डॉ. नंदू मुलमुले
आयुष्यात काय मिळवायचं, आपल्या जगण्याचं उद्दिष्ट काय, यापेक्षा आयुष्याच्या उत्तरार्धात पडणारा प्रश्न म्हणजे ‘हे सारं कशासाठी करायचं?’ त्या प्रश्नाचं उत्तर वेळीच मिळालं की तुमच्या आयुष्याचा उरलेला प्रवास सुंदर होऊन जातो… सविताताईंनी त्यांना मिळालेल्या या प्रश्नाचं उत्तर हेच आयुष्याचं उद्दिष्टठरवलं आणि जेव्हा त्यांनी तोच प्रश्न त्यांच्या बरोबर शिकणाऱ्या तरुण मित्रांना विचारला तेव्हा त्यांनाही त्याचं उत्तर शोधावंसं वाटलं…
आयुष्यात काय मिळवायचं आहे, म्हणजे आपलं उद्दिष्ट काय असावं आणि ते कसं प्राप्त करायचं? हे दोन प्रश्न पडतात तरुणपणी. मात्र तिसरा प्रश्न, ‘हे सारं कशासाठी करायचं?’ तो पडतो म्हातारपणी. या प्रश्नाचं उत्तर ‘आनंद मिळवण्यासाठी’ हे उमगलं तर सगळं आयुष्य ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ होऊन जाईल. आयुष्याच्या अखेरीस ‘तो प्रवास सुंदर होता.’ हेच शब्द ओठी यायला हवेत. तसे ते सविताताईंच्या ओठी आले आणि त्यांचा प्रवास फक्त सुंदरच नाही, तर संस्मरणीय होऊन गेला.
सदुसष्ट वर्षांच्या सविता नगरकर कॉलेजच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पहिल्या तासाला वर्गात शिरल्या तेव्हा सारा वर्ग उठून उभा राहिला. लेक्चरर आल्यात अशीच साऱ्या मुलांची समजूत झाली. सव्वापाच फुटांच्या आसपास उंची, बारीक काठापदराची साडी, डोळ्यावर चष्मा, रुपेरी केस, उजळ वर्ण, हातात दोन पुस्तकं. त्या वर्गात आल्या आणि पटकन विद्यार्थ्यांच्या रांगेत शिरल्या. मुलं आश्चर्यानं पाहत असताना शेवटच्या रांगेतल्या रिकाम्या बाकड्यावर जाऊन बसल्यादेखील.
हे काय? मुलांच्या चेहऱ्यावरचा अचंबा कुतूहलात बदलायच्या आत एक तिशीची तरुणी आत शिरली आणि थेट फळ्यासमोर जाऊन उभी राहिली. तिनं आपली पुस्तकं टेबलावर ठेवली आणि मुलांकडे हसून पाहिलं. तेवढ्यात, सगळी मुलं सारखी मागे नजर वळवून कुणाला तरी पाहताहेत हे जाणवल्यावर तिचीही नजर मागे गेली आणि तीही दचकली. अखेर सविता यांनीच उठून खुलासा केला, ‘‘मी सविता नगरकर. वय ६७. या महाविद्यालयात बीएसाठी प्रवेश घेतलेली नवी विद्यार्थिनी!’’
‘‘बरं बरं. बसा, तुम्ही…’’ तिला काय बोलावं सुचेना. क्लास संपला. सविता उठू लागल्या तसा मुलांनी गलका सुरू केला. पहिल्याच दिवशी त्यांना हे छान ‘टार्गेट’ मिळालं. ‘‘आजी, हळू उठा, हाड मोडेल!’’ अभय प्रधान ओरडला. मुली खिदळत पळाल्या. त्यातल्या एका मुलीला, अश्विनीला वाईट वाटलं. तिनं सवितांचा हात धरला, ‘‘चला आजी, आपण पुढच्या क्लासला जाऊ. या माकडांकडे लक्ष देऊ नका.’’
सवितांना तिचं कौतुक वाटलं. ‘‘अगं पोरंच ती, मला सवय आहे याची. माझे नातू असेच खोडकर होते.’’
हेही वाचा >>> स्त्रियांचं नागरिक असणं!
सुरुवातीचे काही दिवस सगळ्याच वर्गांत त्याच कहाणीची पुनरावृत्ती झाली. लेक्चरर अचंबित, आणि मुलं फिरकी घेणारी. हजेरी घेताना सविता नगरकर हे नाव आलं की, कुणी खोकल्याचा आवाज काढी, कुणी थरथरत्या आवाजात ‘हजर’ म्हणे. त्यात अभय प्रधान पुढे असायचा. कधी सविताताई उशिरा आल्या की पोरं ओरडत, ‘‘आली आली आजी, कडुलिंबाची भाजी.’ त्यात अभयनं दोन ओळी जोडल्या, त्यात अश्विनीलाही खेचलं, ‘‘अश्विनी आजीची स्पॉन्सर, म्हातारीला झाला कॅन्सर.’ अश्विनीनं रागानं अभयकडे पाहिलं. सविताताईंना वाईट वाटलं. त्यांनी दुखावल्या नजरेनं अभयकडे पाहिलं. ‘‘स्टॉप इट, आय से स्टॉप इट,’’ कुणीही यापुढे सविताताईंना त्रास देणार नाही, नाहीतर मी प्रिन्सिपॉलकडे तुमची तक्रार करेन!’’ लेक्चरर ओरडले.
असेच काही दिवस गेले. त्या दिवशी राज्यशास्त्राचा तास होता. सविताताई जाणूनबुजून अभयच्या बाजूच्या डेस्कवर बसल्या. अचानक सरांनी अभयला उभं केलं, ‘‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कुणी केली सांग?’’ सवितांनी पटकन एका चिटोऱ्यावर उत्तर खरडलं आणि तो अभयकडे सरकवला. अभय गोंधळला पण वाचून म्हणाला, ‘‘अॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम. वर्ष १८८५ . ‘‘करेक्ट!’’ सरांच्या नजरेत कौतुक होतं, आणि अभयच्या नजरेत आश्चर्य, ओशाळेपण. तास संपला. अभय खाली मान घालून पळाला.
ही घटना घडण्याआधीच एका मुलीने प्राचार्यांकडे अभयची तक्रार केलेली होती. अभय आणि सविता यांना त्यांनी बोलावून घेतलं. अभयला फैलावर घेत ते ओरडले, ‘‘तुझ्या आजीच्या वयाच्या आहेत ना रे त्या? या वयात त्यांनी ज्ञान मिळवण्यासाठी विशेष परवानगीनं प्रवेश घेतलाय, त्यांची तू खिल्ली उडवतोस? रस्टिकेट करू शकतो मी तुला,’’ प्राचार्य कडाडले.
‘‘नाही सर, तसं काही नाही.’’ शब्द जुळवण्याच्या नादात तो बोलला. ‘‘आता यापुढे नाही करणार तो मला खात्री आहे,’’ सविताताई मध्ये पडल्या.
अभयच्या नजरेत अपराधी भाव होते. त्याने हळूच सविताताईंकडे कृतज्ञतेचा कटाक्ष टाकला. ‘‘ठीक आहे सविताताई, सोडतो आज. अभय पुन्हा असं वागू नको.’’ दोघं केबिनमधून बाहेर आले. अभय पुढे होऊन त्यांचे पाय धरायला लागला तेव्हा ‘‘अरे अरे, डोंट वरी, मी तुझी मैत्रीण, आपण एकाच वर्गांत नाही का?’ सवितांनी त्याला हसून सावरलं.
त्या दिवसापासून सविताताईंची वर्गातल्या सगळ्याच मुलांशी मैत्री झाली. ‘‘आजी तुम्ही या वयात कॉलेज जॉईन का केलंत?’’ या प्रश्नावर सविताताई आपली कहाणी सांगू लागल्या. ‘‘अरे ५०-५२ वर्षांपूर्वीची गोष्ट. सहा भावंडांतली मी थोरली. मॅट्रिकपर्यंत शाळा होती गावात, पुढे शहरात शिकायला पाठवायची ऐपत नव्हती बाबांची. लग्न झालं आणि शिक्षण संपलं. इच्छा खूप होती, पण फुरसतच नाही मिळाली.’’
हेही वाचा >>> स्त्री ‘वि’श्व: ‘हाऊस हसबंड’ असणं!
‘‘मग आता का?’’
‘‘घरी सारे उच्च शिक्षण घेतलेले. कुणी हिणवत नव्हतं, पण माझीच शिकायची खूप इच्छा होती. सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या तोवर नवरा गेला. आता जबाबदाऱ्या नव्हत्या, बंधन नव्हतं. मग ठरवलं, आपली मनीषा पूर्ण करायची. ग्रॅज्युएट व्हायचं.’’ त्या म्हणाल्या.
‘‘ पण मग ओपन युनिव्हर्सिटीत का नाही प्रवेश घेतला?’’
‘‘ हे वातावरण अनुभवायचं होतं. व्हिडीओवर लेक्चर ऐकणं चांगलं की प्रत्यक्ष ऐकणं? आणि तुमच्यासारखे मित्र कसे मिळणार?’’ सविताताईंच्या डोळ्यात मिश्कील भाव होते. सारे हसू लागले. अभयने ‘हाय-फाइव्ह’ केलं.
सविताताईंचं विद्यार्थिनी असणं साऱ्यांच्या अंगवळणी पडलं. आता एकत्र बसणं, गप्पा मारणं, एकत्रित डब्बा खाणं सुरू झालं. अंतिम वर्षाने वेग घेतला. परीक्षा जवळ आली. एकदा उशिरा सविताताई ग्रंथालयातून बाहेर पडल्या तर पॅसेजच्या टोकाला कुणी विद्यार्थी गुडघ्यात मान खुपसून बसलेला दिसला.
‘‘ कोण राहुल?’’ सविताताईंच्या वर्गातला विद्यार्थी. साधारण अंगकाठीचा, काहीसा अबोल.
‘‘आजी?’’ त्याने वर पाहिलं. डोळे नुकतेच रडल्यासारखे थिजलेले.
‘‘ काय झालं रे?’’ सविताताईंनी त्याला जवळ घेतलं. त्यांच्या मायेनं तो गहिवरला. ‘‘आजी, मला आत्महत्या करावीशी वाटते. आता नाही सहन होत ताण,’’ हुंदके देत त्याने आपली व्यथा सांगितली. ‘‘वडिलांचं स्वप्न होतं मी ‘नीट’ परीक्षेत चांगलं यश मिळवावं. मला नाही पडले मार्क. दोनदा परीक्षा दिली, पण टेन्शन इतकं यायचं की परीक्षेत सुचायचं नाही काही. आता स्पर्धा परीक्षांसाठी बीए करायला घेतलं आहे. पण सारखं अपयशाची भीती वाटते,’’ राहुल रडण्याच्या बेतात आला.
‘‘ हे बघ राहुल,’’ सविताताईंनी त्याला जवळ घेतलं. तोवर त्याला शोधत चार-पाच मुलं आली. सारे कोंडाळे करून बसले. ‘‘तुझं उद्दिष्ट काय? परीक्षेत मेरिटचे मार्क मिळवणं, अभ्यास करणं. अभ्यास कशासाठी करायचा?’’ त्यांनी मुलांना विचारलं.
हेही वाचा >>> इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
‘‘यशासाठी,’’ मुलांचं एकसुरात उत्तर.
‘‘ नाही मुलांनो, अभ्यास आनंदासाठी, कुतूहलापोटी करायला हवा. हे सगळं समजून घेण्यात मजा आहे. हे ज्ञान मिळून तुम्हाला जो आनंद मिळेल तोच तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. आपल्या आनंदाची सांगड यशासोबत घालू नका. यशस्वी झालो तरच आनंद मानाल तर ताणामुळे यशाची वाटचाल खडतर होईल. तुम्ही प्रवास एन्जॉय कराल तर यश आपोआप मिळेल. चुकांना प्रयोग समजा. गड-किल्ले चढताना तुम्ही धडपडता तेव्हा मजा येते ना? तशीच मजा अभ्यासात घ्या. मी अभ्यास एन्जॉय करते, कारण मेरिटमध्ये आलंच पाहिजे असा माझा आग्रह नाही.’’
‘‘ तुमची गोष्ट वेगळी आजी, तुम्ही एन्जॉयमेंटसाठीच शिकता आहात.’’
‘‘ तेच तर म्हणते मी, एन्जॉय करा अभ्यास. कृष्ण काय म्हणतो? ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥’ कर्माला फळाचा हेतू चिकटवू नका, कर्म सोडूही नका.’’
‘‘ तुम्हाला टेन्शन नाही, इथे मार्क कमी पडले तर आईबाबा अपसेट होतात,’’ अश्विनी पुटपुटली.
‘‘ मित्रांनो मलाही टेन्शन आहे, पण मी ते मनावर घेत नाही.’’
‘‘ कसलं टेन्शन?’’ मुलांच्या डोळ्यात अविश्वास होता.
‘‘ सांगेन नंतर कधीतरी. सिक्रेट! ते जाऊ देत. राहुल, आजपासून अभ्यास एन्जॉय करायचा. माझ्याशी स्पर्धा लावायची,’’ सविताताईंनी तळवा पुढे केला, राहुलने टाळी दिली.
परीक्षेच्या १५ दिवस आधी सविताताई अचानक कॉलेजमधून दिसेनाशा झाल्या. काही मुले त्यांच्या घरी जाऊन आली, तर आजी मुंबईला गेल्याचे त्यांना कळले.
सविताताई परत आल्या तेव्हा थकलेल्या होत्या, चेहऱ्यावर मात्र तेच हसू होतं. मुलांनी त्यांना घेरलं.
‘‘काय आजी, कुठे गेली होतीस?’’
‘‘अरे काही नाही, परीक्षा आलीय ना जवळ? चला, कॅन्टीनमध्ये जाऊन चहा घेऊ, मग ग्रंथालयात बसू,’’ सविताताईंनी हसून गोष्ट टाळली.
परीक्षा पार पडली. निकाल लागले तेव्हा विद्यापीठाची तीन विषयांतली सुवर्णपदके सविताताईंच्या नावावर जाहीर झाली होती. त्यांच्या पाठोपाठ राहुलचं नाव होतं. सविताताईंनी प्राचार्यांना विनंती केली, ‘‘ माझे पारितोषिक दुसऱ्या क्रमांकावरील विद्यार्थ्याला देण्याची विनंती कुलगुरूंना करा. मला आनंद हवा होता, तेच माझे पारितोषिक. मुलांना यश हवं आहे, आनंदही. त्यांना द्या!’’
कॉलेजमध्ये सविताताईंचा सत्कार झाला. प्राचार्यांनी त्यांचं कौतुक केलं. ‘‘गर्भाशयाच्या कर्करोगाशी झुंजत सविताताईंनी हे यश प्राप्त केलं हे विशेष प्रेरणादायी आहे!’’ हे ऐकताच मुले स्तब्ध झाली. आजीचे हे सिक्रेट होते तर? साऱ्यांनी सविताताईंना घेरलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. अभयला हुंदका आवरेना. ‘‘आजी, त्या दिवशी मी तुझ्यावर इतकी वाईट कविता केली. किती वाईट आहे मी.’’
सविताताईंनी त्याला थोपटलं, ‘‘अरे, उत्साहाच्या भरात तुझ्या तोंडून निघून गेले शब्द. तू कवी आहेस. छान शब्द वापर, सवय जोपास,’’ सविताताई निघाल्या. मुले फाटकापर्यंत त्यांना सोडायला आली.
‘‘ आणि राहुल, तुम्हीही सारे, अभ्यास कशासाठी करायचा?’’
‘आनंदासाठी!’’ सारे एकसुरात ओरडले. ‘‘यश आपोआप मिळेल,’’ मुलांच्या गर्दीतून वाट काढत सविताताई निघाल्या. त्यानंतर महिनाभरात सविताताई गेल्या.
ऐहिक जीवनाचा प्रवास आनंदाचा करून, अनंताच्या प्रवासाला. मुलांना शैक्षणिक यशाचे सिक्रेट शिकवून…
nmmulmule@gmail.com