वंदना खांडेकर

‘‘आईला रंगमंचावर काम करताना पाहणं हा एक वेगळाच आनंद होता. अत्यंत देखणं रूप, सुहास्यवदन, छान उंचीचा नेमस्त बांधा, भूमिकेनुरूप सहज हालचाली, अगदी घरात वावरावं असा मोकळा वावर आणि छाप पाडणारं व्यक्तिमत्त्व. आवाजात एक निसर्गदत्त ‘दर्द’! खरं तर भावगीताने आई आणि पपांची भेट घडवली. पपा स्वतंत्र प्रतिभेचे संगीतकार होते. पपांच्या सक्रिय प्रोत्साहनाने आणि स्वत:च्या अंगभूत गुणांवर मेहनत घेऊन आईनेही अलौकिक यश मिळवलं. दोघेही एकमेकांना कमालीचे पूरक. कधी आई पपा व्हायची तर कधी पपा आई व्हायचे,’’ सांगताहेत कन्या वंदना खांडेकर आई ज्योत्स्ना भोळे आणि वडील केशवराव भोळे यांच्या सांगीतिक सहजीवनाविषयी..

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”

माझ्या ओळखीच्या एका बाईंनी नुकतंच अतीव आश्चर्यानं मला विचारलं, ‘‘तुम्हाला तीन मोठे भाऊ आहेत? अहो, आम्हाला वाटायचं तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या एकुलत्या एक कन्या आहात. म्हणजे चार मुलांना वाढवत ज्योत्स्नाबाईंनी एवढं नाव, एवढं यश मिळवलं? कमाल आहे ज्योत्स्नाबाईंची, सोपं नाहीय ते!’’ अधूनमधून हा प्रश्न मला लोक विचारतातच. त्यांच्याप्रमाणे मलाही वाटतं, ‘खरंच कसं केलं असेल आईनं?’ याचं उत्तर एका शब्दात द्यायचं झालं तर,  पपा!(केशवराव भोळे) पपांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन, सक्रिय पाठिंबा आणि समंजसपणा, याशिवाय आईलाही हे शक्य झालं नसतं. अर्थात, तिचे उपजत गुण, तिचा उत्साह, जिगर, गाण्यावरचं तिचं प्रेम, या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. १९३२ च्या जानेवारीत आई-पपांचा विवाह झाला आणि माझा सर्वात मोठा भाऊ त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये जन्मला. तेव्हा आई केवळ अठरा वर्षांची होती. नुकतंच ‘संत सखूबाई’ चित्रपटात तिनं काम केलं होतं. पपांचं त्या चित्रपटाला संगीत दिग्दर्शन होतं. किशोर जेमतेम सात-आठ महिन्यांचा होतोय, तोच १ जुलै १९३३ ला ‘आंधळ्यांची शाळा’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला. नाटकात काम करण्याचा तसा तिचा पहिलाच प्रसंग. नकोच म्हणत होती ती. पण  वर्तक, पाश्र्वनाथ आळतेकर, अनंत काणेकर, आदी मंडळींनी चंगच बांधला होता, स्त्रियांना रंगभूमीवर आणण्याचा. म्हणून केशवरावांकरवी (पपा) आईला आग्रह चालला होता. शेवटी तिचा निरुपाय झाला आणि ती ‘बिंबा’च्या भूमिकेत रंगभूमीवर उभी राहिली.

‘नाटय़ मन्वंतर’चं ‘आंधळ्यांची शाळा’ हे रूपांतरित नाटक (मूळ लेखक ब्यर्नसर्न – इब्सेनचा मेहुणा) अर्थात, आधुनिक होतं. सर्वार्थानं पारंपरिक नाटकांपेक्षा वेगळं. अवधी केवळ तीन तास आणि मुख्य म्हणजे तीनच पदं, तीही भावगीतंच, अनंत काणेकरांची!  ‘मन्वंतर’ खरंच! केशवराव दात्यांच्या दिग्दर्शनाखाली आईने सुरेख, मुरलेल्या अभिनेत्रीप्रमाणे काम केलं, (बरीच बोलणीही खाल्ली!) म्हणजे तिच्याच भाषेत, ‘जमलं हळूहळू’.  प्रेक्षकांना नाटक पसंत पडलं. आईची तिन्ही गाणी, ‘आला खुशीत समिंदर’, ‘तू माझी अन् तुझा मीच ही’, ‘एकलेपणाची आग’, खूप लोकप्रिय झाली. मुंबई – पुण्यातच प्रयोग होत असत. ‘प्रयोग संपला, की एक क्षणही न थांबता, मेकअप उतरवून लेकाच्या, किशोरच्या ओढीने ती घरी परतायची,’ असं काणेकरांनी तिच्यावरच्या लेखात लिहून ठेवलंय. आचार्य अत्रे पुण्याहून दर शनिवारी-रविवारी मुंबईला हा प्रयोग पाहायला येत असत.

या नाटकाच्या पपांच्या संगीत दिग्दर्शनामुळे प्रभावित होऊन मास्टर विनायक यांनी व्ही. शांताराम यांच्याकडे पपांच्या नावाची शिफारस केली. पपा मुंबईहून पुण्याला येऊन स्थायिक झाले. पपांच्या आयुष्यांत ‘प्रभात पर्व’ सुरू  झालं. पपांनी तनमनाने स्वत:ला ‘प्रभात’च्या चित्रपटांच्या संगीत दिग्दर्शनातच नव्हे तर एकूणच ‘प्रभात’मध्ये झोकून दिलं. आई गाण्याचा रियाज, घर आणि बालसंगोपनात बुडून गेली – अगदी सहजच.’ सुहास १९३५च्या ऑगस्टमध्ये जन्मला. त्यानंतर तीन वर्षांनी, १९३८च्या एप्रिलमध्ये अनिलचा जन्म, आणि त्यानंतर सात वर्षांनी मी! दरम्यानची वर्षे संसार सांभाळून, यात तिच्या दोन-तीन बहिणी, दोन भाऊ, तसंच पपांचे पुतणे आदी वेळोवेळी शिक्षणासाठी आमच्याच घरी असत. तरीही आईने गाण्यात मोठं नाव केलं. ‘आकाशवाणी’ची तर ती अत्यंत लोकप्रिय गायिका! मैफिलीही जोरात चालू होत्या, तसंच ध्वनिमुद्रणंही. जनमनात तिची खास जागा निर्माण झाली होती. त्यात नंतर संगीत अभिनेत्रीच्या रूपाने भरच पडली. पपांचा ‘प्रभात’मधला सहभाग १९४३ च्या सुमाराला संपुष्टात आला. त्यांच्या आयुष्यातलं ते फार महत्त्वाचं, अत्यंत यशस्वी पर्व होतं. इतक्या समर्पक आणि प्रासादिक चाली त्यांनी दिल्या की, आजही त्या तरुण मंडळींच्या ओठांवर असतात. ‘प्रभात’नंतर पपा फारसे सिनेसृष्टीत रमले नाहीत पण एक प्रसंग चित्रपट इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तो असा – ‘प्रभात’मध्ये रुजू होण्यापूर्वी, मुंबईला ‘संत सखूबाई’ नंतर एका ‘कृष्णावतार’ नावाच्या हिंदी चित्रपटासाठी पपांना संगीत दिग्दर्शन करायचं होतं. वसुदेवाचं काम करणाऱ्या दास नावाच्या बंगाली नटाला गाता येत नव्हतं. पपांनी एक युक्ती केली. ती गाणी स्वत: गायचं ठरवलं. त्या नटाकडून ‘लिपसिंक’ बरोबर बसवून घेतलं. मग प्रत्यक्ष चित्रीकरणामध्ये मायक्रोफोन पपांसमोर आणि कॅमेरा मात्र दासवर, अशी गाणी केली. खरं म्हणजे चित्रपट इतिहासातलं हे पहिलं प्लेबॅक – पाश्र्वगायन! पण श्रेय नामावलीत उल्लेख नसल्याने ते तेवढय़ावरच राहिलं. पपांना याची अजिबात खंत नव्हती. प्रसंग निभावून नेला याचाच त्यांना जास्त आनंद! आता ते आठवताना मला मात्र वाईट वाटतं. खरं तर, हे फार मोठं श्रेय आहे. त्यांचं संगीत रचना आणि दिग्दर्शनाच्या अनुभव आणि प्रवासावर लिहिलेलं, ‘माझे संगीत’ हे पुस्तक अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त आहे. तसेच ‘अस्ताई’, ‘अंतरा, ‘आवाजाची दुनिया’, ‘वसंत काकाची पत्रे’ अशा त्यांच्या पुस्तकांनी साहित्य आणि संगीतविश्वात मोलाची भर घातली आहे.

१९४१ मध्ये ‘नाटय़ निकेतन’मध्ये संगीत अभिनेत्री म्हणून आईनं नाटकात काम करण्यास सुरुवात केली. लेखक, निर्माते, दिग्दर्शक होते मो. ग. रांगणेकर. त्यांच्या पत्रकारितेपासूनच पपांची आणि त्यांची मैत्री होती. त्यांच्या ‘चित्रा, ‘वसुंधरा’, या साप्ताहिकांमधून पपा मान्यवरांच्या गायनावर समीक्षात्मक लेख लिहीत असत. ‘एकलव्य’ हे टोपण नावही त्यांना रांगणेकरांनीच दिलं. आईनं रंगभूमीवर काम करायला सुरुवात केल्यावर पपांनी, तिच्या गैरहजेरीत घर आणि आम्हाला सांभाळण्याचं कामही मोठय़ा आनंदानं केलं – तेही सहजपणे, बाऊ न करता! आमच्या खाण्यापिण्याकडे, अभ्यास, खेळाकडे, आमच्या मित्रमैत्रिणींकडे, त्यांची बारीक नजर असे. मला त्यांच्यातलं उत्तम पालकत्व नेहमी जाणवलं, कारण आम्हीच नव्हे तर आमच्या मित्रमैत्रिणींवरही त्यांचं लक्ष असे.

मला आठवतं, अगदी लहान असताना आई नसली, की मी खूप कावरीबावरी व्हायची, पण पपा छान समजूत घालायचे माझी, तेसुद्धा कसलंही आमिष वा फूस न देता. ‘‘ती त्या मोठ्ठय़ा कामाला गेलीय ना, ते संपलं की ती लग्गेच येणार!’’ (ते ‘मोठ्ठं काम’ म्हणजे कुठे तरी गाण्याचा कार्यक्रम किंवा नाटकाचा दौरा – म्हणजे त्याला दोन-तीन दिवस ते पंधरा-वीस दिवस असा अवधी लागायचा.) त्यांचा मायेचा तो सूर अजूनही माझ्या कानात आहे. ‘मी आहे ना!’ असं आश्वासन असायचं त्या सुरात!

आई लांबच्या दौऱ्यावरून खूप दिवसांनी आली, की प्रथम मला, का कोण जाणे, संकोचल्यासारखं होई. तिच्या आठवणीनं जीव थोडा-थोडा झालेला असला तरी एकदम काही बोलता यायचं नाही. थोडीशी अढी, थोडा राग असं सगळं असायचं मनात, किती थकून आलेली असायची, तिलाही मुलांना कधी भेटते असं व्हायचं. तीच मग मला जवळ घेऊन बसायची. मला बोलतं करायची. जशी मोठी होत गेले, तशी मग ही भावना नाहीशी होत गेली. आणि नंतर नंतर तर आम्ही खूप जवळच्या मैत्रिणीच झालो. तिच्या कामाचं महत्त्वही मला समजत गेलं. तरी शाळेतून आल्यावर ती दिसली, की एक वेगळाच आनंद व्हायचा. काही तरी साधंसुधं आमच्यासाठी खायला करून ठेवायची. हाताला चव होती तिच्या. पपा म्हणायचे, ‘‘हात म्हणजे चमचा आहे!’’ आमच्याकडे स्वयंपाकाला नेहमी बाई असायची. पण काही खास पदार्थ, विशेष करून सामिष पदार्थ, तीच बनवायची. मला आठवतंय, आई प्रयोगाहून अगदी रात्री दोन वाजता जरी आली, तरी साडेपाचला उठून पपांना चहा करून देत असे. त्यांना लवकर चहा लागायचा. दोघं टेबलाशी चहा, टोस्ट खात बसायचे. छान वाटायचं त्यांना असं निवांत बघायला. कधी-मधी मी लवकर उठलेच, तर मीही त्यांच्याबरोबर बसायचे.

मला गाणं यावं यासाठी मात्र आईनं जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मी पाचवीत असताना तिनं मला पहाटे साडेपाचला उठवायला सुरुवात केली. कारण दिवसा शाळा, अभ्यास यामुळं फक्त संध्याकाळच मोकळी असायची. आठवडय़ातून तीन वेळा संध्याकाळी गुलाम ख्वाजा शिकवायला यायचे. आईचे गुरू खाँ इनायत हुसेन यांचे ते नातू होते. कमालीचा तयार गळा. सरगम तर अफाट करायचे. मी ऐकतच राहायची.. माझा खरा ओढा सुगम संगीताकडे होता, खासकरून तेव्हाची लताबाई आणि तलत मेहमूदची चित्रपटगीतं.. गंमत म्हणजे, ती ख्वाजाजींनाही खूप आवडायची. तशी एक-दोन गाणी म्हणायचे आणि मग एखादा राग, त्याचे आरोह-अवरोह, चलन, बंदिश सांगायचे. आई पहाटे उठवून मला गायला बसवायची. स्वर घोटून घ्यायची. त्या वेळी तिने सांगितलेला ‘तोडी’ कायम स्मरणात आहे. हळूहळू आणखी काही राग, मग त्यांच्या ‘तानरस’ घराण्याची खासियत असलेले ‘भीम’, ‘गोरख कल्याण’, ‘मधमाद सारंग’, ‘अहिर भैरव’ आदी राग तिने शिकवले. पपांनी मला ‘मारवा’, गौड मल्हार, मिया मल्हार, बिहाग, यमन यांची तालीम दिली, तसंच गंधर्वाची नाटय़पदंही पपांनी शिकवली. पपांच्या आवाजाची जात फार छान होतीच. पण

त्यांचा गळाही गंधर्वपद गाताना बरोबर त्याच धर्तीवर फिरायचा. अगदी लहानपणापासून बालगंधर्व, केशवराव भोसले अशा दिग्गज कलाकारांचं काम पाहिलेलं, गाणं ऐकलेलं, स्मृतीत टिपलेलं. त्यामुळे ती शैली, तो भाव त्यांच्या गाण्यात उतरला होता. अर्थात, तशी ग्रहणशक्ती उपजत त्यांच्यात होती. म्हणूनच हे शक्य झालं. गळाही अतिशय गोड, सहज फिरणारा. त्याकाळी म्हणे, त्यांना काही नाटक मंडळींनीही काम करण्याविषयी विचारलं होतं. ‘पपांनी गाणं उगीच सोडलं.’ अशी आईसकट आम्हां सर्व भावंडांना, स्नेही मंडळींना मनापासून खंत वाटते. त्यांनी संगीतावर भरपूर लिहिलं, समीक्षेचा एक मापदंड तयार केला, उत्तमोत्तम संगीतरचना केल्या. शिकवताना प्रत्येक सूर, उच्चार, खटके, मुरक्या, आलाप, ते स्वत: गाऊन दाखवत. कितीही वेळा, न कंटाळता! याचा अनुभव आई आणि मी, आम्ही दोघींनी घेतला आहे. सूक्ष्मता, अचूकता, यावर त्यांचं सर्व अंगांनी बारीक लक्ष असायचं. रोहिणी भाटे, मालती मांडे, कालिंदी केसकर, मुंबईला असताना सुमन हेमाडी (कल्याणपूर), अशा किती तरी गायिकांना त्यांनी सखोल मार्गदर्शन केलं. स्वत: बैठकी करणं मात्र सोडलं ते सोडलंच. एकदाच काही मंडळींच्या आग्रहाखातर ‘भारत गायन समाजा’त गायला बसले खूप वर्षांनी! बिहाग गायले. मागे तंबोऱ्यावर ‘पट्टशिष्या’ ज्योत्स्ना भोळे! आई मला सांगत होती, ‘‘तो बिहाग मी आयुष्यात विसरणार नाही.’’ त्यांना नुसते ‘भावगीत गायक’ म्हणणाऱ्यांची तोंडं त्यानंतर बंद झाली.’’

भावगीत! या भावगीतानेच आई आणि पपांची भेट घडवली. बंधू रामराय यांनी आपल्या या गोड गळ्याच्या बहिणीला, दुर्गाला, भावगीतं शिकवण्याची केशवरावांना गळ घातली. त्यांच्या भावगीतांच्या मैफली त्याने ऐकल्या होत्या आणि दुर्गाला तर या आकर्षक गानप्रकाराचं वेडच लागलं होतं. दुर्गाची ‘ऑडिशन’ घेऊन केशवरावांनी शिकवण्याचं कबूल केलं. तिचा असाधारण गोड गळा, तल्लख बुद्धिमत्ता आणि लक्षपूर्वक ऐकण्याची, अचूक ग्रहण करण्याची ताकद, यांनी तेही प्रभावित झाले. पुढे आईनं या भावगीतांचं सोनं करत महाराष्ट्राला वेडं केलं. त्या काळी दोघंही ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सव्‍‌र्हिस’ या, फक्त संध्याकाळी दोन तास चालू असणाऱ्या रेडिओवर (‘ऑल इंडिया रेडिओ’ सुरू झाला नव्हता.) गात असत. दोघेही अतिशय लोकप्रिय, लाडके कलावंत होते. पपा वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी, पण मलेरियाच्या तापाचा वारंवार त्रास सुरू झाल्याने त्यांनी चौथ्या वर्षीच ग्रँट मेडिकल कॉलेजचा निरोप घेतला. तिथून पुढे सर्वस्वी संगीतात लक्ष घातलं.

पपा साधारण १९६० नंतर ‘मुंबई आकाशवाणी’वरून निवृत्त झाले. तेव्हा त्यांचं वय ६४ वर्षे होतं, पण दम्याचा त्रास सुरू झाला होता त्यामुळे वाचन, लेखन, संगीत या त्यांच्या आवडत्या उद्योगात रममाण होत ते शांतपणे आयुष्य व्यतीत करू लागले. माझा रियाज मात्र रोज करून घेत. मला मात्र माझं गाणं पुढे नेता आलं नाही, याची आईला कायम खंत वाटत आली. काविळीच्या आजारपणात बहुधा माझा आवाज गेला. तेव्हा तर मला बोलताही येत नव्हतं. खूप प्रयत्न करूनही तो गळा गाता झाला नाही. आजही मी गाते परंतु त्यात पूर्वीचा पोत नाही. बाबांनंतर आईनंही १९६५ नंतर, तेव्हा ती फक्त ५० वर्षांची होती आणि निसर्गकृपेनं ‘कुलवधू’तली ‘भानुमती’ शोभत असतानाच रंगभूमीचा निरोप घेतला. ‘‘केशवराव, आता नाटकात काम करणं थांबवते.’’ ‘‘तुझी इच्छा असेल तेच कर.’’ इति पपा. बास – एवढाच संवाद झाला तिच्या निर्णयावर, पण तिच्या सांगीतिक कर्तृत्वाला कुठेही बाधा आली नाही. बैठकी, रेडिओवरचे कार्यक्रम, रेडिओवरची ‘चेन बुकिंग्ज’ (वेगवेगळ्या शहरांत जाऊन रेडिओवर कार्यक्रम करणं), ध्वनिमुद्रणं, हे चालूच होतं. त्या काळात संसाराची बरीचशी जबाबदारी तिनेच पेलली होती. अर्थात, दोन्ही भाऊ तोवर नोकरीत रुजू झाले होते. सर्वात मोठा किशोर मात्र इंग्लंडला स्थायिक झाला होता. एक आठवलं, किशोरने मॅट्रिक झाल्यावर छायाचित्रणाचा अभ्यासक्रम शिकण्याची इच्छा पपांकडे व्यक्त केली. पपांनी त्याचा कल आधीच ओळखला होता. आई खूप घाबरली. ‘‘अहो, त्याला ग्रॅज्युएट तर होऊ दे आधी आणि मग फोटोग्राफी कर म्हणावं.’’ पण पपांनी तिला  समजावलं, की त्याच्या आवडीचंच क्षेत्र त्याला निवडू दे. इंग्लंडला ‘कलरप्रिटिंग’च्या परीक्षेत किशोर पहिला आला. पहिलाच आशियायी विद्यार्थी.

आईला रंगमंचावर काम करताना पाहणं हा मात्र एक वेगळाच आनंद होता. अत्यंत देखणं रूप, सुहास्यवदन, छान उंचीचा नेमस्त बांधा, भूमिकेनुरूप सहज हालचाली, अगदी घरात वावरावं असा मोकळा वावर आणि छाप पाडणारं व्यक्तिमत्त्व. संवाद बोलण्याची वेगळीच लकब आणि असामान्य असा तो वेगळाच अद्वितीय आवाज. आवाजात एक निसर्गदत्त ‘दर्द’! तिचं गाणं ‘आतून’ यायचं म्हणून ऐकणाऱ्याच्या आत, अंत:करणात पोहोचायचं. एवढे प्रवास केले, तेही साठ-सत्तर वर्षांपूर्वी, कसल्याही सुखसोयी नसताना. मुख्य नायिका म्हणून आरामात, पहिल्या वर्गाने कधी गेली नाही. डगमगणं तर तिला माहीतच नव्हतं. एकदा पुण्यालाच ‘आकाशवाणी’वर विशेष ध्वनिमुद्रणासाठी मधुसूदन कानेटकरांबरोबर  निघाली होती रेडिओच्या गाडीनं. वाटेत एक टांगा येऊन गाडीच्या काचेवर आदळला. पण न भांबावता क्षणात उतरून ती चालूही लागली. कानेटकर थक्क झाले. आई लगबगीनं म्हणाली, ‘‘चला लवकर मधू, अरे गायचंय मला..’’ अशी माझी आई! एकदा, दौऱ्यावरून येऊन एका दिवसात गॅदरिंगसाठी मला हवा तसा स्कर्ट-ब्लाऊज शिवून देऊन चाट पाडलं होतं.

तिच्या गाण्यातला, जगण्यातला उत्साह, ‘जिवंतपणा’ म्हणजे कमाल होती. कधी ती तर कधी पपा, गरजेनुसार एकमेकांच्या भूमिका पार पाडत. कधी ती वडील, तर कधी पपा आई! आता दोघेही नाहीत. पपा १९७७ मध्ये तर आई २००१ मध्ये आम्हाला सोडून गेली. सगळे सन्मानाचे पुरस्कार, विष्णुदास भावे, बालगंधर्व पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार तिला मिळाले. पण ‘पपांना खूप काही मिळायला हवं होतं’, असं ती सारखं म्हणायची.

आईला १९८८ मध्ये कर्करोगाचं निदान झालं आणि ती जाईपर्यंत या राक्षसी रोगाने तिची पाठ सोडली नाही. १९९८ मध्ये तिने तिच्या आयुष्यावर ‘तुमची ज्योत्स्ना भोळे’ हे पुस्तक लिहिलं. तिला पंचाऐंशी वर्ष पूर्ण झाली तेव्हा तिच्या कारकीर्दीवर ‘बोला अमृत बोला’ हा दृक्श्राव्य कार्यक्रम केला. त्यातही किती आठवणी सांगितल्या तिने.. तो माझ्यासह रसिकांसाठीही एक मोलाचा ठेवाच आहे.

आई-पपांच्या सहवासातून खूप काही मिळालं. हृदयात मावत नाही एवढं.. केवढा मोठा वारसा दिला आहे त्यांनी, याची मला जाणीव आहे. ‘त्या आभाळमाये’पुढे मी पूर्ण नतमस्तक आहे. स्फूर्ती घ्यायची, बळ मिळो ही प्रार्थना करायची, इतकंच आपल्या हाती..!

(सदर समाप्त)

vandovij@gmail.com

chaturang@expressindia.com