मीरुईया कॉलेजला असताना, बोर्डावर नोटीस लागली होती, की आंतरमहाविद्यालयीन नाटय़स्पर्धेत रुईयाची प्रवेशिका असणार आहे. नाटकात काम करू इच्छिणाऱ्यांनी आपली नावं द्यावीत आणि दोन दिवसांनी दुसऱ्या मजल्यावरच्या क्लास रूममध्ये जमावं. विद्यार्थ्यांची चाचणी आणि निवड सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आत्माराम भेंडे करणार आहेत. ती वाचून मला वाटलं, आपणही नाव द्यावं. स्वत:ला अजमावून पाहावं. त्याआधी आमच्या ‘शारदाश्रम’ या मोठय़ा सहनिवासाच्या गणेशोत्सवात नित्यनेमानं नाटकात मी सहभागी होत असे. पण त्यात (माझ्या) हौसेचा आणि (रहिवाशांनी केलेल्या) कौतुकाचा भाग जास्त होता. मी धीर करून नाव दिलं.
पण झालं असं, की दुसऱ्याच दिवशी पायाला इजा झाली. चालता येईना. डॉक्टरांनी दोन दिवस पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितलं. मी अस्वस्थ होऊन चौकशी केली तर नाटय़ विभाग सांभाळणाऱ्या प्रा. सरोजिनी वैद्य आणि महाशब्दे सर यांच्याकडून कळलं की भेंडेंना तोच दिवस सोयीचा होता. आता काय करायचं? मी डेस्परेट होऊन आत्माराम भेंडेंना चिठ्ठी लिहिली, ‘मला हलता येत नाही. आपल्या मार्गदर्शनाखाली कॉलेजच्या एकांकिकेत (निवड झाल्यास) काम करण्याची खूप इच्छा आहे. सिलेक्शन थोडे पुढे ढकलता येईल का?’ त्या वेळी ‘सीमेवरून परत जा’ या नाटकाचं भेंडे दिग्दर्शन करत होते. तालमी चर्नीरोड स्टेशनजवळच्या एका छोटय़ा हॉलमध्ये चालत. मी माझ्या मामाला गळ घातली, ‘प्लीज, चिठ्ठी घेऊन जाशील का?’ विजयमामा ऑफिस संपल्यावर तालमीच्या हॉलचा पत्ता शोधत फिरला. शेवटी त्याला हॉल मिळाला आणि त्यानं चिठ्ठी पोहोचवली. भेंडेंनी चिठ्ठी वाचली आणि ‘ठीक आहे. सिलेक्शन पुढे ढकलू या,’ म्हणाले.
काही दिवसांनी मुलं जमली. निवडक उतारे वाचायला दिले होते. माझी निवड झाली. शं. ना. नवरेंची ‘जनावर’ एकांकिका आम्ही केली. मला अभिनयाचा (आयुष्यातला पहिला) पुरस्कार मिळाला. ‘आता असंच काही तरी करत राहायला हवं’ ही जाणीव झाली. आत्मविश्वास वाटला. आत्मभान आलं.
..असं, त्या चिठ्ठीचं निमित्त झालं.
ही सुरुवात होती..
त्यातल्या सगळ्याच नाही, पण काही भूमिकांनी एकाच वेळी मला अस्वस्थता आणि समाधान दिलं आहे. म्हणजे करेपर्यंत अस्वस्थता, करताना आव्हान आणि केल्यावर समाधान देणाऱ्या या भूमिका आहेत. पु.लं.च्या ‘एक झुंज वाऱ्याशी’ नाटकातला नैतिक जबाबदारीचं भान असलेला, दुसऱ्याचं दु:ख दूर करू बघणारा, बेधडकपणे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना थेट त्यांच्या केबिनमध्ये जाऊन भिडणारा, ध्येयानं झपाटलेला ‘माणूस’ (हेच भूमिकेचं नाव), जयवंत दळवींच्या ‘नातीगोती’ नाटकातला आपल्या मतिमंद मुलाच्या काळजीनं ग्रासलेला, त्याच्यासाठी पैसे साठवणारा बाप, ‘काटदरे,’ रत्नाकर मतकरींच्या ‘घर तिघांचं हवं’मधला कलंदर, दिलदार, स्वच्छंदी, मनस्वी, र्दुव्यसनी अशा परस्परविरोधी रंगछटा असलेल्या स्वभाववैशिष्टय़ांचा हुशार बॅरिस्टर ‘डी. एन.’, डॉ. फणसळकरांच्या ‘वा गुरू’मधले जीवघेण्या आजाराला हसतमुखानं सामोरे जाणारे, विद्यार्थ्यांला जगावं कसं, हे शिकवताना वेगळी जीवनदृष्टी देणारे व्हीलचेअरमध
‘चौकट राजा’मधल्या मतिमंद नंदूच्या भूमिकेचं वेगळंच आव्हान होतं. कारण ती मी आयत्या वेळी केली. ‘केली’ म्हणण्यापेक्षा करावी लागली म्हणणं अधिक बरोबर. माझी भूमिका दोन दिवस आधी बदलली. परेश रावल (मराठीत प्रथमच) करणार असलेली भूमिका, ते येऊ न शकल्यामुळे मला (आणि मी करणार होतो ती दिलीप कुळकर्णीला) करण्यास सांगण्यात आलं. या चित्रपटाचं शूटिंग संपेपर्यंत अस्वस्थतेनं माझा पाठपुरावा केला. निर्माती स्मिता तळवलकर आणि दिग्दर्शक संजय सूरकर यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचंही दडपण होतं! मुंबईहून कोल्हापूरला (व्हाया पुणे) निघताना काय करू आणि काय नको असं झालं! त्यात डस्टिन हॉफमन, रॉबर्ट डिनिरो यांच्या ‘रेनमॅन’ आणि ‘अवेकनिंग्स’ सिनेमांच्या कॅसेट्स (त्या वेळी सीडीज आल्या नव्हत्या.) अर्धवट पाहणं, पुण्याला ‘कामायनी’ या मतिमंद मुलांच्या संस्थेला भेट देणं आणि मतिमंदत्वाविषयी अधिक माहिती विचारण्यासाठी ओळखीच्या एका मानसोपचारतज्ज्ञांना भेटणं हे सगळं होतं. पण शेवटी भूमिकेचं आव्हान स्वीकारताना निरीक्षण, कल्पनाशक्ती, (फारशी करता न आलेली) तयारी, या सर्वापेक्षा उत्स्फूर्ततेचा भाग अधिक होता. कधी कधी ‘प्रेशर’खाली आपली सर्जनशीलता कामी येते, आव्हान स्वीकारते, तसं झालं. या भूमिकेचं समाधान अशासाठी की अपुऱ्या तयारीनिशी मी ती निभावून नेऊ शकलो.
आपलं ‘ट्रान्स्फर्मेशन’ झाल्याचा, आपण बदलल्याचा, पूर्ण कायापालट झाल्याचा अनुभव ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाटय़ात मी केलेल्या ‘चेटकी’नं दिला. ‘कलम ३०२’ नाटकातल्या (पॅडिंग लावून केलेल्या) बेढब आणि बेरकी ‘जमादार मानमोडे’नं दिला, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ मालिकेतल्या वृद्ध ‘आबां’नी दिला आणि ‘हसवाफसवी’ नाटकामधल्या कृष्णराव हेरंबकरांनीही दिला. पण हा कायापालट होता. कायाप्रवेश नव्हे. बदललेलं व्यक्तिमत्त्व स्वत:ला जाणवण्याचं, समोरून स्वत:ला पाहण्याचं, अलिप्तपणे अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवण्याचं भान प्रत्येक वेळी होतंच.
नाटकात तर व्यक्तिरेखा उभी करताना प्रेक्षकांच्या अस्तित्वाची, ते तुम्हाला बघत असल्याची जाणीव पुसता येत नाही. मी ही भूमिका पेश करतो आहे, हा सावधपणा कुठे तरी असतोच. भूमिका ‘जगणं’ नसतं. असू नये. एखाद्या भूमिकेत विरघळून जाणं, गुंतून जाणं, झोकून देणं असं माझ्याबाबतीत क्वचित झालं असेल. म्हणजे, नाही झालं, असं म्हटलं तरी चालेल. एकप्रकारची जागरूकता असतेच. आपल्या भूमिकेला दुरून पाहणं असतं. नट मी, साकारत असलेल्या व्यक्तिरेखेतला मी आणि प्रेक्षक म्हणून बाहेरून स्वत:कडे पाहणारा मी, अशी तीन व्यक्तिमत्त्वं परफॉर्मन्सच्या वेळी असतात. उदा.- आबा टिपरे किंवा (‘हसवाफसवी’मधले) कृष्णराव करताना सोळा नंबरचा जाड भिंगाचा चष्मा मी लावत असे. त्या भूमिका करताना मला चष्म्यातून काही दिसत नव्हतं, पण तो चष्मा लावून आबा आणि कृष्णराव कसे दिसतायत हे मला समोरून दिसायचं!
हे समोरून दिसणं, स्वत:ला पाहणं तुमच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवतं. अतिरेक टाळण्याची काळजी घेतं. मी परफॉर्म करतोय, मी तो नाही, हे भान, हा सावधपणा सतत असतो.
पण हे जरी खरं मानलं तरी कधी तरी या व्यक्तिरेखांच्या भावना मला स्पर्श करतात, असंही झालं आहे. ‘नातीगोती’ नाटकातल्या मतिमंद मुलाच्या बापाची कोंडी एक-दोन प्रसंगांत स्पर्शून जायची. ‘कृष्णराव हेरंबकर’ या वृद्ध गायक नटाची तळमळ, ‘चौकट राजा’मधल्या नंदूचा आईला फूल माळण्याचा आग्रह, ‘वा गुरू’ नाटकातल्या मरणोन्मुख सप्रे सरांचं निर्मळ हास्य.. अशी काही अलिप्तपणावर मात करू बघणारी उदाहरणंही आहेत. नट आणि व्यक्तिरेखा यांच्यामधली सीमारेषा (काही क्षणांपुरती) पुसट करणारी.
कधी कधी वैयक्तिक आयुष्यात तुम्ही केलेलं (किंवा आपोआप टिपलं गेलेलं) निरीक्षण तुमच्या नकळत, एखादी व्यक्तिरेखा साकारताना तुम्हाला आठवतं. भूमिकेच्या सादरीकरणात डोकावतं. एक-दोन उदाहरणं सांगतो. अॅक्टरची ‘सिक्रेट्स’ असली तरी. ‘वा गुरू’ या अगदी अलीकडच्या नाटकात एक प्रसंग होता. व्हीलचेअरवर खिळलेल्या सप्रे सरांची पत्नी सुधा (गिरिजा काटदरे) त्यांना व्हीलचेअरवरून उचलून, शेजारीच ठेवलेल्या आरामखुर्चीत बसवण्याचा. आजार वाढलेला आहे. सप्रे सर काहीच हालचाल करू शकत नाहीत. ती काखेत हात घालून मला उचलत असे. त्या वेळी असहाय सप्रे सरांच्या मुद्रेवरचे भाव – परावलंबित्व लपविण्याची पराकाष्ठा, थिजलेपण, चेहऱ्यावरचं सूक्ष्म प्रश्नचिन्ह – दाखवताना माझ्या डोळ्यांसमोर माझे स्वत:चे वडील यायचे. आपोआप. त्यांच्या शेवटच्या आजारातले चेहऱ्यावरचे भाव मला स्पष्ट आठवायचे. माझ्या चेहऱ्यावर ते येत असावेत. त्यांचा चेहरा मला ‘वा गुरू’ नाटकाच्या सगळ्या प्रयोगांत त्या प्रसंगाच्या वेळी दिसला आहे.
भूमिकेसाठी रूप बदलायला मला आवडतं. मिशा, दाढी, भुवया, विग, टक्कल, खोटे दात, चष्मे, नाक, कान, कातडीचा रंग यांचा तऱ्हेतऱ्हेनं वापर मला करायला मिळाला. (‘वासूची सासू’ आणि ‘दीप्ती’साठी सुंदर मेकअपही केला.) पण हे सारं भूमिकेची गरज म्हणूनच केलं. चेहरा बदलायची हौस किंवा क्लृप्ती म्हणून नाही! शिवाय हे करताना ‘मला हे शोभेल का’ असा विचार कधी केला नाही. मला विचित्र (‘चेटकी’), विकृत (‘साळसूद’ मालिकेतला हीन आणि खतरनाक खलनायक ‘भार्गव’) विद्रूप (‘एन्काऊंटर’ सिनेमातला ‘पुनाप्पा’) व्यक्तिरेखाही साकारायला मिळाल्या, तसंच, फारसा मेकअप न करताही मी भूमिका केल्या. (‘नातीगोती’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही नाटकं. ‘सरकारनामा’, ‘निशाणी डावा अंगठा’, ‘देऊळ’सारखे चित्रपट.)
माझी स्ट्राँग, छाप पाडणारी, हीरोची पर्सनॅलिटी नाही. त्यामुळे कदाचित बऱ्याचदा स्वत:च्या सौम्य पर्सनॅलिटीचा ठसा पुसणं कठीण जात नसावं! माझा चेहरा अॅक्टरचा नाही. मवाळ, सौम्य आणि न्यूट्रल आहे. स्वभाव बराचसा (अजूनही) संकोची आहे. तशा खोडय़ा चालू असतात. (अलीकडच्या भाषेत ‘किडे करणं’) पण एरवी नेहमीच्या व्यवहारात असतो त्यापेक्षा कुठल्या तरी भूमिकेत मी जास्त कम्फर्टेबल असतो. अनेकदा मला ते अधिक सोयीचं वाटतं. तो आसरा वाटतो!
एका वेगळय़ा प्रकारचा आनंद मला माझ्या लेखनानंही दिला आहे. स्वत:तल्या नटासाठी केलेलं लेखन (‘हसवाफसवी’, ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही नाटकं आणि अनेक एकांकिका, प्रहसनं) सोडलं तरी ‘अनुदिनी’ (‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ मालिकेचं मूळ लेखन) ‘बोक्या सातबंडे’, ‘गुगली’, ‘कागदी बाण’, ‘हसगत’ वगैरे वगैरेसारखी पुस्तकं संपादक किंवा प्रकाशक यांनी माझ्यामागे तगादा लावल्यामुळे लिहून झाली आहेत. अभिव्यक्तीची ऊर्मी असतेच. पण मला वेळोवेळी कुणी तरी हे करायला भाग पाडत आलंय, माझ्यावर विश्वास दाखवून. अभिनयात दिग्दर्शक-निर्माते आणि लेखनात संपादक-प्रकाशक! तरी नाटक-सिनेमाच्या गडबडीत लेखनाला द्यायला हवा तेवढा वेळ देता आलेला नाही. भेटणारी परिचित-अपरिचित मंडळी ‘नवीन काय लिहिताय’ क्वचित विचारतात. ‘नवीन कुठला सिनेमा?’ ही चौकशी जास्त असते! मग सांगावं लागतं.
सध्या तीन-चार नवे चित्रपट येऊ घातलेत. ‘नारबाची वाडी’ या सिनेमात अतिशय गमतीशीर कथानक आहे. मी नारबाची- एका कोकणी शेतकऱ्याची भूमिका करतोय. इरसाल अािण वल्ली! ‘जयजयकार’ या वेगळ्याच विषयावरच्या सिनेमात तृतीयपंथीयांना मार्गी लावू बघणाऱ्या, स्वत्व मिळवून देणाऱ्या तऱ्हेवाईक माणसाचा रोल आहे, तर गजेंद्र अहिरेच्या ‘पोस्टकार्ड’मध्ये वखारीत काम करणारा जख्ख म्हातारा, निरक्षर लाकूडतोडय़ा झालोय.
..आणखी एक सांगायला हवं.
आपण केलेल्या भूमिकेचा, साकारलेल्या व्यक्तिरेखेचा नेहमीच्या जगण्यावर परिणाम होत नाही, तो होऊ नये, हे खरंय. पण भूमिकांसाठी केलेल्या तयारीचा, करताना आलेल्या अनुभवांचा होतो. नाटक-सिनेमांमधल्या, त्या आभासातल्या जगातल्या माझ्या भूमिकांच्या निमित्तानं काही व्यक्तींशी, संस्थांशी संबंध आला. त्याचा परिणाम झाला. राहिला. (‘नातीगोती’ नाटक आणि ‘चौकट राजा’, ‘रात्र आरंभ’सारख्या सिनेमांमध्ये केलेल्या भूमिकांचं निमित्त झालं.) या सेवाभावी संस्थांचं कार्य मी जवळून पाहतो. संस्था चालवणाऱ्यांचं काम बघतो. मला कधी कधी वाटतं, नट म्हणून मी दुसऱ्यांची आयुष्य जगतो. ही माणसं दुसऱ्यांसाठी आयुष्य जगतात. पुण्याजवळच्या अंबडवेट गावात ‘संस्कार’ ही मतिमंद मुलांची संस्था चालवणारं केंजळे दाम्पत्य, डोणजे इथं अनाथ मुलं आणि निराधार वृद्धांना आसरा देणारे ‘आपलं घर’चे फळणीकर, मतिमंदांना तहहयात सांभाळण्याचा वसा घेतलेल्या अविनाश आणि नंदिनी बर्वे यांनी सुरू केलेलं खोणी गावातलं ‘घरकुल’, रत्नागिरीमधली मूकबधिरांसाठी असलेली ‘अभ्यंकर शाळा’.. ‘..काही करायला हवं’ असं वाटायला लावणाऱ्या या संस्था आहेत. नटाला आभासातल्या जगातून वास्तवात आणणाऱ्या.
..मला नेहमीच वाटत आलंय, भूमिका करताना त्या भूमिकेच्या अंतरंगाचा शोध असतो, तसाच तो स्वत:चा शोध असतो. मी किती आहे, कुठवर आहे, काय करू शकतो, याचा.. आपली शक्तिस्थानं गवसतात तशा मर्यादाही कळतात. त्या सगळ्यांसकट आपण स्वत:ला स्वीकारतो. शोधतो. नवं काही करू पाहतो.
(dilip.prab@gmail.com)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा