऱ्यावर जायचं असेल तर ते आम्हाला गावी आमच्या आजोळी सोडून जात असत. पहिल्यांदाच अशी वेळ आली तेव्हा त्यांनी जड अंत:करणाने आम्हाला गावी नेऊन सोडलं खरं, पण तेव्हा धाकटी बहीण अवघी तीन वर्षांची होती. तिला सोडून जाताना त्यांचे डोळे सतत पाणावत होते आणि तिनेही रडून आकांत मांडला होता. शेवटी मुंबईवरून नेलेला रावळगांवच्या गोळ्यांचा मोठा डबा त्यांनी जमिनीवर ओतला आणि त्यावर तिला बसवून तिचं रडू थांबण्याची वाट न बघता ते गाडीत बसून निघून गेले.. पुढे प्रवासभर तिचं रडू आठवून त्यांचे डोळे सतत भरून येत होते हे नंतर त्यांनीच सांगितलं.. कदाचित दुसरं लग्न करण्याच्या निर्णयाचं हेही कारण असेल. दुसऱ्या आईला आम्ही माई म्हणू लागलो आणि मुलांच्या संगोपनाची मोठी जबाबदारी बाबांच्या शिरावरून उतरुन माईच्या शिरावर गेली. तसं असलं तरी आमच्यावरचं लक्ष त्यांनी तसूभरही कमी केलं नाही. त्यांच्या आत झिरपलेलं आईपण नंतरही बरीच वर्ष टिकून राहिलं.

बाबा कलेच्या क्षेत्रात भरारी मारत होतेच. रेडिओवरचे अव्वल दर्जाचे आणि जास्त रेकॉर्ड्सची विक्री होणारे गायक म्हणून त्यांचा लौकिक वाढत होता. त्या काळात लता मंगेशकर, सी. रामचंद्र, मा. भगवान अशा हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या कलावंतांशीही त्यांची जवळीक वाढू लागली होती. आता जरा मोकळेपणाने ते आपले पंख पसरू शकत होते. आजकाल पालक व्यक्तिमत्त्व विकासासाठी मुलांना एखाद्या शिबिराला पाठवतात. पण बाबा मात्र स्वत: जातीने लक्ष घालून आमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करत होते. आपली मुलं काळी-सावळी असली तरी त्यांनी रुबाबदार दिसावं, नीटनेटकं राहावं याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. ‘ताठ बसा, पोक काढू नका, हळू बोला, जेवताना तोंडाचा आवाज करू नका, हाताची नखं स्वच्छ ठेवा’ हे सर्व ते जातीने लक्ष घालून आमच्या मेंदूत ठसवत असत. इतकंच नाही तर आम्ही पाय ओढत न चालता पाय उचलून टाकत चालावं म्हणून ते छडी घेऊन आमच्या मागेमागे शाळेपर्यंत येत असत.

बाबा आणि माईचं लग्न झालं आणि आम्ही अभ्युदयनगर सोडून परेलच्या आंबेकरनगरमध्ये राहायला आलो. नवीन घरात पाय ठेवताना आधी वास्तुशांती करायला हवी किंवा कमीत कमी गणेशपूजन तरी करायला हवं हे बाबांच्या गावीही नव्हतं. पण आपल्या लेकीचा नवा संसार नव्या घरात सुरू होणार म्हणून माईच्या वडिलांनी हट्टाने तिथे पूजा करायला लावली. नवीन नातलग म्हणून बाबांनी ते जरी खपवून घेतलं असलं तरी देवदेव करणं, पूजा करणं, पोथ्या वाचणं या प्रकारांपासून ते खूप लांब होते. अगदी ग्रामदैवत भरवनाथाच्याही देवळात ते जात नसत. दुरून कळसाला केलेला नमस्कार त्यांच्यासाठी पुरेसा असायचा. खान्देशात आजोळी असताना गाडगेबाबांच्या विचारांचा प्रभाव मात्र त्यांच्यात खोलवर रुजला होता. माझ्यावर बाबांच्या या गोष्टीचा फार मोठा प्रभाव पडला. माझ्याशी बाबांची जास्तच जवळीक होती. कदाचित मी तंतोतंत आईसारखी दिसते हेही त्याचं कारण असेल. पण बरेचदा ते आपल्या जुन्या आठवणी मला सांगत असत.

मुलांच्या जबाबदारीतून मोकळ्या झालेल्या बाबांनी बाहेर कामं वाढवायला सुरवात केली होती. मधल्या काळात बाबा काही नवी-जुनी प्रहसनं, मुक्तनाटय़ करत होते. पण मुंबईत मराठी माणसाची पीछेहाट होतेय या विषयावर बाबांची प्रबोधनकार ठाकरे (दादा) आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर चर्चा होऊ लागली आणि ‘शिवसेना’ या नावाने संघटना स्थापन करायचा निर्णय बाळासाहेबांनी घेतल्यानंतर बाबांनी ‘आंधळं दळतंय’ हे मराठी माणसांच्या डोळ्यात चरचरीत अंजन घालून त्यांचे डोळे खाडकन उघडतील असं मुक्तनाटय़ रंगभूमीवर आणलं. मुळात लोकनाटय़ आणि नाटक यांचा समन्वय साधणारा मुक्तनाटय़ हा नवीन प्रकार बाबांनीच रंगभूमीला प्रदान केला होता. ‘आंधळं दळतंय’ने बाबा लोकप्रियतेच्या आणखीन वरच्या उंचीवर पोचले. पण नंतर ‘शिवसेना’ निवडणुकीच्या रणांगणात उतरताच त्यांनी संघटनेच्या कामापासून फारकत घेतली. पण ते शेवटपर्यंत शिवसेनेचेच मतदार राहिले. बाबा राजकारणात जरी पडले नसले तरी राजकारण्यांशी त्यांची चांगलीच मत्री होती. पण ही मत्री त्यांनी मित्र म्हणूनच जपली. कधीही कुणाकडेही काहीही मागायला हात पसरला नाही. नंतरच्या काळात खेडोपाडी प्रयोग करताना रंगमंचाची येणारी अडचण लक्षात घेऊन त्यांनी एका बसमधून आरामात नेता येईल अशा मोबाईल थिएटरची निर्मिती करायचा ध्यास घेतला. आणि त्या काळात स्वत:च्या डोक्यावर पाच-सहा लाख रुपयांचं कर्ज घेऊन तो पूर्णत्वालाही नेला.

पण.. इथेच सगळी माती झाली, कारण त्यानंतर लागोपाठ तीन वर्षे महाराष्ट्र ओल्या आणि कोरडय़ा दुष्काळाने कोलमडला. बाबांचं लोखंडाने बनवलेलं मोबाईल थिएटर गंज लागून मोडीत काढावं लागलं.. डोक्यावर पाच-सहा लाखांचं कर्ज घेऊन बाबा परत जिद्दीने लढायला उभे राहिले. ‘कोंडू हवालदार, कशी काय वाट चुकला?’, ‘ग्यानबाची मेख’, ‘असुनी खास मालक घरचा’ अशी मुक्तनाटय़ं त्यांनी रंगभूमीवर आणली खरी, पण त्यांचा प्रेक्षक हा पांढरपेशा नव्हता तर ग्रामीण होता. त्यामुळे कितीही उभारी धरली, तरी पंखात बळ म्हणावं तसं येत नव्हतं.. त्याचदरम्यान त्यांनी सई परांजपे लिखित ‘एक तमाशा सुंदरसा’, विजय तेंडुलकर लिखित ‘फुटपायरीचा सम्राट’ आणि चिं.त्र्यं. खानोलकर लिखित ‘माकडाला चढली भांग’ ही मुक्तनाटय़ंही रंगभूमीवर आणली होती. पण कर्जाच्या फेऱ्यातून सुटका काही होत नव्हती.

बाबांनी आपल्या कलाजीवनात अनेक प्रहसनं, लोकनाटय़ं आणि मुक्तनाटय़ं रंगमंचावर आणली. ते मुंबई येथे झालेल्या नाटय़संमेलनाचे अध्यक्षही झाले, पण मी त्यांच्याकडून एक गोष्ट शिकले, की कितीही उंचीवर गेलं तरी माणसाने आपली जमीन सोडायची नाही. त्यांनी राजकारण्यांशी असलेल्या आपल्या मत्रीचा वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोग केला नसला तरी आपल्या गावाला, पसरणीला पुरेपूर उपयोग करून दिला. गावात वीज, एस.टी, शाळेसाठी परवानगी अशा किचकट आणि वेळखाऊ गोष्टी त्यांनी तातडीने मिळवून दिल्या. गावावर आणि गावातल्या बालपणीच्या सवंगडय़ांवर त्यांचं नितांत प्रेम होतं आणि त्यांची साथ बाबांनी शेवटपर्यंत सोडली नाही. कलेच्या क्षेत्रातले खाचखळगे त्यांनी इतके अनुभवले होते, की आपली मुलं या क्षेत्रात येऊ नयेत म्हणून ते अविरत झटले. पण तरीही आम्ही सगळेच या क्षेत्राकडे वळलो. फक्त प्रत्येकाने बाबांमधला एकेक गुण उचलला होता. मोठय़ा भावाकडे देवदत्त (साबळे) गीतरचना आणि संगीत दिग्दर्शनाचे गुण आले. त्यानंतरच्या बहिणीकडे (यशोधरा) थोडंफार गाणं आलं. मी लिखाणाची बाजू उचलली तर धाकटय़ा बहिणीकडे (चारुशीला साबळे) नृत्य आलं. अर्थात

बाबा नृत्य करत नसले तरी ‘मी जर स्त्रीजन्म घेतला असता तर नक्कीच नृत्य आत्मसात केलं असतं’ असं बोलून दाखवत.

मी बाबांच्या फार जवळ होते. त्यांचा माझ्यावर बराच प्रभाव पडला. ‘जिथे हिरे वेचले तिथे गोवऱ्या वेचायला जाऊ नकोस आणि कुणी उठ म्हणेल अशा जागेवर बसू नकोस’ हे त्यांचे शब्द मी कायम लक्षात ठेवले. त्यांच्या आयुष्यातल्या कित्येक घटना ते मला सांगत असत. बालपणापासूनचा त्यांचा जीवनप्रवास त्यांनी आठवेल तसातसा मला सांगितलेला होता. थोडक्यात, काही काळ मी त्यांची सेक्रेटरीच झाले होते म्हटलं तरी गैर ठरणार नाही. जनतेने दिलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या बिरुदाचा त्यांना विलक्षण अभिमान होता. त्यापुढे इतर कोणतीही बिरुदं ते दुय्यम मानत. ‘राजकारण्याला जनता पाच वर्षांत खुर्चीवरून खाली खेचू शकते, पण मला ज्या खुर्चीवर जनतेने बसवलंय ती अढळ आहे,’ याचा त्यांना प्रचंड आभिमान होता. हे सारं मी अनुभवलं होतं. ते माझ्या आत भिनलं होतं. म्हणून कदाचित बाबांच्या रचना गुंफून, त्यांची गाणी नव्या रूपात लोकांपर्यंत पोहोचावीत हा विचार माझ्या मनात आला आणि त्यातूनच ‘महाराष्ट्राची लोकधारा’चा जन्म झाला..

आधी सांगितल्याप्रमाणे बाबा कर्जातून बाहेर पडण्यासाठी जंगजंग पछाडत होते. पण त्या काळात एकरकमी पाच-सहा लाखांचं कर्ज ही फार मोठी रक्कम होती आणि एका लोककलाकाराला ती झटक्यात फेडणं अशक्य होतं. एक काळ असाही आला की आम्ही प-पचा हिशोब करून जगू लागलो होतो. बाबांनी आयुष्यात कितीही संकटं लीलया झेलली असली तरी साठीनंतर परिस्थितीने त्यांच्यातली नवनिर्माणाची ऊर्जा क्षीण केली होती. अशा परिस्थितीतच त्यांच्या आयुष्यात ‘लोकधारा’ आलं. सुरवातीला आम्हा मुलांच्या हातात असलेली या कार्यक्रमाची सूत्रं बाबांनी आपल्या हातात घेतली आणि ‘लोकधारा’ शाहीर साबळ्यांच्या नावानेच अमर झाली. पुढे ती ‘लोकधारा’ दिल्ली ‘दूरदर्शन’वर सादर झाली तेव्हा अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. मला आनंद आहे, की माझ्या विचार आणि लेखणीतून ‘महाराष्ट्राची लोकधारा’ लिहून मी बाबांचे आमच्यावरचे पांग थोडे तरी फेडू शकले..

बाबांच्या सगळ्या आर्थिक विवंचना या एका कार्यक्रमाने कायमच्या संपवून टाकल्या आणि त्यांचं नाव अखेपर्यंत त्याच उंचीवर राहिलं. पण तरीही बाबा ‘लोकधारा’पेक्षाही त्यांनी स्वत: केलेल्या अफाट कामांमुळे लक्षात राहायला हवे होते असं मला मनापासून वाटतं. कारण त्यांनी लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली. राजा बढे याचं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत अजरामर केलं, कार्ल मार्क्‍सचा कम्युनिझमचा विचार अशिक्षित कामगारांनाही चटकन समजेल अशा सोप्या भाषेत, पोवाडय़ाच्या रूपात लिहून काढला, ‘मोबाईल थिएटर’ची कल्पना खिशाला खार लावून साकार करण्याचं धाडस दाखवलं. महत्त्वाचं म्हणजे काळाच्याही पुढे पाहणारी प्रहसनं, मुक्तनाटय़ं त्यांनी लिहिली.. ते उत्तम गायक तर होतेच पण उत्तम संगीतकार, अभिनेते आणि निर्मातेही होते. पु.ल.देशपांडे यांनी बाबा आणि त्यांचे सहकारी राजा मयेकर यांची तुलना परदेशी कलाकार बॉब होप आणि डॅनी के यांच्याशी केली होती. खरं म्हणजे आपल्याकडे लोककलाकारांना फार सन्मानाची वागणूक मिळत नाही. पण बाबांनी स्वत:च्या गुणांवर ती मिळवली. त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ही मिळाला आणि खरं तर ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ मिळण्याची त्यांची योग्यता होती.

खेडोपाडीच्या तमाशा कलावंतांसाठी निवृत्तिवेतन मिळवण्यासाठी ते खूप झटले आणि तत्कालीन महाराष्ट्र सरकारने ते दिलंही. त्यासाठी बाबांचं मान्यतापत्र आवश्यक होतं आणि बाबा दूरदुरून आलेल्या कलावंतांना आनंदाने देत असत. महाराष्ट्रभर विखुरलेल्या शाहिरांनाही त्यांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. ‘अखिल भारतीय शाहिरी परिषदे’चे ते अध्यक्षही होते. म्हातारपणी कलावंतांना दैनावस्था आली तर त्यांना त्यांचे कुटुंबीयही सांभाळत नाहीत हे लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या जन्मगावी पसरणी इथे ‘तपस्याश्रम’ही स्थापन केला. सतत आपल्या आजुबाजूच्या आणि तळागाळातल्या कलावंताची त्यांनी घेतलेली काळजी मी जवळून बघितली. आज त्यांच्या पंखाखालून निघालेले अनेक तरुण कलावंत मराठी नाटय़-चित्रपटक्षेत्रात नाव कमावून आहेत याचा अभिमान वाटतो.

कृतार्थ जीवन बाबा जगले. अगदी वयाच्या नव्वदीपर्यंत त्यांनी स्मरणशक्ती सोडून बाकी धडधाकट शरीराने जगून घेतलं. ‘मला मरण आलं तर ते झोपेत यावं,’ असं ते फार आधीपासून नेहमी बोलायचे. घडलंही तसंच. दुपारी झोपेतच त्यांनी कुणालाही कसलाही त्रास न देता आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्याइतके उत्तुंग आम्ही कुणीच होऊ शकणार नाही, पण त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर चालण्याची सद्बुद्धी आम्हाला मिळत राहो इतकीच प्रार्थना..

nimishdatt@gmail.com

chaturang@expressindia.com