संत दादू दयाल यांचा विश्वास आहे लोभमुक्तीवर, अहंकाराच्या त्यागावर आणि सदाचरणावर. केवळ खाणं-पिणं आणि झोपणं यातच आयुष्य घालवणं म्हणजे आयुष्याचं सार्थक नव्हे, असे सांगून दादू जीवनसार्थकाचा मार्ग दाखवतात.
उत्तर भारतातल्या शेकडो माणसांच्या स्मृतीत संत दादू दयाल अजून जिवंत आहेत. त्यांची पदं शेकडो माणसांच्या ओठावर आहेत. खेडय़ापाडय़ांमधली निरक्षर माणसं कबीर, रैदास, चरणदास, दादू यांना रोजच्या जगण्याच्या धामधुमीत सोबत घेत आली आहेत.
संत सत्पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वामागे दैवी प्रभेचं वलय निर्माण करणं आणि त्यांच्या चरित्राला चमत्कारांचे झळझळते रंग चढवणं ही लोकमानसाची जवळजवळ स्वाभाविक अशी आवडती लकब आहे. दादूंचं व्यक्तिमत्त्वं आणि चरित्रंही याला अपवाद नाही. कबीरासारखीच त्यांची जन्मकहाणी रंगवली गेली आहे. कुणा लोदीराम नावाच्या ब्राह्मणाला अहमदाबादजवळ कुठे तरी साबरमती नदीतून वाहत आलेलं एक तान्हं मूल सापडलं. त्यानं आणि त्याची पत्नी बसीबाई हिनं त्या मुलाचा सांभाळ केला. तोच दादू दयाल.
काही जण असंही मानतात, की कुणा ब्राह्मण कुमारिकेनं आपलं मूल नदीत सोडलं आणि कापूस पिंजणाऱ्या धुनिया जातीच्या जोडप्यानं त्या मुलाचा सांभाळ केला. वस्तुस्थिती काय होती हे आज आपल्याला ठाऊक नाही आणि ठाऊक होण्याची फारशी शक्यताही नाही. पण दादू आपल्या तत्त्वचिंतनाच्या वाटेवरून अशा एका मुक्कामाला पोचले की ‘जाति हमारी जगतगुर, परमेसर परिवार’ असा बोध त्यांना झाला. रूढार्थानं आपण पिंजारा आहोत याचा नि:संकोच उच्चारही त्यांनी केला आहे.
कौण आदमी कमीण विचारा,
किसकौ पूजै गरीब पिंजारा
मैं जन येक अनेक पसारा,
भौजली भरिया अधिक अपारा
दादू गुजराथमध्ये जन्मले. पण त्यांच्या आयुष्याचा बराचसा काळ राजस्थानात गेला. मध्य प्रदेशात काही काळ त्यांनी भ्रमंती केली. इतर संतांप्रमाणेच तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याच्या निमित्तानं ते बिहार, बंगाल आणि उत्तर प्रदेशात फिरले आणि राजस्थानात आमेर, सांभर, नराजा अशा ठिकाणी मुक्काम करत अंतिमत: नराजालाच त्यांनी आपला देह ठेवला.
दादूंचा काळ सोळाव्या शतकातला. अकबराच्या शासन काळात ते वावरले. त्यांनी परब्रह्म संप्रदाय या नावानं स्वत:चा स्वतंत्र संप्रदाय निर्माण केला. अनेक शिष्य तयार केले. असं सांगितलं जातं की सुरुवातीला त्यांचे १५२ शिष्य मानले गेले. त्यातले १०० हे पूर्णपणे विरक्तीचं जीवन जगले. उरलेल्या ५२ शिष्यांनी पारमार्थिक साधनेबरोबरच संप्रदायाची बांधणी आणि विस्तार हेही आपलं काम मानलं. त्या ५२ शिष्यांचे मठ किंवा आखाडे निर्माण झाले. गरीबदास, बनवारीदास बधना, रज्जब, सुंदरदास अशा अनेक शिष्यांनी राजस्थान, पंजाब, हरियाणासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी नवीन सांप्रदायिक अनुयायी निर्माण केले आणि आपल्या सांप्रदायिक भक्तितत्त्वांना अनुसरून साहित्यनिर्मितीही केली. दादूंच्या देहावसानानंतर काही काळानं त्यांच्या संप्रदायातून पाच उपसंप्रदाय निर्माण झाले. तत्त्वप्रणालीमधले लहान लहान भेद जरी या उपसंप्रदायांना कारण झाले तरी दादू दयाल हेच त्या सर्वाच्या साधनेचं आणि उपदेशाचं प्रेरक केंद्र राहिलं.
दादू दयालांची पदरचना संख्येनं विपुल आहे. आचार्य क्षितिमोहन सेनांसारखे अभ्यासक मानतात, की दादूंनी २० हजारांपेक्षा अधिक पदं रचली आहेत. आज ती सर्व उपलब्ध नाहीत. जी उपलब्ध आहेत, त्यांतही दादूंची आणि इतरांची रचना कोणती हे सांगता येणार नाही. तरीही आचार्य परशुराम चतुर्वेदींनी संपादित केलेली दादू दयाल ग्रंथावली आज सर्वात प्रमाणित मानली जाते.
ती पदावली म्हणजे दादूंच्या विचारविश्वाचा आरसा आहे. सर्वच निर्गुणी संतांप्रमाणे दादू समाजाच्या तथाकथित खालच्या थरांमधून आलेले आणि जातिभेदाचा तीव्र निषेध करणारे होते. समाजातल्या दंभाचा, अन्यायाचा आणि क्रौर्याचा संयत पण ठाम निषेध त्यांच्या वाणीतून ठायी ठायी प्रकट झालेला दिसतो. मुस्लीम शासक आणि धर्मगुरू यांना अत्याचार आणि फसवणूक याबाबत सुनावताना दादूंची भाषा तिखट होते. हिंदू असो वा मुसलमान, जो सहृदय असेल, जो सज्जन असेल, जो मानवतावादी असेल, तो खरा ईश्वरभक्त असेल.
माणसाला जात नसते. कोणी जातीनं नीच नसतो की कोणी उच्च नसतो, हे त्यांनी पुन:पुन्हा सांगितलं आहे. त्यांचा विश्वास आहे लोभमुक्तीवर, अहंकाराच्या त्यागावर आणि सदाचरणावर. संसार मिथ्या आहे आणि त्यापासून मनानं अलिप्त होण्याचं भान व्यक्तीमध्ये जागलं पाहिजे. केवळ खाणं-पिणं आणि झोपणं यातच आयुष्य घालवणं म्हणजे आयुष्याचं सार्थक नव्हे, असे सांगून दादू जीवनसार्थकाचा मार्ग दाखवतात.
ज्या शरीराची मदत घेऊन माणूस उपभोग घेतो किंवा पापही करतो, ते शरीर नाशवंत आहे आणि त्याला सोडूनच एक दिवस जायचं आहे. मरणाची अटळता माणूस विसरतो. पण जन्माबरोबर मरणही येतंच. खरं तर ते एक चक्र आहे. उदय आणि विलय यांचं चक्र. जे चक्र निसर्गात दिसतं, तेच मनुष्य प्राण्यातही असतंच. म्हणून जन्म-मरणाच्या मधला एक तात्पुरता मुक्काम म्हणजे आयुष्य हे ध्यानात ठेवलं पाहिजे. शेवटी शाश्वत आहे ते परब्रह्म. कालही जिला स्पर्श करू शकत नाही अशी अद्भुत शक्ती म्हणजे परमात्मा.
हा परमात्मा एकच आहे अशी दादूंची श्रद्धा आहे. तो कधी राम म्हणून ओळखला जातो आणि कधी रहीम म्हणून. त्याची नावं अनेक आहेत. त्याच्या विषयीच्या श्रद्धा वेगवेगळ्या आहेत. त्याची रूपं निरनिराळी आहेत. पण तो अंतत: एकच आहे.
बाबा दुसरा नाही कोई
येक अनेक नावं तुम्हारे, मो पै और न होई
अलख इलाही येक तू, तूही राम रहीम
तूही मालिक मोहना, केसी नाव करीम
साई सिरजनहार तू, तू पावन, तू पाक
तू काइम करतार तू, तू हरि हाजिर आप
रमिता राजिक येक तू, तू सारंग सुबिहान
कादिर करता येक तू, तू साहिब सुलतान
अविगत अलह येक तू, गनी गुसाई येक
अजब अनुपम आप है, दादू नाव अनेक
दादू जवळजवळ ६० वर्षे जगले. या काळानं त्यांना केवळ प्रौढ केलं नाही, तर परिपक्व केलं. त्यांची वाणी त्यांच्या शिष्यांनी लेखनबद्ध केली आणि ती आज ४०० वर्षांनंतरही ती आपल्याला उपलब्ध झाली, हे आपलं भाग्य. एरवी साऱ्याच सच्च्या संतमंडळींप्रमाणे, साहित्यनिर्मिती करावी म्हणून दादूंनी पदरचना केलीच नव्हती. जनहितासाठी प्रवाहित झालेला त्यांच्या हृदयीचा एक मधुर झरा सहजपणे त्यांच्या शब्दात उमळून आला होता.
त्या झऱ्याच्या पाण्याने उत्तर भारतीयांची हृदयभूमी ४०० वर्षे भिजली. अद्यापही त्या पाण्याचा झिरपा इथे-तिथे होतोच आहे.
डॉ. अरूणा ढेरे -aruna.dhere@gmail.com

Story img Loader