नीना कुळकर्णी
जेव्हा स्त्रीनं झोकून देऊन ‘करिअर’ करणं तितकंसं सामान्य नव्हतं अशा काळात एक आई आपल्या करिअरला महत्त्व देऊ पाहते. ‘आई’ म्हणून ती कशी कमी पडतेय, हे तिला दाखवून दिलं जात असतानाही संयम सोडत नाही. शांतपणे, खंबीरपणे काही निर्णय घेते. चटके सोसत उभी राहते. ‘आईचं घर उन्हाचं’ या नाटकानं १९९२ मध्ये रंगमंचावर आणलेलं हे चित्र आजही फारसं बदललेलं नाही..
गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेलं पहिलं नाटक, ‘आईचं घर उन्हाचं’ १९९२ मध्ये रंगमंचावर आलं. जाहिरात कंपनीत डिझायनरचं काम करणारी क्षमा. नवरा आर्किटेक्ट. मोठी मुलगी आणि धाकटा मुलगा अशा दोन वयात येणाऱ्या मुलांची ही आई. या ‘करिअरिस्ट’ आईची भूमिका मी केली होती आणि माझे पती दिलीप (कुळकर्णी) यांनी त्यातल्या वडिलांची भूमिका केली होती. ३२ वर्षांपूर्वी ‘आईपण आणि करिअर’ यातल्या स्त्रीच्या संघर्षांचं प्रत्ययकारी चित्रण या नाटकात आहे. त्या संहितेत मांडलेल्या प्रश्नांचं स्वरूप आज काहीसं बदललं असलं, तरी आजही आपण त्याच प्रश्नांची उत्तरं शोधत आहोत.
या नाटकाच्या शीर्षकापासून संहितेपर्यंत एक वेगळेपण त्यात अनुस्यूत होतं. संपूर्ण नाटक अत्यंत नि:संदिग्ध होतं. संहितेत कुठेही सैलपणा, विस्कळीतपणा नव्हता. त्यामुळे दिग्दर्शक अथवा कलाकाराला स्वत:च्या परिभाषेत ते मांडण्याला फारसा वाव नव्हता. प्रत्येक व्यक्तिरेखेची स्वतंत्र ठाशीव मानसिकता होती. उदा. ‘आईचं घर उन्हाचं’ असं म्हणताना अनेकदा ते ‘आईचं घर उन्हात’ असं म्हटलं जायचं. त्यावर गजेंद्र अहिरे ठामपणे सांगत, की ‘आईचं घर उन्हाचं’ हेच शीर्षक आहे. म्हणजे या आईचं घर- अर्थात तिचं आयुष्य सतत होरपळणारं आहे, खडतर आहे. ती कुटुंबातल्या प्रत्येकालाच नव्हे, तर तिच्या पारंपरिक विचारांच्या मैत्रिणीला, सामाजिक संस्थेतल्या सदस्यांनासुद्धा सावली देण्याचा प्रयत्न करते, पण खासगी आयुष्यात मात्र ती सतत टीकेच्या, संतापाच्या झळा सोसते.
स्त्रीच्या वाटयाला येणाऱ्या या झळांची सुरुवात होते ती तिच्या आईपणापासून! एकदा का ती आई झाली की अनेकींच्या बाबतीत प्रवास सुरू होतो तो मर्यादांचा, बांधिलकीचा, स्वातंत्र्याच्या संकोचाचा! हे नाटक हा प्रवास अत्यंत प्रत्ययकारकपणे मांडतं. आईपणाला पर्यायी शब्द आणि नातं उपलब्ध नाही, हे कालातीत सत्य आहे. म्हणूनच नाटकातल्या क्षमाचा संघर्षसुद्धा कालातीत आहे.
आणखी वाचा-‘भय’भूती : भीती माणसांचीच!
नाटकात क्षमावर आईपण काहीसं लादलं गेलंय, असं दाखवलं आहे. जेव्हा तसे संवाद नाटकात येत, तेव्हा मला ती वाक्य म्हणणं कठीण व्हायचं. पण दिग्दर्शकाचं मत ठाम होतं, ‘क्षमा अशीच आहे.’ इथे माझी खरी कसोटी होती. मला क्षमा सकारात्मक दाखवायची होती. ती नाटकाची नायिका आहे, खलनायिका होऊन चालणार नव्हती. माझ्या देहबोलीतून, अभिनयातून मी हे प्रतीत केलं, की क्षमा ही खंबीर स्त्री आहे. ती स्वत:वर कोणतीही गोष्ट लादून घेणार नाही. तिचं लग्न झालं, मुलं झाली. कदाचित तेव्हा क्षणभर तिला वाटलंही असेल, की करिअरच्या आड ही मुलं येत आहेत. मला माझं आयुष्य मन:पूत जगायचंय. त्यावर बंधनं येतायत.. पण म्हणून ती मुलांची जबाबदारी झटकत नाही. आजसुद्धा करिअरिस्ट मुली अपवाद वगळता आईपण नाकारताना दिसत नाहीत. त्यामुळे नाटकातल्या क्षमाच्या वाटयाला आलेला आईपणाचा संघर्ष आजही तीव्र आहे. तिनं करिअरपेक्षा घरालाच प्राधान्य द्यावं, स्त्रीनं नीट लक्ष दिलं नाही तर घराची, नवऱ्याची, मुलांची आबाळ होते, या मानसिकतेतून समाजमन पूर्णत: बाहेर पडलेलं नाही. पण त्याच वेळी मला असं वाटतं, की कदाचित आर्थिक रेटयापायी असेल, पण स्त्रियांच्या करिअरला आता बऱ्याच अंशी एक मान्यताही प्राप्त झाली आहे. आजची एखादी तरुण मुलगी हे स्पष्टपणे सांगू शकते, की ‘मला पोहे करता येत नाहीत. पण मी विमान चालवते!’
‘आईचं घर उन्हाचं’मधल्या क्षमाच्या आयुष्यात मुलांमुळे ज्या समस्या निर्माण झाल्या, त्यांना ती ज्या पद्धतीनं सामोरी गेली, तशाच पद्धतीनं आजची स्त्रीसुद्धा सामोरी जाताना दिसते. फुटबॉलच्या टीममध्ये जागा मिळावी म्हणून क्षमाचा मुलगा गैरमार्गाकडे वळतो. इथे तिची विश्वासार्हता, नीतिमूल्यं पणाला लागतात. तेव्हा ती मुलाला पाठीशी न घालता पोलिसांत देण्याचा निर्णय घेते. तिची घालमेल होत नाही. कारण ती डोळस, जागृत आणि खंबीर आहे. पालकांची नीतिमूल्यं आणि मुलांचं नैतिक आचरण यातला संघर्ष पिढयान्पिढया सुरू आहे. काळाच्या परिमाणात विचार केला, तर कदाचित गुन्हेगारीचा मूल्यांक आज बदलला आहे. महत्त्वाकांक्षा, समाजमान्यता, जीवघेणी स्पर्धा यामुळे आजचे पालक क्षमासारखे वागतीलच याची शाश्वती नाही. पूर्वी वर्तन चूक की बरोबर याला महत्त्व होतं. आज या दोन्ही शब्दांचे अर्थ सापेक्ष झालेत!
आणखी वाचा-सांधा बदलताना : तोच वाद, तोच संघर्ष पिढयान्पिढया ?
क्षमाची मुलगी रिक्षावाल्या- बरोबर- बबनबरोबर पळून जाऊन लग्न करते. हे अध्याहृत आहे, की मुलांच्या प्रत्येक ‘गैर’कृत्यासाठी आईलाच दोषी धरलं जातं. तेव्हाही आणि आजही. विशेषत: आई करिअर करणारी असेल तर सगळं खापर तिच्या माथी फोडलं जातं. क्षमाच्या बाबतीत तेच होतं. पण ती यशस्वी व्यावसायिक आहे. ती हळवी आहे, पण कमकुवत नाही. आपल्या या मुलीला ती स्वत:ची स्वीय सहाय्यक म्हणून नोकरी देते.
या संहितेत मुळातच क्षमाची व्यक्तिरेखा इतकी स्पष्ट आणि ठाम आहे, की कितीही होरपळ झाली तरी ती परिस्थितीला शरण जात नाही. स्थिर मनानं मार्ग काढते, अगदी तिच्या स्वगतांमध्येसुद्धा ती हळवी होत नाही. भावनिक न होणं हेच तिचं बळ आहे. मुलांचे वडिलांशी खटके उडतात, कारण वडिलांचा धाक असतो, पण आईची शिस्त असते. मुलांचा संघर्ष आईशी नसतो, या शिस्तीशी असतो. आई आणि मुलं यांच्यात जन्मत:च एक दुवा असतो. म्हणूनच नाटकातल्या एका हळव्या प्रसंगात वाद घालणारी क्षमाची मुलगी, तिला हाताचा पाळणा करून वाढवणाऱ्या आईच्या मैत्रिणीकडे नव्हे, तर पुरेसा वेळ देऊ न शकणाऱ्या आईच्याच कुशीत झेपावते. आई आणि मुलांमधल्या तरल नात्याचं उत्कट चित्रण करणाऱ्या अशा अनेक प्रसंगांची पखरण नाटकात आहे. ‘आईपण’ या शब्दाचा गाभा खोल आहे. हे आकाशाएवढं आईपण आणि ते पेलण्याचं बळ स्त्रीच्या नाजूक देहात मुळातच आहे.
या कथेच्या कालातीत असण्याबद्दल हेही सांगायला हवं, की करिअरला अत्युच्च प्राधान्य देणारी क्षमा ३२ वर्षांपूर्वी साकारणं मला समर्थपणे जमलं, याचं कारण माझ्या मनातली माझ्या आईची प्रतिमा! माझे आई-वडील डॉक्टर. त्या काळात आई प्रॅक्टिस करायची आणि अत्यंत सक्षमपणे आमचं संगोपन तिनं केलं. अतिशय गृहकृत्यदक्ष अशा आईला संसार आणि करिअरची उत्तम सांगड घालताना मी सतत पाहिलं होतं. त्यामुळेही क्षमाची भूमिका आत्मसात करणं मला अधिक सोपं झालं आणि तिचं तसं असणं पटलंही.
आणखी वाचा-‘एका’ मनात होती..! ‘करिअर वूमन’चा एकटेपणा
३२ वर्षांपूर्वी आजच्यासारखं करिअर स्त्रिया करत नसत. जगण्यातल्या धावपळीला मर्यादा होत्या, अनेक कुटुंबांत वडीलधारी मंडळी असत. आता कुटुंबं छोटी झाली आहेतच, पण स्पर्धा, ओढाताण आणि त्यातून येणारा ताण नको इतका वाढलाय. त्या दृष्टीनं पाहता आजच्या ‘क्षमां’ना आणखी कणखर व्हायला लागतंय. स्त्रीकडून अनेकदा अतिशय एकांगी अपेक्षा ठेवणाऱ्या जगाशी लढा देत आणि जवळच्या माणसांना विश्वासात घेत आजच्या क्षमा आपली वाट शोधताहेत, त्यातल्या काही यशस्वीही होताहेत. त्यांना प्रयत्नपूर्वक साधाव्या लागणाऱ्या समतोलाचा एक भक्कम परिपाठ मात्र उन्हाच्या घरात राहून चटके भोगलेल्या त्या क्षमानं घालून दिला आहे.
‘प्रश्न जुनेच, पण दृष्टी बदललेली’
‘आईचं घर उन्हाचं’ हे मी लिहिलेलं पहिलं व्यावसायिक नाटक. तत्पूर्वी प्रायोगिक नाटकं लिहिली होती. वय विशीचं आणि अनुभव नाही. पण अवतीभोवती जे बघत होतो, त्यातून ‘क्षमा’ची व्यक्तिरेखा तयार झाली. मी जेव्हा नाटक-सिनेमा, त्यातील स्त्रीवादी भूमिका लिहितो तेव्हा ती कणखर स्त्रीचीच असते. निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांचा ‘बंदिनी’ हा मला सर्वात जास्त भिडलेला चित्रपट. तो मी किमान शंभर वेळा पाहिला. स्त्री निर्णय घेते, तेव्हा तो निर्णय ती किती सक्षमपणे, अचूक घेते, ते मला ‘बंदिनी’मुळे कळलं. ‘क्षमा’ लिहिताना मनाच्या तळाशी हा विचार नक्की असावा. स्त्री-शिक्षणातून आलेल्या पहिल्या पिढीची ती प्रतिनिधी आहे. अशा पहिल्या पिढया जोवर येत राहतील, तोवर अगदी पुढची पन्नास वर्षसुद्धा स्त्रीच्या वाटयाला हा संघर्ष येतच राहणार. त्यामुळे प्रश्न तेच राहतील, फक्त त्यांचं स्वरूप बदलेल.
आजच्या परिप्रेक्षात हे नाटक लिहायचं ठरवलं, तर तेव्हा ‘कठोर करिअरिस्ट’ वाटणारी क्षमा आज समजूतदार आणि घराला सावरणारी ठरेल. कारण आजची स्त्री त्याहून अधिक परखड झाली आहे. मोठया झालेल्या मुलांमध्ये ती आज फार गुंतणार नाही. कुटुंबासाठी कदाचित जिवाचा एवढा आटापिटा करणार नाही. आज प्रत्येक जण आपापल्या सोयीनं जीवन जगत आहे. स्वत:चा आनंद स्वत:पुरता शोधत आहे. तडजोडीअभावी घटस्फोटाचंसुद्धा पाऊल उचलत आहे. आज सुखेनैव नांदणारी कुटुंबं हा फक्त ‘डिस्प्ले’ आहे. म्हणून ३२ वर्षांनंतर या नाटकातले प्रश्न जरी तसेच असले तरी त्यांची उत्तरं मात्र बदलत्या परिप्रेक्षानुसारच शोधावी लागतील. -गजेंद्र अहिरे, लेखक-दिग्दर्शक
शब्दांकन- माधुरी ताम्हणे
madhuri.m.tamhane@gmail.com