मुलांचा अभ्यास मी रोज, नियमित घेतला. शिस्तीचे धडे फार लवकर लावले. त्यांना सर्व विषयांची गोडी लावली. म्हणूनच आज माझी मुलं ज्ञानार्थी झाली आहेत. मान्यताप्राप्त संस्थेतून उच्चशिक्षण घेत आहेत. अभ्यासासाठी सराव हवा, केलेल्या अभ्यासावर मनन, चिंतन झाले पाहिजे. केवळ शाळा आणि शिकवणीच्या भरवशावर राहिल्यास पाया कच्चा राहतो. मुलांना सर्व रेडिमेड दिल्यास त्यांना कष्टाची सवय लागत नाही, लागली तरी राहत नाही. त्यांच्या क्षमता कमी होतात.
पंधरा ते वीस वर्षांपासूनच शिक्षण क्षेत्रात इंग्रजी माध्यमाचे वारे जोरात वाहायला सुरुवात झाली होती. पण मी मात्र माझ्या दोन्हीही मुलांना मराठी माध्यमांच्याच शाळेत घातले. आमच्या मूर्तिजापूरच्या (अकोला) ज्या शाळेत रोज येण्याची, इंग्रजी बोलण्याची, डब्यात विशिष्ट भाजी आणण्याची सक्ती नाही, अशा अतिशय साधारण शाळेत मुले घातली. मुलांना शिकवणी न लावता त्यांचा सर्वच विषयांचा अभ्यास घरीच घ्यायला सुरुवात केली.
वाचन, लिखाण आणि शाळेतील अभ्यास यांचे वेळापत्रक तयार केले. त्यामुळे मुले रोज दुपारी बाराला घरी आली की एकपर्यंत कपडे बदलून जेवण करून नियमाने अभ्यासाला बसायची. एकाने प्रथम शाळेचे दिलेले लिखाण करायचे. तोपर्यंत मी दुसऱ्या मुलाचे वाचन आणि लिखाण करून घ्यायची. वाचलेल्या विषयांवरील प्रश्न काढून मी वहीवर लिहायची. मुलाला फक्त उत्तरे लिहावयास सांगायची. त्यात त्याचा काना, मात्रा, वेलांटी, उकार चुकणार नाही ही काळजी घ्यायची. त्यानंतर एका तासाने पहिल्याचे वाचन, लिखाण करून घ्यायचे. तीन तास फक्त अभ्यास चालायचा. दरम्यान ना ते कुणाकडे जात ना कुणी आमच्याकडे यायची परवानगी होती. पाढे पाठ झाल्यानंतर दोघांचीही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार पक्के होईपर्यंत मी पुढचा अभ्यास घेतला नाही किंवा वर्गात जितकं शिकवलं आहे तेवढं घेऊन तो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावरच मुलांच्या इच्छेने पुढे जायचे. प्रत्येक विषयाचा थोडासाच भाग घेऊन विषय बदलायचा. प्रत्येक विषय वीस मिनिटांच्यावर घेतला नाही. त्यामुळे मुलांना कंटाळा यायचा नाही आणि लिखाण रोज नेमाने घ्यायचे.
रोजच्या लिखाणामुळे अक्षर स्वच्छ, सुंदर आणि शुद्ध झाले. मधूनच कॅलेंडर समोर ठेवून तारीख, वार विचारायची. सण, मराठी महिने, इंग्रजी महिने विचारायची. लिंबू, कांदे, बटाटे देऊन गणिते करून घ्यायची. घडय़ाळ समोर ठेवून प्रत्येक प्रश्नाचे मुद्देसूद उत्तर ठरावीक वेळात लिहिण्याचा सराव करवून घेतला. इंग्रजीचे शब्द व अर्थ रिकाम्या जागा देऊन, जोडय़ा लावायचे प्रश्न देऊन शिकविले. छोटी इंग्रजी वाक्ये कशी बोलायची हे शिकविले. पाढे, तीन अंकी आकडे, चार अंकी आकडे सतत तीन वर्षे शिकविले. त्यामुळे त्यांचे अंकगणित पक्के होण्यास मदत झाली. सर्व शिक्षण मराठीतून असल्यामुळे समजायला सोपे गेले. गणित व सायन्स शिकविताना प्लस, मायनस हे शब्द चिन्हांजवळ लिहायला सुरुवात केली. घरच्या व शाळेतल्या वह्य़ा वेगवेगळय़ा ठेवल्या. अशा प्रकारे चौथीपर्यंत गणित, विज्ञान, भाषा, इतिहास, भूगोल आणि कामापुरते इंग्रजी हे सर्वच विषय मी मुलांना शिकविले. इंग्रजीची सक्ती केली नाही.
अभ्यास रोज केल्यामुळे आमचा अभ्यास सहा महिन्यांतच पूर्ण होत असे. त्यानंतर प्रत्येक विषयाची, प्रत्येक धडय़ावरची प्रश्नपत्रिका काढून वेळ लावून त्यांना सोडवायला दिली. कोणताही विषय आवडत नाही हा भाग कधी ठेवलाच नाही. अभ्यास हा सर्वच विषयांचा आणि पूर्णच करायचा असतो हेच सतत शिकविले आणि करवून घेतले. शाळेत त्यांची उजळणी होत असे. शाळेत मुले सर्वात पुढेच होती. मुले हुशार आहेत म्हणून शाळेनेही त्यांच्यावर कोणताही नियम लादला नाही. उलट मला बोलावून मुलांच्या व्यवस्थितपणाचे, अक्षरांचे कौतुक करायचे. स्कॉलरशिपचा अभ्यास घेताना सर्व अभ्यास झाला की अर्धा तास जास्त घ्यायचा. पहिल्या दिवशी गणित, नंतर भाषा, तिसऱ्या दिवशी बुद्धिमत्ता. गणिताची सूत्रे एकत्र लिहून त्याचे तक्ते बनवून भिंतीवर लावले. तसेच संस्कृतचे, भौतिकशास्त्राच्या सूत्राचे असे अनेक तक्ते बनविले. त्यामुळे मोकळय़ा वेळात मुलांची नजर त्यावर जात असे. पुढे पुढे तर मुले केस पुसता-पुसतासुद्धा तक्ते वाचीत असत. अशा प्रकारे एक ते चार एवढा वेळ मुले अभ्यास करीत नंतर चार ते सहा मैदानी खेळ खेळत असत. त्याचबरोबर उन्हाळय़ाच्या सुट्टीत एक-एक तास कॉम्प्युटर क्लास, कधी चित्रकला, कधी तबला, कधी पेटीवादन असेही क्लास लावले. क्रिकेटचे तर त्यांना वेड होतेच. त्यातही ती पुढेच होती.
दिवाळीपर्यंत किंवा डिसेंबर महिन्यापर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करून शाळेतील पेपर्स, मी काढलेले पेपर्स मुले ठरावीक वेळात सोडवायची आणि उरलेल्या वेळात अवांतर वाचनही करायची. त्यामुळे त्यांना रोज प्रार्थनेच्या वेळी गोष्ट सांगण्याची संधी मिळत असे. भाषण देणे तर त्यांना फार आवडायचे. कुणाचीही जयंती, पुण्यतिथी असो मुलं भाषणं द्यायचीच.
त्यांच्या प्रत्येक विषयाचा अभ्यास करून मी त्यांना प्रत्येक पान घरी शिकविले. त्यांना पूर्ण अभ्यास करण्याची, रोज अभ्यास करण्याची आणि स्वत: अभ्यास करण्याची सवय लागली. माझे एखादे दिवशी अभ्यास घेणे झाले नाही तर मुले स्वत:च पुढचा अभ्यास करायची. तेही पाठय़पुस्तक वाचून! गाईडचा उपयोग न करता. स्वत:च्या भाषेत उत्तरे लिहायची.
पाचवीपासून मी त्यांचे गणित, सायन्स, इंग्रजी आणि संस्कृत हेच विषय घेतले. बाकीचा अभ्यासक्रम त्यांनीसुद्धा सहाच महिन्यांत पूर्ण केला. आम्हाला एखादे गणित आले नाही तर आम्ही चार पुस्तके गोळा केली, वाचली आणि स्वत:हूनच त्यातून शिकलो. शिकवणी नाही, शाळीची सक्ती नाही, सातवीपर्यंत मराठी माध्यम, सर्व अभ्यास घरीच यामुळे त्यांना वेळ भरपूर मिळायचा. त्यामुळे उरलेल्या वेळात वाचन, क्रिकेट, चित्रकला, संगीताचे क्लासेस, गॅदरिंगच्या हस्तकलेपासून तर नाटकापर्यंत सर्वच कार्यक्रमात भाग घेणे, सभांना जाणे, हे सर्व छंद माझ्या मुलांनी जोपासले. त्यामुळे त्यांना वेळ पुरत नसे. मी त्यांना कधीही रिकामे पाहिले नाही.
त्यांना कष्टाची सवय, शिस्त आणि सखोल आणि स्वत:च अभ्यास करण्याचे वळण लागले. आम्ही कधीही टीव्ही बंद ठेवला नाही की कधी जास्त पाहिला नाही. स्वच्छता, टापटीप, पाण्याचे महत्त्व, विजेचे महत्त्व या गोष्टी ते आपोआप शिकत गेले. परिणाम असा झाला की, माझी दोनही मुले चौथी व सातवीच्या स्कॉलरशिपमध्ये मेरिटमध्ये आली. पाचवीत नवोदयकरिता निवडली गेली. आठवी/ नववीच्या महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत मेरिटमध्ये आली. पुढे दहावी, बारावीलाही मेरिटमध्ये आली. सीईटीसारख्या परीक्षांमध्ये ९५ टक्के मार्कस् मिळवून आज सी.ओ.ई.पी. सारख्या उच्च दर्जाच्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. तेथेही टॉपरच आहेत.
आठव्या वर्गात गेल्याबरोबरच मी त्यांना सायन्स आणि गणित उन्हाळय़ातच इंग्रजी माध्यमातून शिकवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे इंग्रजी माध्यमातही ती मागे पडली नाही हे सर्व साधले फक्त घरच्या शिकवणीमुळे. मी न सांगताही माझी मुलं आज ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’, ‘ व्यक्ती आणि वल्ली’ आदी पुस्तके खरेदी करतात. हे यश त्यांनी स्वकष्टाने आणि बिनाकॉपीने मिळविले. असे केल्यासच ग्रामीण भागातील मुलेही शहरी भागात टिकतात. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा, हे त्यांना कळले. वाचलेले लिहिता आले पाहिजे आणि लिहिलेले सांगता आले पाहिजे, हे जर लक्षात ठेवले तर मुलांना शिकणे जड जात नाही.
मी सतत १२ ते १४ वर्षे मुलांना शिकविले. संस्कृतपासून भूगोलाच्या नकाशा वाचनापर्यंत, केमेस्ट्रीच्या इक्वेशनपासून तर स्टॅटिस्टिक्सपर्यंत. त्यासाठी मला प्रथम अभ्यास करावा लागला. दवाखान्यातील रुग्ण, घर सांभाळून हे रोज करताना खूप त्रास झाला. पण मुले हुशार झाली, कष्टाळू, विनयशील तसेच अपयशसुद्धा पचविणारी झाली. दुसऱ्यांना मदत करणारीही झाली. सतत कार्यमग्न राहणारी झाली. मुख्य म्हणजे माझ्या वीस पावले पुढे गेली, हे पाहून खूप आनंद झाला. त्यांचे खूप सत्कार झाले. म्हणून सांगते, मुलांना केवळ पैसाच नाही तर वेळही द्यावा लागतो. तेव्हा सर्वागीण विकास झालेला परिपूर्ण ‘माणूस’ बनतो आणि मुले ज्ञानार्थी बनतात.
घरी शिकवल्याचा फायदा
मी सतत १२ ते १४ वर्षे मुलांना शिकविले. संस्कृतपासून भूगोलाच्या नकाशा वाचनापर्यंत, केमेस्ट्रीच्या इक्वेशनपासून तर स्टॅटिस्टिक्सपर्यंत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-03-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advantages of home tuitions