सुमित्रा भावे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्याची जशी अगणित रूपं, तशी तितकी कॅमेऱ्यातून दिसणाऱ्या घटनेची रूपं. अगणित. कॅमेऱ्यातून बघणारा, कॅमेऱ्याला डोळा लावून एका घटनेची अगणित रूपं बघू शकतो. अगणित रूपं दाखवू शकतो आणि नंतर प्रेक्षकही स्वत:च्या दृष्टीनं अगणित रूपं बघू शकतो. एकाच घटनेची या दोघांना दिसणारी दृश्यं वेगळीही असू शकतील. दोघांनीही हा वेगळेपणा आदरानं मान्य करायचा. म्हणजे कॅमेरा हे यंत्र तुम्हाला ‘हुबेहूब’ या हट्टातून बाहेर काढून शोधक, आश्वासक आणि सहिष्णू बनवतं.

तशी कॅमेऱ्याची माझी ओळख बऱ्याच लहानपणी झाली. माझ्या लहानपणी आमच्या शेजारच्या म्हणजे अगदी सख्ख्या शेजारच्या घरातला मुलगा सी.आय.डी. खात्यात छायाचित्रकार होता. त्याचे फोटोशूट म्हणजे दचकवणाऱ्या साहस सहलीच असायच्या. आज म्हणे एका जबरी चोरीच्या स्थळाचे फोटो काढले, काल म्हणे एका अपघाताचे फोटो काढले, तर आत्ता अचानक एका खुनाचे फोटो काढण्यासाठी त्याला कार्यालयातून निरोप आलाय.

मला वाटायचं फोटो काढणं म्हणजे किती स्पेशल. पावडर लावून, नीट वेण्या घालून कॅमेऱ्याकडे बघत ताठ उभं राहायचं. मग फोटोग्राफरनं ‘रेडी’ असं म्हटल्यावर एक क्षण दात विचकून हसायचं किंवा डोळे मोठे करून कॅमेऱ्याकडे बघायचं. त्याला मी एकदा म्हटलं, ‘‘तू काढतोस ते फोटो किती भयंकर असतात.’’ तो म्हणाला, ‘‘गुन्हेगारांना पकडायला या फोटोंची मदत होते.’’ कारण कॅमेरा प्रत्येक घटना ‘हुबेहूब’ पकडतो. हुबेहूब म्हणजे जशी दिसतेय अगदी तशीच ती घटना फोटोत बंदिस्त होते. मग जणू ती घटनाच आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता येते.

खरं तर लहानपणापासूनच मला चित्रं काढायला आवडायची. माझे आजोबा माझी चेष्टा करून म्हणायचे, ‘‘चित्राखाली हे कशाचं चित्र आहे ते लिहावं, म्हणजे उदाहरणार्थ बदक, मांजर, पतंग उडवणारा माणूस – म्हणजे बघणाऱ्याला ते काय आहे ते कळेल. नाहीतर आम्ही हे मांजर आहे हे कसं ओळखायचं?’’ म्हणजे खरं तर चित्र काय लायकीचं आहे, याला दिलेला हा टोमणा होता. त्यातल्या टोमण्याकडे दुर्लक्ष करून मी स्वत:ला म्हटलं, म्हणजे चित्र त्या वस्तूसारखं ‘हुबेहूब’ दिसत नाही. मग मला वाटायला लागलं, आपल्याला आवडलेल्या गोष्टींचे फोटोज् काढले पाहिजेत. मग माझ्या वडिलांनी मी दहावी झाल्यावर बक्षीस म्हणून एक छोटा ‘बॉक्स कॅमेरा’ आणून दिला. एका ठरावीक अंतरावरूनच ‘फोकस’ मिळायचा. म्हणजे घटना फक्त त्या अंतरावरूनच ‘हुबेहूब’ दिसणार. म्हटलं, असूदे. मग ते अंतर लक्षात ठेवून मी कॉलेजात असताना अनेक सहलींना खूप फोटो काढले.

पुढे पदव्युत्तर शिक्षण घेताना एक उदार मित्र भेटला, जो खूप सुंदर फोटो काढत असे. त्याचा कॅमेरा ‘प्रोफेशनल’ होता. जर्मन. झाइसइकॉन. उत्तम लेन्स असलेला. या कॅमेऱ्यामुळे आता वस्तूंच्या अधिक जवळ जाता यायला लागलं. पण मग ‘हुबेहूब’चं काय? इथून वेगळं दिसतं आणि तिथून वेगळं दिसतं. म्हटलं, हेही ‘हुबेहूब’ आणि तेही ‘हुबेहूब’ असूदे! हा कॅमेरा मी इतका वापरला, की तो मला माझ्या मित्रानं बक्षीसच देऊन टाकला. साठ वर्ष होत आलीत अजून तो माझ्याकडे आहे. मित्र तेव्हा म्हणाला होता की, ‘हुबेहूब हे कॅमेऱ्याचं कामच नाही.’ पण ‘म्हणजे काय?’ हे तेव्हा त्याला विचारायचं सुचलं नाही. तो मितभाषी. कदाचित काही बोललाच नसता. आता तर तो या जगातच नाही. असो.

मग पुढे बऱ्याच वर्षांनी जेव्हा पहिला चित्रपट केला तेव्हा पुन्हा या ‘हुबेहूब’नं मी पछाडले गेले होते. झोपडपट्टीतल्या बाईचं जीवन जसंच्या तसं दाखवलं पाहिजे. आपण ते ‘कंटॅमिनेट’ -दूषित – करायचं नाही, अशी माझी शपथ होती. बाळनं, म्हणजे माझ्या पहिल्या फिल्मचा कॅमेरामन देबू देवधर यानं, पहिल्यांदा जेव्हा मला कॅमेऱ्यातून – मूव्ही कॅमेऱ्यातून, झोपडपट्टी दाखवली तेव्हा तो म्हणाला, ‘‘कॅमेऱ्याला डोळा लावून, त्या बाहेरच्या दृश्याला चौकट देऊन, त्या दृश्याकडे बघितलं, की ते दृश्य, ‘बाहेरचं दृश्य’ कुठं उरतं? किती तरी अधिक-उणं झालेलं असतं.’’ पहिल्या चित्रपटभर हे कोडं मला पुरलं. खरं तर अजूनही, ३५ वर्षांनंतरही मी ते सोडवतेच आहे. मुळात मूव्ही कॅमेरा एका सेकंदात २४ फोटो काढणार आणि ते सलग दाखवून आपल्या डोळ्यांना फसवून म्हणणार, ‘हे चलतचित्र आहे.’ म्हणजे बाहेर जे घडलं त्यात कॅमेऱ्यानं ओळखू येऊ नयेत असे स्वल्पविराम टाकले की काय?

पहिला चित्रपट झाल्यावर तर हे प्रश्न मला फारच छळायला लागले. या सगळ्या कुतूहलाच्या वावटळीत असतानाच आम्हाला-आम्हाला म्हणजे पहिला चित्रपट केलेल्या आमच्या ४-५ जणांच्या टीमला एक व्हिडीओ कॅमेरा मिळाला. एका संस्थेनं (त्यांना कुणाला तो नेमका कसा वापरायचा ते कळत नसल्यामुळे) आम्हाला व्हिडीओ कॅमेरा वापरायला देऊन तिसरा डोळाच दिला. आता या कॅमेऱ्यानं काय करूया, असा विचार करत असतानाच पुण्यातल्या अंधसंस्थेचे संस्थापक-संचालक डॉ. पंडय़ा मला भेटले. ते स्वत: अंध. ते ‘बाई’ चित्रपट ‘बघायला’ आले होते. म्हणाले, ‘‘फिल्म ‘बघितल्याचा’ मला खूप आनंद झाला. मला आवडली. आता आमच्या अंध मुलांसाठी काही तरी करा ना!’’ त्यांचा फिल्म ‘बघितली’ हा शब्दप्रयोग माझ्या फार लक्षात राहिला. म्हणजे त्यांच्या अंत:चक्षूंना जे ऐकलं त्याचं ‘हुबेहूब’ चित्र दिसलंही होतं प्रत्यक्ष न पाहता. असो तर, आमच्या पाचजणांच्या टीममध्ये माझी मुलगी सती, सुनील सुकथनकर आणि सुनील गोडसे हे तिघे नाटकवेडे होते. आणि मला आणि सुधीर पलसानेला कॅमेऱ्याचं अप्रूप होतं. अंध मुलांशी चर्चा करून ठरलं, की त्यांचं नाटक बसवायचं. आम्हाला वाटलं, ही नुसती श्रुतिका होईल पण त्यांना स्टेजवरचं नाटक हवं होतं.

त्यांच्यातला एक हुशार मुलगा महेश भागवतनं एच. जी. वेल्सची एक गोष्ट ब्रेलमधून सगळ्यांना वाचून दाखवली. ‘अंधांच्या राज्यात एक डोळस माणूस येतो. त्याला वाटतं, या सगळ्यांपेक्षा अपण श्रेष्ठ, कारण आपल्याला डोळे आहेत. तेव्हा आपणच इथले राजे होणार. पण प्रत्यक्षात अंधांच्या संवेदना इतक्या तल्लख ठरतात की तो हरतो.’ असं ठरलं, की नाटकवेडय़ांनी नाटक बसवायचं आणि मी कॅमेऱ्यानं नाटक बसवण्याची प्रक्रिया चित्रित करायची. त्यातून नट आपल्या भूमिका कशा समजावून घेतात? शरीराचा, आवाजाचा वापर कसा करतात? एकमेकांच्या संबंधांतल्या हालचाली कशा करतात? एकमेकांना कसे सावरतात? त्यांच्या अनुभवाची-शिकण्याची सगळी प्रक्रिया टिपली जाईल आणि आपल्याला कॅमेरा आणि माणूस यांचं नातं शोधता येईल, असं मला वाटलं.

खरंच सगळ्या घडण्यावर सतत कॅमेरा लाऊन ठेवल्यानं, वेगवेगळ्या कोनातून, वेगवेगळ्या अंतरातून -अगदी जवळून-खूप दुरून, खालून, वरून.. अगणित पर्याय दिसू लागले. सगळ्यातून ही घटना दिसायला लागली. इथे सर्व नट अंध असल्यामुळे त्यांना कॅमेरा कशावर, कुणावर लावलेला आहे, हे दिसत नव्हतं. त्यामुळे ते कॅमेऱ्याच्या तिथे असण्यानं अवघडून जात नसत. त्यांच्या हालचाली-संभाषणं आपसातली-सुनील या दिग्दर्शकाबरोबरची, मोकळेपणानं आणि नव्या अनुभवाच्या आनंदात, एका वेगळ्या ऊर्मीत चालत. मी आणि सुधीर दुरून नि:शब्दतेने हे बघत होतो. गंमत म्हणजे, कॅमेरा, कॅमेरापर्सनला आणि नटांना दोघांनाही फसवून एखाद्या दृश्यावर असा स्थिर व्हायचा, की माणसांमधल्या नात्यांच्या, प्रेमाच्या, आकर्षणाच्या, स्पर्धेच्या, भयाच्या, पुढाकाराच्या, हरल्याच्या, नाराजीच्या अनेक छटा दिसायला लागायच्या. हा आमचा नाटकाचा प्रकल्प खूपच यशस्वी झाला. नाटकाचा, प्रेक्षकांनी भरलेल्या थिएटरमध्ये स्टेजवर प्रयोग झाला. नंतर रेडिओवरही झाला. अंधांना आपण स्टेजवर नाटक केलं याचं खूपच अप्रूप वाटलं. आम्हालाही. कॅमेऱ्यानं प्रक्रिया नोंदण्याचं काम केलं होतं. पण तेव्हा आम्हाला संकलनाची शक्यता उपलब्ध नव्हती. त्यामुळे या दैनंदिन नोंदीतून काही ‘दृश्य आकृतिबंध’ तयार झाला नाही. पण ‘हुबेहूब’चं कोडं सुटायला लागलं.

माझ्या लक्षात आलं, की माणसानं कॅमेरा या महान यंत्राचा शोध लावून किती कमाल केली आहे. कॅमेरा नसता तर जगातल्या किती तरी वस्तूंचा, संस्कृतीचा, माणसामाणसांमधल्या नातेसंबंधांचा आपल्याला पत्ताच लागला नसता. कॅमेऱ्यानं अनेक प्रकारचं, अनेक गोष्टींचं ज्ञान माणसाच्या बुद्धीशी, डोळ्यांशी, अनुभवाशी, मनाशी आणून भिडवलंय. आज आपण म्हणतो जग जवळ आलंय. ते जवळ आणण्यात कॅमेऱ्याचा केवढा मोठा भाग आहे, हे विसरून चालणार नाही. कुठल्याही घटनेचा काळ, काम, वेग, अवकाश यांच्या स्वरूपाचा अर्थच कॅमेऱ्यानं बदलवला. तुम्ही आजच्या काळात वावरत असताना कॅमेरा तुम्हाला हव्या त्या भूतकाळात किंवा भविष्यकाळात नेऊ शकतो. आभाळातून भूमी दाखवू शकतो. भूमीवरून आकाशदर्शन घडवू शकतो. अगदी छोटय़ा किडय़ा-मुंगीपासून महाकाय प्राण्यांच्या विश्वात शिरू शकतो. पक्ष्यांबरोबर उडू शकतो. महासागरांच्या तळाशी जाऊन त्या विश्वाशी समरस होऊ शकतो. लहान बाळाच्या नजरेतील निरागसता, वृद्धाच्या सुरकुत्यांमधली अगतिकता, तरुण ऊर्मीतली उत्सुकता, खेळाडूच्या पराजयातला विस्कटलेपणा, राजकारणी सत्तास्पर्धेतली निर्दय चंचलता, कॅमेरा सगळंच टिपू शकतो. घटनेची, वस्तूची, इच्छा असो वा नसो, कॅमेरा सगळ्या बुरख्यांपलीकडे काय आहे ते दाखवू शकतो. तुमच्या बुद्धीत, मनात, कातडीत तो शिरू शकतो.

पण म्हणजे हा सगळा अनुभव पाण्यासारखा वाहता म्हणजे सतत बदलता असणार. म्हणजे वरवर कॅमेरा, स्थिर, हुबेहूब घटना पकडली म्हणतो पण खरं तर कॅमेऱ्यातून बघणाऱ्याला त्या घटनेच्या अंतरंगात नेऊन सोडतो. त्यात कसं आणि किती डुंबायचं ते तुमच्या ताकदीवर अवलंबून. म्हणजे माझं ‘हुबेहूब’ कोडं भलत्याच दिशेनं सुटायला बघतंय. ‘हुबेहूब’ असं काही नसतंच की काय? बहुधा नसतंच. घटना तिच्या जागी असते आणि कॅमेरा जे टिपतो ते कॅमेऱ्याच्या ताकदीनुसार आणि डोळा लावणाऱ्याच्या दृष्टीनुसार. अगदी ज्यांना ‘माहितीपट’ म्हटलं जातं, ती ‘वृत्तचित्रं’ही कॅमेऱ्यातून टिपणाऱ्याच्या निवडीची असतात. त्यातही अधिक-उणं असतं. असेना का! पण त्याचं भान निर्माता आणि प्रेक्षक दोघांनाही असलं म्हणजे झालं. म्हणजे कॅमेऱ्याला ‘तिसरा डोळा’ म्हटलं ते योग्यच होतं. तो दोन डोळ्यांच्या पलीकडचं रूपही दाखवू शकतो.

सत्याची जशी अगणित रूपं, तशी तितकी कॅमेऱ्यातून दिसणाऱ्या घटनेची रूपं. अगणित. कॅमेऱ्यातून बघणारा, कॅमेऱ्याला डोळा लावून एका घटनेची अगणित रूपं बघू शकतो. अगणित रूपं दाखवू शकतो आणि नंतर प्रेक्षकही स्वत:च्या दृष्टीनं अगणित रूपं बघू शकतो. एकाच घटनेची या दोघांना दिसणारी दृश्यं वेगळीही असू शकतील. दोघांनीही हा वेगळेपणा आदरानं मान्य करायचा. म्हणजे कॅमेरा हे यंत्र तुम्हाला ‘हुबेहूब’ या हट्टातून बाहेर काढून शोधक, आश्वासक आणि सहिष्णू बनवतं.

‘सत्याची अगणित रूपं’ म्हणतानाच हेही लक्षात येतं, की यात सुरूप आणि कुरूप, दोन्ही रूपं असणार. मग पुढे प्रश्न येतो की, मग कुरूप दाखवायचंच नाही का? तर तेही सत्यच पण कुरूप. म्हणून त्याचं उदात्तीकरण न करता कॅमेऱ्याला ते टिपू द्यायचं. कॅमेरा हे निर्जीव यंत्र आहे, हे विसरायचं नाही. त्यातून दिसणाऱ्या घटनेकडे बघणाऱ्या दृष्टीनं बघायचं. सर्व सत्यच पण निवड अिहसक सत्याचीच करायला हवी. ‘हुबेहूब’च्या पुढे जाऊन जबाबदार निवड आपणच करायची, माणूस म्हणून!

sumitrabhavefilms@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Absolutely photography vichitra nirmiti article sumitra bhave abn