‘‘वलयांकित, यशस्वी पिता आणि पतीही लाभलेली माझी आई, पण त्यांच्या तेजाने स्वत:ला झाकोळू न देता आपल्या अस्तित्वाच्या प्रयोजनाच्या नित्य शोधात असणारी माझी आई.. माझ्यासाठी मात्र मातृत्वाचे मला पूर्वी कधीतरी अताíकक भासलेले आणि नंतर हलके हलके उमगू लागलेले एक सुरस गम्य बनून राहिली आहे.’’ ‘नाच गं घुमा’कार आणि प्रसिद्ध लेखिका माधवी देसाई यांचं नुकतंच निधन झाले. त्यांच्याविषयी सांगताहेत त्यांच्या कन्या यशोधरा काटकर.
माधवी देसाई.. लेखिका.. माझी तसेच मीरा आणि गीतांजलीची आई! दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आणि मराठी चित्रपट निर्मितीच्या सुरुवातीच्या कालखंडात अतिशय आशयघन चित्रपटांची निर्मिती करून आपला विशेष ठसा मराठी मनावर उमटवणारे निर्माते, दिग्दर्शक, संकलक भालजी पेंढारकर आणि लीलाबाई पेंढारकर यांची मुलगी. पण तिने तसे असल्याचे स्तोम माजवलेले कधी पाहिल्याचे मला आठवत नाही. इतका महान सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा तिच्या रूपाने आम्हाला आई म्हणून लाभला हे आमचे महत्भाग्यच. खरे तर पारंपरिक िहदू कुटुंबातून त्या काळच्या मुलींवर होणारे संस्कार याला कारणीभूत असावेत की ती कायम आईसारखीच आम्हाला वाटत राहिली. राष्ट्रभक्ती, शिवभक्ती आणि कलेविषयीची जाण-वारसा परंपरेने तिच्या रोमरोमांत भिनली होती.
मला आई आठवते ती म्हणजे सतत धडपड करत राहणारी, कार्यमग्न, कधी स्वत:च्या  शिक्षणासाठी, तर कधी शिक्षिकेची नोकरी करत असताना घर आणि लहान मुली सांभाळण्याची कसरत करणारी, कधी वडिलांच्या आजारपणात त्यांच्यासाठी झटणारी आणि आयुष्याच्या वाटेवर अनेक चढ-उतार अनुभवल्यानंतरही हसतमुख आणि सतत आशावादी असणारी एक स्त्री म्हणूनच! आल्यागेल्या प-पाहुण्यांचा कुठल्याही परिस्थितीत अगत्याने पाहुणचार करणारी माझी आई सुगरण होतीच, पण नवनवीन पदार्थ शिकण्याचाही तिला सोस होता. तशी आपली आई प्रत्येकालाच सुगरण वाटतच असते. तिच्या हाताला असलेला मायेचा सुगंध अन्नाला सुग्रास बनवत असावा. कुठलाही पदार्थ करायचा तो थोडा थोडका नाहीच, तर अगदी भरपूर प्रमाणात असा आईचा खाक्या! सगळ्यांना पोटभर खाऊ -पिऊ घालण्याची तिला आवड होती. तिचे मनही मोठे असल्याने हा सगळा आटापिटा करण्यासाठी लागणारे कष्ट तिला जाणवत नसावेत. विवाहानंतर खवय्या गोव्याच्या भूमीत, तर तिच्यातील सुगरणीने अधिकच भरारी घेतली असणार! माशांची विविध प्रकारची कालवणं, हुमणं, भुजणं, तोंडाकसारखे अस्सल गोव्याचे पदार्थ ती अप्रतिम बनवत असे. आंब्याचं सासव तसेच मुगा-गाठी सर्वाना भरपूर करून खाऊ  घालण्यात तिला परमानंद मिळत असे आणि ते समाधान तिच्या चेहऱ्यावर नित्य विलसत असे.
कोल्हापुरात संपन्न कुटुंबात परंतु कडक शिस्तीच्या वातावरणात वाढल्यामुळे स्वत:बद्दल फार मोठे भ्रम तिच्या मनात निर्माण झाले नसावेत. आईने स्वत:ला कधी या आवर्तात वहावत जाऊ दिले नाही. स्वत:ला सतत व्यस्त ठेवून आपला मानसिक, शैक्षणिक विकास कसा होईल यावर तिचा कटाक्ष राहिला. गोव्याच्या अत्यंत खानदानी अशा काटकर कुटुंबातील नरेंद्र काटकर यांच्याशी तिचा विवाह झाला. हवेलीसारखे भले मोठे घर, त्यात असलेली भरपूर माणसे, तिथले निराळे रीतीरिवाज हे तिने चटकन आत्मसात केले, पण मोठय़ा कुटुंबातली सून म्हणून कुठलाही तोरा तिने कधी मिरवला नाही, उलट कुटुंबातील व गोव्यातील इतर बऱ्याच स्त्रिया आजूबाजूच्या परिस्थितीबाबत कशा अनभिज्ञ आहेत याचे तिला वैषम्य वाटे. गोव्यात आपल्या संसारात हळू हळू रुळत जातानाच तेथील समाजजीवनाचा तिने परिचय करून घेतला. गोवा मुक्ती आंदोलनाच्या काळात तिने त्यात उत्साहाने भाग घेतला. तिला अटक झाली, त्या वेळी मी अगदीच लहान होते. मग माझ्या वडिलांनी तिला आग्वादच्या तुरुंगातून सोडवून आणले. तेव्हापासूनच गोव्यातील सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक चळवळींचा ती एक महत्त्वाचा हिस्सा बनून गेली. गोव्यातील महिलांची परिस्थिती, त्यांच्याबद्दल जनमानसात असलेले विविध आडाखे याबद्दल तिला प्रकर्षांने जाणीव झाली.
केवळ समाजात जागृती घडवून आणायची आणि आपले घर मात्र परंपरांच्या नावाने जखडलेल्या बेडय़ांमध्ये बांधून राहू द्यायचे हे तिच्या स्वभावात नव्हते. गोव्याचे भले थोरले घर, नोकर-चाकर, रग्गड शेतीभाती या पलीकडेही एक जग आहे आणि गोव्यातील सुखासीन आयुष्यावर अवलंबून न राहता ते आपल्या पतीने बघावे, अनुभवावे असे तिला वाटत असावे. तिच्या या जाणिवेचा यथोचित आदर करून मुंबईतील कल्याणजवळ असलेल्या ‘एनामाल्ड वायर्स’ कंपनीत माझे पप्पा नरेंद्र काटकर रुजू झाले. त्या वेळी त्यांच्यासमवेत आई, मी, आणि धाकटी बहीण मीरा होतो. आम्ही मुंबईला आलो. गोव्यातील एका वैभवसंपन्न घरातून मुंबईत नॅशनल रेयॉन कॉलनीतील एका सामान्य अशा चाळीतील दोन खोल्यांमध्ये आईने अत्यंत आनंदाने आणि रसिकतेने संसार थाटला. मला आमच्या त्या घरातली अगदी छोटी-छोटी गोष्ट अजूनही आठवते. इतकं छान घर आईने लावलं होतं! आई शिस्तप्रिय होतीच, पण नेटकेपणाने प्रपंच करायला जे भान लागते, तेही तिच्याजवळ होते. मुंबईच्या शहरी जीवनात तग धरायचा असेल तर आपणही कमाई करायला हवी आणि त्यासाठी आपले शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे हे तिच्या सुज्ञ मनाला लगेच कळले. मुंबई- पुणे अशा वाऱ्या करत आपले पदवी आणि नंतर बीएडपर्यंतचे शिक्षण पूर्ण करतानाची तिची ओढाताण मला अजूनही आठवते. आईने पुढे शिक्षिकेची नोकरी धरली आणि एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून अल्पावधीतच लौकिक मिळवला. आई गेल्याचे कळल्यानंतर अगदी मुख्यमंत्र्यांपासून अगणित लोकांचे शोकसंदेश आले आहेत, यात सर्वाधिक शोकसंदेश देणाऱ्यांमध्ये किंवा भेटायला येणाऱ्यांमध्ये आईच्या विद्यार्थ्यांची संख्या थक्क करणारी आहे. आई निवृत्त होऊनही आता इतकी दशके उलटून गेली, पण तिच्या विद्यार्थ्यांमध्ये तिच्याविषयी असलेली आस्था व आदर अजूनही टिकून आहे. औपचारिक शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कार, आचार-विचार आणि उच्चार या सर्वानाच अधिक महत्त्व देणाऱ्या माझ्या आईने सुसंस्कृत नागरिकांच्या किती पिढय़ा घडवल्या असाव्यात याचा अंदाज यातून आम्हाला आला.
मी सोळा वर्षांची असतानाच एका आजारात माझे वडील अचानकपणे हे जग सोडून गेले. आईचे निराळेच रूप मला त्या वेळी प्रथमच दिसून आले. मी दिवस-रात्र रडत राहत असे, पण आठव्या दिवशी आईने मला कॉलेजला गेलेच पाहिजे, रडत बसून काही व्हायचं नाही, असे म्हणून समजावले आणि कॉलेजमध्ये पाठवले. पती निधनाचे दु:ख तिने बाजूला सारले आणि आम्हा तिघी बहिणींसाठी तीच माय आणि तीच बाप बनून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
काही काळानंतर दादा (थोर लेखक रणजीत देसाई) तिच्या जीवनात आले. आई तर तिच्या लहानपणापासून दादांना परिचित होती. त्यांना आम्हा सर्वाचाच लळा होता. आईने जेव्हा त्यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय मला सांगितला, तेव्हा मी तिला पाठिंबाच दिला. ते अत्यंत खेडेगाव असलेल्या ‘कोवाड’ या गावी राहात होते. आईच्या अगोदर आम्ही बहिणीच कोवाडला जाऊन आलो होतो. मला त्यांचे ते भले मोठे घर, खानदानी कुटुंबाचा रुबाब हे सर्व भावले होतेच, पण त्याहीपेक्षा मला त्यांच्या खासगी पुस्तकालयाचे फार आकर्षण वाटले होते. त्यांनी आपल्या या खजिन्याच्या चाव्या माझ्याकडे अनेकदा सोपवल्या आणि मी त्यातून बरेच काही विचारधन लुटून आणले.
कोवाडला आल्यानंतरही तिचे समाजभान जागृत होतेच! खेडय़ातल्या अशिक्षित बायकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना एकत्र आणून त्यांच्या उत्थानाचे कार्यच तिने कोवाडला हाती घेतले. दादांच्या प्रथम पत्नीपासूनच्या दोन लहान मुली होत्या (आहेत) मधु आणि पारू, सावत्र आई म्हटले की मनात येणारी प्रतिमा आपल्याबाबतीत कुठेही व कधीही खरी ठरू नये यासाठी तिने जिवाचे अक्षरश: रान केले. आम्हा बहिणींबाबत कधी अधिक- उणे तिच्याकडून झाले असेल, पण या दोघं मुलींना तसली कुठलीही जाणीव होऊ नये असे तिला सतत वाटे. त्यांची शिक्षणं, लग्न आणि नंतर ओळीने आम्हा सर्व बहिणींची बाळंतपणं यात ती गुंतून पडली.
आयुष्याच्या संध्याकाळी तिची सेवा करणाऱ्या पूजा, शरद आणि इतर मुलींना तिने आपल्या अपत्यांप्रमाणेच मानले आणि आईच्या जबाबदारीने त्यांच्यासाठी जे काय करायला हवे ते सर्व ती करीत राहिली .
दादांचा आणि तिचा घटस्फोट झाल्यानंतर ती परत गोव्याला आली. काटकरांचे वडिलोपार्जति घर आणि इतर संपत्तीतला काही वाटा मिळाला होता. स्वत:चे हक्काचे घर असल्यामुळे तिला एक सुरक्षितता लाभली होती. ती कविताही लिहित असे. तिची ‘साहेब’ नावाची एक कविता मला आवडते. हेलिकॉप्टरमधून येणारा साहेब (मंत्री) आपल्या आयुष्यात खूप काही मोठ्ठा बदल घेऊन येणार आहे अशा भ्रमात असलेल्या खेडवळ स्त्रीची मनोवस्था तिने त्यात अचूक टिपली आहे. तिच्या आतापर्यंत ३५ प्रकाशित पुस्तकांपकी ‘प्रार्थना’, ‘कांचनगंगा’ या कादंबऱ्या तसेच ‘सीमारेषा’ हा कथासंग्रह, विश्वनाथ नागेशकर या गोवेकर पण जर्मनीमध्ये राहात असलेल्या महान चित्रकारावरची ‘विश्वरंगे’ ही कादंबरी माझी विशेष आवडती आहेत.  
मी मुंबईला नोकरी करीत असताना माझे मुंबईला हक्काचे घर असावे यासाठीची तिची धडपड आजही मला आठवते. सरकारी कोटय़ातून घर मिळावे यासाठी मंत्रालयात तिने अगणित खेटे मारले. तिचं मोठी लेखिका असणं वगरे काही याच्या आड आलं नाही हे आवर्जून सांगण्याजोगे!   
आई आणि आम्ही बहिणी यांच्यातील नाते काळानुसार अधिकच दृढ मत्रीचे होत गेले. आम्हा     सर्वामध्ये मनमोकळा संवाद असावा याबाबत ती नेहमीच पुढाकार घेत असे, परंतु दादा आणि तिच्या सहजीवनातील कटू आठवणी मात्र तिने आमच्याशी क्वचित शेअर केल्या असतील. आपले दु:ख तिने आपल्या उरात चिणून ठेवले आणि कालांतराने ते ‘नाच गं घुमा’च्या स्वरूपात जगापुढे आले. ‘सनसनाटी’ म्हणून काहींनी त्याची समीक्षा केली असली तरी तिच्यासारख्या प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला ते खूप भावले हे नाकारता येत नाही. कारण सच्च्या भावनांची अभिव्यक्ती ज्या तऱ्हेने तिच्या उत्कट लेखनशैलीतून व्यक्त झाली ते ‘अभिजात’ मानले गेले नसले तरीही निखळ होते.. उथळ तर नक्कीच नव्हते!
कुटुंबाची वीण घट्ट राहावी, आम्हा बहिणींनी व आमच्या कुटुंबीयांनी सतत एकमेकांना धरून राहावे, यासाठी तिच्यातील कुटुंबवत्सल स्त्री सदैव तत्पर राहिली. तिचे कुटुंब आमच्या पुरतेच मर्यादित कधीच नव्हते. गोव्यातील तिच्या महिला सख्या, मत्रिणी, कोवाडमधील तिने जमवलेला गोतावळा हे सर्व तिला आईच्या स्थानी मानत. आपल्यावर स्त्री म्हणून होत असलेल्या अन्यायाच्या, सहसंवेदनेच्या एका अनामिक भावबंधाने या स्त्रियांशी तिची नाळ जुळली होती का? असेलही कदाचित!
कधी कधी मात्र आमचे खटके उडत. तिचे स्वत:ला विसरून दुसऱ्यांसाठी राबत राहणे मला फार रुचत नसे. आता वय झाले आहे तेव्हा तिने डोक्याला फार शीण येईल इतके दुसऱ्यांच्यात गुंतू नये असे मला वाटायचे. माझ्या आयुष्यातील मी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णयदेखील मी तिला फार उशिरा सांगितला होता. माझी आई अत्यंत पारंपरिक विचारांची आहे, कदाचित ती मला समजून घेणार नाही, असे माझे त्या वेळी मत होते. आजही ते फारसे बदलेले नाही, परंतु आज वयाच्या या टप्प्यावर तिच्या माझ्याविषयीच्या काळजीतूनच तो कर्मठपणा तिने माझ्यासाठी का होईना पांघरला असावा असे मला आता वाटते.
तिचे साहित्यिक जीवन आयुष्याच्या उतरणीला अधिकच बहरले. अनेक मानसन्मान तसेच ‘कवी कुसुमाग्रज पुरस्कार’, ‘दमाणी साहित्य पुरस्कार’ असे प्रतिष्ठित पुरस्कारही तिला लाभले. २१ जुलैच्या तिच्या जन्मदिनी तिची दोन पुस्तके ‘चेरी ब्लॉसम’ (कादंबरी) आणि ‘कस्तुरीगंध’ (कथासंग्रह) आम्ही प्रकाशित केली.
वलयांकित, यशस्वी पिता आणि पतीही लाभलेली माझी आई, पण त्यांच्या तेजाने स्वत:ला झाकोळू न देता आपल्या अस्तित्वाच्या प्रयोजनाच्या नित्य शोधात असणारी माझी आई.. माझ्यासाठी मात्र मातृत्वाचे मला पूर्वी कधीतरी अताíकक भासलेले आणि नंतर हलके हलके उमगू लागलेले एक सुरस गम्य बनून राहिली आहे.
(शब्दांकन- शर्वरी जोशी)
sharvarijoshi10@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा