संशोधक म्हणून पुण्यातील मधमाशीपालन केंद्रात तब्बल २५ वर्षे अखंड योगदान देणारे डॉ. क. कृ. क्षीरसागर आज ८४ व्या वर्षीही त्याच उत्साहात कार्यमग्न आहेत. ‘भारतीय मधमाश्यांचा तुलनात्मक अभ्यास.’ या विषयावर प्रबंध सादर करून, त्यांनी भारतीय मधमाश्यांचं शास्त्रीय पद्धतीने पालन करण्याच्या पद्धती विकसित केल्या तसेच परदेशी मधमाश्यांमुळे आलेल्या ९ रोगांवरचे उपचार शोधून काढले. विज्ञानविषयक २६ पुस्तके व अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधून सादर केलेले ५० शोधनिबंध एवढी साहित्य संपदा त्यांच्या नावावर जमा असून आत्तापर्यंत त्यांना मान्यताप्राप्त ९ पुरस्कार मिळाले आहेत. त्या क्षीरसागरांविषयी..
प्राचीन वेद व त्यानंतरच्या अनेक ग्रंथांत मध व मधमाशा यांचे उल्लेख आले असले तरी मधमाश्यापालनाच्या आधुनिक तंत्राची भारतात सुरुवात व्हायला एकोणिसावं शतक उजाडावं लागलं. पूर्वी माश्यांना पोळ्यातून हुसकून मध लुटला जायचा. मधमाशीपालनाच्या आधुनिक पेटय़ांचा युरोपात शोध लागला १८५० च्या सुमारास. महात्मा गांधींना जेव्हा कोणीतरी ही पेटी दाखवली तेव्हा कुठे त्यांनी मधाचा स्वीकार केला व नंतर त्यांच्याच आदेशावरून महाबळेश्वरला देशातलं पहिलं केंद्र सुरू झालं. वैकुंठभाई मेहता, बापूसाहेब शेंडे, डॉ. देवडीकर, चिंतामण विनायक ठकार यांनी त्यात खूप काम केलं. नंतर १९५५ मध्ये पुण्यातील केंद्र व प्रशिक्षण संस्था उभी राहिली. या पुणे केंद्रात डॉ. क. कृ. क्षीरसागर (कमलाकर कृष्ण)यांनी वरिष्ठ संशोधक व प्रशिक्षक म्हणून सलग २५ र्वष योगदान दिलं. अनेक शोधनिबंध लिहिले. पुस्तकं लिहिली. संशोधनासाठी जंगलं पालथी घातली. वरील सर्व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे आज आपला देश मध निर्यात करणाऱ्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. आज डॉ. क. कृ. क्षीरसागर पुण्यातील मधमाशीपालन केंद्रातील निवृत्त शास्त्रज्ञ आहेत.
क्षीरसागर यांनी जेव्हा पुणे विद्यापीठाची कीटकशास्त्रातील उच्च पदवी घेतली तेव्हा डॉ. देवडीकर व आय. ए. कमते यांचे रेशीम किडय़ांपासून वस्त्रोद्योग यावरचे संशोधन सुरू होते. त्यांच्या अथक संशोधनात क्षीरसागरांनी महत्त्वाची भूमिका निभावली. पुढे दोन र्वष सोलापूरमध्ये प्राध्यापकी करून १९६४ पासून ते पुण्यातील मधमाशीपालन केंद्रात संशोधक म्हणून रुजू झाले आणि मग निवृत्तीपर्यंत तिथेच रमले. इथल्या कारकिर्दीत त्यांनी मधमाशीपालन विषयातील ७ वी ते एम.एस्सी.पर्यंतचा अभ्यासक्रम तयार केला. एम् फील, एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं व हे करत असताना स्वत:च संशोधनही केलं. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता, ‘भारतीय मधमाश्यांचा तुलनात्मक अभ्यास.’ या अभ्यासात त्यांनी भारतीय मधमाश्यांचं शास्त्रीय पद्धतीने पालन करण्याच्या पद्धती विकसित केल्या. परदेशी मधमाश्यांमुळे आलेल्या ९ रोगांवरचे उपचार शोधून काढले आणि देशी मधमाश्यांचा संकर घडवून त्यांची उत्पादनक्षमता वाढवण्यासंबंधात यशस्वी प्रयोग केले. निवृत्तीनंतर राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आपलं कार्यक्षेत्र अधिकच विस्तारीत केलं. याच महिन्यात (सप्टेंबर) १७ तारखेला ते ८४ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत.
बोलता बोलता डॉ. क्षीरसागरांनी मधमाश्यांविषयीचं ज्ञानभांडारच खुलं केलं. ते म्हणाले, ‘‘मधमाश्यांचं जीवन हा निसर्गात घडलेला महान प्रयोग आहे. निसर्गातील अस्तित्वाच्या लढाईत मधमाशा कोटय़वधी र्वषे टिकून राहिल्या त्या आपल्या सहकार्यावर आणि एकमेकांशी असलेल्या नात्यावर, कामाच्या अचूक विभागणीवर आणि समूहाने जगण्याच्या विलक्षण युक्तीवर!’’
मधमाशीला राष्ट्रीय कीटक म्हणून मान्यता मिळाली पाहिजे, या आपल्या मागणीचं समर्थन करताना ते म्हणाले, ‘‘त्यांचा केवळ मधच उपयुक्त असतो असं नव्हे तर त्यांच्यातून स्रवणारं विष व मेण यांनाही प्रचंड मागणी आहे.’’ त्यांच्या विषाचं सामथ्र्य समजण्यासाठी क्षीरसागरांनी आपला एक अनुभव सांगितला. पुणे केंद्रात ते काम करत होते तेव्हा सांध्यांचा असाध्य रोग झालेली एक पारशी बाई गुडघ्यांना माशा चावून घ्यायला आली होती. प्रथम आली तेव्हा तिच्या मुलांनी तिला उचलून आणलं. काही महिन्यांनी कुबडय़ाच्या आधाराने येऊ लागली. मग नुसतीच काठी आणि नंतर खूप वर्षांत आलीच नाही. आता या विषाची इंजेक्शन्स मिळतात. पण हा प्रयोग डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा असं त्यांनी सांगितलं. मधमाशीच्या मेणाबद्दल ते म्हणाले की, या नैसर्गिक मेणाला प्रसाधन क्षेत्रात खूपच मागणी आहे. लिपस्टीकमध्ये हेच मेण वापरतात. पूर्वीच्या बायका पिंजर टेकवण्याआधी हेच मेण लावायच्या.
मधमाश्यांचं विष व मेण यासंबंधी थोडीफार ऐकीव माहिती होती. पण कामकरी माश्यांच्या शरीरातील काही ग्रंथींमधून जो प्रोटिनयुक्त पदार्थ (रॉयल जेली) स्रवतो, त्यात भरपूर खनिजं व जीवनसत्त्वं असल्याने बऱ्याच ऑलिम्पिक खेळाडूंना ही जेली आहारातून दिली जाते हे ही त्यांच्याकडून समजलं. मधमाश्यांच्या पोळ्याची रचना खूप वैशिष्टय़पूर्ण असते. सर्वात वर मध साठवायची जागा, बाजूला परागकणांचा विभाग (मध व पराग हा त्यांचा आहार) त्याखाली कामकरी माश्यांच्या खोल्या. त्याच्याखाली राणीने घातलेली अंडी, अळ्या, कोश.. त्या खाली नरमहाशयांच्या ‘क्वार्टर्स’ आणि सगळ्यात खाली राणी माशीचा ऐसपैस महाल आणि हे भलंमोठं मोहळ पेलणाऱ्या भिंतीची जाडी फक्त २/१००० इंच.. सगळंच विलक्षण!
मध्याच्या बाटल्यांवर जांभूळ मध, कारवी मध, लिची मध.. असं लिहिलेलं असतं, त्याचा अर्थ सांगताना ते म्हणाले, ‘मायक्रोस्कोपखाली तो तो मध तपासल्यावर ज्या फुलाचे पराग त्यात जास्त दिसतील त्याचं नाव त्या मधाला देतात. शेतांमध्ये मधमाशीपालनाच्या आधुनिक पेटय़ा ठेवल्या तर तिथलं उत्पन्न ४० टक्क्य़ांनी वाढतं हा प्रयोगातून सिद्ध झालेला निष्कर्ष अधोरेखित करून ते म्हणाले की, परदेशात तर मधासाठी मधपेटय़ा ही कल्पनाच पुसली गेलीय. परागीभवनासाठी मधपेटय़ा हीच संकल्पना रुजलीय.
मधमाश्यांचा अभ्यास म्हणजे जंगलभ्रमंती अपरिहार्य.. प्रत्येक फेरीत वेगवेगळे अनुभव. अस्वल आणि मधमाशा यांच्या संबंधातील निरीक्षणे नोंदविण्यासाठी ते गोवा किनारपट्टीजवळील कॅसलरॉक या घनदाट अरण्यात ते डॉ. देवडीकरांबरोबर गेले होते. तिथल्या मिट्ट अंधारात, एका मचाणावर, जंगली श्वापदांच्या सहवासात काढलेली ती काळरात्र त्यांना आजही आठवते. आपल्या आगळ्यावेगळ्या नोकरीतील असंख्य अनुभव, संशोधन, निरीक्षणं शब्दबद्ध करण्यासाठी त्यांनी निवृत्तीनंतर लेखणी सरसावली. याची परिणिती म्हणजे, मैत्री मधमाशांशी, ऋतू बदलाचा मागोवा, उपयोगी कीटक.. अशी विज्ञानविषयक २६ पुस्तके (+ दोन येऊ घातलेली) व अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधून सादर केलेले ५० शोधनिबंध एवढी साहित्य संपदा त्यांच्या नावावर जमा आहे. एकूण ९ पुरस्कारांपैकी ‘देशोदेशीचे कृषीशास्त्रज्ञ’ या त्यांच्या पुस्तकाला मिळालेला वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा २०१४ चा ‘कृषीविज्ञान साहित्य पुरस्कार’ हा सर्वात अलीकडचा. मायबोलीतून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी गेल्या ८७ वर्षांपासून प्रकाशित करण्यात येत असलेल्या एकमेव मासिकाच्या संपादक मंडळाचे ते सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या इंडियन बी जर्नल या त्रमासिकाचेही ते एक संपादक होते. अनेक नामवंत शिक्षण व संशोधन संस्थांच्या कार्यकारिणीवर त्यांनी काम केलंय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले प्रचारक बाबासाहेब आपटे यांनी १९७२ साली अखिल भारतीय पातळीवर इतिहास संकलन समितीची स्थापना केली. या समितीच्या पुणे शाखेचे कार्यवाह म्हणून १९८० पासून क्षीरसागर कार्यरत आहेत. ‘नामूलं लिख्यते किञ्चत्।’ (ज्याला आधार नाही असं किंचितदेखील लिहीत नाही) हे या संस्थेचं बोधवाक्य आहे. कला, क्रीडा, विज्ञान.. अशा १६ विषयांतील तज्ज्ञांच्या मौखिक मुलाखती घेऊन स्थानिक इतिहासाचा ‘आँखो देखा हाल’ प्रकाशित करण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. या मालिकेत आतापर्यंत ५ खंड प्रकाशित झाले असून, सध्या पश्चिम महाराष्ट्र ते गोवा भागातील महिलांच्या खेळांचा प्राचीन ते अर्वाचीन असा इतिहास शब्दबद्ध करण्याचं काम सुरू आहे.
क्षीरसागरांच्या घरात डोकावलं तर ‘कुटुंब रंगलंय अभ्यासात वा संशोधनात’ हा प्रत्यय येईल. त्यांच्या पत्नी डॉ. हेमा क्षीरसागर यांच्यावर स्वतंत्र लेख लिहिता येईल इतकं गुणवैविध्य त्यांच्यापाशी आहे. पुण्याच्या टिळक शिक्षण महाविद्यालयात ३२ वर्षे अध्यापन केल्यावर (त्यातील शेवटचं वर्ष प्राचार्य) निवृत्तीनंतर त्यांनी डॉक्टरेटचा अभ्यास केला. कारण एकच.. आत्मानंद. एवढंच नव्हे तर राहून गेलेली पोहणं शिकण्याची इच्छाही त्यांनी साठीनंतर पूर्ण केली. पुण्यात स्कूटर चालविणाऱ्या पहिल्या चार महिलांपैकी एक हा विक्रमही त्यांच्या नावावर जमा आहे. ६० वर्षांपूर्वी स्कूटर चालविणाऱ्या बाईचं पुण्यातदेखील एवढं अप्रूप होतं की नाव माहीत नसणारे त्यांना MXD 129 या त्यांच्या स्कूटरच्या नंबराने संबोधत.
दर सोमवारी संस्कृतप्रेमी ज्येष्ठ नागरिक प्राचीन संस्कृत साहित्याचं वाचन व मंथन करतात. गेली १९ र्वष कोणतेही मूल्य न घेता अव्याहतपणे सुरू असलेल्या या उपक्रमाची धुरा ७७ वर्षांच्या हेमाताई गेली ३/४ र्वष सांभाळत आहेत.
लेखनाच्या बाबतीत तर पती-पत्नी दोघांनाही तोडीस तोड म्हणावं लागेल. संस्कृतमधील प्रसिद्ध उक्तींचे इंग्रजीत ससंदर्भ स्पष्टीकरण करणारा त्यांचा ‘संस्कृत उक्ती-विशेषा:’ हा ग्रंथ म्हणजे एक मोल ठेवाच आहे. वर्डस्वर्थ, रॉबर्ट फ्रॉस्ट, शेक्सपियर अशा लोकप्रिय कवींच्या ५० कवितांचा मराठीत भावानुवाद केलेलं त्यांचं ‘बिंब प्रतिबिंब’ हे पुस्तक वाचताना मूळ कविता जास्त चांगल्या कळतात, असं वाचक म्हणतात.
हेमाताईंच्या प्रकाशित व प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या एकूण ७ पुस्तकांपैकी ‘बाराव्या शतकातील खाद्यसंस्कृती’ हे डॉ. हेमा जोशी यांच्यासह लिहिलेलं पुस्तक एकदम वेगळ्या वाटेवरचं. मानसोल्लास या मूळ संस्कृत ग्रंथातील अन्नभोग व पानीयभोग या दोन प्रकरणांवर आधारित शाकाहारी व मांसाहारी खाद्यसंस्कृतीचं त्यात वर्णन आहे. मांडे, पुरणपोळी, श्रीखंड, तांदळाची खीर, तंबीटाचे लाडू.. असे पदार्थ आपले पूर्वज ८०० वर्षांपासून करीत आणि खात आले आहेत हे वाचताना गंमत वाटते. या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा व वुमन्स नेटवर्कचा असे २ मोठे पुरस्कार मिळाले आहेत.
या दाम्पत्याची मोठी मुलगी डॉ. प्राची साठे म्हणजे पुण्याच्या सुप्रसिद्ध रुबी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता (I.C.U.) विभाग सुरू करणारी डॉक्टर. तेव्हापासून आजतागायत म्हणजे गेली २०-२२ वर्षे हे युनिट तीच समर्थपणे सांभाळतेय. इथल्या थरारक अनुभवांवर तिने लिहिलेल्या On the Verge of life and death या पुस्तकाच्या ‘जीवन-मृत्यूच्या सीमेवरून’ या हेमाताईंनी केलेल्या अनुवादाला राज्य शासनाचा (२००९) पुरस्कार मिळालाय.
क्षीरसागरांची दुसरी कन्या वर्षां सहस्रबुद्धे शिक्षणतज्ज्ञ असून, मुलांना आनंददायी शिक्षण देणारी पुण्यातील ‘अक्षरनंदन’ ही प्रयोगशील शाळा हे तिच्याच प्रयत्नांचं फळ. आदिवासींच्या शिक्षणासंदर्भातही तिने खूप काम केलंय. चंद्रपूरला राहून त्यांची भाषा शिकून त्या बोलीभाषेतून पुस्तकंही लिहिलीत. तिची मुलगी सुनृता सहस्रबुद्धे हिने बालमानसशास्त्रात उच्चशिक्षण घेतलं असून, आईच्या पावलांवर पावलं टाकत आता तिने एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या कामात स्वत:ला वाहून घेतलं आहे. त्यांचा नातू आलोक साठे याने गेल्या वर्षी म्हणजे ९ वीत असताना पाणिनी लिंग्वीस्टिक ऑलिम्पियाडमध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवलंय.
क्षीरसागर कुटुंबीयांनी विज्ञान, भाषा, शिक्षण, वैद्यक अशा अनेक क्षेत्रांत भरभरून योगदान दिलंय. तरीही अजून बरंच काही करायचं बाकी आहे, असं त्यांना वाटतं. हे मनोगत व्यक्त करण्यासाठी डॉ. क. कृ. क्षीरसागरांनी निवडलेल्या रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या कवितेतील या ओळींचा हेमाताईंनी केलेला भावानुवाद.
The woods are lovely,
dark and deep
But I have promises to keep,
And miles to go before I sleep
And miles to go before I sleep.
गर्द सभोती वनराई ही मना घालिते भुरळ,
परि मन सांगे सदासर्वदा दिलिस वचने पाळ
चालायाचे मैलोगणती, उरे अल्पकाळ
कार्य संपता अलगद यावी विश्रांतीची वेळ
डॉ. क. कृ. क्षीरसागर संपर्क – nanahema10@gmail.com
याच सदरात ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘महाराष्ट्रकन्या’ या लेखाखालील मॅक्सिन मावशी यांचा ई-मेल – maxineberntsen@gmail.com.
वळसा वयाला : ‘मधु’र योगदानाची पंचविशी
संशोधक म्हणून पुण्यातील मधमाशीपालन केंद्रात तब्बल २५ वर्षे अखंड योगदान देणारे डॉ. क. कृ. क्षीरसागर आज ८४ व्या वर्षीही त्याच उत्साहात कार्यमग्न आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-09-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About dr kk kshirsagar