मलिका अमर शेख
शाहीर अमर शेख यांच्या नावातच स्फूर्ती ओतप्रोत भरलेली होती. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो की, त्यांच्या कलापथकाचे कार्यक्रम; त्यांच्या शाहिरी बाण्याने अनेक आयुष्य लखलखली. त्यांनी मित्रांवर-माणसांवर नितांत प्रेम केलं. मनोरंजनाबरोबर समाजाचं प्रबोधन केलं. त्यांच्याबरोबरच्या, आपल्या वडिलांबरोबरच्या उण्यापुऱ्या १२ वर्षांच्या काळात आयुष्याचे सर्वात समृद्ध श्रीमंत रंग ‘ती’ जगली.. त्या मलिका अमर शेख, वडिलांविषयीच्या त्यांच्या आभाळभर पुरून उरलेल्या आठवणी..
काळ : १९६०-६१..
वेळ : भल्या पहाटेची म्हणजे साडेनऊ वाजताची साधारण..
स्थळ – अर्थात बिछाना..
पात्र – एके काळी काठीसारखे हातपाय असलेली चार-पाच वर्षांची अशक्त पोर.. अचानक हार्मोनियमचा सूर.. त्याबरोबर..‘जय महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या गाऊ गाना..’ सोन्यासारखी तळपत्या तलवारीगत तीक्ष्ण आकाशाला भेदणारी तान.. ‘ती’ ऐकू लागते तिच्या वडिलांचा आवाज..
‘गर्जा जयजयकार क्रांतीचा..
आता कर ओंकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळीच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी उर
सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते
उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते..’
त्या पोरीला गलबलून येतं.. रडू येईलसं वाटलं.. तो आवाज मेंदू, रक्त सारं काही ढवळून काढत होता.. अंगावर काटा आला सर्रकन् .. घाईनं ती प्रेक्षकातून उठून बाहेर धावली..
– ते समोर बसून यशवंतराव होळकरांचा पोवाडा लिहितायत्..
– आचार्य अत्रे काकांबरोबर हास्यविनोद – अन् काव्य ऐकवतायत्..
– विंदा काका न् शिरुभाऊ काका तेही कधीमधी मैफिलीत..
– भाई सतत दौऱ्यावर..
पण घरी आले की घरटं आणखी जिवंत, उबदार, हिरवंगार हसरं चैतन्यमयी..
ती अशक्त पोर फार आजारीये.. तापानं डोळे उघडत नाहीय्त.. खूप खूप रात्र.. फक्त स्वयंपाकघरात दिवा.. न् हॉलमध्ये तिचे वडील तिला खांद्यावर घेऊन फेऱ्या मारतायत्.. तो आश्वस्त कणखर मायाळू खांदा.. त्यावर डोकं टेकून ती क्लान्त मलूल इवल्या तापल्या देहाचं आयुष्यासकट शालीत गुंडाळलेलं छोटं गाठोड घेऊन ग्लानीत झोपलीय्..
– तीच अशक्त पोर वडिलांजवळ स्टेजवर बसलीय्.. पुढं भाषण करताहेत कॉम्रेड डांगे..
– लाडवाचा डबा घेऊन ती वडिलांबरोबर दौऱ्याला निघालीय.. आळंदी, नेवासा, नाशिक, श्रीरामपूर, खंडाबे, अकोला, किती मजा.. ‘जाऊ तिथं खाऊ’ मध्ये तर तिनं स्टेजवर नाच केला. गाताना, तिचा नाच बघताना वडिलांच्या चेहऱ्यावर अतीव समाधान, अभिमान, आनंद..
– ती नाटय़छटा सादर करतेय.. ‘ऐकावे जनाचे’.. नऊ वेगवेगळ्या व्यक्तिरेखा.. वडील प्रत्येकासमोर ती नाटय़छटा करायला लावायचे न् मग प्रचंड कौतुक..
– तिनं पहिली कविता लिहिली – आणखी कौतुक..
– तिनं छान निबंध लिहिला.. खूप खूप आनंद वाटला त्यांना, त्यांच्या डोळ्यात, चेहऱ्यावर.. शब्दातनं..
– आयुष्याचे सर्वात समृद्ध श्रीमंत रंग ‘ती’ वडिलांबरोबर जगली.. सगळ्या जगातली सर्वोत्तम अप्रतिम कुणालाही न मिळालेली गोष्ट तिच्याकडे होती. तिचे वडील.. तिचं घर.. तिची प्रेमळ हसरी आई न् नाचरी, हसरी, जपणारी, बहीण.. या जगात आज प्रकर्षांनं न आढळणारी गोष्ट मानवीयता तिच्या वडिलांच्या माथ्यावर लखलखत होती.. त्यांचं तत्त्वनिष्ठ असणं, क्षमाशील असणं.. आभाळाएवढे उंच असतानाही पाय आपल्या मातीत घट्ट रोऊन तिच्याबरोबरचं न् माणसांबरोबरचं नातं जपणं.. केवढा प्रचंड मित्रपरिवार.. किती आत्मीयता.. प्रेम.. सर्वगुणसंपन्न.. त्यांच्यात एकही न्यूनत्व नव्हतं.. कलावंत म्हणूनही.. माणूस म्हणूनही.. अभिजात कला.. कलापथकातल्या एकाही स्त्रीचा पदर सरकलेला त्यांना चालायचा नाही. तसच प्रेक्षकातल्या कुणी शिटी मारलेलीही चालायची नाही. तिथेच असं काही झापायचे की, कुणाची ताकदच नसायची बोलायची..
– वाटेत जाताना कुणी दीदीला छेडलं तर भर रस्त्यात त्यांनी हातातल्या फरशीनं त्याला बेदम मारून तिच्या पाया पडून क्षमा मागायला लावली होती..
– तिच्या त्यांच्याबरोबरच्या जेमतेम बारा वर्षांच्या अल्प आयुष्यात एकदाच तिला दटावलेलं.. तिनं रस्त्यावरची कुल्फी खाल्ली म्हणून! पण ते दटावण्याचे दोन शब्द तिला पुरे होते.. त्यानंतर तिनं कधीच रस्त्यावरची कुल्फी खाल्ली नाही.
– संपूर्ण सात रस्त्यात न् सगळ्या महाराष्ट्रभर सगळेच त्यांना ‘भाई’ म्हणायचे, ज्यात खूप प्रेम, आदर, दरारा, धाकही असायचा त्यांचा. आज या शब्दाचं व्याकरण, भाव सर्वच बदललंय. कुणाचं भांडण झालं की ते भाईंकडे येत.
– चीन-भारत युद्धामुळे त्यांनी कम्युनिस्ट पार्टीचा राजीनामा दिला, पण तत्त्वांना कधीच सोडलं नाही. त्या दोघांची आई-भाईंची निष्ठा, श्रद्धा त्या पार्टीवर, त्यातल्या तत्त्वांवर न् माणसांवर शेवटपर्यंत कायम होती. शर्टाप्रमाणे पक्ष न् तत्त्व बदलणाऱ्या आताच्या जगात हे उदाहरण एकमेवाद्वितीय.. तसंच पक्ष वेगळा असो अगर व्यवसाय – सरसकट सर्वच भाईंच्या प्रेमात! त्यांच्या गाण्यांवर बेहद्द खूश झालेला एक जण पुढं आला न् आपली जवाहिऱ्याची पेटी भाईंसमोर ठेवली. ‘तुम्ही यातला कुठलाही खडा- रत्न, पाचू हिरा जे काय पाहिजे ते घ्या.’ तर एकानं मृगाजिन दिलं.. एकानं वाघाचं चामडं.. (त्या काळी त्यावर बंदी नसावी)!
– शिरस्त्याप्रमाणे आयुष्याशी अलिखित करार असल्याप्रमाणे ती रोगट अशक्त काटकुळी पोर महिन्यातून एकदा आजारी पडून हॉस्पिटलात असायची.. हॉस्पिटलमध्येही पडल्या पडल्या ती अभ्यास करायची.. भाई एकदा रशियाच्या दौऱ्यावर गेलेले. पण आले ते विमानतळावरून सरळ हॉस्पिटलमध्ये.. खूप काय काय आणलेलं तिच्यासाठी – बाहुलीच्या पोटात सात बाहुल्या असणारी मात्रोष्का- उडणारं मोठं फुलपाखरू, काचेचा क्रेमलिन बुरुज, खूप सुंदर रंगीबेरंगी खडे, कानातले, वेगवेगळे देशांचे स्टॅम्प, तिथली जुनी नाणी, रशियन बाहुल्या, कझाकिस्तानी वेश असलेल्या, घरी-चांदीवर काचेचं कोरीवकाम न् नक्षीदार तीन सुरया, रशियन काचपेटय़ा, तिथल्या खाण कामागाराची पोलादी चांदीगत असलेली मूर्ती, चहादाणी..
ते कलासक्त – रसिक वातावरण.. रोजची रिहर्सल.. त्या वैचारिक गप्पा.. हास्यविनोद.. मित्रमंडळी.. अण्णाभाऊ साठे असो वा कलापथकातील कलावंत, त्यांच्या अडचणीमध्ये धावून जायचं -अण्णाभाऊ गेले तेव्हा -अत्रेकाका गेले तेव्हा ते फार खचले.
डॉ. रवी बापटांनी आठवण सांगितली परवा- ‘आचार्य अत्रे आजारी असताना हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये रात्रंदिवस दोन माणसं त्यांच्या रूमबाहेर बसून होती, एक अमर शेख न् दुसरे धुमाळ..!’
– त्यांनी मित्रांवर-माणसांवर नितांत प्रेम केलं.
– समाजाचं प्रबोधन केलं, मनोरंजनाबरोबर. कुटुंबालाही जिवापाड जपलं न् त्याबरोबर कलापथकातल्या पंधरा माणसांच्या पंधरा कुटुंबालाही.. मग ते तरुताईचं लग्न करून देणं असो किंवा एखाद्याचा कौटुंबिक प्रश्न असो. मानव्य, तत्त्व, मूल्य यांना प्राणपणाने जपतानाही त्यांनी अभिजात उदारता, प्रेम यांनाही तितकंच महत्त्व दिलं. द्वेष, आकस, तिरस्कार, हेवा हे शब्द ज्या घराला कधीच माहीत नव्हते.. संपूर्ण कार्यक्रमात कुठंही सवंग शब्द-अश्लीलता द्वय़र्थी विनोद याला थारा नव्हता.. त्यांच्या लिखाणात जे लिहिलं ते सर्वच महत्त्वाचं आहे पण त्यांच्या जीवनाचं सार त्यांनीच ज्या शब्दात लिहिलं त्यातच सारं आलं- ‘मी जगात एकदाच जन्माला आलो. आणि प्रत्येक जण एकदाच जन्माला येतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मरण आले तर ते लाखो लोकांपुढे गाताना, तारसप्तकी स्वर लावताना यावे अशी इच्छा आहे. पण माणसांच्या सर्व इच्छा सफल होतातच असेही नाही; पण मी अभिमानाने म्हणेन, की माझे जीवन मी अत्यंत यशस्वीरीत्या जगलो आणि जातानापण त्या विजयाचा आनंद बरोबर घेऊन जात आहे. जग हे फार सुंदर आहे.’
आचार्य अत्रे काका त्यांच्याबद्दल म्हणतात, ‘संयुक्त महाराष्ट्र समितीने छप्पन्नच्या जुलै महिन्यात लोकसभेच्या महाद्वारावर जो मोर्चा नेला त्यात आघाडीला शाहीर अमर शेख होते. आषाढामधल्या मेघाप्रमाणे गडगडत होते. त्यांच्या गळ्यातून उचंबळणारे काव्य साक्षात विद्युल्लतेप्रमाणे कडकडत होते. अमर शेख यांच्या अंगात त्या वेळी जणू काही साक्षात् महाराष्ट्रच संचारला होता. त्या वेळचा त्यांचा दैवी अवतार मी तरी कालत्रयी विसरणार नाही. सतत दोन दिवस दिल्लीच्या रस्त्यांमधून ‘जागा मराठा आम जमाना बदलेगा’ या अमर शेखांच्या आवाजावाचून दुसरा आवाज ऐकू येत नव्हता. सतत चार- चार, पाच-पाच तास न् दोन दोन दिवस त्याच त्या तारसप्तकात चढत्या आवाजाने गात राहायचे. हा शाहिरी सामर्थ्यांचा अभूतपूर्व चमत्कार आहे, असे मी म्हणतो. त्या दिवशीचा त्यांचा पराक्रम संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. गेल्या तीनशे वर्षांतले सारे मराठी शाहीर जणू त्यांच्या गळ्यात आणि डोळ्यात येऊन बसलेले. श्री शिवछत्रपती जर त्या वेळी असते तर त्यांनी अमर शेखना अक्षरश: आपल्या छातीवर उचलून धरले असते आणि ‘शाबास शाहीर’ अशी त्यांच्या पाठीवर थाप मारली असती.’.. हे सर्व अत्रेकाकांनी लिहिले, ते वाचले की अभिमान न् आनंद या भावना एवढय़ा दाटून येतात की, केवढे भाग्यवान आम्ही की अशा महान माणसाच्या पोटी जन्म घेतला न् बारा वर्षे आम्हाला त्यांचं प्रेम, वात्सल्य लाभलं. आमचे आई-वडील देवमाणसंच होती. पण मी नाही – मी माणूस आहे.. सर्व गुण जसे माझ्यात ठासून भरलेत तसेच दोषही. गुण माझ्या आई-वडिलांचा वारसा! दोष फक्त माझ्या व्यक्तिस्वातंत्र्याचा सापेक्ष भाग!
.. शाळा सुटल्यावर सगळी पोरं दंगा करत जशी धावतात घरी जायला तशा आठवणी धावत येतायत्..
..भाईंचा मित्रपरिवार असंख्य.. त्यात सर्वप्रथम तरुणपणापासून संघर्षांत, कम्युनिस्ट विचारांनी भारलेल्या वातावरणात सतत बरोबर राहिलेले अण्णाभाऊ साठे त्यांचे जिवलग मित्र. ‘लालबावटा’ कलापथकात भाई, अण्णाभाऊ न् गव्हाणकर ही त्रिमूर्ती.. महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव त्यांनी आपल्या प्रबोधन मनोरंजनातून ढवळून काढलेलं. ‘बेकायदेशीर’ हे वगनाटय़ तिघांनी गाजवलं. कालपरत्वे कम्युनिस्ट पार्टीच्या भारतीय सामर्थ्यांला उतरती कळा लागल्यावर बरेच जण दूर झाले. काही
नैराश्यात गेले. त्यात अण्णाभाऊ होतेच. संवेदनशीलता हा कलावंताला शाप की वरदान? हा यक्षप्रश्न.
– धोटेकाका (जांबुवंतराव धोटे) असोत; अत्रेकाका असोत, सगळ्यांनी ‘या’ पोरीचं नेहमी कौतुक, अतीव माया न् प्रेम – इतकं निरपेक्ष, अलोट, अजोड प्रेम, माया न् कौतुक की ते मी रत्नजडित लखलखत्या मुकुटासारखं आयुष्यभर मिरवलं. त्यामुळे पुढं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मला कधी एकटं वाटलं नाही. कोसळून पडायचे क्षण आले तरी मी डगमगले नाही. कारण ही सारी माणसं – भाई, आई, दीदी सतत माझ्या अवतीभवती राहिली. त्यांचं प्रेम, माया ढालीगत, चिलखतागत घालून मी आयुष्यभर आंधळी लढाई लढत गेले.
– अण्णा घरी राहिले असताना त्यांनी आणि भाई दोघांनी मिळून गप्पा मारता मारता एक लावणी रचली.. सहज.. साक्षीदार ‘ती’ पोर!
‘ऊन पडले फैना ग बाई मी बांगडी मैना’
एक कडवं भाईंचं एक अण्णांचं! प्रतिभेचा तो अद्भुत आविष्कार किती सहजसुंदर!
मग तिलाही स्फुरण चढलं. आत जाऊन तिनंपण तावातावानं कागद घेतला –
‘हिरवे हिरवे गवत – फुले भोवती जमत – जाते मी माघारी – येते मी रमत गमत..’
किती मज्जा.. केवढं कौतुक, तिचे हात आभाळालाच..
कुसुमाग्रजांची कविता ‘पृथ्वीचं प्रेमगीत’ तिला तोंडपाठ होतं. न् भाई प्रत्येक वेळेला तिला कविता म्हणायचा आग्रह करायचे.
‘बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला’ किंवा ‘जय महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या गाऊ गाना’ हे भाईंनी रचलेलं समरगीत असो अगर वगनाटय़ाच्या बतावणीतलं-
‘मी ब्रह्मांडाचा कर्ता ग सर्व विघ्नहर्ता ग
जगताचा जेता मी देवकीचा बाळ..
चंद्र सूर्य तारांगण नांदे माझ्या ग कृपेनं
चराचर व्यापून दुष्टांना शासून
काळाचा होईन मी एक महाकाळ॥
कुरुक्षेत्री अर्जुनाचा सारथी मी होईन त्याचा
सांगेन मी दिव्य गीता खरा धर्म क्षत्रियाचा..’
जरासंधा चिरिन, शिशुपालाला मारीन भक्तांना तारीन करून प्रतिपाळ’ हे कृष्णाचं गाणं असो अगर ‘काळ्या आईचा सख्खा पुत्र तू तूच खरा घनश्याम.. जय जय राजा कुणबी हरे राम.. ब्रह्मा होऊन तूच निर्मिले निर्मियले जग सारे.. दरी डोंगरे फोडून सगळे विश्व सजवले न्यारे
गाळूनिया तू घाम..।।
विष्णू होऊन तूच पोसले
पोशियले जग सारे –
नाही तुला टिचभर निवारा
तोच ब्रह्म तू का?
नाही तुला कुटकाही खावया
विष्णू उपाशी उभा
नाही तुझ्या हाती मृत्यू राहिला रे
भोळ्या सांबा
घालू लागले नीच दैत्य या जगामध्ये थैमान॥
– उठ रे राजा॥
घे हाती या साऱ्या जमिनी घे ब्रह्माचा अवतार
पहिले खा तू विष्णू होऊनी जगून जगाला तार
उघड नेत्र तो तिसरा भयंकर घेई
लालेलाल अंगार
ऐतखाऊंचे कर निर्दालन घेइ रुद्र अवतार
उठ हे सर्वव्यापी भगवान॥
– तर शेतकऱ्यांना साक्षात ब्रह्मा-विणू-महेशाची अप्रतिम सार्थ उपमा देणारे माझे वडील त्यांच्या लेखणीत शब्दप्रतिभेत असलेली समाजाप्रति, गरीब तळागाळाच्या जनतेप्रति असलेली निष्ठा किती अस्सल न् खरी बांधिलकीची होती न् ही कविता आजही किती सार्थ आहे हे कुणालाही पटेलच.
– तर या शब्दांच्या लखलखीत साम्राज्यात मी वाढले. छप्पा-पाणी, आठचल्लस, करटी ऐसपैस, डोंगराला आग लागली पळा रे पळा, माझ्या भावाचे पत्र हरवले, हे खेळता खेळता मीही शब्दांशी खेळण्यात जास्त रमू लागले.
– ‘पृथ्वीची उलथापालथ तर झाली नाही ना? मुंग्यांनी मेरुपर्वत तर गिळला नाही ना? मग आम्हीच असे कमनशिबी कसे?’ हे ‘बेबंदशाही’मधली संभाजीचे पल्लेदार वाक्य मी तलवारीसारखी फिरवत नाटय़छटा करण्यात मग्न..
सक्काळी उठून त्या भयंकर बोरिंग शाळेत जाणं, सक्काळी उठून ती भयानक अंघोळ करायची या दोन गोष्टींनी माझ्या अंगावर काटाच यायचा. त्यापेक्षा सकाळी ‘थोडं बरं वाटेनासं’ झालं की शाळेला न् अंघोळीला दांडी मारली की मला ‘ताबडतोब बरं वाटून’ मग रिहर्सल बघत प्रॉम्टिंग करणं, ढोलकी वाजवणं, पेटी वाजवणं असलं काही करण्यात भयंकर गंमत होती.
– कधी कधी भाई मला कुठल्या तरी प्रदर्शनाला – नाटकाला घेऊन जात – एकदा चुकीच्या बसमध्ये चढलो. मी, भाई, दीदी मग वरळीला उतरून आम्हाला चक्क हॉटेलमध्ये आईस्क्रीम खायला नेलेलं.. मी आईस्क्रीम खाताना दीदीचं आईस्क्रीम खाऊन झालेलं – ती मला प्रेमानं गोड म्हणाली, ‘राजू, मी तुला मदत करू?’ मी म्हटलं ‘हो’. तिनं ताबडतोब चमचा उचलून कपातलं माझं आईस्क्रीम खायला सुरुवात केली! माझा चेहरा म्हणजे, ‘भाईऽ बघा नं ही दीदी मला मदत करतेय्..’ भाई मजेत हसतायत् दीदीपण..
– आई-भाईंची वादावादी मी कधीच ऐकली नाही. दोघं म्हंजे अद्वैतच.. तरीपण एकदा भाईंनी नुकतं लिहून पूर्ण झाल्यावर एक गाणं की कविता म्हणून दाखवलेली.. आईला ती खूप आवडलेली, ती म्हणालीपण. तर मी आगाऊपणे म्हटलं.. ‘अगं आई, तू भाईंना जरा कमी त्रास दिलास तर ते आणखी चांगलं लिहितील!’ सगळे कौतुकानं हसले.. आईनं माझा गालगुच्चा घेतला, ‘अरे लब्बाडा’
– तर अशा प्रेम, कौतुक, कला, प्रतिभेनं संपन्न साम्राज्यात मी राजकन्येगत –
– दादा.. वा. वि. भट हे कलापथकाचे मुख्य – हिशेब – पत्रव्यवहार – प्रसंगी गाणी म्हणणं.. यापेक्षा भाईंवर सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम आणि निष्ठा असलेले, तेही डाव्या विचारसरणीचे. रोहिणी माझी सख्खी मैत्रीण, एकमेकींच्या खांद्यावर हात टाकून दोघींना एकत्र शिवून टाकल्यागत आम्ही या गल्लीतून त्या गल्लीत हिंडायचो. महिन्यातले दहा-पंधरा दिवस मी तिच्या घरी ‘पडलेले’ असायचे..! एकदा मी अशीच तिच्या घरी राहायला गेलेले.. आम्ही खेळायला शेजारच्या समोरच्या घरात गेलेलो.. त्या बाईनं विचारलं ‘काय गोऽऽ नाव काय तुजं?’ मी मान उडवत ताठय़ानं तोऱ्यात उत्तर दिलं – ‘मलिका अमर शेख’ – ती सूप पाखडता पाखडता थांबली – डोळे विस्फारून म्हणाली, ‘अगोबाय् मंजे मुसलमाऽन तू?’
झालं! मी धावतच वहिनींकडे गेले. (रोहिणीची आई)
– एकदम त्यांच्या गळ्यात हात टाकून विचारलनं ‘वहिनी वहिनी, ती बाई बघा मला मुसलमान म्हणते.. आमी नाही की नाही मुसलमान?’
वहिनी तोंडभरून हसल्या. म्हणाल्या, ‘नाही. गं, तुमी नाही मुसलमान.’ माझं समाधान झालं!
म्हणजे बरीच वर्ष मला दोघांचं वेगळ्या जातीतलं बंडखोर प्रेमलग्न – वेगळी जात माहीत नव्हतं. काही कारणही नव्हतं. ते माझे आई-भाई होते एवढं मला पुरेसं होतं न् जगात प्रत्येकाला ते पुरेसं कारण असायला हवं. जातधर्माचे फायदे-तोटे मला आजही समजत नाही न् जाणून घ्यायची इच्छाही नव्हती. मी माझ्या साम्राज्यात खूश होते. न् ते दोघं कम्युनिस्ट असल्यामुळेही असेल. शिवाय कलापथकात सर्वच वेगवेगळे असले तरी एका कुटुंबातल्याप्रमाणेच. ‘वसुधैव-कुटुंबकम्’. मग बंगाली सुबलदा, किशू दीदी असो, अगर कानडी भाषिक अशोकदादा असो, या सर्वसमावेशक लोकांमध्ये राहून मीही कलाप्रेम सोडून दुसऱ्या कुठल्याच गोष्टीशी संबंध ठेवला नाही.
पण माझ्या वडिलांच्या तत्त्वनिष्ठतेमुळे – भूमिकेमुळे स्पष्ट, परखड न् सुंदर चांगल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करण्याच्या ताकदीमुळे आज मी वादळातही स्थिर उभी आहे. मी मला गरीब, पोरकी पोर समजत नाहीय्, ही आत्मविश्वासाची मिळकत खूप मोठी – ती त्यांच्यामुळेच!
chaturang@expressindia.com