काही ध्वनी हे प्रत्यक्ष संगीताचा भाग नसले तरी ते मन आणि मेंदू शांतविणारे असू शकतात. जसे धातुवाद्यांच्या आघातातून निर्माण होणारे ‘सिंगिंग बाऊल्स’चे ध्वनी. पितळ, कांस्य, तांबे अशा धातूंच्या मिश्रणातून निर्माण होणाऱ्या ध्वनींचा आपापसांतील सुसंवाद आणि स्वरयुक्त मेळ मनाला सुखावतात. आणि हे ध्वनी जर स्वरयुक्त असतील तर ते अधिक सुरेल वाटतात हे लक्षात घेऊन भौतिकशास्त्राच्या कसोटीवर तयार केलेले ‘सिंगिंग बाऊल्स’ मानसिक स्वास्थ्यासाठी अधिक उपयुक्त ठरतात. त्या सिंगिंग बाऊल्सच्या नादमयतेविषयी.
‘‘वाहनांचा वेग कमी करण्यासाठी जसे जागोजागी गतिरोधक बसवलेले असतात तसेच कर्णकर्कश आवाज कमी करण्यासाठीचे ध्वनिरोधकही जागोजागी बसवले गेले तर?’’ एका रम्य आणि शांत वेळी ही सुखद कल्पना रंगवण्यात मी गुंग झालेले असतानाच कुणाच्या तरी रिंगटोनच्या एका किंकाळीनं माझं हे दिवास्वप्न भंग पावलं. आपल्याला जऽऽरा शांत व्हावंसं वाटलं की हे असंच होतं. पण यात दोष तरी कुणाचा? दाही दिशांनी कानावर आदळणारे ध्वनी हे कमावलेली मन:शांती गमावणारे नसावेत ही अपेक्षा आजकालच्या जगात करणं हे कितपत बरोबर आहे! नाही समजत.
‘सुंदर मी ऐकणार’ असं कितीही वाटत असलं किंवा तसं ठरवलंही, तरी कळत-नकळत कानाला ऐकू येणारा प्रत्येक बरा-वाईट ध्वनी सहन करून घेण्याची मनाला कुठेतरी ‘सवय’ करून घ्यावी लागते. या सवयीतूनच एकीकडे मन शांतवणारे ध्वनी आणि दुसरीकडे कानावर आदळणारा अपरिहार्य कोलाहल यातील संघर्ष वाढत जातो. शांततेच्या प्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची की कोलाहलात लोटणाऱ्या सवयीची गुलामगिरी स्वीकारायची? मला कानांनी जे काही ऐकू येतंय त्यात मला जेव्हा मनाने समाधान ‘मानून’ घ्यावं लागतं, तेव्हा मी आतून शांत नसतानाही ‘मी शांत आहे’ असा मुखवटा धारण करावा लागतो. ही कसरत करता करता माझं मन शांत करणाऱ्या सौंदर्यपूर्ण ध्वनीच्या आवश्यकतेशी मीच कुठेतरी तडजोड करत असते. वरकरणी हा संघर्ष मी कितीही समजून घेण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न केला, तरी आत कुठेतरी तो दबा धरून धुमसत बसलेला असतो; संधी मिळाली रे मिळाली की तो भडकून उठतो. ज्याला आपण क्रोध म्हणतो ती अनेक कारणांनी दाबून ठेवलेली मानसिक घुसमट तर असतेच, पण आपल्या मेंदूला जे चित्रविचित्र आवाज सहन करावे लागतात, ते निभावून नेणारी सहनशीलताही याला कारणीभूत असते. पण मनाशी ठरवलं तर यातून मार्ग निघू शकतो.
दूर डोंगरावरच्या एखाद्या देवळात जाण्यासाठी तासंतास पायपीट करत वाट तुडवत असताना, देऊळ दिसण्याआधीच अनपेक्षितपणे वातावरणात एक प्रसन्न घंटानाद दुमदुमू लागतो आणि थकल्या-भागल्या शरीरात एक नवचैतन्य निर्माण होऊ लागतं. सगळ्या दिशा व्यापणाऱ्या त्या नादानं शरीराबरोबरच मनाचाही प्रतिसाद बदलू लागतो; त्या नादाच्या दिशेनं पावलं झपाझप पडू लागतात. तो नाद मनाला इतका शांत करणारा असतो की, आपल्याला शारीरिक श्रमांचा आणि तहान-भुकेचाही विसर पडतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या शारीरिक गरजांबरोबर शांतता ही मानसिक गरज आहे हे अशा वेळी पटतं. गरज म्हणून का होईना, कोलाहलात गुंतलेल्या आपल्या मनाला, अशा आल्हाददायक आणि शांतवणाऱ्या ध्वनिजगताच्या जवळ नेलं पाहिजे. मनाला प्रसन्न वाटावं म्हणून आपण देवळात जातो, तिथे जमेल तसा घंटानादही करतो, परंतु त्या घंटानादाशी जवळीक साधत नाही. घंटेच्या गोल घुमटाच्या बरोब्बर मधोमध ताठ उभं राहून घंटा वाजवल्यास त्यातून निर्माण होणारं ध्वनिसौंदर्य आपल्याला नक्कीच अनुभवता येईल. आपण कानात काय आणि कसं साठवतो, त्यावर आपलं स्वत:चं स्वत:शी ‘जोडलेपण’ ठरत असतं. संगीतातून नाद निर्माण होतो हे जितकं खरं तितकंच नादातूनही संगीत निर्माण होत असतं हेदेखील खरंच ना! पण आजूबाजूच्या वातावरणातून, समाज, संस्कृतीतून आणि संस्कारातून एक विशिष्ट साचा आपल्या मनाभोवती तयार झालेला असतो. हा साचा मोडायला मन सहजासहजी तयार होत नाही. ध्वनिसौंदर्य असं साचेबद्ध नसावं, किंबहुना त्याला कोणतंच बंधन नसावं; अगदी संगीताचंदेखील नाही.
वरील उदाहरणातून हे लक्षात येतं की काही ध्वनी हे प्रत्यक्ष संगीताचा भाग नसले तरी ते मन आणि मेंदू शांतवणारे असू शकतात. याचंच आणखी एक उदाहरण म्हणजे धातू अनुनाद (मेटॅलिक रेझोनन्स) अर्थात धातुवाद्यांच्या आघातातून निर्माण होणारे ‘सिंगिंग बाऊल्स’चे ध्वनी. नेपाळ, भूतान, तिबेट, कोलकाता येथील कारागिरांकडून पितळ, कांस्य, तांबे अशा धातूंच्या मिश्रणातून खास ध्वनिनिर्मिती करणारी जी धातुवाद्यो घडवली जातात ती ‘सिंगिंग बाऊल्स’ या नावानं हल्ली जगभरात प्रसिद्ध होत आहेत. वाडग्यासारख्या आकाराच्या या वाद्यांच्या ध्वनींमधून कोणताही शाब्दिक किंवा सांगीतिक अर्थबोध होत नसला, तरी त्यातून निघणारे स्वरयुक्त दीर्घ ध्वनितरंग मन शांत करण्यासाठी उपयुक्त ठरतात. ‘हस्तनिर्मित’ आणि ‘यांत्रिक’ अशा दोन्ही पद्धतीने ‘सिंगिंग बाऊल्स’ तयार केले जातात. यापैकी हस्तनिर्मित बाऊल्सच्या ध्वनीचे गुंजन (Resonance) घनता (Density) आणि खोली (Depth) अधिक परिणामकारक असते, कारण ते विशेष पद्धतीने घडवले जातात. या निर्मितीप्रक्रियेत योग्य त्या प्रमाणात मिश्रधातू वितळवून ते एका गोलसर साच्यात ओतले जातात व त्यांना लहान-मोठा, जाड-बारीक, गोल-पसरट असा आकार दिला जातो. पाण्यावरील कंपनांमुळे निर्माण झालेले वर्तुळाकार तरंग ज्याप्रमाणे डोळ्यांनी बघता येतात त्याप्रमाणे ‘सिंगिंग बाऊल्स’मधून निर्माण झालेले ध्वनितरंग हवेतील कंपनांमुळे कानांनी ऐकता येतात व शरीरालाही जाणवू शकतात. यासाठी मॅलेट्स, अर्थात लाकडाचे साधारण सहा ते सोळा इंचापर्यंतचे दांडे तयार केले जातात. मॅलेट्सच्या घर्षणामुळे किंवा धातूच्या वाडग्यावर हलकासा आघात केल्यामुळे (stroke) हवेत दीर्घकाळ टिकणारे ध्वनितरंग निर्माण होतात. पोकळी तसेच घनतेमुळे ध्वनीचा कंप पावण्याचा कालावधी आणि आयाम वाढत जातो, ज्यातून विशिष्ट प्रकारचा अनुनाद (रेझोनन्स) ऐकू येतो. ‘सिंगिंग बाऊल्स’मधून ध्वनिनिर्मिती करण्याची दुसरी पद्धत म्हणजे ‘रीमिंग’, अर्थात वाडग्याच्या काठावर गोलाकार घर्षण करणे. सहा ते दहा इंचांचा, वेलवेट पेपर लावलेला लाकडी छोटा दांडा ‘सिंगिंग बाऊल’च्या काठावर असलेल्या रिंगवर घर्षण करत फिरवला जातो. या घर्षणातून काही वेळानं ध्वनितरंग निर्माण होऊ लागतात. या ध्वनितरंगांची वारंवारिता गोलाकार गतीने वाढत जाऊन, पुनरावृत्तीमुळे हे ध्वनी दीर्घकाळ हवेत टिकतात, ऐकू येतात व मन शांत करू लागतात. मात्र यासाठी ‘सिंगिंग बाऊल्स’ वाजवण्याचं कौशल्य हे योग्य प्रशिक्षणानं व सरावानं आत्मसात करावं लागतं.
विविध प्रकारचे, विविध आकाराचे आणि विविध वजनाचे ‘सिंगिंग बाऊल्स’ हे वेगवेगळ्या घनतेचा ध्वनी निर्माण करत असतात. खोल, वजनदार आणि मोठ्या ‘सिंगिंग बाऊल्स’चा ध्वनी साधारणपणे ८० ते ३०० ‘हर्ट्स’च्या दरम्यान, म्हणजे खर्जयुक्त असतो तर लहान, वजनाला हलक्या व तुलनेने उथळ बाऊल्सचा ध्वनी ३०० ते १२०० ‘हर्ट्स’च्या दरम्यान, म्हणजे वरच्या पट्टीचा असू शकतो. आकार, पोकळी, खोली, घनता यात समतोल साधून तयार केलेले काही बाऊल्स सांगीतिक स्वरांशी मिळतीजुळती कंपनं (हार्मोनिक कंपनं) निर्माण करू शकतात. जगभरातून वेगवेगळ्या क्षेत्रांतून ‘सिंगिंग बाऊल्स’वर जे संशोधन सुरू आहे. त्यात तज्ज्ञ कारागीर, भौतिकशास्त्राचे अभ्यासक आणि संगीतज्ञ यांच्या समन्वयातून विशिष्ट पुनरावृत्ती (फ्रिक्वेन्सी) व अंतर्नाद निर्माण करणारे ‘सिंगिंग बाऊल्स’ही घडवले जातात. पूरक उपचार पद्धती म्हणून ‘साउंड थेरपी’ देणाऱ्या काही संस्था, असे विशिष्ट ‘हर्ट्स‘चे ‘सिंगिंग बाऊल्स’ वापरणं जास्त पसंत करतात. त्यातून निघणाऱ्या ध्वनींचा आपापसातील सुसंवाद आणि स्वरयुक्त मेळ अधिक सुखद असतो. ज्यामुळे मेंदूतील विचारप्रक्रिया संथ होऊन मनाला शांत आणि प्रसन्न वाटतं. ध्वनी हा स्वरयुक्त असेल तर तो अधिक सुंदर वाटतो हे लक्षात घेऊन भौतिकशास्त्राच्या कसोटीवर तयार केलेले ‘सिंगिंग बाऊल्स’ मानसिक स्वास्थ्यासाठी अधिक उपयुक्त ठरतात. हल्ली साधे ‘सिंगिंग बाऊल्स’ ऑनलाइन खरेदी करता येतात तसेच काही ‘सिंगिंग बाऊल्स’चे ध्वनी समाजमाध्यमावरही ऐकायला मिळतात परंतु त्यातून गुंजनयुक्त आणि सघन कंपनं मूळ स्वरूपात ऐकू येत नाहीत ही मुख्य अडचण आहे. अगदीच पर्याय नसेल तेव्हा अशा प्रकारचे ध्वनी ऐकून मनातील थोडे विचार कमी करता येतील, परंतु मन खऱ्या अर्थाने शांत करायचं असेल तर प्रत्यक्ष आणि दर्जेदार ‘सिंगिंग बाऊल्स’चा ध्वनी ऐकणं उत्तम.
वरकरणी शांत वाटणाऱ्या व्यक्तींनादेखील कधी कधी एखाद्या छोट्याशा कारणानं राग अनावर होतो.कारण मनात भावनिक असमतोल आणि मेंदूत संमिश्र ध्वनींचा गोंधळ. राग अनावर झाल्यावर अशा व्यक्ती आपला निषेध व्यक्त करण्यासाठी फेकाफेक करतात, भांडी आपटतात, ओरडतात; जणू मनाला नको असलेला कर्णकर्कशपणा मनाच्या बाहेर फेकण्यासाठीची ती धडपड असते. त्यांच्या मनातली सुखद शांतता भंग पावली आहे हे या कोलाहलावरून समजू शकतं. याचा अर्थ शांतता आणि ध्वनी यांचं आपापसात खूप वेगळं आणि तरल नातं आहे, जे समजून घ्यायला आपण कदाचित कमी पडत असू.
जे ध्वनी आपण कानांनी ऐकतो ते नंतरही बराच वेळ आपल्या मनात घर करून बसतात आणि त्यांचे भास आपला पाठलाग करीत असतात; म्हणून ऐकलेले ध्वनी मनाला शांत करणारे आहेत की अशांत करणारे आहेत हे ओळखून अतिशय निर्विरोध मनानं, प्राप्त परिस्थितीत शक्य होईल तेव्हा मन शांतविणाऱ्या ध्वनिसौंदर्याचा आस्वाद घ्यायला शिकलं पाहिजे.